Saturday, 13 September 2014

फेअर आणि लव्हली!

भारतात मिळणार्‍या सौंदर्य प्रसाधनात, सगळ्यात लोकप्रिय कोणते असा प्रश्न जर विचारला तर उत्तर देणे फारसे कठिण नाही. त्वचेचा रंग उजळवतो असा दावा करणारे कोणतेही प्रसाधन(प्रत्यक्षात काय होते ते सांगणे कठिण आहे.) बाजारात हातोहात खपते. या क्षेत्रातल्या बहुतेक सर्व कंपन्या हे उत्पादन कोणत्या ना कोणत्या नावाखाली बनवतातच. हिंदुस्तान युनिलीव्हर सारख्या मोठ्या कंपनीने सुद्धा आपल्या वार्षिक अहवालात, त्वचेची निगा राखणार्‍या त्यांच्या अनेक उत्पादनांच्यात, या रंग उजळवणार्‍या क्रीमचे स्थान महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षात, या रंग उजळवणार्‍या क्रीम्सची ग्रामीण भागात होणारी विक्री शंभर टक्क्यांनी वाढली आहे आणि आतापर्यंत मुख्यत्वेकरून स्त्रियाच वापरत असणारे हे उत्पादन, आता पुरुषही वापरू लागले आहेत आणि त्याचा खप प्रतिवर्ष 20 टक्क्यांनी वाढतो आहे. ईमामी, निव्हिया व गार्निये सारख्या कंपन्याही आता ही उत्पादने बनवू लागल्या आहेत आणि आता पुरुषांसाठी खास रंग उजळवणार्‍या क्रीम्स पण बाजारात आल्या आहेत.

ग्राहकोपयोगी उत्पादने बनवणारी कंपनी बाजारात आली की ती त्या उत्पादनाची जाहिरात  सर्व माध्यमातून देणे सुरू करतेच. त्याप्रमाणे या रंग उजळवणार्‍या क्रीम्सच्या जाहिरातींचा भडिमार आपल्यावर सतत होतो आहेच. या जाहिरातींमधे एक समान सूत्र असते. एक व्यक्ती(स्त्री किंवा पुरुष) तिला हवी असलेली नोकरी किंवा मित्र ( मैत्रिण) मिळत नाही म्हणून निराश असते. त्या व्यक्तीचा एक उजळ वर्णाचा मित्र(मैत्रिण) तिला ही क्रीम देतो. थोड्याच दिवसात या व्यक्तीचा वर्ण उजळतो व तिला हवी असलेली नोकरी किंवा मित्र मैत्रिण अर्थातच मिळते.

भारतातील राज्यसभेच्या व कम्युनिस्ट पक्षाच्या एक सभासद, श्रीमती बृंदा कराट यांना या जाहिराती वर्ण भेदाला प्रोत्साहन देतात आणि काळ्या वर्णांच्या व्यक्ती कमी दर्जाच्या आहेत असे चित्र तुमच्या मनात त्या रंगवतात असे वाटते. या जाहिराती बघून असे वाटू लागते की तुमचे अंगभूत गुण, कौशल्य व शिक्षण यांना काही महत्व नसून, तुमची त्वचा उजळ झाली की तुम्हाला जगात काय पाहिजे ते मिळते. श्रीमती कराट या जाहिरातींवर फारच संतप्त झालेल्या असून त्यांनी आता या जाहिरातींविरूद्ध सरकारी यंत्रणेकडे तक्रार केली आहे.

श्रीमती कराट यांच्या मताला कोणाचाही विरोध असण्याचे काहीच कारण मला तरी दिसत नाही. प्रत्यक्षात कोणतीही नोकरी त्या उमेदवाराची पात्रता बघूनच त्याला दिली जाते. काही ठराविक नोकर्‍यांच्यात मात्र ती व्यक्ती दिसते कशी याला महत्व असते. उदाहरणार्थ रिसेप्शनिस्ट, हवाई सुंदरी वगैरे. अशा ठिकाणी कदाचित त्वचेचा रंग हा मुद्दा निवड प्रक्रियेत असू शकेल. अशा थोड्या नोकर्‍या सोडल्या तर बाकी ठिकाणी उमेदवाराची पात्रता हाच महत्वाचा मुद्दा असतो. आता राहिला मित्र किंवा मैत्रिण मिळण्याचा मुद्दा. कोणाला कोण आवडेल हे सांगणे खरोखरच कठिण आहे. एकदा एखादी व्यक्ती आवडली की ती काळी आहे का गोरी? हा मुद्दा गौण ठरतो असे मला वाटते. प्रत्यक्षात जर असे घडत असले तर मग या जाहिराती निराळेच चित्र का आपल्या समोर उभे करतात? सर्व सामान्यांना ते खरोखरच आवडते का?

या प्रश्नांची उत्तरे खरे म्हणजे आपल्या मानसिकतेतच आहेत. अगदी लहानपणापासून, बालगाणी, गोष्टी यांच्यातून उजळ व्यक्ती ही जास्त सुंदर, जास्त छान हे आपल्या मनावर ठसतच जाते. “नंदा अमुची छान ग! गोरी गोरी पान ग!” किंवा “ दादा मला एक वैनी आण! गोरी गोरी पान, फुलासारखी छान!” या सारखी गाणी या मानसिकतेचीच उदाहरणे आहेत. असे म्हणतात की भारतीय लोक सर्वात मोठे वर्णभेद पुरस्कर्ते आहेत. हे जवळपास खरेही आहे असे मला वाटते. काही लोकांच्या मते ब्रिटिशांच्या काळापासून आलेली ही मानसिक गुलामगिरी आहे. परंतु गोरा रंग हा जास्त चांगला हा आपला समज त्यापेक्षा कितीतरी जुना आहे असे मला वाटते. सौंदर्याची जी काही लक्षणे आपण मानतो त्यात चाफेकळीसारखे नाक,  छोटीशी जिवणी याचबरोबर गोरा वर्ण हे ही सौंदर्याचे प्रमुख लक्षण मानले जाते. वधु किंवा वर पाहिजेच्या बाजारात गोर्‍या रंगाचा भाव इतका वर काही उगीच नसतो.

आपण आहोत त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसावे असे कोणालाही वाटणे साहजिकच आहे. तरुण वयात तर याचे सर्वात जास्त महत्व असते. टक्कल पडलेले लोक टोप घालतात किंवा आता केसांचे रोपणही करतात. चेहर्‍यावर पडलेल्या सुरकुत्या घालवण्यास ‘बोटॅक्स’ची इंजेक्शने घेतात. आपले अवयव जास्त सौष्ठवपूर्ण दिसावे म्हणून चरबीची इंजेक्शने घेतात किंवा सिलिकोनचे घनपदार्थ शल्यक्रियेने शरिरात बसवून घेतात. मग गोरे म्हणजे जास्त छान हे एकदा ठरवले की ही क्रीम लावून जास्त गोरे दिसण्याचा प्रयत्न करणे यात मला तर काहीच गैर दिसत नाही. आपल्या याच मानसिकतेचा फायदा या जाहिराती घेतात व जाहिरात केलेले उत्पादन कसे श्रेष्ठ आहे हे आपल्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करत रहातात.

श्रीमती कराट यांना राग येवो किंवा क्रोध येवो, जोपर्यंत भारतातल्या लोकांना आपण जास्त उजळ दिसावे असे वाटते आहे तोपर्यंत या क्रीम्सचा खप वाढतच जाणार आणि अर्थातच या क्रीम्सच्या जाहिरातींचा भडिमार पण आपल्यावर होतच रहाणार.


12 सप्टेंबर 2009