इराणच्या ‘बंदर अब्बास’ या बंदरावर रजिस्टर झालेली ‘इराण जोमुरी’ ही
मालवाहतुक बोट, ब्राझीलच्या एका बंदरावर काही महिन्यापूर्वी येऊन पोचली. या
बोटीवरच्या मालापैकी बरेचसे कंटेनर इंग्लंडहून पाठवले गेले होते व बिल ऑफ
लेडिन्ग प्रमाणे या कंटेनर्समधे भंगार प्लॅस्टिक भरलेले होते व
ब्राझीलमधल्या प्लॅस्टिक रीसायकल करणार्या कंपन्यांसाठी ते पाठवले गेलेले
होते. आणखी एका मालवाहतुक बोटीवरूनही असेच कंटेनर्स आले होते. एकूण
कंटेनर्सची संख्या 89 एवढी होती. हे सर्व कंटेनर्स तीन बंदरांच्यावर उतरवले
गेले. ब्राझीलच्या कस्टम्स अधिकार्यांनी जेंव्हा तपासणीसाठी हे कंटेनर्स
उघडले तेंव्हा असह्य अशा दुर्गंधीचा त्यांना सामना करावा लागला. आधिक
तपासणी केल्यावर त्यांना असे आढळून आले की त्या कंटेनर्समधे भंगार
प्लॅस्टिक नव्हतेच. ते सर्व कंटेनर्स इंग्लंडमधल्या घराघरातून फेकल्या
गेलेल्या कचर्यानेच पूर्णपणे भरलेले होते. या कंटेनर्समधे काय नव्हते असे
विचारा. वापरलेले बेबी डायपर्स, इंजेक्शनच्या वापरलेल्या सिरिंज, कंडोम,
बॅटरीज, उष्टे व पूर्णपणे सडलेले व कुजलेले अन्न पदार्थ, वापरलेले
डिटर्जन्ट्स आणि फाटकी तुटकी फडकी, या असल्या पदार्थांनी ते 89 कंटेनर्स
शिगोशिग भरलेले होते. या कचर्याचे एकूण वजन होते 1400 टन.

ब्राझीलमधील अधिकारी साहजिकच अतिशय संतापले. “आमचा देश काय आंर्तराष्ट्रीय कचरा डेपो आहे का?” अशी तप्त प्रतिक्रिया एका अधिकार्याने दिली. बंदरावरच्या अधिकार्यांच्या माहितीप्रमाणे ही कन्साइनमेंट इंग्लंडमधल्या फेलिक्स्टोव (Felixstowe) या बंदरावरून पाठवली गेलेली होती. आधिक तपासाअंती असे लक्षात आले की हा कचरा बर्याच ब्रिटिश कंपन्यांनी पाठवलेला होता. यात स्विंडन (Swindon) गावातल्या दोन कंपन्या, ‘वल्डवाइड बायोरीसायकलेबल्स’ आणि ‘यूके मल्टीप्लास’ या कंपन्या प्रमुख होत्या. त्यांचा मालक ’ज्युलिओ सीजर रॅंडो डिकोस्टा’ याने या बाबतीत चक्क कानावर हात ठेवले. त्याच्या मते त्याच्या पुरवठादार कंपन्यांना त्याने प्लॅस्टिक भंगाराचीच ऑर्डर दिली होती.

आता दोषी कोण? हे शोधून काढण्याची प्रक्रिया चालू आहे. इंग्लंडच्या अधिकार्यांनी आपला कचरा आपण परत इंग्लंडमधे घेऊन जाऊ असे मान्य केले आहे. या कन्साइनमेंटमधल्या काही मोडक्या खेळण्यांच्यावर, “ ब्राझीलमधल्या दरिद्री मुलांना देण्याआधी धुऊन घेणे” अशी चिठ्ठी चिकटवलेली आढळली. ब्राझीलियन लोकांना ही चिठ्ठी जखमेवर मीठ चोळल्यासारखी वाटली असली तर त्यात काही नवल नाही.
26 जुलै 2009