Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

Thursday, 16 August 2018

पुणे 1790-95




(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904)  यांनी मुंबई,  जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांनी  आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा सर चार्लस मॅलेट यांच्याबद्दलचा लेख चाळत असताना मला त्यात 1792 मधल्या पुण्याचे हे वर्णन सापडले. संपूर्ण लेखाचा अनुवाद करण्यापेक्षा पुण्याचे वर्णन जास्त रोचक ठरेल या कल्पनेने तेव्हड्याच भागाचा अनुवाद मी केला आहे.. वाचकांना हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)

1790-95 हा कालखंड पुण्यासाठी मोठा खळबळजनक होता असे म्हटले तरी चालेल.  1791 मध्ये घाशीराम कोतवालावर झालेल्या दगडफेकीत तो ठेचला गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. 1794 मध्ये महादजी शिंदे यांचे वानवडी येथे तापाने निधन झाले होते आणि 1795 मध्ये स्वतः श्रीमंत पेशवे यांचा शनिवारवाड्याच्या गच्चीवरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनांचे मधल्या तीन वर्षाच्या कालखंडाच्या पूर्व आणि पश्चात आलेली अकस्मात वादळे असे करणे योग्य ठरेल कारण मधला हा तीन वर्षांचा कालखंड पुण्यासाठी एक ऐतिहासिक आनंदपर्व होते असे म्हणणे फारसे चूक ठरणार नाही. हा आनंददायी कालखंड सुरू झाला होता जून 1792 मध्ये झालेल्या महादजी शिंदे यांच्या आगमनाबरोबर आणि संपला होता  फेब्रुवारी 1794 मध्ये झालेल्या त्यांच्या निधनाबरोबर!  

चर्तुदिशांहून आलेल्या अनोळखी लोकांच्या जमावांनी पुणे त्यावेळी गजबजलेले दिसत होते. या लोकांनी आपल्या थैल्या जरा जास्तच सैल सोडल्याने का होईना! बाजारांच्यात मोठे उत्सवी वातावरण होते. त्या वेळी दिल्लीमधील मुघल सम्राट हे पेशव्यांच्या हातातील एक बाहुले बनलेले होते. या मुघल सम्राटाच्या साम्राज्याचे सुभेदार म्हणून पेशव्यांना वस्त्रे प्रदान करण्याच्या समारंभासाठी महादजी शिंदे मुद्दाम पुण्याला आले होते. या समारंभाच्या दिवशी (हा समारंभ 11 जून 1792 मध्ये  झाला होता.) लोकांचा उत्साह पराकोटीला पोचला होता आणि संपूर्ण शहरच हर्षमय झाले होते. जूनचा महिना असल्याने दख्खःनच्या पठारांवर निसर्गाने आपला हिरवा गालिचा उलगडला होता व पक्षांचा चिवचिवाट सर्वत्र ऐकू येत होता. महादजी शिंद्याची राहुटी जरी संगमाजवळ उभी केलेली असली तरी पार खडकीपर्यंत त्यांच्या फौजेचे तंबू  सर्व उंच सखल प्रदेशामध्ये उभे राहिलेले दिसत होते. या भागात दिसणार्‍या सर्व झाडाझुडपांच्या सावलीला एकत्र बसून शिंद्याच्या फौजेतील जवान सुट्टी असल्याने मौजमजा करताना दिसत होते.

येणार्‍या प्रत्येक रात्री, शनिवार वाड्यातील गणेश हॉल दिव्यांच्या झगझगाटामुळे लखलखत होता. शेकडो नर्तकींचे नाच तिथे चालू असत. गणेश हॉलच्या एका बाजूला असलेले कारंजे व त्याच्या शेजारचे वाहते पाणी यांच्या आवाजाच्या साथीवर गाण्याचे कार्यक्रम होत होते. (आम्हाला हे गायन जरी एकसुरी आणि कंटाळवाणे वाटत असले तरी पौर्वात्य लोकांना ते स्वर्गसुखासमान वाटते यात शंकाच नाही.) हिराबागेचा वाडा त्याच्या वैभवात तळपत होता तर ताराबाग (Helen’s Isle, परीचे बेट) त्याच्या भोवती असलेल्या तळ्यामधे एखाद्या भिंगावर असलेल्या धुळीच्या कणाप्रमाणे दिसत होता. रस्त्याने नेले जाणारे हत्ती, वाघोबा या नावाने ओळखल्या जाणार्‍या दगडी वाघांना आमिष वाटत आहेत की काय? असे भासत होते. मुळा मुठा नद्यांवर अनेक लोक नौकांमध्ये सफर करून मौजमजा करत होते. रात्री याच नौका त्यांच्यावर केलेल्या आकाशकंदिलांच्या रोषणाईने नुसत्या झगमगत होत्या.

वस्त्रे प्रदान करण्याच्या समारंभाच्या दिवशी महादजी शिंद्यांच्या राहुटीपासून थोड्या अंतरावर उभारलेल्या  राहुट्यांच्या टोकाला एक सिंहासन किंवा तख्त उभारलेले होते.  हे सिंहासन म्हणजे दिल्लीच्या तख्ताची प्रतिकृती होती. अर्थात  हा आनंदोत्सव साजरा करणारे पेशवे आणि दिल्ली दरबार या दोन्हींना कल्पनाही नव्हती की थोड्याच काळात ही दोन्ही साम्राज्ये धुळीस मिळणार होती.
समरंभाच्या दिवशी पेशवे मिरवणुकीने येथपर्यंत आले होते व नंतर रिकाम्या तख्तापर्यंत पायी चालत आले होते. तीन वेळा तख्ताला कुर्निसात केल्यानंतर त्यांनी सिंहासनासमोर 101 सुवर्ण मोहोरा भरलेली थैली नझर म्हणून ठेवली होती. मुघल बादशहाच्या इराणी वझिराने मग पेशव्यांना खिलत (राजाचा अंगरखा),  रत्नजडित शिरपेच, तुरा, ढाल-तलवार, दोन मोरपिसे आणि “दोन चंद्रकोरी, दोन तारे, सूर्य आणि मासा यांची चित्रे असलेला” ध्वज हे सगळे प्रदान केले होते. हे सगळे घेऊन पेशवे जवळच्या राहुटीत गेले होते व थोड्याच वेळात बादशहाने पाठवलेले हे सर्व वस्त्रालंकार परिधान करून बाहेर आले होते. एका पालखीत बसलेले महादजी शिंदे आणि पेशव्यांचे इतर सर्व सरदार पेशव्यांचे, एकनिष्ठ सेवक असल्याचे दर्शवित त्यांच्या समोर एखद्या पंख्याप्रमाणे पसरलेले होते. नंतर तेथे जमलेल्या सर्व लोकांनी केलेल्या जयजयकाराच्या आवाजात, तोफांच्या गडगडाटात अणि तुतार्‍यांच्या ललकारींत, सातार्‍याच्या भोसल्यांनी पेशवे म्हणून घोषित केलेल्या, आणि स्वतःला तैमुरचे वंशज म्हणवणार्‍या मुघल बादशहाने सुभेदारकी दिलेल्या, या राजाने मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या व शिवाजीने स्थापना केलेल्या पुणे शहरात प्रवेश केला होता. ब्रिटिश रेसिडेन्सी शिंद्यांच्या तळाच्या अगदी जवळच असल्याने तेथे असलेल्या सर्व लोकांना या संपूर्ण उत्सवात भाग घेण्यासाठी आमंत्रण होते. नद्यांचा कोणताही संगम खरे म्हणजे एक  पवित्र जागा समजली जाते. परंतु ब्रिटिश रेसिडेन्सी ज्या ठिकाणी होती तो मुळा-मुठांचा संगम ही किती रम्य आणि सुंदर जागा आहे याची आज सुद्धा उत्तम कल्पना येऊ शकते.

1792 मधे असलेले पुणे कसे होते याची कल्पना आजमितीला करणे अतिशय सोपे आहे. परंतु यासाठी तुम्हाला काल्पनिक विध्वंसाचा मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. प्रथम सर्व चर्चेस आणि कबरस्ताने तुमच्या नकाशातून काढून टाका. सर्व सैनिक छावण्या आणि इस्पितळे यांचीही वासलात लावा. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ, तारेचे संदेशवाहक खांब, सुस्थितीतील रस्ते आणि पूल यांचीही तीच गत करा. 1792 मध्ये अर्थवट कुजलेला आणि धोकादायक असा एकच लाकडी पूल होता. तुमच्या मनातून असेम्ब्ली, कौन्सिल हॉल, गव्हर्नर आणि त्याच्याबरोबर बसणारे इतर सर्व अधिकारी काढून टाकून त्यांच्या जागी पेशव्यांहून सुद्धा जास्त सर्वशक्तीमान असलेले नाना फडणवीस यांची स्थापना करा. सर्व शाळा, कॉलेजे काढून टाका. ख्रिस्ती धार्मिक शिकवण देणारे पाद्री आणि इतर यांना वार्‍यावर उडवून द्या. पत्रकारांना फुंकर मारून उडवा. कोणालाही स्वत:चे असे म्हणता येईल असे काही देऊ नका व एखाद्याने कष्ट करून जमवलेले धन त्याच्याकडून काढून घ्या, कारण पेशव्यांच्या काळात हीच रीत बनली होती. संगमावरची रेसिडेन्सी सोडली तर उरलेला बाकी प्रत्येक इंग्लिश बंगला नष्ट करा. हे सगळे केल्यावर तुमच्या मनात दीड चौरस मैल (अंदाजे चार चौरस किमी) आकारमानाची एक जागा राहील. 

1792 मधल्या पुण्याचे चित्र पूर्ण करण्यासाठी या जागेत सध्याच्या बाजारपेठा, त्यातली उत्कृष्ट कारागिरीची घरे, बड्या आणि धनवान व्यापार्‍यांच्या टोलेजंग हवेल्या हे सर्व बसवा. संगमाजवळची सर्व मंदिरे, तेंव्हाची बांधकाम झालेली पर्वतीची टेकडी ही सुद्धा या चित्रासाठी निवडा. हे सगळे झाल्यावर त्या चित्रात सतत खरेदी विक्री करणारी, ओरडणारी आणि किंचाळणारी एक लाख वीस हजार ही लोकसंख्या बसवा म्हणजे तुमचे पुण्याचे चित्र पूर्ण होईल. एडवर्ड मूर आपल्या “सर्व देव सभा” (Hindu Pantheon) या पुस्तकात पुण्याचे वर्णन करताना म्हणतो. “पुणे शहर शोभिवंत किंवा देखणे दिसेल असे बांधलेलेच नाही.” पुण्याच्या आसमंताबद्दल बोलायचे तर तो आता जसा आहे तसाच तेंव्हाही होता. लकडी पुलावरून दिसणारा देखावा आतासारखाच तेंव्हाही भव्य दिसत होता. आतासारखेच पांढर्‍या ठिपक्यांसारख्या ढगांनी व्यापलेले निळेभोर आकाश तेंव्हाही दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतीचा डोंगर आतासारखाच तेंव्हाही कपाळावर एक हलकी आठी उमटवत होता. सिंगगडाला न ओळखणारा  पुण्यात कोण असणार?  तो आणि त्याच्या पलीकडचा निळ्या सुळक्यासारखा दिसणारा तोरणा हे तेंव्हाही दिसत होते. तोरणा शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला असल्याने त्यांचा आत्मा त्याच्या शिखरावर नक्कीच रेंगाळत असणार. गणेशखिंडीच्या बाजूला एकुलते एक असणारे देऊळ आतासारखे तेंव्हाही दिसत होते. भारतीय वास्तुकलेचे वैशिष्ट्य दर्शविणारे व दिल्ली ते कन्याकुमारी यामध्ये दिसणार्‍या प्रत्येक देवळाप्रमाणे असलेले हे देऊळ सुद्धा फुलात कधीच रुपांतर न होणार्‍या कळीप्रमाणेच तेंव्हाही दिसत होते. थोडीफार सुरूची झाडे वगळली तर पुण्याचा  सर्वच आसमंत  तेंव्हा जरासा उघडा बोडका व वृक्षहीन दिसत होता. आता दिसणारी लाखो आंब्याची झाडे तेंव्हा बाजीरावाने (दुसर्‍या) लावलेली नव्हती. 1792 मधले पुणे हे असे होते.  


16 ऑगस्ट 2018


Tuesday, 20 January 2015

शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना



 कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील दुआबाच्या प्रदेशाला दख्खन या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जाते. या दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता प्रथम स्थापन झाली ती 1294 मध्ये, जेंव्हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादव राजांचा पराभव केला तेंव्हा! या नंतर 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाली आणि अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली की दख्खनचे इस्लामीकरण आता पूर्णत्वास जाणार. मात्र याच वेळी सांगमा राजघराण्यातील दोन हिंदू राजे, हरिहर आणि बुक्का यांनी तुंगभद्रा नदीच्या किनार्‍यावर 1336 मध्ये एका हिंदू राष्ट्राची स्थापना केली आणि पुढची 200 वर्षे तरी दख्खनच्या इस्लामीकरणाची प्रक्रिया थोपवून धरली. यानंतर 5 दखखनी सलतनतीच्या सुलतानांनी मिळून विजयनगरच्या सैन्याचा पराभव केला आणि या भव्य आणि नेत्रदीपक अशा नगराची अक्षरशः राखरांगोळी केली. या नगरीतील एकापेक्षा एक सरस अशा स्थापत्यांच्या जागी फक्त भग्नावशेष आणि दगडांच्या राशी एवढेच उरले. तरी सुद्धा जे काही उरले आहे ते इतके प्रेक्षणीय आणि भव्य आहे की जगभरातले हजारोंनी पर्यटक हंपीला भेट देण्यासाठी रोज येथे येत असतात. या भग्नावशेषांमध्ये असलेल्या प्रसिद्ध बालकृष्ण मंदिराच्या निकट, 2 छोटी मंदिरे आहेत. यापैकी एक मंदीर आहे क्रोधित नृसिंहाचे! या मंदिराचा काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने जीर्णोद्धार केला होता. जुन्या दगडी स्थापत्याला सिमेंट कॉन्क्रीटची मलमपट्टी लावली होती. परंतु नंतर पुरातत्त्व विभागाच्याच हे लक्षात आले की हा जीर्णोद्धार आपल्याच 80 किंवा 90 वर्षांपासून अंमलात असलेल्या धोरणाविरुद्ध केला गेलेला आहे. यानंतर पुरातत्त्व विभागाने केलेली मलमपट्टी चक्क तोडून टाकली व मंदिराचे भग्नावशेष परत गेली 500 वर्षे होते त्याच स्थितीत पुन्हा आणले.
हे सगळे जरा जास्तच बारकाईने मी लिहिले आहे याचे कारण मला वाचकांच्या लक्षात एक महत्त्वाची बाब आणून द्यायची आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने 1920 साली प्रसिद्ध केलेल्या प्राचीन अवशेषांच्या निगराणी बद्दलची एक कार्यपुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेत हे अगदी स्पष्ट केलेले आहे की प्राचीन भग्नावशेषांचा जीर्णोद्धार करणे पुरातत्त्व विभागाला मान्य नाही व या भग्नावशेषांची (मग ते भग्नावशेष असोत किंवा इतस्ततः पडलेले पाषाण असोत) फक्त निगराणी आणि संरक्षण करणे हेच या विभागाचे अधिकृत धोरण आहे. या कार्यपुस्तिकेमध्ये काही बदल नुकतेच करण्यात आले मात्र वर निर्देश केलेले मुलभूत धोरण आहे तसेच ठेवण्यात आलेले आहे.

आता आपण पुण्याकडे वळूया. पुण्यामध्ये ऐतिहासिक कालातील सर्वात महत्त्वाचे आणि अजूनही जमिनीवर उभे असलेले स्थापत्य म्हणजे शनिवारवाड्याची तटबंदी आहे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधून घेतलेले हे स्थापत्य किती भव्य आणि दिमाखदार असले पाहिजे याची थोडीफार झलक आपल्याला या तटबंदीमुळे अजूनही पहायला मिळते हे आपले भाग्यच म्हणता येईल. आपल्या तलवारीच्या जोरावर मध्य आणि उत्तर हिंदुस्थानचा बहुतांशी भाग आपल्या अंमलाखाली आणणार्‍या या पेशव्याने आपल्या सामर्थ्याला साजेशी अशी आपली राजधानीची जागा असली पाहिजे या विचाराने शनिवार वाड्यात अतिशय सुंदर दिसणारे आणि सागाचे लाकूड वापरून बांधलेले 7 मजली भव्य महाल उभारलेले होते. हे सर्व महाल 1817 मध्ये ब्रिटिशांनी शेवटच्या पेशव्याचा पराभव करून सत्ता काबीज केल्यानंतरची 10 वर्षे पर्यंत तरी शाबूत होते. पण त्या नंतर अचानक आग लागून हे सर्व महाल भस्मसात झाले. त्या नंतर तटबंदीच्या आत उरली आहेत ती फक्त दगडी बांधकाम केलेली इमारतींची जोती. या जोत्यांवरून या महालांच्या आकाराची मात्र कल्पना येऊ शकते.

सर्व मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल की या दुर्घटनेनंतर, पेशव्यांच्या या राजधानीची, इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून भेट देणार्‍या अधिकार्‍यांनी लिहून ठेवलेली वर्णने सोडली, तर हा वाडा आणि त्यातील महाल कसे होते हे पुढच्या पिढ्यांना कळू शकेल असे कोणतेही चित्र, छायाचित्र किंवा इमारतीचा आराखडा आता कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे तटबंदीच्या आतील महाल, त्यांची स्थापत्य वैशिष्ट्ये आणि त्यांचा दिमाख कसा होता हे कळणे आता अशक्यप्राय आहे. हे महाल कसे दिसत असत? त्यांचे बांधकाम कसे केलेले होते? वगैरे सारखे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार आहेत.
या अडचणीमुळे जरी या महालांची पुनर्बांधणी करू असे कोणी ठरवले तरी कोणतेच आराखडे, तैलचित्रे किंवा छायाचित्रे उपलब्ध नसल्याने पुनर्बांधणी केलेले महाल जुन्या महालांप्रमाणेच आहेत असे खात्रीलायकपणे कोणालाच सांगणे शक्य होणार नाही. त्याच प्रमाणे पुरातत्त्व विभागाची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार शनिवार वाडा ही महत्त्वाची राष्ट्रीय वारसा वास्तू समजली जात असल्याने हा विभाग अशी काही पुनर्बांधणी शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत करू देईल याची सूतराम शक्यता दिसत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शनिवारवाड्याची पुनर्बांधणी करण्याचा ठराव संमत करणे जरा आश्चर्यजनक वाटते.  हा ठराव मांडणार्‍या आणि मंजूर करून घेणार्‍या नगरसेवकांना एकतर वस्तुस्थिती काय आहे याची माहिती तरी नसावी किंवा ते एखादी राजकीय खेळी खेळू इच्छित आहेत असे वाटले तर नवल वाटावयास नको. मागे जिजामाता उद्यानातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा जसा हलवला गेला किंवा आता शनिवारवाड्याजवळील बस थांब्याला लाल महाल बस थांबा असे नाव देण्यात यावे अशी काहीतरी गर्भित अर्थ असणारी एक मागणी करण्यात आली आहे असे माझ्या नुकतेच कानावर आले आहे. त्यातलाच काहीतरी हा प्रकार असावा असा संशय मनात येणे स्वाभाविक आहे.
या ठरावानुसार पुनर्बांधणीचे कार्य बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी भव्य दिव्य असे कार्डबोर्डचे सेट उभारणार्‍या एका प्रसिद्ध कला दिग्दर्शकाला देण्यात यावे असेही या ठरावात नमूद केलेले आहे. हे कला दिग्दर्शक मोठे नामवंत व प्रतिभाशाली आहेत व त्यांनी उभारलेले काही सेट मनाला थक्क करून सोडणारे आहेत याबाबत काही शंका वाटत नाही. परंतु शनिवारवाड्याचे कोणतेही तैलचित्र, छायाचित्र किंवा आराखडा उपलब्ध नसताना या कला दिग्दर्शकांनी उभारलेली कोणतीही वास्तू, मग ती कितीही भव्य किंवा दिव्य असली तरी ती एखाद्या फिल्मसेट सारखी त्यांच्या कल्पनेतीलच फक्त असणार आहे. या वास्तूला कोणतेच ऐतिहासिक महत्त्व असू शकणार नाही.
मला आशा आहे की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा या कारणांसाठी हा ठराव फेटाळून लावील. अर्थात जरी या सभेने असा काही ठराव संमत केला तरी पुरातत्त्व विभाग शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत अशी काही वास्तूबांधणी करण्यास परवानगी देणे अशक्यच वाटते. त्यामुळे हा पुनर्बांधणी केलेला काल्पनिक शनिवारवाडा तटबंदीच्या बाहेरच साकारू शकतो. त्यामुळे इतिहासाशी संबंध नसलेली एक प्रेक्षणीय वास्तू एवढेच फक्त त्याचे महत्त्व असू शकेल.
28 सप्टेंबर 2013

Saturday, 10 January 2015

पुणे: कचर्‍याचे माहेरघर



स्वातंत्र्यपूर्व कालात आणि अगदी पानशेतच्या पुरापर्यंत पुणे हे एक छोटेखानी, निवृत्त लोकांचा स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे एक शहर होते असे म्हटले तरी चालेल. मात्र पानशेतच्या पुरानंतर हेच शहर झपाट्याने व विस्तृत प्रमाणात वाढू लागले. या कालापर्यंत पुणे महानगपालिका शहरात निर्माण होणारा कचरा गावाबाहेर नेऊन टाकत असे. 1965 मध्ये महानगरपालिकेने प्रथम कोथरूड कचरा डेपो तयार केला व शहराचा सर्व कचरा येथे आणून टाकण्यास सुरुवात केली. परंतु या भागातही वस्ती झपाट्याने वाढू लागल्याने 1981 मध्ये उरळी देवाची व 2003 मध्ये फुरसुंगी या दोन गावांतील जागा कचरा डेपोसाठी मुक्रर केल्या. परंतु आता या दोन्ही जागाही अपुर्‍या पडू लागल्या असून तेथे होणारे प्रदुषण व दुर्गंधी यामुळी ग्रामस्थांचा या कचरा डेपोला तीव्र विरोध आहे.


हंजर प्रकल्प

शहरातील कचरा ही आता हाताबाहेर जाणारी समस्या बनू लागली आहे. व या समस्येला नागरिक आणि महानगरपालिका हे दोन्ही समप्रमाणात जबाबदार आहेत. गेल्या 3 दशकात कचर्‍याचे स्वरूप बदलले असून ओल्या कचर्‍याबरोबर प्लॅस्टिक आणि धातूचे डबे यांचाही या कचर्‍यात समावेश  झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी कचर्‍याचे वर्गीकरण करूनच त्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक बनले आहे. त्याच प्रमाणे कचरा डेपोमध्ये नुसता टाकून न देता त्यावर प्रक्रिया करून त्याचा शक्य तेथे पुनर्पयोग किंवा खत किंवा इंधन निर्मितीसाठी कचर्‍याचा वापर करणे हे सुद्धा महानगरपालिकेसाठी अनिर्वाय बनले आहे.


रोशेम उर्जा प्रकल्प

"स्वच्छ" सारख्या कष्टकरी महिलांच्या सहकारी संघटनेला कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने मान्यता दिलेली असली तरी नागरिकांनी मुळात वर्गीकरण केलेला कचरा टाकला तर हे काम सोपे होऊ शकते. त्याचप्रमाणे हे काम अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे असल्याने शक्यतो तेथे यांत्रिकीकरण करण्याची गरज आहे. आतापर्यंत महानगरपालिकेने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी जे जे प्रकल्प उभारले आहेत ते सर्व, नोकरशाहीचा ढिसाळ कारभार व भ्रष्टाचार यामुळे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत हे सत्य आहे.

या समस्येवर उपाय काढण्यासाठी महानगपालिकेने कडक आणि नेमकी पावले उचलण्याची गरज आहे. असे न केल्यास पुढच्या वर्षभरात पुणे हे विद्येचे माहेरघर न ठरता कचर्‍याचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वाटते.


10 जानेवारी 2014 

Thursday, 1 January 2015

पुण्यातील नद्यांसाठी स्मरण गीत- भाग 3


देव-नदीवरची जादू;   Dev-Nadi Rivulet, Going……Going…….Gone


राम नदीच्या पूर्वेला, थोड्या अंतरावर, आणखी एका अगदीच छोटेखानी असलेल्या नदीचा प्रवाह आहे. या प्रवाहाचा उगम चांदणी चौक व एनडीए याच्या मध्ये असलेल्या टेकड्यांवर होतो. या ठिकाणापासून साधारण 20 किमी अंतरावर, हा प्रवाह राम नदीच्या प्रवाहाला बाणेर गावामध्ये जाऊन मिळतो व हे दोन्ही प्रवाह एकत्रितपणे पुढे थोड्या अंतरावर असलेल्या मुळा नदीला जाऊन मिळतात. पुणे महानगरपालिकेने राम नदी प्रमाणेच, या प्रवाहाला सुद्धा नाला एफ. एन .23 (Nala F.N. 23) असे नाव देऊन, पुढच्या कारवाईला मोकळीक करून घेतली आहे.
नोव्हेंबर 2009 मध्ये जल बिरादरी या संस्थेचे प्रमुख व मॅगसेसे पारितोषिक विजेते डॉ. राजेंद्रसिंहजी यांनी देव नदीच्या पात्रामधील काही ठिकाणांना भेट देऊन, या नदीचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी काही उपाय सुचवले होते. या उपायात, नदी पात्रात ठिकठिकाणी छोटे बंधारे उभारून पाणी साठवा व जिरवा हे तत्व वापरून, भूजलाची पातळी वर आणण्याचा सल्ला दिला होता. बाणेर विभागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने हा उपाय प्रभावी ठरू शकला असता. हा सल्ला मानून येथील रहिवाशांनी श्रमदानाने एक मातीचा बंधारा येथे बांधला होता व तो सुस्थितीतही राखला होता. नदीकाठांचे संवर्धन करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंहजी यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, छोट्या देवराया निर्माण करण्यासाठी, नदी काठावर 1400 वृक्षांचे रोपण केले होते.
बाणेर, पाषाण भागात मोकळ्या जागांसाठी निर्माण झालेल्या अभूतपूर्व मागणीमुळे, सर्व बड्या बांधकाम व्यावसायिकांचे डोळे या जागेकडे वळल्यावर, देव नदीचे पात्र व नदी काठ हा या व्यावसायिकांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. परंतु देव नदी जरी राम नदीच्या मानाने छोटेखानी असली तरी ती पावसाळी नाला नव्हती व नदीला थोडेफार पाणी वर्षभर असल्याने, शहरातील इतर ठिकाणचे नाले जसे नकाशावरील निळी रेघ खोडून टाकून महानगरपालिकेने गायब केले होते तसे येथे करणे शक्य नव्हते. नाला एफ.एन. 23 याचे अस्तित्व खोडून टाकणे शक्य नसल्याने, महानगरपालिकेने एक नवीनच जादू अंमलात आणण्याचे ठरवले. महानगरपालिकेला या सुमारास जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजना या योजनेच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पांसाठी, बरेच पैसे केंद्र सरकारकडून मिळण्याची शक्यता होती. नदी सुधार योजना या गोंडस नावाखाली नदीचे नैसर्गिक पात्र बुजवून त्या जागी जमिनीखालून नेलेले नळ व कॉंक्रीटचे इंग्रजी U आकाराचे चॅनेल यातून नदीपात्र नेण्याचा आराखडा महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीकडून मंजूर करून घेतला व नंतर त्याला केंद्र सरकारची मंजुरी मिळवून पैसे उपलब्ध करून घेतले.
 देव नदीचे चॅनेलायझेशन का अस्तित्व मिटवणे?
देव नदी पात्रातील मंजूर झालेले प्लॉट लेआऊट्स
या जादुमुळे, देव नदीचे पात्र व पूर नियंत्रण रेषा याखाली असलेली बर्‍याच ठिकाणची 60 मीटरची रूंदी फक्त 1 मीटर करण्यात, महानगरपालिका यशस्वी झाली व पात्राच्या दोन्ही बाजूंची तेवढी जमीन, बड्या बांधकाम व्यावसायिकांना सदनिका व व्यापारी बांधकामे या साठी उपलब्ध झाली. अर्थातच आसपासचे सर्व सांडपाणी या 1 मीटर देव नदी गटारातूनच वाहू लागले. अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेने देव नदीचे पात्र अदृष्य करून तेथे एक गटार निर्माण करण्याची जादू बाणेर गावात यशस्वी करून दाखवली.

जमेनीखालच्या बंद नळातून नेलेली देव नदी 



बाणेर रस्त्याजवळच्या एका भागात तर देव नदी जमिनीखालून बंद नळातून नेण्यात आली. नदी पात्रांचे अशा प्रकारचे क़ोंक्रीटायझेशन करू नये. त्यातून सर्व जैविक प्रणाली नष्ट होईल, भूजलाचा अधिकच र्‍हास होईल वगैरेसारख्या पर्यावरणवाद्यांच्या मागण्यांना महानगरपालिकेने पूर्णपणे वाटाण्याचा अक्षता दाखवल्या.
महानगपालिका काहीच ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे लक्षात आल्याने, पर्यावरणवादी संघटनांनी शेवटी कोर्टाचा आधार घ्यायचे ठरवले. आणि मार्च 21, 2011 रोजी मुंबई हाय कोर्टात अर्ज दाखल केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर, कोर्टाने महानगरपालिकेने सर्व नद्यांतील कॉंक्रीटायझेशन व इतर कामे ताबडतोब थांबवावी असा आदेश दिला व केंद्र सरकारच्या ‘पर्यावरण व जंगले’ मंत्रालयाने, एक समिती पुण्याला पाठवून प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे याचा अहवाल कोर्टाला देण्याची आज्ञा दिली. या समितीने नोव्हेंबर महिन्यात देव नदीच्या पात्राला भेट देऊन तपासणी केली आहे. त्यांचा अहवाल अजून हातात आलेला नाही. देव नदीचे भवितव्य म्हणजे ती देव नदी राहणार की देव-गटार होणार? हे आता कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
पर्यावरण मंत्रालयाच्या समितीकडून देव नदी (किंवा देव गटार) पाहणी
या छोट्या मोठ्या नद्यांना नेस्तनाबूत केल्यावर आता महानगरपालिकेचे डोळे मुठा नदीकडे वळले आहेत. विठ्ठलवाडी भागात पूर नियंत्रण रेषेच्या आत असलेली काही जमीन संरक्षक भिंत बांधून घर बांधणी उद्योगास उपलब्ध करून देण्याचा एक प्रकल्प महानगरपालिकेने हातात घेतला आहे. मात्र कोर्टाच्या आदेशाने ही काम सुद्धा सध्या तरी बंद आहे. मात्र मुठा नदीच्या पात्राशी खेळणे हे आगीशी खेळण्यासारखे आहे याची जाणीव महानगरपालिकेला झाल्याचे दिसत नाही. नदीचे पात्र एका ठिकाणी संकुचित केल्यावर ते पाणी दुसर्‍या सखल भागात पसरेल हे सरळ आहे.
कोर्टाचा निर्णय जल बिरादरीच्या बाजूने लागला तर पुण्यातील नद्या व तात्पर्याने पर्यावरण आणखी खराब होण्यापासून थोडेफार वाचवता येण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने तसे जर झाले नाही तर पुण्याच्या नद्यांसाठी स्मरणगीते म्हणण्याशिवाय आपण दुसरे काहीच करू शकणार नाही.
(समाप्त)
29 जानेवारी 2012

Saturday, 27 December 2014

पुण्यातील नद्यांसाठी स्मरणगीत- भाग 1


Case of a Missing Stream;  हरवलेल्या नाल्याची कथा 
मी लहान असताना प्रभात फिल्म कंपनीच्या रस्त्यावर असलेले माझे घर व प्रभात कंपनी यांच्यामध्ये फक्त एक माळरान होते. या माळरानाच्या एका बाजूला प्रभात कंपनीकडे जाणारा रस्ता तर दुसर्‍या टोकाला वेताळ टेकड्यांपैकी सर्वात बुटकी असलेली पायथ्याची एक टेकडी होती. माझ्या घराच्या गच्चीवरून प्रभात फिल्म कंपनीचे कुंपण सहज दिसत असे. एखाद्या दिवशी बाह्य चित्रीकरण असले की आमच्या गच्चीवरून ते स्पष्टपणे दिसू शके.
 1950 च्या दशकातील, प्रभात फिल्म कंपनीच्या शेजारचे माळरान.
हा भाग आता संपूर्णपणे विकसित झाला आहे. 
या मधल्या माळरानाला जरी टेकडी पासून ते प्रभात फिल्म कंपनीकडे जाणारा रस्ता असा एक सर्वसाधारण उतार असला तरी असंख्य उंचवटे व त्या बाजूंच्या घळी यामुळे मधल्या जमिनीला सपाटपणा असा नव्हताच. खडकाळ मुरमाड जमिनीमुळे मोठी झाडे वगैरे नव्हतीच. होती ती बाभळीची काटेरी झुडपे. या माळरानाला साधारण तिरपा, म्हणजे प्रभात फिल्म कंपनीच्या आवाराच्या नैऋत्य टोकापासून, छेद देत साधारण दक्षिणेच्या दिशेला जाणारा एक बर्‍यापैकी मोठा ओढा किंवा नाला होता. एकदा पाऊस सुरू झाला की या ओढ्याला नोव्हेंबर-डिसेंबर अखेरपर्यंत भरपूर पाणी असे. टेकडीवरून वहात येणारे सर्व पाणी या ओढ्यात एकत्र येऊन, हा ओढा सध्याची अभिनव शाळा आहे त्या जागेतून जाऊन कर्वे रस्ता ओलांडत असे व पुढे सरळ मुठा नदीला जाऊन मिळत असे. पावसाचे सर्व अतिरिक्त पाणी या नाल्यातून वहात जात असल्याने रस्ते व बाजूचा भाग जलमय कधीच होत नसत. पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याची ही एक नैसर्गिक प्रणालीच होती. पावसाळ्याचे चार पाच महिने हे माळरान हिरवेगार बनत असे व या मधल्या ओढ्याच्या काठी वाढलेले उंच गवत. त्यावरचे असंख्य कीटक, फुलपाखरे, बेडूक आणि हे खाद्य बघून गोळा होणारे खंड्या व इतर पक्षी यामुळे हा परिसर मोठा रमणीय बनत असे. या माळरानामुळे या भागातले पर्यावरण आल्हादकारक राहण्यास मदत होत असे मला वाटते.
साठ किंवा सत्तरच्या दशकानंतर पुण्यात स्थायिक होण्यासाठी बाहेरून लोक येऊ लागले. त्यांना राहण्याची घरे बांधण्याचा मोठा उद्योग पुण्यात विकसित होऊ लागला. या उद्योगाने माझ्या घराशेजारच्या माळरानाचा कधी घास घेतला ते मला कळलेच नाही. या ठिकाणी हळूहळू तीन समांतर रस्ते व त्यांच्या मध्ये घरे, बंगले उभे राहिले. या सगळ्यात तो ओढा व माळरान हे सगळे हरवलेच. ओढ्याच्या खालच्या पात्रात अभिनव शाळा उभी राहिली, ओढ्याचे काही थोडे फार तुकडे अस्तित्वात राहिले होते ते बुजवले गेले व आता येथे पूर्वी कधी ओढा होता हे सांगितले तरी विश्वास बसणार नाही.
माझ्या घराशेजारचा ओढा, माळरान हे सगळे नाहीसे झाले असले तरी पुण्यात पाऊस अजून पूर्वीसारखाच पडतो. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात तशाच धुवांधार सरी येतात. असा पाऊस पडायला लागला की टेकड्यांवरून पडलेले पाणी खाली उताराकडे धावू लागते. टेकडीच्या पायथ्याशी हे पाणी असंख्य ओहोळ, झरे या स्वरूपात येऊन ओढ्यात एकत्र होत असे. पण आता ओढाच नसल्याने हे पाणी घरांच्या कांपाउंड्स मध्ये शिरते किंवा जे तीन रस्ते बनवले आहेत त्या रस्त्यांवरून वाहू लागते व या रस्त्यांना छोट्या नद्यांचे स्वरूप येते.
खरे तर अलीकडे दर वर्षी पाऊस पडला की निर्माण होणारी ही परिस्थिती मी पाहतो आहे पण कुठेतरी काहीतरी गडबड आहे, चुकले आहे ही जाणीवच मला होत नव्हती. मध्यंतरी डॉ. राजेंद्रसिंहजी यांनी राजस्थान मध्ये स्थापन केलेल्या जल बिरादरी या संस्थेचे पुण्यातले संघटक श्री सुनील जोशी यांचे एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला आणि माझे डोळेच उघडले. ज्या कारणांमुळे अतिशय सुखद हवामानाचे शहर म्हणून पुणे प्रसिद्ध आहे त्यापैकी काही प्रमुख कारणे पुसुन टाकून, पुण्याचे पर्यावरणच नष्ट होण्याची भिती, बांधकाम उद्योगातील काही बडे व्यावसायिक, राजकीय पाठिंबा असलेले धनदांडगे व पुण्याच्या महानगरपालिकेतील काही मंडळी हे सर्व मिळून करत असलेल्या एका उद्योगामुळे निर्माण झाली आहे. या उद्योगाची व्याप्ती बघितल्यावर हे जर असेच चालू राहिले तर थोड्याच वर्षात पुणे हे एक अत्यंत गलिच्छ व घाणेरडे शहर होणार आहे या बाबत माझी खात्रीच पटली आहे. वैयक्तिक फायद्यासाठी पुण्याचे पर्यावरण नष्ट करण्याचा हा जो अभद्र उद्योग सध्या ही मंडळी करत आहेत त्याची वाचकांना थोडीफार माहिती व्हावी म्हणून या लेख मालिकेचा प्रपंच करतो आहे.
पुणे महानगरपालिकेने आपल्या वेब साईटवर ‘Pune storm water master plan drawings’ या नावाखाली पुण्यातल्या सर्व विभागात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी काय व्यवस्था केली आहे याची तपशीलवार नकाशे ठेवले आहेत. यापैकी ‘प्रभात रोड खोरे’ (Prabhat Road Basin) हा नकाशा मी उघडला.
 
प्रभात रोड परिसरातील पाऊसपाण्याचा निचरा कसा होईल? महानगरपालिकेने 
प्रसिद्ध केलेला नकाशा. यात फक्त एक नैसर्गिक नाला(निळ्या रंगात) दाखवला आहे.
या ड्रॉइंगवर अस्तित्वात असलेले सर्व नदी नाले निळ्या रंगात आखलेले आहेत तर महानगरपालिकेने टाकलेल्या पाणीवाहक नळ्या लाल रंगात दाखवलेल्या आहेत. यानंतर माझे घर आणि प्रभात फिल्म कंपनी (सध्याची फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) या मधले माळरान जिथे होते तो नकाशाचा भाग मी उघडला.
या ठिकाणी झालेले नवे समांतर रस्ते या रस्त्यांच्या कडांनी महानगरपालिकेने टाकलेले नळ वगैरे सर्व या नकाशात आहे. पण माझ्या घराशेजारचा ओढा नकाशात नाहीच. तो संपूर्णपणे गायब झालेला आहे. माझी खात्री आहे की सर्व्हे ऑफ इंडियाच्या कोणत्याही जुन्या नकाशात हा ओढा असणार आहे पण महानगरपालिकेच्या हिशोबात हा ओढा किंवा नाला कधी अस्तित्वातच नव्हता.
प्रभात फिल्म कंपनी शेजारील परिसरातील पाण्याचा निचरा. निळ्या रंगात 
दाखवलेला जुना नाला आता अस्तित्वात नाही.
समजा हा ओढा तसाच ठेवून नवीन प्लॉट्स पाडायचे असे महानगरपालिकेने ठरवले असते तर काय झाले असते? एकतर या ओढयाची संपूर्ण जागा घरबांधणी न करता आल्याने बांधणी व्यावसायिकांच्या दृष्टीने पूर्ण वाया गेली असती. सध्याचे एकमेकाला समांतर रस्ते, त्या मधली घरे हे सगळे साध्य झाले नसते. म्हणजे जमीन मालक, डेव्हलपर या सर्वांचे नुकसानच झाले असते. त्यामुळे नकाशावरून ऑढाच गायब केला की काम सोपे झाले.
माझ्या पक्के स्मरणात आहे की माझ्या घराशेजारील ओढ्यासारखेच आणखी दोन मोठे ओढे या भागात होते. त्यातील एक ओढा डहाणूकर सोसायटीच्या थोड्या अलीकडे कर्वे रोडला छेदत असे तर दुसरा एक मोठा ओढा कासट पेट्रोल पंपाजवळ कर्वे रोडला छेदत असे. या ओढ्याच्या पाण्याला एवढी ओढ असे की 1060च्या दशकात खडकवासल्याच्या ऍकॅडमीमधल्या एका अधिकार्‍याचे सर्व कुटुंब आपल्या गाडीतून हा ओढा क्रॉस करत असताना वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या नकाशांच्यात या ओढ्यांचा आज मागमूसही दिसत नाही. (एरंडवणे व भांबुर्डे या जुन्या दोन खेड्यांच्या सीमेवरचा मोठा ओढा, जो लॉ कॉलेज परिसराच्या मागच्या टेकडी पासून सुरू होऊन हा परिसर दुभागतो व ज्याच्या पात्रामधेच कमला नेहरू पार्क शेजारचे दत्त मंदिर बांधलेले आहे; तो ओढा फक्त या नकाशात मला सापडला.)
नकाशावरची निळी रेघ खोडून टाकली की ओढा गायब होऊ शकतो. सबंध पुणे शहरातले असे किती ओढे नकाशावरून गायब झाले किंवा केले गेले असतील हे सांगणे केवळ अशक्य आहे. पण ओढे गायब झाले तरी हे ओढे जे पाणी पूर्वी नदीकडे वाहून नेत असत ते पाणी अजुनही तसेच व तितक्याच जोराने टेकड्यांवरून वहात येते आहे. हे पाणी मग लोकांच्या सदनिका संकुलात शिरले, घरात शिरले तर त्यात नवल करण्यासारखे काही नाही.
ओढे गायब करून जास्त जास्त जमीन घर बांधणीला उपलब्ध करून घ्यायचा हा सोपा मार्ग पुण्यातल्या जमीन मालकांना आणि घरबांधणी व्यावसायिकांना सापडला खरा! परंतु आता जुने पुणे व त्याच्या आजुबाजूच्या भागात, मोकळ्या जागाच घरबांधणी व्यावसायिकांना उपलब्ध राहिल्या नव्हत्या. या सुमारास पुण्याच्या उत्तरेकडे हिंजवडीला माहिती उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ लागला. या घटनेमुळे पुण्याच्या उत्तरेला असलेल्या व पश्चिम-पूर्व वाहणार्‍या मुळा नदीच्या दोन्ही काठांवरील भूखंडात, घरबांधणी उद्योग विकसित करण्याची एक मोठी संधी या उद्योगापुढे चालून आली. मुळा नदीच्या दक्षिण तीरावरच्या भूखंडाचा विकास करण्यात या व्यावसायिंकासमोर दोन मोठ्या अडचणी होत्या. या अडचणी दोन छोटेखानी नद्यांच्या स्वरूपात होत्या. या पैकी जरा मोठ्या असलेल्या नदीचे नाव आहे राम नदी व अगदीच छोटेखानी असलेल्या दुसर्‍या नदीला देव नदी असे नाव आहे. शहरात आधी अस्तित्वात असलेल्या व नकाशावरून पुसुन टाकल्या गेलेल्या असंख्य ओढ्यांसारख्या या नद्या नव्हत्या. त्यांना थोडेफार का होईन सतत पाणी वर्षभर होते आणि पावसाळ्यात त्या चांगल्याच फुगत होत्या.
घर बांधणी उद्योग व महनगपालिका यांच्या संयुक्त उद्यमाने या नद्यांची मृत्यूघंटा वाजवण्याचा कसा प्रयत्न केला गेला त्याचा आढावा पुढील भागात घेऊया.
22 जानेवारी 2012

Thursday, 18 December 2014

पानिपत मोहिमेचा खर्च 900 कोटी रुपये


भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या पानिपतच्या लढाईचा एकूण खर्च किती आला असेल असे वाटते? आतापर्यंत, या लढाईत किती शूर वीर मराठ्यांनी गमावले याची माहिती आपण इतिहासात नेहमीच वाचतो. परंतु ही एवढी मोठी व दीर्घ काल चाललेली मोहिम करण्यासाठी पेशवे दरबारला एकूण किती खर्च आला याचा निश्चित आकडा कोणासच माहीत नव्हता.
अहमद शाह अबदाली दिल्लीवर चालून येत आहे हे समजताच मार्च 19 1760 रोजी सदाशिव राव भाऊ यांना दारूगोळा, सैन्य व आवश्यक तेवढे धन देऊन नानासाहेब पेशवे यांनी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी पाठ्वले होते. 1 ऑगस्ट 1760 ला मराठे दिल्लीला पोचले होते व दुसर्‍या दिवशी त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला होता. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला होता.
अहमद शाह अबदाली आणि मराठी फौज यांच्यातील युद्ध 14 जानेवारी 1761 ला पानिपत येथे लढले गेले होते व या लढाईमध्ये मराठ्यांचा दारूण पराभव झाला होता. युद्धक्षेत्रावर मराठ्यांचा पराभव झाला असला तरी नंतरच्या काळात या मोहिमेवर पेशवे दरबारचा खर्च चालूच होता. पेशवे दरबारच्या हिशोबनीसांनी या युद्धावर झालेल्या खर्चाचा हिशोब अगदी बारीक तपशीलासह लिहून ठेवलेला आहे. या खर्चामध्ये कोणत्या प्रकारचा दारूगोळा मराठ्यांनी वापरला होता? ऊंट, हत्ती यावर किती खर्च झाला होता? याची नोंद आहे. मराठ्यांनी 18 कारखाने युद्धक्षेत्रात उभे केले होते. या कारखान्यात लोहार, सुतार, मिस्त्री आणि मजूर यांच्यावरचा खर्च, सैन्यासाठी गुप्त हेर, न्हावी,शिंपी आणि पहारेकरी यांच्यावरचा खर्च, या सर्व खर्चांची नोंद या हिशोबनीसांनी ठेवलेली आहे.
पेशवे दरबारने या युद्धावर एकूण 92,23,242 रुपये आणि 9 आणे (बाण्णव लाख तेवीस हजार दोनशे बेचाळीस रुपये व नऊ आणे) एवढा खर्च केला होता. या खर्चात 2 ऑगस्टला दिली ताब्यात घेतल्यावर पुढचे साडेतीन महिने शिबंदीवरील खर्च, दिल्लीतील देवळे व मशिदी यांना दिलेल्या देणग्या, संत ,फकिर, मौलवी यांना दिलेली बिदागी यावरील खर्च निराळा दाखवलेला आहे. हा खर्च 14,71,326 रुपये (चवदा लाख एकात्तर हजार तीनशे सव्वीस रुपये) एवढा झाला होता.
1761 ते 2011 या कालातील रुपयाच्या किंमतीतील फरक लक्षात घेतला तर आजच्या रुपयाच्या किंमतीनुसार मोहिमेचा एकूण खर्च 900 कोटी रुपये व दिल्लीतील खर्च 150 कोटी रुपये येतो. पुण्यातील एक इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी नुकतेच काही नवीन मोडी कागदपत्रांचे वाचन केले असता ही माहिती उजेडात आली. हे पैसे मराठ्यांनी कसे उभे केले असतील याची कल्पना या कागदपत्रांवरून येते असे श्री. बलकवडे यांचे मत आहे.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कालात मराठी सत्ता किती वैभवसंपन्न असली पाहिजे याची एक चुणूक या हिशोबामुळे उजेडात आली आहे.
17 डिसेंबर 2011

Tuesday, 9 December 2014

एक हृदयस्पर्शी सोहळा


पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमधून 1959 मध्ये मी एसएससी परिक्षा उत्तीर्ण झालो. त्या वेळी आमची शाळा पुण्यातील एक अग्रणी शाळा म्हणून मानली जात असे. तरीही आपल्या शाळेविषयी काही मुलांना जसे वाटते तसे प्रेम मला या शाळेबद्दल कधीच वाटले नाही. मात्र माझे काही शिक्षक व शाळासोबती यांच्या आठवणींसाठी माझ्या मनाचा एक कोपरा राखून ठेवला गेला आहे हे मात्र नक्की! काही दिवसांपूर्वी, माझी पत्नी, पुण्याच्या जुन्या पेठांमधील एका भागात, रस्त्याने चालत जात असताना, ओळखीचे कोणीतरी आपल्याला पास झाले असावे असे तिला वाटले म्हणून तिने मागे वळून बघितले. ती व्यक्तीही तिच्याकडेच वळून बघत होती. ती व्यक्ती म्हणजे माझा एक शाळा सोबती होता हे माझ्या पत्नीच्या लगेच लक्षात आले. त्यांचे थोडेफार बोलणे झाले व माझ्या पत्नीने या माझ्या शाळासोबत्याचा दूरध्वनी क्रमांक उतरवून घेतला व नंतर मला दिला.

मी अर्थातच नंतर या मित्राला फोन केला व आमचे भेटण्याचे ठरले. दोघेच किती वेळ बोलणार म्हणून त्याने त्याच्या माहितीतील आणखी दोघा मित्रांना त्यांच्या पत्नीसह माझ्याकडे जमण्याचे ठरले असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे हे सर्व जण माझ्याकडे एका रविवारी संध्याकाळी आले. भेळ, आईसक्रीम असा मस्त बेत आम्ही ठरवला होता. त्या संध्याकाळी भरपूर गप्पा झाल्या. आणखी कोण शाळामित्र कोठे आहेत त्याची उजळणी झाली. कोणते शिक्षक अजून हयात आहेत हे कळले. एकूण पाहता ती संध्याकाळ म्हणजे भूतकालातील एक सफरच आहे असे मला तरी वाटले.
त्या संध्याकाळी, गप्पांच्यात असा एक विषय निघाला की 1959 च्या बॅचचे एक पुनर्भेट संमेलन का भरवू नये? बोलणे खूप सोपे होते पण हे घडवून आणणे महाकर्म कठिण होते. एकतर त्या वेळी असलेल्या सर्व वर्गमित्रांची नावे सुद्धा आठवत नव्हती तर त्यांचे पत्ते कोठून माहिती असणार? पण माझ्या पत्नीला प्रथम भेटलेल्या वर्गमित्राला, ही कल्पना एकदम आवडली. म्हणजे तो या कल्पनेने झपाटलाच गेला. हे संमेलन भरवायचेच असे त्याने ठरवले व माझ्यासारख्या दोन चार मित्रांना बोलावून हे करायचेच असे सांगितले. आम्ही त्याला पाहिजे ती मदत करू असे आश्वासन दिले असले तरी हे संमेलन प्रत्यक्षात येईल असे मला तरी काही वाटते नाही.
माझ्या या मित्राने पुढचे 3/4 महिने या संमेलनाचा विचार करण्याखेरीज दुसरे काही केलेच नाही. फेसबूक, इंटरनेट, ई-मेल ही साधने वापरून त्याने झपाट्याने मित्रांचा शोध चालू केला. माझ्या पिढीत परदेशी जाण्याचे खूळ शक्यही नव्हते व बोकाळलेही नव्हते. त्यामुळे बरेचसे शाळा मित्र आताही पुण्यातच रहात होते. माझ्या या मित्राने पायी फिरून पुण्याच्या जुन्या भागांच्यातून, गल्लीबोळांतून, हळूहळू मित्रांची माहिती काढली. एक मित्र सापडला की त्याला माहिती असलेले आणखी दोघे चौघे सापडत. असे करत त्याला एकूण 38 मित्रांची नावे सापडली. त्यांच्याशी संपर्क साधला गेला. मग माझ्या या मित्राने पंधरा एक मित्रांची एक बैठक बोलावली. बोलावल्यापैकी बहुतेक जण आले व त्यांनी ही पुनर्भेट संमेलनाची कल्पना उचलून धरली. एक सुकाणू समिती नेमली, वर्गणी ठरली, कामांचे वाटप झाले आणि हे पुनर्भेट संमेलन भरवायचे नक्की ठरले.
मग या सुकाणू समितीने शाळेच्या विद्यमान प्रमुखांची भेट घेतली. या प्रमुखांना ही संमेलनाची कल्पना खूपच आवडली. आणि आम्ही माजी विद्यार्थी संस्थेला काहीतरी घसघशीत देणगी देणार आहोत हे कळल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आम्हाला जे शिक्षक शिकवत असत त्या पैकी दोघेजण अजून हयात आहेत हे कळल्यावर त्यांना या संमेलनाला बोलावयाचे हे साहजिकच ठरवले गेले. या संमेलनाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्याची कल्पना निघाली. शाळाप्रमुखांना ती फारच पसंत पडली. त्यांनी तर अशी विनंती केली की आम्ही बर्‍याच संख्येने झाडे लावून द्यावीत. त्यासाठी पक्के बांधलेले पार, शाळेने बांधून देऊ म्हणून मान्य केले.

माझ्या शाळामित्राच्या या अथक प्रयत्नांमुळे मागच्या रविवारी आमचे हे पुनर्भेट संमेलन यशस्वी रित्या पार पडले. सकाळी नाश्ता झाल्यावर, सर्वांचा ग्रूप फोटो झाला व त्यानंतर एक सभा आयोजित केली गेली. आमचे जे दोन शिक्षक या संमेलनाला उपस्थित राहू शकले त्यातले एक माझे अत्यंत आवडते शिक्षक होते. त्यांना माझे नाव सांगितल्याबरोबर मी कोठे रहात होतो हे त्यांना लगेच स्मरले. 52 वर्षांनंतर, माझ्यासारखा एक सामान्य विद्यार्थी, आमच्या सरांच्या लक्षात अजून आहे हे लक्षात आल्यावर मला पुढे काही बोलताच येईना व डोळ्यात पाणीच उभे राहिले. सभेमधे शाळेला देणगी देणे, गुरूजनांचा सत्कार करणे वगैरे औपचारिकता पार पडल्यावर आम्ही मुख्य कार्यक्रमाकडे वळलो.
शाळा मित्रांचे छंद, व्यासंग काय आहेत हे इतरांना कळावे म्हणून एक छोटेसे प्रदर्शन आम्ही सभागृहाच्या बाजूलाच आयोजित केले होते. यात परदेशी असलेल्या काही जणांच्या पेंटींग्जची छायाचित्रे, वूड कार्व्हिंग्ज, पेपर मॉडेल्स, पुस्तके, काव्य संग्रह असे बरेच काही होते. काही मित्रांची मुले नातवंडे पण आपल्या वडिलांची, आजोबांची शाळा बघण्यासाठी म्हणून आवर्जून आले होते.


हे संमेलन आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू, इतकी वर्षे दुरावलेल्या शाळा सोबत्यांची, पुन्हा एकदा ओळख करून घ्यायची व जुनी मैत्री परत वृद्धिंगत करायची हाच असल्याने परस्पर ओळखीचा कार्यक्रम हेच आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने या संमेलनाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमात पाळीपाळीने एक एक वर्गमित्र आपल्या पत्नीसह सभामंचावर आला व शाळा सोडल्यावर पुढे काय शिक्षण घेतले नंतर नोकरी व्यवसाय काय केला, पत्नीचे शिक्षण, नोकरी व्यवसाय आणि मुलांबद्दलची माहिती त्याने आम्हाला दिली. आता बहुतेक जण निवृत्त झालेले असल्याने सध्या वेळ कसा घालवतो, छंद काय? आणि सोशल नेटवर्किंग कसे करतो या बद्दलची माहिती त्याने थोडक्यात दिली.
माझ्या शाळामित्रांची ही निवेदने ऐकत असताना आमच्या चाळीस किंवा पन्नास जणांच्या या बॅचमधल्या मित्रांच्या गत आयुष्यात केवढा फरक होता? अनेकांना सांसारिक अडचणींना, शारिरीक व्याधींना कसे तोंड द्यावे लागले? हे सगळे ऐकणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे असे मला सतत वाटत राहिले. डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक, प्रोफेसर व डिपार्टमेंट हेड, युनिव्हर्सिटी प्रोफेसर, प्रथितयश कारखानदार, व्यापारी, बॅन्कर, मॅनेजमेंट, शासकीय अधिकारी या सारख्या सर्व क्षेत्रांत माझ्या मित्रांनी नाव कमावलेले दिसले. बहुतेकांच्या पत्नी सुविद्य आणि काहीतरी व्यवसाय करत होत्या. अर्थात काही जणी गृहिणी होत्या. या संमेलनासाठी एक मित्र कोल्हापुराहून तर एक जण मुंबईहून पुण्याला आला होता.दोघे तिघे परदेशी स्थायिक झाले होते त्यांनी संदेश पाठवले होते.
काही जणांचे आयुष्य खूपच खडतर गेले होते. आयुष्यात आलेल्या सुसंधी, केवळ आजारपणामुळे हातातून सुटल्या होत्या. सरकारी नोकरी करणार्‍यांना आडगावी रहावे लागले होते. एसएससी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवणार्‍या एकाला तर आयुष्यभर सतत कनिष्ठ पदांच्यावर रहावे लागले होते. एकाने प्रथम सैन्यात अधिकारी, नंतर अमेरिकेत दुकान चालवणे व नंतर उत्पादनाचा व्यवसाय करणे व अखेरीस भारतात येऊन विक्री व्यवसाय करणे या सारखे बहुरंगी व बहुढंगी व्यवसाय केले होते. एका रुक्ष सरकारी ऑफिसात काम करणारा माझा एक मित्र आज सुंदर कविता, गझल करत होता. अपघातामुळे काहींच्या आयुष्यांना कलाटणी मिळाली होती, एक दुर्बलता आली होती. वैयक्तिक आयुष्यात घटस्फोट, पत्नी वियोग या सारख्या दुर्घटनांना काही जणांना तोंड द्यावे लागले होते.
मित्रांची निवेदने ऐकत असताना मला असे सारखे जाणवत होते की भले! जरी आमच्या सगळ्यांचे आयुष्य अगदी भिन्न मार्गांवरून गेले असले किंवा चालले असले तरी आमच्या सर्वांच्या आयुष्यात काहीतरी समान सूत्रे आहेत. विद्युत पुरवठा करणार्‍या एका संस्थेत काम करणार्‍या माझ्या एका मित्राने
भ्रष्टाचारापासून चार हात दूर रहाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने, आयुष्यभर त्याला मिळालेले प्रत्येक पोस्टिंग हे खेडेगावात किंवा नागरी सुविधा नसलेल्या स्थांनावरच दिले गेले होते. व त्या बद्दल त्याची काही तक्रारही नव्हती. दुसर्‍या एका मित्राने चालून आलेली सरकारी नोकरी न स्वीकारता प्राध्यापकाची नोकरी घेतली होती. तर आणखी एका मित्राने, सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरी तिथला भ्रष्टाचार बघून सोडून दिली होती. औषधांचा व्यवसाय करणारा एक मित्र फावल्या वेळात संस्कृत पुस्तकांचे अध्ययन करत होता. वर उल्लेख केलेल्या व एसएससी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या माझ्या मित्राला, प्रथम श्रेणीची बढती मिळाल्यावर पोस्ट नाही म्हणून जुन्याच पदावर काम करायला लागले होते व निवृत्त होण्याच्या अगोदर ती पोस्ट दिली गेली होती.
त्यांच्यावर आयुष्यात काहीतरी अन्याय झाला होता हे जरी या माझ्या मित्रांच्या निवेदनावरून स्पष्ट कळत होते तरी अतिशय तटस्थ रित्या त्यांनी हा अन्याय स्वीकारला होता. त्यासाठी आपल्या आयुष्याची मूल्ये त्यांनी गमावली नव्हती. मूल्यांना धरून राहिल्यानेच आज गत जीवनाबद्दल एवढ्या तटस्थपणे ते सांगू शकत होते. शाळेतल्या आम्हा सर्वांच्या आयुष्यात, बरे वाईट, कमी अधिक प्रसंग आले असले तरी आमच्यापैकी कोणीच आपली मूल्ये सोडली नव्हती. खरे तर आम्हा सर्वांमधे, शिक्षण, पदे, आर्थिक परिस्थिती यात काहीच समानता नव्हती तरीही आम्हाला आम्ही सर्व जण एकाच विचार पातळीवर आहोत हे सारखे लक्षात येत होते. हे असे कसे शक्य आहे? याचे गमक मला त्यावेळी लक्षात आले नव्हते परंतु नंतर मात्र आले. शाळेने जे संस्कार आमच्यावर केले होते त्यातूनच ही मूल्यनिष्ठता आमच्या मनात रुजली होती. त्यामुळेच आयुष्यात पुढे काहीही घडले असले तरी शाळेत मिळालेले हे संस्कारधन आम्ही आमच्या मनात एखाद्या आठवणीसारखे जपून ठेवले होते. माणूस घडवताना शाळेचे कार्य किती महत्वाचे असते याची ही जणू एक प्रचिती होती.
हा कार्यक्रम संपला आणि सगळ्यांनाच परत एकदा आपल्या जुन्या मित्रांच्या जवळ आल्यासारखे वाटले पुढचे वृक्षारोपण, भोजन आणि काव्यवाचन हे कार्यक्रम सर्वांनीच एका निराळ्याच मूड मध्ये पण भरपूर आनंदात अनुभवले. संध्याकाळ कधी झाली ते समजलेच नाही.
19 ऑगस्ट 2011

Saturday, 6 December 2014

निमित्त विमानप्रवासाचे


मागच्या आठवड्यात विमानाने दिल्लीला जाण्याचा योग आला. खूप वर्षात विमानाने भारतामधे प्रवास केला नव्हता. दिल्लीला तर मागच्या तीस वर्षांत गेल्याचे आठवत नाही. त्यामुळे सगळेच नवीन होते. अगदी पुण्याच्या विमानतळापासून. आमचे विमान सकाळी साडे अकराच्या सुमारास सुटणार होते. माझा जुना अनुभव लक्षात होता. त्या वेळेस पुण्याचा विमानतळ म्हणजे अगदी छोटासा होता. एका वेळी जेमतेम एखादे विमान विमानतळावर येऊन उभे रहात असे आणि तेही इंडियन एअरलाइन्सचे डाकोटा किंवा DC3 विमान. दुसरी कोणतीही विमान सेवा देणारी कंपनीच तेंव्हा नव्हती. विमानतळावर गेल्यावर तिथली गर्दी बघून धक्काच बसला. सात आठशे माणसे तरी कोठेतरी निघालेली होती. आत गेल्यावर लक्षात आले की समोर चार किंवा पाच विमाने थांबलेली आहेत. ती सुद्धा मोठी जेट विमाने. त्यातली तीन विमाने तर दिल्लीलाच निघणार होती. तीन विमान कंपन्यांची दिल्लीला जाणारी विमाने दहा पंधरा मिनिटाच्या फरकाने आता दिल्ली कडे जाणार होती. हे सगळे माझ्या कल्पनेच्या आवाक्याच्या बाहेरचे वाटते होते. मग तिथला एक बोर्ड बघितला. त्या बोर्ड प्रमाणे रोज दिल्लीला जाण्यासाठी 11 विमान सेवा होत्या. म्हणजे 1500 ते 2000 प्रवासी रोज पुण्याहून दिल्लीला जाऊ शकत होते. आमच्या फ्लाईटला असलेली गर्दी बघून एवढी मंडळी रोज दिल्लीला जात असणारच याची खात्रीच पटली.
विमानाचे तिकिट मी जालावरून काढले होते. त्याचे फारसे अप्रूप मला नव्हते कारण परदेश प्रवासाची तिकिटे मी जालावरून काढतोच. परंतु आश्चर्य वाटले ते एका नव्या प्रकारच्या संकेत स्थळांचे किंवा वेब साईट्सचे. सिंगापूर एअरलाईन किंवा सिल्क एअर यासारख्या विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर जाऊन तिकिट काढणे हे माझ्या परिचयाचे होते. पण आता या नवीन संकेतस्थळांवर कोणत्याही विमान कंपनीच्या विमान सेवेचे तिकिट काढता येते. त्यांचे दर आता पूर्वीसारखे फिक्स पण नसतात व ते सारखे बदलत राहतात. शोधाशोध करून स्वस्त फ्लाईट मिळू शकते हा सगळा प्रकार मला नवीनच होता.
1960 किंवा 1970 च्या दशकात केलेले विमान प्रवास मला अजून आठवतात. तिकिट काढण्यासाठी विमान कंपन्यांच्या ऑफिस मधे जाणे मग ती लांबलचक अनेक पाने असलेली तिकिटे, त्याच्या बरोबर एखादे प्लॅस्टिक फोल्डर मिळत असे. ते घ्यायचे. ते तिकिट जपून ठेवायचे कारण ते दाखवल्याशिवाय तुम्हाला चेक इन करता येत नसे. तिकिटावरचे नाव आणि तुमचे नाव हे एक असलेच पाहिजे असे नव्हते कारण तिकिटावर नाव असलेली व्यक्ती खरोखरच प्रवास करते आहे का ही माहिती करून घेण्याची विमान कंपन्यांना जरूरीही नसे व ते महत्वाचे पण नव्हते. अलीकडे तिकीट नसले तर एअरपोर्ट वर छापून मिळते पण तुमचे सरकारी ओळखपत्र नसले तर तुम्हाला विमानात प्रवेश मिळणे मुष्किलच. त्या वेळेला सुरक्षा जांच वगैरे प्रकारही नव्हते. सामानही कोणी तपासत नसे. अलीकडे सामान क्ष किरणांनी तपासल्याशिवाय पुढे जाणेही शक्य नाही. पुण्याचा विमानतळ म्हणून तेंव्हा वायुदलाचा एक हॅन्गर वापरात येत असे. प्रवाशाला पोचवायला आलेला कोणीही अगदी विमानाच्या थोड्या अलीकडे पर्यंत जाऊ शकत असे. मी बंगलुरुला रहात असताना माझे वडील मला एकदा भेटायला आले होते. त्यांच्या अगदी विमानापर्यंत त्यांना पोचवायला गेल्याचे मला आठवते. आता पोचवायला आलेल्या माणसाला इतक्या लांब अंतरावरूनच परत पाठवतात की विमानतळावर निरोप द्यायला जाण्यासारखा मूर्खपणा नसावा.
आमच्या दिल्लीच्या विमानफेरीत हवाई सुंदर्‍या होत्या पण खाणे पिणे वगैरे काही नव्हतेच त्यामुळे त्यांना फारसे काम पण नव्हते.विमानाची साफसफाई करताना त्याच दिसल्या. अगदी पिण्याचे पाणी हवे असले तरी ते अलीकडे विकत घ्यावे लागते. पूर्वी थंडगार तेलकट समोसे. लेमन किंवा चहा कॉफी , लेमनच्या गोळ्या, यू-डी कलोन वगैरे सारख्या मिळणार्‍या कोणत्याच गोष्टी आता मिळत नाहीत. विमानसेवेचे तिकिट काढल्यावर विमान कंपनी त्या स्थळावर तुम्हाला पोचवण्याची जबाबदारी घेते. बाकी तुमचे तुम्ही बघायचे. नशीब की आंतर्राष्ट्रीय विमान सेवांच्यात अजून जेवण खाण देतात. नाहीतर दहा बारा तास प्रवास करायचा पण खायला प्यायला विकत घ्यायचे हा प्रकार सुरू झाला नाहीये.
माझ्या एक परिचित महिला आहेत. स्वकष्टाने अगदी साधारण परिस्थितीतून वर आलेल्या. परवा त्या मला म्हणत होत्या की या सुट्टीत शिमला, मनालीची सफर करण्याचा बेत आहे पण मुलगा म्हणतो आहे की दर वेळेस आपण कोठेही जायचे असले की द्वितीय वर्गाने, फार फार तर शयन यान, प्रवास करतो. आता विमानाने जाऊया. मी आश्चर्याने थक्क झालो. पूर्वी विमान जवळून बघितले असलेल्यांची संख्या (आत बसण्याचे सोडूनच द्या.) नगण्य असे. आता सामान्य माणसे सुद्धा विमानाने जाण्याचे बेत करू लागली आहेत. भारत समृद्धीच्या मार्गाने नक्की वाटचाल करतो आहे याची ही एक खूण आहे नक्की. काही वर्षात रेल्वे स्टेशनसारखी गर्दी बहुदा विमानतळांच्यावर होऊ लागेल आणि ती तशी व्हायलाच पाहिजे आहे.
माझी दिल्लीची ट्रिप संपवून मी पुण्याच्या विमानतळावर उतरलो तेंव्हा रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. विमानतळावर गर्दीचा महापूर होता कारण एका पाठोपाठ विमाने उतरत होती. बाहेर आल्यावर वाहतुक मुरंब्याने सर्व वाहतुक कोलमडली असल्याचे लक्षात आले. याच पुण्यात, रात्रीचे आठ वाजून गेल्यावर रस्त्याने जायला नको वाटे. लोहगावच्या आसपास तर भटकी कुत्री सुद्धा बहुदा फिरकत नसावीत. या भूतकालाची मला आठवण झाली आणि मोठी गंमत वाटली.
कालाय तस्मै नम: हेच खरे.
4 मार्च 2011

Wednesday, 3 December 2014

आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने


आमच्या शाळेच्या मुख्य दरवाज्यातून आत शिरले ही एक वर्तुळाकार कक्ष लागत असे. या कक्षात समोरच लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या शाला संस्थापकांचे अर्धपुतळे भिंतीच्या कडेला बसवलेले दिसत असत. डाव्या हाताला एक मोठा सूचना फलक असे. या सगळ्यातच कुठेतरी दोन चार सुभाषिते लिहिलेले फलकही अडकवलेले असत. ती सुभाषिते कोणती होती हे आता काही नीटसे आठवत नाही. परंतु ” क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.” असे शब्द लिहिलेला व छान पॉलिश केलेला एक लाकडी फलक, नोटिस बोर्डाच्या बाजूला लावलेला होता हे मात्र चांगले स्मरते आहे. शाळेत ये जा करताना किंवा सूचना फलकावर दृष्टीक्षेप टाकताना ही ‘क्रियेवीण वाचाळता‘ आम्ही मुले रोज बघत असू. पण या वाक्यातून काही शिकण्यासारखे आहे किंवा बोध घेण्यासारखे आहे असे कधीच वाटले नाही व आताही वाटत नाही.
मागच्या वर्षी पुणेकरांच्या ध्यानी मनी फक्त एकच विषय होता. रस्त्यावरची घाण, पाणी पुरवठ्याची अनियमितता, गर्दी, धूळ सगळेच मागे पडले होते. सर्व नेतेमंडळी मोठ्या हिरिरीने स्वत:ची या विषयावरची मते मांडत होते. नागरिकांच्या चर्चा झडत होत्या. काही विचारू नका!. हा विषय होता अर्थातच पुण्यामधे मेट्रो आणावी का नाही? ती मेट्रो उड्डाण पुलांवरून न्यावी का भूमिगत असावी? तिचे थांबे कुठे असावे? इतके चर्वितचर्वण झाले की सर्व पुणेकरांना वाटू लागले की मेट्रो आता येणार व आपले शहरांतर्गत प्रवासाचे हाल कमी होणार. पुणे महानगरपालिकेने मोठ्या वादविवादानंतर हा प्रकल्प मंजूर केला. या गोष्टीनंतर आता सहा महिन्याहून अधिक काळ लोटला. मेट्रो प्रकल्पाची फाईल नोकरशाहीच्या यंत्रणेने बहुदा गिळून टाकली. आता जर कोणा पुणेकराला मेट्रोबद्दल विचारले तर ” कसली मेट्रो?” असे उत्तर मिळेल अशी मला खात्री वाटते.
दोन वर्षांपूर्वी या मेट्रो संबंधितच एक विषय पुणेकरांच्या चर्चेसाठी आला होता. तेंव्हा एक रुळाची आगगाडी बसवावी असे काही नगरसेवकांच्या मनात आले. झाले त्यावर चर्चा सुरू. काही म्हणत एक रुळाची गाडी नको ती धोकादायक असते. दुसर्‍यांच्या मते ही एक रुळाची गाडी हा पुण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. चर्चा झाल्या. वृत्तपत्रांना मथळे मिळाले. आता मुंबईमधे ही एक रुळाची मोनोरेल सुरू पण झाली असे ऐकले. पुण्याच्या मोनोरेलची बहुदा फाईलच कधी बनली नसावी. मग ती नोकरशाही यंत्रणेने गिळली असा दोषारोप करणेही शक्य नाही.
मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे महानगरपालिका या वर्षात काहीतरी पंधरा वीस उड्डाण पुलांचे काम चालू करणार अशा बातमी वाचली. माझ्या घराजवळ असलेल्या ” नळ स्टॉप” चौकाचेही नाव त्यात वाचले. मनाला जरा बरे वाटले की आपल्या घराजवळच्या वाहतुकीत आता जरा थोडी सुधारणा होणार. आता पुढचे म्हणजे या वर्षीचे अंदाजपत्रक सादर झाले तरी मागच्या वर्षभरात कोणत्याच उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन झाल्याचेही ऐकिवात नाही. कदाचित मंडईत नारळांची टंचाई झाल्यामुळे असे झाले असावे. हरकत नाही. काम सुरू झाले नाही तरी हे उड्डाण पूल कसे चांगले? व कसे हानीकारक? या विषयावर चर्चा तरी झाली की नाही? मग झाले.
माझ्या घराजवळ एक प्रशस्त रस्ता आहे कर्वे रस्ता म्हणून. या रस्त्याला बहुदा गिनीज किंवा लिमका बूक ऑफ रेकॉर्ड्स मधे स्थान मिळेल असे वाटते. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम गेली सहा सात वर्षे तरी सुरू आहे. इतक्या कालात दोन गांवांच्यामधे एखादा एक्सप्रेस हायवे सुद्धा बांधून झाला असता पण आमच्या कर्वे रस्त्याच्या कामाला अडचणीच फार. अजुनही या रस्त्याच्या बाजूचे पदपथ तयार नाहीतच. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे दुसर्‍या एका चर्चेच्या संबंधाने नुकतेच ऐकले. आमच्या घराजवळच्या भागात विजेचा नेहमीच लपंडाव चालू असतो. परवा विद्युत मंडलाच्या एका अधिकार्‍याने या अडचणीचे खरे कारण सांगितले. तो म्हणला की ” काय करणार? अहो कर्वे रस्ता खणता येत नाही ना आता! त्या मुळे केबल बदलता येत नाही.” मी त्याला माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे विचारून घेतले की कर्वे रस्त्यावर व्हायाडक्ट का काहीतरी बनवले होते ना केबल्स नेण्यासाठी, त्याचे काय झाले? त्या अधिकार्‍याला त्या संबंधात फारशी माहिती असल्याचे किंवा माहिती असल्याचे दर्शविण्याचा त्याचा अनुत्साह, माझ्या निदर्शनास आल्याने आता यापुढे आपल्याला वीज मधून मधूनच मिळणार एवढे मात्र नक्की समजले.
पुणेकरांच्या पुढे सध्या चर्चेसाठी दोन ज्वलंत विषय आलेले आहेत. 27 मार्गांच्यावर BRT किंवा जलद बस सेवा चालू करायची की नाही हा पहिला विषय. या विषयावर अर्थातच नेहमीप्रमाणे दोन तट आहेत. ” ती स्वार गेट- कात्रज सेवा आधी नीट करा आणि मग बाकीच्या रस्त्यांकडे वळा.” किंवा ” रस्ते अरूंद त्यात बसेस साठी स्पेशल लेन म्हणजे अपघाताला निमंत्रणच की!” वगैरे सारख्या चर्चा सुरू झाल्या आहेत आता कुठे पूर्वरंग सुरू झाला आहे. चर्चा संपेस्तोवर वर्ष संपेलच.
दुसरा महत्वाचा विषय म्हणजे अर्थातच दादोजी कोंडदेव. पुणे शहरापुढची सर्वात महत्वाची अडचण, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हीच तर होती. लाल महालात या 400 वर्षांपूर्वीच्या व्यक्तीचा असलेला पुतळा ही पुण्याची सर्वात मोठी समस्या होती म्हणे! त्याचे आता निराकरण झाल्याने बाकीचे प्रश्न म्हणजे BRT, मेट्रो वगैरे चुटकीसरशे सुटतील या बद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. या दादोजी व त्याच्या अनुषंगाने आलेल्या संत रामदासांच्या प्रकरणाने बरीच नवीन माहिती मला कळली. दादोजी या व्यक्तीचे आडनाव कुलकर्णी होते हे मला व माझ्यासारख्या अनेक लोकांना नव्याने कळले. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या मोठ्या सत्पुरुषांपैकी एक, ही संत रामदासांसंबंधीची माझी माहिती बहुदा चुकीची असावी आणि त्यांनी लिहिलेले दासबोध, मनाचे श्लोक वगैरेसारखे ग्रंथ विचारात घेण्याची बहुदा काही जरूरी नसावी आता दिसते आहे. आम्हाला इतके दिवस वाटत होते की शिवाजी महाराजांना त्यांनी लिहिलेले उपदेशपर पत्र म्हणजे मराठी साहित्याचा एक अमोल ठेवा आहे. शिवाजी किंवा रामदासांच्या कालापासून ते आजपर्यंत हयात असलेल्या काही मंडळींनी म्हणे सांगितले आहे की संत रामदास, शिवाजी महाराजांना कधी भेटलेलेच नाहीत. समकालीन नसावेत बहुदा! हे सगळे नूतन संशोधन कोणी व का केले? या मागचे इंगित रामदासांच्या आडनावात आहे. दादोजींचे आड्नाव कुलकर्णी असल्याने ते जसे Persona non grata झाले, तसेच रामदासांचे, ठोसर हे आडनाव बहुदा त्यांचा 400 वर्षांनंतर छळ करणार असे दिसते आहे. असो!
थोडक्यात काय पुणेकरांना चर्चेसाठी विषय असला म्हणजे झाले. रस्त्यांवरची गर्दी दिवसेदिवस वाढते आहे. प्रत्येक चौकात पोलिस सुद्धा वाहतुकीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे सगळे किरकोळ प्रॉब्लेम्स आहेत हो! महत्वाचे काय की कोणत्या तरी विषयावर चर्चा सुरू पाहिजे.
संत तुकारामांच्या (हे तरी नक्की राहणार असे दिसते आहे बरंका!) शब्दात सांगायचे तर पुणेकरांना “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने !” महत्वाची आहेत. बाकी आम्हाला काही गरजच नाही. कारण शेवटी पुणे तिथे काय उणे?
15 जानेवारी 2011

पुण्याची थंडी


मागच्या आठवड्यात, तब्बल साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर पुण्यामधे परत पाऊल ठेवले. माझी गाडी पुण्यात शिरली तेंव्हा सकाळचे साडेनऊ वाजून गेले होते. सिंगापूरच्या स्टॅन्डर्ड प्रमाणे एव्हाना उन्हाचे चटके बसणे अपेक्षित होते. गाडीतून उतरताना प्रथम जाणवला तो एक सुखद गारवा. सिंगापूरमधे गारवा ही चीज फक्त वातानुकूलित कक्षांमध्ये अनुभवायला मिळते त्यामुळे प्रथम काही क्षण लक्षातच आले नाही की अरे! पुण्यात चक्क थंडी पडली आहे. अलीकडे पुण्यात सुद्धा थंडी क्वचितच पडते. मागच्या वर्षी तर एक किंवा दोनच दिवस थंडी पडली होती. जरा गार होते आहे असे वाटू लागले की पावसाळी ढग येत व परत उकडू लागे.
या वर्षी मात्र हा अगदी सुखद असा बदल जाणवतो आहे. मधे 3 दिवस आकाश ढगाळच होते पण थंडी मागच्या वर्षी सारखी पळून गेली नाही. उलट गार गार वारे सुटले आणि समस्त पुणेकरांचे उबदार कपडे कपाटाच्या बाहेर आले. प्रत्यक्षात रात्रीचे तपमान फारसे खाली गेलेले नव्हते परंतु दिवसाचे तपमान मात्र एकदम उतरले व हवा एकदम मस्तच होऊन गेली.
अशी थंडी पडली की माझे मन एकदम भूतकाळातच जाते. शाळा कॉलेजमधले दिवस आठवतात. त्या वेळेला (सुमारे 50 तरी वर्षांपूर्वी) नोव्हेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला की थंडीची चाहूल लागत असे. कॉलेजमधले एक्स्ट्रॉ तास किंवा शाळेतल्या NCCच्या परेड्स या थंडीच्या दिवसात लवकर सकाळी ठेवल्याच पाहिजेत असा त्या काळी बहुदा नियम असावा. कारण आठवड्यात 3/4 दिवस तरी सकाळी काहीतरी कार्यक्रम असेच. म्हणजे सकाळी लवकर उठणे क्रमप्राप्त होत असे. अलीकडे पहाटेचे 5 वाजले की जागच येते व कधी एकदा अंथरूण सोडतो असे होतो. त्या काळात सकाळी साडेसहाला उबदार पांघरूण सोडून बाहेर गार हवेत कुडकुडत सायकल मारण्याची कल्पना सुद्धा अघोरी वाटत असे पण इलाज नसल्याने बाहेर पडावेच लागे. आमच्या शाळेतली अनेक मुले तेवढ्या थंडीत सुद्धा नुसता एक पातळ सदरा घालून येत. अलीकडे शाळेत जाणार्‍या मुलांच्या अंगावर मी निळा किंवा लाल पूर्ण बाह्यांचा स्वेटर बघतो. तो स्वेटर मुलांना म्हणे युनिफॉर्म म्हणूनच मिळतो. मी शाळेत असताना युनिफॉर्म म्हणजे पांढरा हाफ शर्ट व खाकी चड्डी एवढाच असे. हा युनिफॉर्म शिवणे सुद्धा बर्‍याच पालकांना जड जात असे. त्यामुळे युनिफॉर्मचा भाग म्हणून बूट किंवा कॅनव्हासचे स्पोर्ट्स शूज, स्वेटर वगैरे चैन तेंव्हा शक्यच नव्हती. बहुतेक मुले चपला घालूनच येत. आमच्या वर्गातली अनेक मुले एवढ्या थंडीत स्वेटर न घालता तर येत असतच पण आपल्याला कशी थंडी वाजत नाही हे ते मोठ्या प्रौढीने सांगत. एखादा मुलगा शाळेत स्वेटर घालून येतो म्हणजे तो मुलींसारखा नाजुक आहे असे समजण्यात येत असे. मी घरातून बाहेर पडायचो तेंव्हा स्वेटर घातला आहे की नाही हे माझी आई कटाक्षाने बघत असे. मग कोपर्‍यावर घर नजरेआड झाले की मी हळूच स्वेटर काढून दप्तरात ठेवून देत असे. शाळेत गेल्यावर अंगावर स्वेटर दिसला तर इतर मुलांना चिडवायला आपण आयतेच सावज होऊ ही भिती मनात असेच. जवळ स्वेटर असून, थंडीत कुडकुड्णारी आम्हीच मुले होतो असे नाही. तेंव्हा ती फॅशनच होती. अलीकडे संध्याकाळी, सकाळी थंडीत बाहेर पडले तर निरनिराळ्या रंगांचे स्वेटर्स, शाली, जॅकेट्स, जर्किन्स यांचे एक प्रदर्शनच बघायला मिळते. त्या वेळेस, आयते स्वेटर सहसा कोणी वापरत नसे. घरात कोणाला न कोणाला तरी विणकामाची आवड असल्याने, विणलेले स्वेटर्स घालण्याचीच प्रथा होती. जॅकेट्स, जर्किन्स वगैरे तर क्वचितच बघायला मिळत.
मी कॉलेजमधे असताना एकदा माझ्या वडिलांच्या मोटर सायकलचा पेट्रोलचा पाईप फुटला व त्यातून वाहणार्‍या पेट्रोलने अचानक पेट घेतला व मोठा जाळ झाला. मी प्रसंगावधान राखून एक फायर एस्टिंगविशर जवळ होता तो वापरून ती आग विझवली होती. माझ्यामुळे मोटर-सायकल वाचली असे घरात ठरले व मला बक्षिस म्हणून काय पाहिजे? अशी विचारणा झालेली मला आठवते. तेंव्हा मी ताबडतोब मला जर्किन हवा म्हणून माझी मागणी नोंदवलेली मला आठवते. मग कॅम्पातल्या मेन स्ट्रीटवर जाऊन एका शिंप्याकडून मी एक जर्किन शिवून घेतला होता. तो जर्किन मला एवढा आवडत असे की अगदी फाटेपर्यंत मी तो वापरला होता त्याचा तो हिरवट काळसर रंग मला अजून आठवतो. .
आमच्या शाळेच्या दरवाजाबाहेरच एक अमृततुल्य चहाचे दुकान असे. तिथला वाफाळणारा गरम चहा व पिळाची खारी बिस्किटे तोंडाला अगदी पाणी आणत. परंतु तेंव्हा पॉकेट मनी वगैरे प्रथा नसल्याने बहुतेक कोणाजवळ पैसे वगैरे नसतच. त्यामुळे इतर चहा पिणार्‍या मंडळींच्याकडे बघूनच समाधान मानावे लागे. एखाद वेळेस चुकून एखाद दुसरा आणा खिशात असला तर दोघे तिघे मिळून त्या चहाचा आस्वाद घेत असू. त्या घोटभर चहाची चव मात्र अजुन माझ्या जीभेवर रेंगाळत असते. आता कितीही महागातली चहाची पावडर आणली तरी तसा चहा परत आयुष्यात कधीच प्यायला मिळाला नाही हे ही खरेच आहे.
थंडी पडली की काही खास पदार्थ माझी आई बनवत असे. लसणीची फोडणी घातलेले खमंग मेथीचे पिठले, कांदा बटाट्याचा झणझणीत रस्सा व तीळ लावलेली बाजरीची भाकरी हे थंडी स्पेशल पदार्थ असत. या सगळ्या बरोबर लसणीची लालभडक चटणी ही असेच. बाजरीची भाकरी उष्ण असते म्हणून ती थंडीतच खायची हे इतके माझ्या डोक्यात बसलेले आहे की आता कधी कुठे बाजरीची भाकरी दिसली तर आता कशी काय बुवा ही बनवली असे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर लगेच उभे रहाते.
पुढे कॉलेजात गेल्यावर डिसेंबरच्या सुट्टीत NCC चा कॅम्प भरत असे. भर थंडीच्या दिवसात पहाटे परेड करायला धमाल यायची. त्यानंतर मेस म्हणून उभारलेल्या राहुटीमधून एका रांगेत उभे राहून खाद्य पदार्थ आपल्या डिशमधे घ्यायचे हे तिथे मी पहिल्यांदा अनुभवले. अलीकडे पॉश हॉटेलांच्यात बफे डिनर घेताना मला त्या NCC डिनर्सची आठवणे होते. या NCC कॅम्प्स मधल्या जेवणांच्यात मी आयुष्यात प्रथम मटन व चिकन हे खाद्यपदार्थ चाखून बघितले होते.
त्या वेळी थंडीच्या दिवसात पुण्याच्या डोक्यावरचे आकाश निरभ्र झाले की तारे बघायला मजा येत असे. बहुतेक तेजस्वी नक्षत्रे या कालातच आकाशात चमचमतात. उन्हाळ्यात दिसणारे तारे मंद प्रतीचे असल्याने तारे बघायला एवढी खास मजा येत नसे. माझ्या आजोबांना ज्योतिर्विद्याशास्त्राची आवड असल्याने त्यांना दिसणारे तारे कोणते आहेत हे माहिती होते. त्यांच्याकडून तार्‍यांची माहिती समजावत कित्येक संध्याकाळी मी घराच्या गच्चीवर घालवल्या आहेत.
थंडीचे दिवस सुरू झाले की घराच्या जवळ असलेल्या टेकड्यांवर फिरायला जाण्याचे आम्हा मित्रमंडळींचे बेत ठरत अगदी चार साडेचारला घरातून निघाले तरी चालत असे. त्या फिरण्यामधल्या गप्पा अजुनही माझ्या स्मरणात आहेत.
त्या दिवसांतल्या थंडीची मजा आता काही येत नाही हे मात्र खरे. एकतर प्रदुषण, गर्दी यामुळे पुण्याचे हवामान बिघडून तर गेले आहेच. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते वयही गेले आहे. अमुक केले तर सर्दी होईल. तमुक केले तर खोकला होईल अशी भिती तुम्हाला एकदा वाटू लागली की साध्या साध्या गोष्टींच्यातून जो आनंद, जी मजा पूर्वी मिळत असे तो आता तसा मिळतच नाही.
पण ती मजा जरी आता लुटता येत नसली तरी पूर्व स्मृतींना उजाळा देऊन पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवणे हे तर माझ्या हातातच आहे. तो माझा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही मग तक्रार तरी कसली करायची? हे ही खरेच.
14 डिसेंबर 2010