Showing posts with label विमान प्रवास. Show all posts
Showing posts with label विमान प्रवास. Show all posts

Monday, 15 December 2014

प्रवास आणि मोबाईल विना?


काही दिवसांपूर्वी मी दख्खनच्या राणीने मुंबईहून पुण्याला येत होतो. अलीकडे या गाडीला वातानुकुलित आसन कक्ष नावाचे डबे बसवलेले असतात. मी लहान असताना दख्खनची राणी मोठी प्रसिद्ध गाडी होती. या गाडीला फक्त आठ का नऊ डबे असत. त्यात एक डबा खानपान सेवेचा असे. उरलेल्या डब्यांना प्रथम वर्गाचे डबे असत. प्रवास इतका आरामदायी असे की काही विचारू नका. तुम्ही चौघे जण प्रवास करत असलात तर स्वतंत्र कंपार्टमेंट प्रवासासाठी मिळत असे त्यामुळे प्रायव्हसी पण असे. 1960-70 च्या दशकात कधीतरी आसन कक्ष आले. तरी ही आसने बरी होती म्हणायला हरकत नाही. एका ओळीत चार आसने असत. त्यामुळे भरपूर जागा असायची. खरे तर प्रथम वर्गात एका ओळीत 3 माणसांचीच बसण्याची व्यवस्था असते. पण आधुनिकीकरणाच्या नावाखाली आणखी एक माणूस एका ओळीत रेल्वेने घुसडला. ही व्यवस्था बरीच वर्षे होती नंतर 1990 च्या दशकात हे आसन कक्ष वातानुकुलित केले गेले. या बरोबरच एका ओळीत 5 माणसांना बसवण्याला सुरूवात झाली. म्हणजे भाडे तेवढेच पण प्रत्येक प्रवाशाला जागा मात्र आणखी कमी अशी सुधारणा रेल्वे करत गेली.
तर हे आसन कक्ष वातानुकुलित असल्याने डब्यांचा रूळावरून जात असल्याने ऐकू येणारा खडखडाट आता डब्याच्या आत कमी ऐकू येतो. हे जरी चांगले असले तरी त्यामुळे प्रवाशांच्या आपापसांतल्या गप्पा या खाजगी राहूच शकत नाहीत. त्या सार्वजनिकच होऊन जातात. त्यात भरीस भर म्हणून मोबाईलचे रिंग टोन व फोनवरचे बोलणे हे ही सगळ्यांना ऐकू जातेच. मी एकदा पुण्याहून निघालेलो असताना माझ्या समोरचे गृहस्थ घराची किल्ली बरोबर घेऊन आले. घरच्या लोकांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांना पोचवायला स्टेशनवर आलेल्या पण आता परतीच्या रस्त्यावर रिक्षामधे असलेल्या बायकोला फोन लावला. पुढची 5 मिनिटे त्यांच्या घराची डुप्लिकेट कोणत्या खिडकीच्या मागे कशी दडवून ठेवलेली आहे याचे बारीक वर्णन डब्यातल्या आम्हा इतर प्रवाशांना नीट कळले. कोणी गैरफायदा घेऊ इच्छिणारा जर डब्यात असता तर त्या गृहस्थांच्या घराचे काही खरे नव्हते.
तर त्या दिवशी मुंबईहून परत येत असताना सह- प्रवाशांना सारखे फोन येत होते. बहुतेक प्रवाशांना ते कोठेपर्यंत आले आहेत? हीच विचारणा होत होती. “कर्जतला पोचलो. खंडाळ्याला पोचलो.” वगैरे वगैरे. लोणावळा सुटले तसे डब्यातून बाहेर फोन जाऊ लागले “न्यायला येता आहात ना?” कुठे उभे राहायचे? शिवाजीनगरला उतरणार की पुणे स्टेशन? क्वचित एखादा फोन मुंबईलाही होत होता. मी बहुदा एकटाच असा प्रवासी होतो की ज्याला एकही फोन आला नाही व करावासा वाटला नाही. मी घरून निघताना निघत असल्याचे कळवले होते. नेहमीच मी पुणे स्टेशनला उतरतो. त्या दिवशी तसाच उतरणार होतो. सांगण्यासारखे काहीच नव्हते.
मला मोबाईल फोनची सेवाच उपलब्ध नव्हती तेंव्हाचे दिवस आठवले. कामानिमित्त मी नेहमीच पुणे-मुंबई अशा एका दिवसाच्या ट्रिप्स करत असे. सकाळी एकदा घरून निघालो की त्यानंतर रात्री परत घरी पोचेपर्यंत घराशी काहीच संपर्क रहात नसे. फॅक्टरीमध्ये सुद्धा संपर्क होणे कठीण होते. अगदी फारच अडचण असली तर एक दोन कॉंन्टॅक्ट क्रमांक आम्हास माहीत असत. पण सहसा त्याचा वापर करत नसू.
एकदा एशियाड सेवेने मुंबईला निघालेलो असताना, रस्त्यावर वाहतुक मुरंबा असल्याने, लोणावळ्या जवळच्या मळवली गावात संबंध दिवस काढून मी परत रात्री पुण्याला आलेलो आठवते. पण घरी काही पत्ताच नसल्याने मी मुंबईला गेलोच नाही हे रात्रीच कळले.
मोबाईल विना प्रवासाला तशा दोन बाजू होत्या. पुष्कळ वेळा अज्ञानात सुख असते त्या प्रमाणे फॅक्टरीत आलेले किंवा घरगुती प्रॉब्लेम मला दुसर्‍या दिवसापर्यंत समजत नसत. त्यामुळे ज्या कामासाठी मी प्रवासाला निघालेलो असे त्या कामावर लक्ष नीट लावून ते काम करत यायचे. मधे आम्ही काही मित्र दिल्लीला गेलो होतो. तेथे माझ्या बरोबरचे मित्र त्यांच्या धंद्याचेच प्रश्न दिल्लीला बसून बहुतेक वेळ सोडवताना दिसले. म्हणजे दिल्लीचे काम बाजूलाच राहिले. पण खरोखरच काही सिरियस प्रॉब्लेम असला तर तो मला लगेच कळत नसे व त्यामुळे नुकसानही होत असे.
पण मग कोणता प्रवास जास्त बरा? मोबाईल विना का मोबाईल सकट? या प्रश्नाचे उत्तर मी अर्थातच मोबाईल सह असेच देईन. मोबाईल बरोबर असला तर तुम्हाला आणि घरातल्या सगळ्यानाच एका प्रकारे सुरक्षितता वाटते. पूर्वी परदेश प्रवासाला निघाले की विमानतळावर शिरल्यानंतर तुम्हाला कोणताही संपर्क घरच्यांशी ठेवता येत नसे. एकदा माझी हॉन्गकॉन्गची फ्लाईट 24 तास उशीरा सुटली. पण ही गोष्ट मला विमानतळावरून घरी आणि परदेशातल्या नातेवाईकांना कळवणे सुद्धा इतके कठीण गेले की विचारू नका. आता विमानतळावर मोबाईल चालतात त्यामुळे विमानात बसेपर्यंत व विमान उतरल्याबरोबर घरी संपर्क साधता येतो.
मात्र मोबाईल हा एखाद्या दुहेरी शस्त्रासारखा आहे. त्याचा गैर उपयोगही हो ऊ शकतो किंवा बहुतेक वेळा होतोच. तो टाळता आला तर ही आधुनिक सुविधा आपल्याला जास्त उपयोगी आणि सोईची पडेल असे मला तरी वाटते.
2 ऑक्टोबर 2011

Saturday, 6 December 2014

निमित्त विमानप्रवासाचे


मागच्या आठवड्यात विमानाने दिल्लीला जाण्याचा योग आला. खूप वर्षात विमानाने भारतामधे प्रवास केला नव्हता. दिल्लीला तर मागच्या तीस वर्षांत गेल्याचे आठवत नाही. त्यामुळे सगळेच नवीन होते. अगदी पुण्याच्या विमानतळापासून. आमचे विमान सकाळी साडे अकराच्या सुमारास सुटणार होते. माझा जुना अनुभव लक्षात होता. त्या वेळेस पुण्याचा विमानतळ म्हणजे अगदी छोटासा होता. एका वेळी जेमतेम एखादे विमान विमानतळावर येऊन उभे रहात असे आणि तेही इंडियन एअरलाइन्सचे डाकोटा किंवा DC3 विमान. दुसरी कोणतीही विमान सेवा देणारी कंपनीच तेंव्हा नव्हती. विमानतळावर गेल्यावर तिथली गर्दी बघून धक्काच बसला. सात आठशे माणसे तरी कोठेतरी निघालेली होती. आत गेल्यावर लक्षात आले की समोर चार किंवा पाच विमाने थांबलेली आहेत. ती सुद्धा मोठी जेट विमाने. त्यातली तीन विमाने तर दिल्लीलाच निघणार होती. तीन विमान कंपन्यांची दिल्लीला जाणारी विमाने दहा पंधरा मिनिटाच्या फरकाने आता दिल्ली कडे जाणार होती. हे सगळे माझ्या कल्पनेच्या आवाक्याच्या बाहेरचे वाटते होते. मग तिथला एक बोर्ड बघितला. त्या बोर्ड प्रमाणे रोज दिल्लीला जाण्यासाठी 11 विमान सेवा होत्या. म्हणजे 1500 ते 2000 प्रवासी रोज पुण्याहून दिल्लीला जाऊ शकत होते. आमच्या फ्लाईटला असलेली गर्दी बघून एवढी मंडळी रोज दिल्लीला जात असणारच याची खात्रीच पटली.
विमानाचे तिकिट मी जालावरून काढले होते. त्याचे फारसे अप्रूप मला नव्हते कारण परदेश प्रवासाची तिकिटे मी जालावरून काढतोच. परंतु आश्चर्य वाटले ते एका नव्या प्रकारच्या संकेत स्थळांचे किंवा वेब साईट्सचे. सिंगापूर एअरलाईन किंवा सिल्क एअर यासारख्या विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर जाऊन तिकिट काढणे हे माझ्या परिचयाचे होते. पण आता या नवीन संकेतस्थळांवर कोणत्याही विमान कंपनीच्या विमान सेवेचे तिकिट काढता येते. त्यांचे दर आता पूर्वीसारखे फिक्स पण नसतात व ते सारखे बदलत राहतात. शोधाशोध करून स्वस्त फ्लाईट मिळू शकते हा सगळा प्रकार मला नवीनच होता.
1960 किंवा 1970 च्या दशकात केलेले विमान प्रवास मला अजून आठवतात. तिकिट काढण्यासाठी विमान कंपन्यांच्या ऑफिस मधे जाणे मग ती लांबलचक अनेक पाने असलेली तिकिटे, त्याच्या बरोबर एखादे प्लॅस्टिक फोल्डर मिळत असे. ते घ्यायचे. ते तिकिट जपून ठेवायचे कारण ते दाखवल्याशिवाय तुम्हाला चेक इन करता येत नसे. तिकिटावरचे नाव आणि तुमचे नाव हे एक असलेच पाहिजे असे नव्हते कारण तिकिटावर नाव असलेली व्यक्ती खरोखरच प्रवास करते आहे का ही माहिती करून घेण्याची विमान कंपन्यांना जरूरीही नसे व ते महत्वाचे पण नव्हते. अलीकडे तिकीट नसले तर एअरपोर्ट वर छापून मिळते पण तुमचे सरकारी ओळखपत्र नसले तर तुम्हाला विमानात प्रवेश मिळणे मुष्किलच. त्या वेळेला सुरक्षा जांच वगैरे प्रकारही नव्हते. सामानही कोणी तपासत नसे. अलीकडे सामान क्ष किरणांनी तपासल्याशिवाय पुढे जाणेही शक्य नाही. पुण्याचा विमानतळ म्हणून तेंव्हा वायुदलाचा एक हॅन्गर वापरात येत असे. प्रवाशाला पोचवायला आलेला कोणीही अगदी विमानाच्या थोड्या अलीकडे पर्यंत जाऊ शकत असे. मी बंगलुरुला रहात असताना माझे वडील मला एकदा भेटायला आले होते. त्यांच्या अगदी विमानापर्यंत त्यांना पोचवायला गेल्याचे मला आठवते. आता पोचवायला आलेल्या माणसाला इतक्या लांब अंतरावरूनच परत पाठवतात की विमानतळावर निरोप द्यायला जाण्यासारखा मूर्खपणा नसावा.
आमच्या दिल्लीच्या विमानफेरीत हवाई सुंदर्‍या होत्या पण खाणे पिणे वगैरे काही नव्हतेच त्यामुळे त्यांना फारसे काम पण नव्हते.विमानाची साफसफाई करताना त्याच दिसल्या. अगदी पिण्याचे पाणी हवे असले तरी ते अलीकडे विकत घ्यावे लागते. पूर्वी थंडगार तेलकट समोसे. लेमन किंवा चहा कॉफी , लेमनच्या गोळ्या, यू-डी कलोन वगैरे सारख्या मिळणार्‍या कोणत्याच गोष्टी आता मिळत नाहीत. विमानसेवेचे तिकिट काढल्यावर विमान कंपनी त्या स्थळावर तुम्हाला पोचवण्याची जबाबदारी घेते. बाकी तुमचे तुम्ही बघायचे. नशीब की आंतर्राष्ट्रीय विमान सेवांच्यात अजून जेवण खाण देतात. नाहीतर दहा बारा तास प्रवास करायचा पण खायला प्यायला विकत घ्यायचे हा प्रकार सुरू झाला नाहीये.
माझ्या एक परिचित महिला आहेत. स्वकष्टाने अगदी साधारण परिस्थितीतून वर आलेल्या. परवा त्या मला म्हणत होत्या की या सुट्टीत शिमला, मनालीची सफर करण्याचा बेत आहे पण मुलगा म्हणतो आहे की दर वेळेस आपण कोठेही जायचे असले की द्वितीय वर्गाने, फार फार तर शयन यान, प्रवास करतो. आता विमानाने जाऊया. मी आश्चर्याने थक्क झालो. पूर्वी विमान जवळून बघितले असलेल्यांची संख्या (आत बसण्याचे सोडूनच द्या.) नगण्य असे. आता सामान्य माणसे सुद्धा विमानाने जाण्याचे बेत करू लागली आहेत. भारत समृद्धीच्या मार्गाने नक्की वाटचाल करतो आहे याची ही एक खूण आहे नक्की. काही वर्षात रेल्वे स्टेशनसारखी गर्दी बहुदा विमानतळांच्यावर होऊ लागेल आणि ती तशी व्हायलाच पाहिजे आहे.
माझी दिल्लीची ट्रिप संपवून मी पुण्याच्या विमानतळावर उतरलो तेंव्हा रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. विमानतळावर गर्दीचा महापूर होता कारण एका पाठोपाठ विमाने उतरत होती. बाहेर आल्यावर वाहतुक मुरंब्याने सर्व वाहतुक कोलमडली असल्याचे लक्षात आले. याच पुण्यात, रात्रीचे आठ वाजून गेल्यावर रस्त्याने जायला नको वाटे. लोहगावच्या आसपास तर भटकी कुत्री सुद्धा बहुदा फिरकत नसावीत. या भूतकालाची मला आठवण झाली आणि मोठी गंमत वाटली.
कालाय तस्मै नम: हेच खरे.
4 मार्च 2011

Monday, 6 October 2014

वैयक्तिक गुप्ततेचा शेवट

जॉर्ज ऑरवेल या ब्रिटिश लेखकाने 1949मधे, ‘1984’ या नावाची एक जगप्रसिद्ध कादंबरी लिहिली होती. या कादंबरीत, एकाधिकारशाहीमधे खितपत असलेल्या एका समाजाच्या असहाय्यतेचे मोठे भीषण वर्णन आहे. या कादंबरीत केलेल्या वर्णनाप्रमाणे, सर्व सार्वजनिक व खाजगी जागांच्यात मोठे दूरदर्शन कॅमेरे असे बसवलेले असतात की कोणत्याही माणसाचे कुठलेही सार्वजनिक किंवा खाजगी वर्तन अधिकार्‍यांच्या नजरेतून सुटू नये.

जगभर पसरलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे, सर्वसामान्य माणसावर, आता या कादंबरीत वर्णन केलेल्या दूरदर्शन कॅमेर्‍यांना सामोरे जाण्याची वेळ, निदान सर्व आंतर्राष्ट्रीय विमानतळांवर तरी येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी एका नायजेरियन नागरिकाने आपल्या कमरेभोवती विस्फोटके बांधून एक अमेरिकन विमान हवेतच उडवण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने हा प्रयत्न फसला. परंतु हा नायजेरियन माणूस, कमरेभोवती विस्फोटके बांधलेली असताना सुद्धा विमानतळांवरच्या सर्व सुरक्षा कवचांमधून सुटल्यामुळे, विमानतळांवरच्या सुरक्षा तपासणी प्रणालींच्या कार्यक्षमतेबाबत परत संदेह निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून प्रवाशाच्या संपूर्ण शरीराचे अनावृत्त चित्र दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दर्शवतील अशी यंत्रे(Whole Body Scanners) विमानतळांवर बसवली जाऊ लागली आहेत. नायजेरिया व हॉलंड या दोन देशांनी अशी यंत्रे विमानतळांवर बसवलीही आहेत.





ही यंत्रे कार्य तरी कशी करतात? या यंत्रातील कॅमेर्‍यासमोर प्रवाशाने दोन्ही हात वर करून एखादे सेकंद उभे रहावयाचे असते. या यंत्रातून अगदी कमी शक्तीच्या एक्स किरणांचे प्रक्षेपण होते. हे किरण अंगावरच्या कपड्यांच्यातून आत शिरतात व शरीराची संपूर्ण अनावृत्त छबी सुरक्षा अधिकार्‍याच्या समोरच्या टी.व्ही.च्या पडद्यावर दिसू लागते. जर त्या प्रवाशाने काही हत्यारे किंवा विस्फोटके शरीरावर लपवण्याचा प्रयत्न केलेला असला तर पडद्यावर ते लगेच दिसते. या सुरक्षा प्रणालीमुळे दहशतवाद्यांना विमानात चढण्यासाठी प्रतिबंध केला जाईल असा विश्वास सुरक्षा अधिकार्‍यांना वाटतो आहे.





या यंत्रांबद्दलची सर्वसाधारण प्रवाशांची प्रतिक्रिया साहजिकपणे अतिशय कटू आहे. एक डच महिला याला एक प्रकारचा बलात्कारच मानते आहे. दुसर्‍या एका प्रवाशाच्या मते हा प्रकार भयानक आहे.




सर्वसाधारणपणे अमेरिकेतील विमानतळांवर ज्या सुरक्षा चाचण्या होतात त्या प्रवाशांच्या मताप्रमाणे आधीच मानहानीहारक व वैयक्तिक स्वातंत्र्याला अनादर दाखवणार्‍या असतात. म्हातार्‍या व अधू प्रवाशांना चालायला लावणे, बूट काढून ते उभ्या उभ्याच परत घालावयाला लावणे. वगैरे त्रासदायक प्रकारात आता या नवीन यंत्राची भर पडली तर ते अत्यंत अपमानास्पद होणार आहे. चाऊशेस्क्यू (Ceausescu) च्या राजवटीतले हाल सहन केलेल्या एका रुमानियन माणसाच्या मते या यंत्रासमोर उभे राहणे जास्त अपमानास्पद आहे. धार्मिक बंधने म्हणून बुरखा किंवा ओढणी घेणार्‍या महिलांना तर या यंत्रासमोर उभे रहाणे हे धर्माविरुद्ध वाटते आहे. अनेक महिला व विशेषकरून तरूण महिला यांना तपासणी करणार्‍या पोलिस दलातील, विकृत व्यक्तींचीही भिती वाटते आहे.





दहशतवाद्यांमुळे सर्वसाधारण नागरिकांना जे त्रास सहन करावयास लागत आहेत त्यात आणखीनच भर पडणार आहे हे नक्की. परंतु दहशतवादी हल्यात निरपराध नागरिकांचा बळी जाऊन जीवित व स्थावर संपत्तीचा नाश होण्यापेक्षा हे त्रास सहन करणे केंव्हाही चांगले असल्यामुळे आपल्या वैयक्तिक व खाजगी आयुष्यावर आलेल्या या बंधनाला हसत हसत सामोरे जाण्याशिवाय दुसरा तरी काही इलाज मला दिसत नाही.



1 जानेवारी 2010 

Sunday, 21 September 2014

साधी रहाणी

मागच्या महिन्यात, भारतातल्या राजकारणी मंडळींना एक नवीनच साक्षात्कार झाला. आपण फार चैनी खुशालीत रहात आहोत व ते लोकांच्या डोळ्यावर येते आहे असे त्यांना एकदम वाटू लागले. त्यामुळे विमानप्रवास करताना, प्रथमवर्गाऐवजी ते गुरेढोरे वर्गातून  प्रवास करू लागले. कोणी राजकारणी तर आगगाडीमधून प्रवास करते झाले. महात्मा गांधी आपला प्रवास नेहमी तृतीय वर्गातून करत असत. कै.सरोजिनीबाई नायडू या कॉंग्रेसच्या त्या वेळच्या एक ज्येष्ठ नेत्या. त्यांनी महात्माजींच्या या तृतीय वर्गातल्या प्रवासाबद्दल म्हटले होते की महात्माजींना प्रथम वर्गातून नेण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च कॉंग्रेसला त्यांना तृतीय वर्गाने नेण्यासाठी येतो. सरोजिनीबाईंच्या या विधानाची प्रचिती आजच्या या तरूण नेत्याच्या नुकत्याच झालेल्या आगगाडी प्रवासात परत आली. यांच्या बरोबर असलेले झ दर्जाचे सुरक्षा रक्षक वगैरे सगळ्या मंडळींच्या प्रवासासाठी एक संपूर्ण डबा लागला. अर्थात एकूण किती खर्च आला याला महत्व नसून नेत्यांच्या आगगाडी प्रवासाला महत्व आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

अर्थात काही वरिष्ठ नेत्यांनी यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. काही मंडळींचा देहविस्तार, विमानाच्या गुरेढोरे वर्गातील खुर्च्यात मावण्यासारखा नसल्याने त्यांना विमानप्रवास हा प्रथम वर्गानेच करणे आवश्यक होते. ते या साध्या प्रवासाच्या आदेशातून आपोआपच सुटले. काही नेतेमंडळी, मंत्रीमंडळात समावेश झाल्यापासून, त्यांच्या दर्जाचे निवासस्थान उपलब्धच  नसल्याने, पंचतारांकित हॉटेल्समधे कसेतरी वास्तव्य करून होती. आपण या हॉटेल्सचे बिल स्वत: भरत असल्याने कोणाची काही तक्रार असण्याची शक्यता नसावी असे त्यांचे म्हणणे पडले. परंतु वरिष्ठ पातळीवरच्या लोकांना त्यांचे हे समर्थन न पटल्यामुळे घाईघाईने त्यांना सरकारी अतिथीनिवासामधे निवासास जाणे भाग पडले.

भारतात अतिश्रीमंत लोकांची संख्या काही कमी नाही. ही मंडळी कोट्यावधी रुपये सहजपणे खर्च करू शकतात. ही मंडळी सुद्धा, नेतेमंडळींच्या पावलावर पाऊल टाकून, आपला खर्च लोकांच्या डोळ्यात भरणार नाही या पातळीवर आणण्याच्या  प्रयत्नात आहेत. हे लोक आता सणासुदीला नवे सोन्याचे दागिने खरेदी न करता, सोन्याच्या विटा खरेदी करून, जुनेच दागिने वापरणार आहेत. कपडे घेताना किंमत जरी पूर्वीएवढीच असली तरी ते कपडे एवढे महाग किंमतीचे आहेत हे बघणार्‍याला कळणार नाही याची काळजी घेऊ लागले आहेत. लग्न समारंभ जास्त भपकेदार न करता करावेत असाही सूर निघतो आहे.

या नेते मंडळींची आणि अतिश्रीमंतांची ही ‘साधी रहाणी’ मोहिम कशासाठी चालली आहे? त्यांना यातून काय सिद्ध करावयाचे आहे? असे प्रश्न कोणासही पडतील. गेल्या एक वर्षापासून आलेली आर्थिक मंदी, या वर्षी कमी प्रमाणात पडलेला पाऊस व परिणामी उत्तर हिंदुस्तानात आलेली दुष्काळसदृष्य परिस्थिती, अन्नधान्य व सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे भडकत चाललेले भाव यामुळे सर्वसामान्य शहरी जनता होरपळलेली आहेच. या उलट शेतमालाला मिळणारे भाव व येणारे खर्च यांचे गणित जमत नसतानाच त्यावर पावसाने मारलेली दडी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हे याचेच द्योतक आहे. अशा परिस्थितीत आपणही साधेपणे राहून परिस्थितीला कसा हातभार लावतो आहोत हे दाखविण्याचा हा एक अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा प्रयत्न आहे असे मला तरी वाटते.

प्रश्न एवढाच आहे की नेतेमंडळींचा हा दिखावा, न समजण्याएवढे भारतातले लोक मूर्ख आहेत का? नेतेमंडळींनी एखादा विमानप्रवास गुरेढोरे वर्गाने केला म्हणजे त्यांची रहाणी साधी झाली असे वाटायला भारतातल्या लोकांचे बौद्धिक वय 3 किंवा 4 वर्षे इतके कमी नक्कीच नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूका किंवा सध्याच्या महाराष्ट्रातील निवडणूका यात जी मंडळी उमेदवार म्हणून उभी होती किंवा आहेत त्यांच्यावर आपली संपत्ती जाहीर करण्याचे बंधन आहे. यातल्या बहुसंख्य उमेदवारांची संपत्ती दहा बारा कोटी रुपयाच्या पुढेच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या लोकांनी या तरूण वयात एवढी संपत्ती गोळा कशी केली हे न समजण्याइतकी भारतातली जनता दुधखुळी आहे कां? दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेल्सचा रोजचा दर पंधरा ते वीस हजार रुपयाच्या आसपास असतो. सहा महिने आपल्या खिशातून हा खर्च जी व्यक्ती करू शकत असेल तिची एकूण आर्थिक सुबत्ता किती असेल? आणि ती कुठून व कशी आली असेल? हे भारतातल्या जनतेला कळू शकत नाही कां? सर्व सामान्य नागरिकाच्या मनात, या नेतेमंडळींच्या बद्दल, आदर असण्याऐवजी चीड व असहाय्यता का आहे?

सर्वसामान्य माणसाचे आपल्याबद्दल काय मत आहे हे ही नेतेमंडळी अतिशय धूर्त असल्याने पूर्णपणे जाणतात यात शंकाच नाही. अति होते आहे असे वाटल्यानेच त्यांनी हा साध्या रहाणीचा ‘शो’ जनतेला दाखवला असावा. पण त्यांचा हा प्रयत्न फक्त ‘फ्लॉप शो’ झाला आहे असे ‘शो’ करून सत्य परिस्थिती दडवता येत नाही हेच खरे आहे.


12 ऑक्टोबर 2009