Showing posts with label People. Show all posts
Showing posts with label People. Show all posts

Friday, 5 September 2014

वर्दे गुरुजी




माझी मोठ्या आत्याबाई, एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असत. शिक्षकांना रहाण्यासाठी, संस्थेने आवाराच्या एका कोपर्‍यातच, एक चाळवजा दगडी इमारत बांधलेली होती. त्याला शिक्षक चाळ असे म्हणत. प्रत्येक बिर्‍हाड, आगगाडीच्या डब्यांसारख्या जोडलेल्या, तीन खोल्यांचे असे. माझ्या आत्याचे बिर्‍हाड अगदी कोपर्‍यातले होते. मे महिन्याच्या सुट्टीत मी पुष्कळ वेळा आत्याकडे रहायला जात असे. ही संस्था तशी गावापासून बरीच लांब असल्याने दिवस रात्र तसा शुकशुकाटच असे. रात्री रातकिड्यांच्या किरकिरण्याशिवाय दुसरे फारसे आवाज कधी ऐकू यायचे नाहीत. मी असाच एकदा आत्याकडे रहायला गेलो असताना, रात्री अतिशय सुमधुर अशा गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले. गंमतीची गोष्ट म्हणजे तेच गाणे चार पाच वेळा परत परत ऐकायला मिळाले. आत्याला विचारल्यावर ती म्हणाली “गुरुजी गाणे बसवत असतील शाळेच्या कार्यक्रमाचे, म्हणून फोनो घरी आणला असेल.” मग नंतर काही गाणे ऐकू आले नाही आणि मी झोपून गेलो.
दुसर्‍या दिवशी सकाळी आत्याची परवानगी घेऊन मी व माझी आतेबहिण असे दोघेही शेजारच्या बिर्‍हाडात गेलो. शेजारच्या बिर्‍हाडात रहाणारे वर्दे गुरुजी, त्यांच्या पत्नी माणिकताई, घरीच होते. रात्री लावलेले गाणे मला खूप आवडले होते असे माझी बहिण म्हणाल्याबरोबर, गुरुजींनी मला ते परत ऐकायचे आहे का विचारले आणि एक पेटी बाहेर काढली. त्यांनी त्या पेटीवर मध्यभागी एक काळी तबकडी ठेवली. बाजूला असलेल्या एका किल्लीने त्या पेटीला घड्याळासारखी किल्ली दिली आणि एक नागमोडी दिसणारी नळी त्या फिरणार्‍या तबकडीवर ठेवली. मी आश्चर्यांने बघतच राहिलो. कारण काल रात्रीचा तोच सुमधुर आवाज त्या पेटीतून उमटू लागला होता. त्या दिवशी माझी तोंडओळख बर्‍याच नवीन गोष्टींशी झाली. एक तर ते गाणे, ‘आला खुषीत समिंदर’, दुसरे म्हणजे ज्योस्नाबाई भोळ्यांचा तो अफलातून आवाज आणि तिसरी म्हणजे ती जादुची पेटी किंवा फोनो.

वर्दे गुरुजींची आणि माझी ओळख अशी झाली. गुरुजी माझ्यापेक्षा पंधरा एक वर्षांनी मोठे असावेत. पण मला ते नेहमी एखाद्या मित्रासारखेच वागवत. डोक्याला काळी टोपी, रेघा रेघांचा हाफ शर्ट व खाली पांढरा पायजमा असा त्यांचा नेहमी वेष असे. शाळेत गायन या विषयाचे ते शिक्षक असल्याने, शाळेत किंवा कोठेही बाहेर जाताना ते एक काळा कोट परिधान करत. गुरुजी रंगाने मात्र गोरेपान होते आणि बघायला गेले तर ते थोडेसे तसे जाडगेलेच वाटत. त्यांचा आवाज अतिशय मृदु होता. या अशा आवाजात ते वर्गाला कसे शिकवत असतील? याचे मला नेहमीच कोडे वाटे. गुरुजी बोलताना सुद्धा, स्पष्ट कधी बोलत नसत. त्यांचे बोलणे ओठातल्या ओठात, पुटपुटत, अडखळत, अस्पष्ट असे. खूप लक्ष देऊन ऐकावे लागे. मधून मधून ते काही क्षण शून्यातच बघत रहात. नंतर एकदा आमच्या मातोश्रींच्या मनात आले की मला कोणतीच कला अवगत नाही. मी तबला तरी शिकावा असे ठरले. आणि गुरुजींची मला शिकवणी सुरू झाली. आठवड्यातून दोन तीनदा तरी बिचारे गुरुजी सायकल मारत मारत आमच्या घरी येत. त्यांना तबल्यापासून सतारीपर्यंत सर्व वादने वाजवता येत. त्यामुळे ते तबला, हार्मोनियम, व्हायोलिन, सतार, जलतरंग, फ्ल्यूट काय म्हणाल ते शिकवू शकत. गंमत म्हणजे मी त्यांना गाताना कधीच ऐकले नाही. दुसर्‍याला गाणे शिकवताना काय ते गाऊन दाखवत तेवढेच. मी कलोपासक या दृष्टीने एकदम ढ दर्जाचा विद्यार्थी ठरलो व थोड्याच दिवसात गुरुजींची शिकवणी बंद झाली. त्यांनी शिकविलेला त्रिताल तेवढा लक्षात राहिला आहे.

गुरुजींच्या पत्नी माणिकताईंना कधीही बघितले की वाटे, या कोठेतरी बाहेरच निघाल्या असाव्यात. सदाकाळ इतक्या टापटीपीने रहाणारी स्त्री विरळाच. साधीच पण अतिशय टापटीपीने नेसलेली साडी, वर घट्ट अंबाडा, त्यावर फुलांची वेणी आणि मोठे लाल कुंकू असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यांना बघितले की बालगंधर्वकालीन स्त्रीचा फोटो बघितल्यागत वाटायचे. याचे कारण मला नंतर उमगले. माणिकताईंचे वडील गंधर्व नाटक मंडळीत बालगंधर्वांना साथ संगत करत असत. माणिकताईंचे माहेर असे संगीतमय होते. बालगंधर्वांची तर त्यांच्या घरी जवळपास पूजाच होत असे. मी माणिकताईंना बघितले तेंव्हा त्यांच्या, गुरुजींशी झालेल्या लग्नाला, सात आठ वर्षे तरी झालेली  असावीत. पण कोणी गुरुजींचे नाव काढले की त्या नवोढेसारख्या लाजत. गुरुजींना हाक मारणे, बोलावणे त्यांना प्रचंड अवघड वाटे. त्यांच्या बोलण्यात पण एक वयाला न शोभणारा बालिशपणा होता. कळण्याचे वय नव्हते तरी मला ते जरा विचित्रच वाटे.

गुरुजी आणि माणिकताई नंतर माझ्या आत्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आले. माझी आत्या निवृत्त झाली आणि पुण्यात स्थायिक झाली. तिच्या घरी जाता येताना नेहमी गुरुजी किंवा माणिकताई दिसत. काही कारणांनी गुरुजींनी शाळेची नोकरी सोडून दिली होती व ते शिकवण्या करून गुजराण करत होते. मी नंतर पुण्याच्या बाहेर पडलो आणि गुरुजी व माणिकताईंचा तसा संबंधच संपला.

काही वर्षांनी मी पुण्याला परत आलो व मला एक अतिशय वाईट बातमी समजली गुरुजींना पोटाचा कॅन्सर झाला आहे म्हणून. एकदोनदा भेट झाली पण त्या दोघांना बघून इतके गलबलल्यासारखे झाले की फारसे काही बोलताच आले नाही. नंतर त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली व एक दिवस अचानक त्यांचा मला फोन आला की त्यांना आता खूप बरे वाटते आहे आणि मला भेटण्यासाठी त्यांना माझ्या घरी यायचे होते. मी अतिशय आग्रहाने त्या दोघांना या म्हणून सांगितले. त्याप्रमाणे ते आलेही. जुन्या गप्पा झाल्या.मी त्या वेळी पं.जसराजजींची नवीन एल.पी रेकॉर्ड आणली होती ती लावू का म्हणून विचारले. लाव म्हणून सांगितल्यावर ती सुरू केली. पांचच मिनिटात गुरुजी म्हणले, “बंद कर, सोसत नाही.” माझ्या मनात तेंव्हाच शंकेची पाल चुकचुकली. नंतर कळले की शस्त्रक्रियेत कॅन्सरची वाढ एवढी दिसली होती की डॉक्टरांनी पोट फक्त परत शिवून टाकले होते.
आता काय! फक्त वाट बघणे बाकी होते. वर्षा ऋतूतल्या अशाच एका उदासवाण्या संध्याकाळी मला फोन आला की गुरुजी गेले. पाउस मी मी म्हणत होता. आम्ही दोन चार जणच जमलो आहेत हे लक्षात आल्यावर विद्युतदाहिनीवर घेऊन जावे असा विचार झाला. पण गुरुजींच्या ऐंशी वर्षांच्या सासरेबुवांनी पूर्ण नकार दिला. त्या पावसात मग आम्ही भिजत भिजत ओंकारेश्वरांवर गेलो. गुरुजींचे दुसरे कोणी नातलगच नव्हते. सासरेबुवांनीच जावयाचे सर्व विधी केले व गुरुजींनी पोचवून आम्ही घरी आलो.

काही दिवसांनी आत्याकडे गप्पा गोष्टी चालू असताना, गुरुजींचा विषय निघाला. त्या दिवशी आमच्या न बोलणार्‍या आत्याबाई सहजपणे एक वाक्य बोलून गेल्या. “या माणिकचे तर सर्व आयुष्यच नासून गेले!  कशी ती या  नामर्दाबरोबर राहिली कोण जाणे?” एखादी वीज चमकावी तसे मला झाले. केवढी प्रचंड शोकांतिका आमच्या डोळ्यांसमोर घडत होती. आणि आम्हाला पत्ता पण कधी लागला नाही. गुरुजींचे ते शून्यात बघत राहणे, अस्पष्ट व पुटपुटल्यासारखे बोलणे आणि माणिकताईंचे ते अनैसर्गिक लाजणे, वयाला न शोभणारे बालिश् बोलणे, एखाद्या लोकरीच्या गुंड्यातून धागा सरसर उलगडावा तशा आठवणी येत राहिल्या. कशासाठी एवढा प्रचंड त्याग या बाईने केला? वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी? निदान एखादे अनाथ बालक का नाही दत्तक म्हणून घेतले? पण या आमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर कोणीच देणार नव्हते. माणिकताई तर कधीच नाही.
आता कधीही ज्योस्नाबाईंचा आवाज कानावर पडला की “आला खुषीत समिंदर” आठवते. गुरुजी आठवतात. माणिकताई आठवतात. पण हे ही मनाला खुपत रहाते की गुरुजी आणि माणिकताई यांचा समिंदर कधी खुषीत आलाच नाही. फेसाळणार्‍या लाटा सोडाच पण त्याला कधी भरतीही आली नाही.

28 जून 2009

डबेबाटलीवाला



संध्याकाळी फिरून परत येत असताना काहीतरी बारीक सारीक खरेदी करावयाची म्हणून ‘एल कमिनो’ वरून येत होतो. रस्त्याच्या कडेला सहज लक्ष गेले. एक व्यक्ती, कुंपण म्हणून लावलेल्या झाडांच्या मध्ये एक लांब काठी घालून काहीतरी खुडबुड करताना दिसली. थोडे जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या काठीला पुढे एक आंकडा बसविलेला आहे. त्या व्यक्तीने मोठ्या  सफाईदारपणे त्या आंकडयाच्या मदतीने कुंपणात पडलेले शीतपेयाचे दोन डबे बाहेर काढले. बुटाखाली चिरडून व दाबून सपाट केले आणि रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आपल्या सायकलच्या मागे बसविलेल्या एका डब्यात टाकले. प्रथम वाटले की हा नगरपालिकेचा सफाई कामगारच असावा पण आणखी थोडे जवळ गेल्यावर पटकन ओळख पटली की हा तर आपल्या पुण्याच्या रस्त्यांवर भेटणारा डबेबाटलीवाला.

तसे पाहिले तर पुण्याच्या आणि सनीव्हेल मधे भेटलेल्या या डबेबाटलीवाल्यांत शारीरिक  साम्य असे कांही नव्हतेच. जवळ जवळ साडेसहा फूट ऊंची व आडदांड शरीरयष्टीचा हा माणूस पोलीस खात्यांत जास्त शोभला असता. त्याने अंगावर घातलेले कपडे सुध्दा त्याच्या लालबुंद रंगाला शोभत होते. मूळ निळया रंगाची असावी अशी शंका यावी पण आता फक्त मळकट दिसणारी जीन्स व तशाच कापडाचा कोट आणि डोक्याला बेसबॉल खेळाडू घालतात तशी टोपी असा त्याचा वेष होता. पायात, जुन्या जमान्यात कोणीतरी कधीतरी खरेदी केलेले व आता टाकून दिलेले, मूळ पांढर्‍या     रंगाचे बूट होते. पण एकूण कळकटपणा आणि मळकटपणा मात्र पुण्याच्या रस्त्यांवर भेटणार्‍या     याच्या भाईबंदांसारखाच होता. त्याची सायकल मात्र एक प्रेक्षणीय वस्तू होती. 

सायकलच्या सर्व बाजूंना त्याने निरनिराळया प्रकारचे डबे व टोपल्या मोठया सृजनशीलतेने बांधल्या होत्या. बांधलेले हे सर्व डबे व टोपल्या, असंख्य आकाराच्या आणि अनेक  प्रकारच्या पेयांच्या बाटल्या व डबे यांनी पूर्णपणे भरलेले होते. इतके दिवस माझी अशी प्रामाणिक समजूत होती की सायकल वरून जास्तीत जास्त सामान नेण्याच्या बाबतीत पुण्याच्या लोकांचा कोणीच हात धरू शकणार नाही. धान्याची भरलेली पोती, गॅसचे सिलिंडर, लोखंडी लांब लांब नळया, तेलातुपाचे डबे असले विचित्र आकाराचे सामान पुण्याचा सायकलवाला लीलयेतेने आपल्या वाहनांवरून घेऊन जाताना दिसतो.पण हा कॅलिफोर्नियाचा डबेबाटलीवाला तर त्यांच्याहून कांकणभर जास्त सरसच वाटत होता. इतके विचित्र आकाराचे व प्रकारचे सामान एकाच वेळी सायकलवरून नेणे किती सहज शक्य आहे हे त्याच्याकडे नुसता एक दृष्टीक्षेप टाकला तरी कळत होते.

पुण्याच्या रस्त्यांवर याचे अनेक भाईबंद पाहिले होते. खांद्यावर एक मोठे पोते टाकून रस्त्याकडे काकदृष्टीने बघणारा व कोठेही डबा बाटली किंवा तत्सम वस्तू पडलेली दिसली की क्षणांत ती आपल्या पोत्यांत टाकून अदृष्य करणारा भंगारवाला इतका नेहमी दिसतो की परत वळून किंवा लक्ष देऊन बघण्यासारखे, विचार करण्यासारखे त्यात काही आहे असे वाटतच नाही. पण कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर, झगमगत्या दुकानांच्या समोर आणि माशांसारख्या सुळकन जाणार्‍या   मोटारींच्या मधे भेटलेला हा त्यांचाच जातभाई मात्र स्मरणांत पक्का राहिला आहे.

18 फेब्रुवारी 2000

Thursday, 4 September 2014

नानामामा



नानामामाचे एका शब्दात वर्णन करणे एकदम सोपे आहे. जगन्मित्र हा शब्द बहुदा मामासाठीच बनविलेली असावा. समवयस्क भाचेजावई असोत, पंचविशीतील नातवंडे असोत किंवा समोर राहणारा चार पांच वर्षाचा ओंकार असो, मामाची सर्वांशी मैत्री. मामा समवयस्कांबरोबर राजकारणावर बोलेल. तरुणांच्या बरोबर सिनेमा व क्रिकेटवर बोलेल तर ओंकार बरोबर सचिनने मारलेल्या ‘ फोर ‘ चे कौतुक करेल. यामुळेच की काय मामाच्या शब्दकोशात पणजोबा, आजोबा वगैरे नाती नसावीतच. सर्वांचा तो नानामामाच आहे. नानामामाची मैत्री फक्त माणसांपर्यंतच मर्यादित नाही. तो आला की आमची लॅसी कुत्री धावत येणार व त्याच्याकडून थोपटून घेणार. आमचा बोका मान उंचावून बघणार व मामाच तर आहे म्हणून परत कुशीत डोके खुपसून निद्राधीन होणार.
आडमाप सहा फूट उंची, गोरापान रंग व सडपातळ बांधा असलेला मामा गेली चाळीस वर्षे आहे तसाच आहे. नाही म्हणायला माथ्यावरचे विरळ केस आता पांढुरके झाले आहेत व थोडासा बाक आल्यासारखा वाटतो आहे. पण उठून मामा ताडताड चालावयाला लागला की मामाचे वय विसरायलाच होते आणि जेंव्हा केंव्हा संभाषणाची गाडी पुढारी, राजकारण, भ्रष्टाचार व महागाई या सारख्या मध्यमवर्गाच्या जिव्हाळयाच्या विषयांवर येते तेंव्हा मामा अशा तडफेने बोलतो की आपण एखाद्या तरुण क्रांतिकारकाशीच बोलतो आहेत असे वाटू लागते. नानामामाचा मूळचा स्वभाव खूपच तापट व रागीट. घरातले सर्व त्याला वचकून असत. पण हा राग कांही क्षणांचाच. मग आतला प्रेमळ, वात्सल्यपूर्ण स्वभाव परत उभारून येणार.

पुण्या-मुंबईच्या मध्यम वर्गाचा प्रातिनिधीक असलेल्या आमच्या मामाला कधी प्रापंचिक अडचणी आल्या,  नव्हे ,आल्या असतीलच,  तरी त्या कोणाला कधी दिसल्या नाहीत. कोणाचीही अडचण असो, मामा सदैव हजर व मनापासून मदत करण्याची तयारी. रात्री अपरात्रीच्या प्रवासासाठी  कोणाला सोबत हवी असली तरी मामा सदैव तयार. भाचीच्या लग्नाच्या प्रयत्नांत खीळ बसते असे वाटल्यावर याच्या डोळयात पाणी. भाचेजावयांना पुण्याला जागा घ्यावयाची असे कळल्यावर त्यांना योग्य तो माणूस गांठून देण्यात मामा पुढे. पण नंतर कोणतीही अपेक्षा नाही.

नानामामा खरे म्हणजे आमचा आजोबा. पण आईच्या आईला कधीच न बघितल्यामुळे नानामामाचे मुंबईचे घरच आम्हा नातवंडांचे खरे आजोळ होते. उन्हाळयाच्या सुट्टीत मुंबईला गेल्यावर आमचे लाड पुरवावे नानामामानेच. चौपाटीवर जाऊन मनसोक्त भेळ कोणी खाऊ घातली असेल तर त्यानेच. नानामामाला प्रत्येक गोष्टीचा प्रचंड उत्साह. घरी भेळ करावयाची ठरली तर चुरमुरे आणण्यापासून ती कालवण्यापर्यंत सर्वात नानामामा हवाच. परत कामाचा उरक प्रचंड. नातवाच्या मुंजीत शंभर सव्वाशें पानाच्या पंक्तीसाठी श्रीखंड गाळायला बसला नानामामाच. गणपती आले की आरत्या म्हणायला व विसर्जनासाठी चौपाटीच्या समुद्रात जाताना त्याचाच पुढाकार. आपली एकुलती एक बहीण, लवकर तरुण वयातच गेल्यामुळे की काय, भाच्यांच्यावर अपार माया, प्रेम व जिव्हाळा. पण प्रदर्शन बघायला गेलेल्या भाच्या तेथेच रमल्या व त्यांना परतायला उशीर झाला म्हणून वडीलांसारखा धाक दाखवून रागावणारा नानामामाच. त्यामुळेच बहुदा याच भाच्या आता सत्तरीच्या झाल्या तरी मनातून कुठेतरी मामाचा धाक बाळगूनच असतात. आम्हा नातवंडांना मात्र मिळाले मामाचे प्रेम, अकृत्रिम जिव्हाळा व त्याच्यापेक्षाही त्याची मैत्री.

नानामामाची नंतर पुण्याला बदली झाली व सुरवातीला तो आमच्या घरीच पाहुणा म्हणून राहू लागला. त्याचा मुक्काम नातवाच्या खोलीत, त्यामुळे हा आजोबा कॉलेजात जाणार्‍या    आपल्या नातवाचा मित्रच झाला. सिनेमाला जाण्यापासून ते गप्पागोष्टींपर्यंत मामाचा सहभाग असे. कांही दिवसांनी मग मामा आपल्या स्वत:च्या घरांत रहायला गेला पण नातवाला मात्र मित्र दुरावला. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर नातवाने स्कूटर घेतली व पुणे-मुंबई प्रवास स्वत:च्या वाहनाने करण्याची गंमत अनुभवली. पण गंमतीची गोष्ट म्हणजे या प्रवासात सुध्दा मागच्या सीटवर होता नानामामाच.

नानामामाचे बोलणे निर्भिड व स्पष्ट. तो पांढर्याला   पांढरे व काळयाला काळेच म्हणणार. राजकारणी धूर्तता त्याच्याजवळ नाही. नातीच्या घरभरणीला गेल्यावर जेवणाचा बेत न आवडला तर तिला तसे सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा फक्त नानामामाच करू जाणे. परंतु बोलणे पूर्ण पारदर्शी, कुठलाही हेतू मनात न धरता केलेले, त्यामुळे त्यावेळी अप्रिय वाटले तरी नंतर कोणी मनात ठेवणे शक्य नाही. कुठल्याही समारंभाला किंवा भोजन समारंभाला मामाची पसंतीची पावती मिळाली की तो कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडलेला असणारच.
नानामामा तसा खरा खवैय्याच. भेळ, पाणीपुरी, बिरडयांची उसळ किंवा थालीपीठे, सर्व अगदी आवडीने खाणार. पण आपण पाटावर बसून हुकुम सोडावयाची त्याची मानसिकता नाही. अजूनही मंडईत जाऊन भाचीसाठी लोणच्याच्या कैर्‍या     आणण्याची त्याची तयारी. वेळ आली तर पाककलेतही तो आपला हात चालवतो. सर्व गोष्टी व्यवस्थित रीतसर पार पाडल्याच पाहिजेत हा हेका. पणतीच्या लग्नात नीट केळवण करता येत नाही म्हणून त्याला केवढी रुखरुख.

नानामामा अलीकडे थकल्यासारखा वाटतो. बोलताना मधून मधून विषादाची एखादी लहर उमटते. पण ती तात्पुरतीच असते. कांही क्षणांतच त्याच्या मनातला प्रचंड उत्साह परत जागा होतो. परवां त्याची पणती अमेरिकेला जाऊन आली. ती परत आल्यावर तिचे प्रवास वर्णन सर्व बारकाव्यांसकट कोणी ऐकले असेल तर नानामामानेच. नंतर तिला एका संगणकप्रणाली बनविणार्‍या     उद्योगांत नोकरी मिळाली. मामाला त्यातही पूर्ण रस. पणतीला खूपच आश्चर्य वाटले. पण खरे तर त्यात नवल असे काहीच नाही. उद्या नानामामाला त्याची खापर पणतवंडे नक्की भेटतील. मामा त्यांना त्यांच्याच पध्दतीने ‘ हाय ‘ म्हणेल व ती पण आपल्या खापर पणजोबांना नानामामा म्हणूनच हाक मारतील व त्यांची मैत्री क्षणांत जुळेल.


6 ऑगस्ट 1999

आजी



काही माणसे दुसर्‍यांना कांहीना काही देत रहाण्यासाठीच बहुदा जन्म घेतात. आजींचे काहीसे असेच असावे. आजींनी आयुष्यभर दुसर्‍यांना भरभरून दिले व देत राहिल्या. त्यांचा हात नेहमी उपडाच व मिटलेलाच राहिला. त्यांनी हाताची ओंजळ कधीच पसरली नाही. मुले, नातवंडे,बहिणी,भाचरे यांना तर त्यांनी दिलेच पण परिचित आणि अगदी घरचा विश्वासू गडी माणूस सुध्दा त्या कधी विसरल्या नाहीत. त्यामुळेच की काय त्यांची झोळी परमेश्वराने कधीच रिकामी ठेवली नाही. आजी आयुष्यभर दुसर्‍यांना देत गेल्या पण त्यांनी घेणार्‍याला कधी कमीपणा वाटू दिला नाही. गरजू असो किंवा संपत्तीच्या राशीवर लोळणारा असो, त्याला नेहमीच ” हे मला आजींनी दिले.” हे अभिमानानेच सांगता आले. कोणाला गरज आहे हे आजींना बरोबर उमगे. कोणाचा विमा थकलेला असो, कोणाला नवीन धंदा चालू करण्यासाठी बीज भांडवल हवे असो किंवा नातवाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी मदत हवी असो, आजींनी कधी गरज भागवली नाही असे झाले नाही.

आजी आयुष्य ताठ मानेने आणो ताठ कण्याने जगल्या. वयाची साठ पासष्ठ वर्षे झाल्यावर त्या परत एकटया पडल्या. पण खंबीरपणे त्यांनी आपले स्वतंत्र आयुष्य परत उभे केले. त्यांना कधी दुसर्‍या कोणाची मदत लागली नाही की कधी त्यांना दुसर्‍याकडे काही मागावयाला जावे लागले नाही. उरलेल्या तुटपुंज्या शिलकीवर कसेतरी रडत खडत आयुष्य घालविणे किंवा मुलांच्यावर भार होऊन जगणे वगैरे त्यांना कधी रुचले नसावे. त्यांनी स्वतंत्रपणे आपला अर्थार्जनाचा मार्ग शोधून काढला व मोठया टेकीत आपले उर्वरित आयुष्य त्या जगल्या.
उतार वयात मागे लागलेल्या दुर्धर रोगाने आजींची शरीरयष्टी बारकुडी झाली होती. पण त्यांचे मन इतके खंबीर होते की शरीराचा अशक्तपणा व आजारीपणा यांना त्यांनी पूर्णपणे एका बाजूल ठेवले होते. एका अर्थाने आजी राजयोग़ीच होत्या. त्या विरक्त वगैरे कधीच झाल्या नाहीत. आयुष्यातील सर्व आनंद त्यांनी भरपूर लुटला व त्यात इतरांनाही सहभागी करून घेतले. चांगली चुंगली रेशमी वस्त्रे, हिऱ्यामोत्यांचे दागिने, कशाचेच आजींना वावडे नव्हते. पण एकदा मनात आल्यावर हे दागिने मुलांना वाटून टाकले. अर्थात नवीन फॅशनचे नवे दागिने परत स्वत:साठी करायला त्या विसरल्या नाहीत.

निरनिराळया प्रकारचे खाण्याचे चविष्ट पदार्थ करून ते इतरांना खाऊ घालणे हा तर आजींचा सर्वात आवडीचा विषय. नंतर नंतर मुले मोठी झाली व त्यांचा आहार पण पूर्वीसारखा राहिला नाही याची आजींना मोठी हळहळ वाटे. घरी कोणी कधी पाहुणा आला व त्याला कांही खाण्यापिण्याला देता आले नाही तर आजींना मोठे अपमानास्पद वाटे. मुलाचे मित्र,सहकारी,व्याही मंडळी, सर्वांचा आजींनी भरपूर पाहुणचार केला. त्यांच्याकडे कधीही गेले तरी साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठे तयार कशी असत हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. अगदी शेवटच्या आजारपणापर्यंत मुलाच्या आवडीच्या आल्याच्या वडया आणि तांदुळाच्या पिठाचे लाडू करून तो जगभर कोठेही असला तरी त्याच्यापर्यंत पोचवायला आजी विसरल्या नाहीत. भाजी खरेदी हा तर आजींच्या आवडीचा आणखी एक एक विषय. आजी दिल्लीला रहात असताना घरावरून जाणार्‍या जवळ जवळ प्रत्येक भाजीवाल्याकडून त्या कांही ना कांही भाजी घेत. दिल्लीला मिळणारी चविष्ट भाजी हा त्यांच्या मोठया कौतुकाचा विषय असे. त्या स्वत: तर सुगरण होत्याच पण नवीन पध्दतीचा कांही पदार्थ त्यांच्या खाण्यात आला व त्यांना आवडला नाही असे क्वचितच होत असे.मुलगी पिझ्झा करायला शिकली तेंव्हा तिने भीतभीतच एक तुकडा आजींना खाण्यास दिला. आजींना तो इतका आवडला की पुढे मुलीने परत कधीही पिझ्झा केला की एक तुकदा तरी आपल्या आईसाठी वगळून ठेवायला विसरत नसे.

आजींची बुध्दी अतिशय कुशाग्र व स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती. सुतावरून त्या केंव्हाच स्वर्गाला पोचत. पण दुसर्‍याच्या अडचणीचा त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही. कोणाबद्दल कधी वावडी उठवली नाही. कुठलीही माहिती आजींच्याकडे नेहमी एकेरी मार्गासारखी जात असे. त्यांच्या मनातच ती राही. आजींचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते पण इंजिनीयर असलेल्या आजोबांच्यावर, स्क्रॅबलच्या खेळात त्या बरोबरीच काय पण कुरघोडीही करत. आजोबांना कुरकुरत का होईना, आजींची हुषारी मान्य करावीच लागे. त्या म्हातार्‍या झाल्या तरी त्यांचा जगण्यातला उत्साह कधी कमी झाला नाही. गाण्याच्या मैफिली, नवीन नाटके या सर्वांत आजींना रस होता. नातीचे लग्न ठरल्यावर नवीन नातजावई आपल्या जुन्या झालेल्या सोफासेटवर कसा बसणर म्हणून आजींनी प्रथम काय केले असेल तर हॉलला नवीन पडदे व सोफासेटला नवीन कव्हर्स करायला घेतली.
आजींची आयुष्यातील प्राधान्ये सरळ होती. मुलांच्या अडचणींना त्यांनी सर्वात महत्व दिले. मुलाच्या अभ्यासासाठी त्या एकटया सर्व मुलांना घेऊन पुण्यात राहिल्या. कोणाचे आजारपण, ऑपरेशन, कांहीही असो, हातातले सर्व टाकून त्या धावत येत असत. कुठल्याही अडचणींना त्या कधीच घाबरल्या नाहीत. आजोबा दूर देशी नोकरीत अडकलेले असताना त्यांनी एकटीने लेकी सुनांच्या दिवाळसणांपासून ते बाळंतपणापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या व सर्व संभाळले. आजोबांची उणीव कधी कोणाला जाणवू दिली नाही. पण मुले आता स्वतंत्र झाली आहेत व त्यांना आता आपली गरज नाही हे लक्षात आल्याबरोबर त्या सरळ पुण्यातले आपले घर बंद करून आजोबांच्या दूरगांवाला निघून गेल्या. पण मुलीला उत्तर हिंदुस्थानातील अगदी आडगांवी नवीन संसार थाटायचा आहे हे समजल्यावर त्या तिच्या मदतीला त्या कानाकोपर्‍यातही धावून गेल्या. त्यावेळी आपण बाईमाणूस ! एवढा लांबचा व जिकिरीचा प्रवास एकटीने कसा करणार ? वगैरे विचार त्यांच्या मनाला शिवलेही नाहीत. त्या एकटयाच मोठया खंबीरपणे प्रवास करून लेकीकडे गेल्या व तिच्या संसाराचे बस्तान बसवून दिल्यावरच परत एकटयाच आजोबांच्या गावाला परतल्या.

आजींना प्रवासाची विलक्षण आवड होती. साठी उलटल्यावर त्यांना एकदा तरी परदेश प्रवास करावा असे वाटू लागले. आजोबांनी नेहमीप्रमाणे द्रव्याची अडचण सांगून बघितली. आजींना याची बहुतेक आधीच कल्पना असावी. त्यांनी या अडचणीतून असा मार्ग शोधून काढला की आजोबांना पुढे काही बोलताच आले नाही. आजी,आजोबा मग अमेरिकेला गेले. सर्व काही बघून, मनासारखी खरेदी करून, मोठया मजेने ही सफर करून आले. भारतातल्या भारतात प्रवास करण्यासाठी मात्रा आजी कोणांसाठी अडून राहिल्या नाहीत. यात्रा कंपनी, कोणी मैत्रिणी. जमेल तसा त्यांनी प्रवास केला. काश्मिर ते कन्याकुमारी,सौराष्ट्र ते बंगाल. सर्व काही बघितले. एवढे झाल्यावर सुध्दा त्यांचा प्रवासाचा उत्साह कमी झाला नाही. मुंबईची नात पुण्याला आल्यावर तिला पुणे दाखवायला स्पेशल टॅक्सी करून त्या फिरल्या. नातींना घेऊन गोव्याला जाण्याचे बेत त्यांच्या मनात होतेच.
आजींची नातवंडांच्यावर अपार माया होती. त्या दिल्लीला रहात असताना कोणीही पुण्या मुंबईला येणारे मिळाले की नातवंडांच्यासाठी खाऊ,खेळ,कपडे पाठवायला त्या विसरल्या नाहीत. नातवंडांना काही दुखले खुपले तर त्या नेहमीच धावून जात असत. पण नातीचे लग्न ठरल्यावर तिला सासरी वागावे कसे याबद्दल चार परखड शब्द सांगायला त्या विसरल्या नाहीत.

आजींच्या मनाचा एक कोपरा मात्र त्यांच्या मुलासाठी पूर्ण आरक्षित होता. मुलाची हुशारी, त्याने निरनिराळया परीक्षात मिळविलेले यश, पुढील आयुष्यात त्याला मिळालेले मानसन्मान व त्याच्या कार्यक्षेत्रात त्याने गाठलेली यशोशिखरे याचा आजींना मनस्वी अभिमान होता. शाळेपासूनची त्याची वह्या-पुस्तके, सर्टिफिकेट्स आजींनी सर्व जपून ठेवले होते. पण हा अभिमान आजींच्या चालण्याबोलण्यात कधी अहंभाव, गर्वाच्या स्वरूपात प्रगट झाला नाही. फक्त चार समवयस्क मैत्रिणींच्या बरोबर पत्ते खेळताना मात्र मुलाचे भरपूर कौतुक चाले आणि आपल्या मुलाचा सहवास आपल्याला पुरेसा मिळत नाही या विषादाची लहर त्यांच्या बोलण्यात जरूर उमटत असे.

आजोबा गेल्यावर उणीपुरी पंधरा वर्षे आजींनी सर्व संभाळले. एवढे मोठे घर, पै पाहुणा कधी कुठे काही उणे पडले नाही. मुलांच्या घरची कार्ये, त्यांच्या अडचणी, आजी सगळीकडे समर्थपणे मागे उभ्या राहिल्या. तब्येत साथ देत नव्हती तरी मनाची उभारी,खंबीरपणा तसाच राहिला. पण या सगळयात आजी आता थकल्या आहेत, त्यांना हे सर्व संभाळणे कठीण जात आहे हे कधी कोणाच्या लक्षातच आले नाही. अर्थात आजींनी कधी तक्रार केली नाही की वैताग व्यक्त केला नाही. त्या सर्व सांभाळतच राहिल्या.

पण शेवटी तब्येतीनेच साथ सोडली व आजी परावलंबी झाल्या. आपण आजारी आहोत व दुसरे कोणीतरी आपली शुश्रुषा करते आहे हे खरे म्हणजे आजींना स्वप्नात सुध्दा मान्य झाले नसते. पण नियतीपुढे त्यांना मान झुकवावी लागली. एकदा मुलगी त्यांना म्हणाली की ” आई तुला जरा बदल होईल ! तू माझ्या घरी रहायला चल.” पण, स्वत:चे घर सोडून आजारी अवस्थेत मुलीकडे जाणे त्यांना नामंजूर होते. त्यांनी साफ नकार दिला. आजी अंथरूणावर परावलंबी अवस्थेत पडून राहिलेल्या असताना सुध्दा त्यांची स्वतंत्र वृत्ती कधी कमी झाली नाही.. स्वत:च्या आजारपणाचा कोणताही भार मुलांवर पडू नये असे त्यांना सारखे वाटत राही. भेटायला आलेल्या पाहुण्यांचा नीट पाहुणचार करता येत नाही याचे त्यांना सारखे वैषम्य वाटत राही. मुलगा भेटायला आला तर त्याच्या आवडीच्या आल्याच्या वडया कोणाकरून कशा करून घेता येतील याच्याकडेच त्यांचे लक्ष असे. त्या तशा अवस्थेत सुध्दा नातीच्या लग्नात तिला काय द्यावयाचे याचे मनसुबे त्या करीत रहात.
काही माणसे दुसर्‍यांना काहीना काही देत रहाण्यासाठीच जन्म घेतात. आजींचे काहीसे तसेच असावे.

19 जुलै 2000

आमचा तुकाराम




तुकाराम जोरी या व्यक्तीचे, गेल्या जन्मीचे काहीतरी देणे आम्ही लागत असलो पाहिजे. नाहीतर त्याला माळीकाम करण्यासाठी आम्ही कां ठेवून घेतले असावे या कोडयाचे उत्तर सापडणे फार कठिण आहे. त्याच्याकडे कोणी नुसती एक नजर टाकली असती तरी हा इसम, माळीकामव काय तर इतर कोणतेच काम करू शकणार नाही हे सहज लक्षात आले असते. तरीसुध्दा तुकाराम आमच्याकडे माळीकाम करण्यासाठी म्हणून कामाला लागला आणि पुढची तब्बल चार पांच वर्षे तो कामाला येत राहिला.

जेमतेम पांच फुटापर्यंत पोहोचणारी उंची, जोराच्या वाऱ्याचा रपाटा बसला तर पांच पंचवीस पावले भेलकांडत जाईल, अशी शरीरयष्टी, खोल गेलेली गालफडे, हातापायाच्या काडया, सदोदित चेहऱ्यावर, वाढलेल्या दाढीचे खुंट आणि अत्यंत दीन व बापुडवाणा भाव, तुकारामचे असे दर्शन पाहणाऱ्याला फारसे भावणारे नसे. त्याने अंगावर चढविलेली कापडं पण त्याला साजेशीच असत. तळाला उसवलेली व अनंत ठिगळे लावलेली विजार, त्याच्या तिपटीने दांडगट असणाऱ्या बाप्याच्या मापाचा सदरा, पायाची तीन चार बोटे बाहेर डोकावताहेत असे कोणत्याही मापाचे बूट व जिचा मूळचा रंग संशोधनाचा विषय होऊ शकेल अशी टोपी, असे त्याचे ध्यान असे. भरीत भर म्हणून तो एक अत्यंत कळकट फडके खांद्यावर टाकून ते पडू नये म्हणून एका हाताने घट्ट धरून ठेवत असे. त्याचे कपडे सुधारण्याचे आम्ही बरेच प्रयत्न केले. त्याला त्याच्या मापाचे कपडे, बूट दिले. परंतु आम्ही दिलेले कपडे त्याच्या अंगावर सहसा कधीच दिसले नाहीत. तो त्याच्या मूळ कपडयांच्यातच कामाला येत राहिला. दर गुरवारी तो त्याचे हे कपडे धूत असे व सुकेपर्यंत उन्हात वाळवत असे. कपडे वाळत घालण्यासाठी स्वच्छ जागेची वगैरे त्याची अपेक्षा नसे व कुठेही,वाळूवर, चिखलात त्याचे कपडे वाळताना दिसत. बऱ्याच वेळा एक अर्धी चड्डी घालून तो स्वत:लाही वाळवताना दिसे. हे असे मळकट कपडे घालण्याबद्दल त्याची कारण मीमांसा अगदी सरळ असे. काम करताना नाहीतरी कपडे मळणारच तेंव्हा मळकेच कपडे घातले की ते आणखी मळण्याचा प्रश्नच उरत नाही. थंडीवाऱ्याच्या दिवसात तो कोठून तरी पैदा केलेले पायमोजेही घालत असे. घरांत वावरताना, साहेबी थाटाने तो बूट काढून ठेवून मोज़े घालून वावरत असे. जमीन पुसताना सुध्दा त्याचे ते मोजे पायातच असत. अर्थातच मोजे पाण्याने भिजले किंवा धुळीने मळले तरी त्याची त्याला फारशी पर्वा नसे. मोज्यांमुळे पायाला थंडी वाजू नये एवढीच त्याची अपेक्षा असे. मात्र कोणाच्या लग्नाला जावयाचे असले की त्याच्या कपडयांत पूर्ण बदल होत असे. पांढरे शुभ्र धोतर व गुलाबी सदरा हा त्याचा लग्नाला जाण्याचा वेष असे. त्यावेळेस तो दाढीही करून येत असे. अर्थात अशा वेळा इतक्या कमी असत की या वेषांत त्यला ओळखणेही कठिण असे.

तुकाराम कामाला येऊ लागल्यावर थोडयांच दिवसांत आमच्या हे लक्षात आले की त्याला माळीकामाचा गंध सुध्दा नाही. त्यामुळे आपोआपच त्याला माळीकाम सांगणे बंद झाले व तो पडेल ते काम करणारा सांगकाम्या झाला. परंतु खरे म्हणजे त्याला दोनच कामे चांगली जमत. एक तर अंगण स्वच्छ झाडून घेणे व घराचा केर काढून फरशी पुसून घेणे. या दोन कामांच्या व्यतिरिक्त सांगितलेले कोणतेही काम तो अत्यंत नाइलाजाने व निरुत्साहाने करत असे. तुकाराम सकाळी कामाला आला की अंगण झाडताना दिसे व त्याच्यानंतर तो गायब होत असे. कोणतेही काम त्याला सांगायचे म्हणजे प्रथम त्याला शोधून काढणे हे काम असे. बसण्यासाठी त्याने आडोशाच्या अनंत जागा शोधून ठेवलेल्या असत. वळचणीला, कानाकोपऱ्याला तो इतक्या बेमालूमपणे मिसळून जाऊन डुलक्या घेत असे की त्याला शोधून काढण्यासाठी हाका मारणे हा एवढाच पर्याय असे. वीस ते पंचवीस हाका कानावर पडेपर्यंत तो बाहेर दिसणे शक्यच नसे. त्यामुळे पुष्कळ वेळा त्याला शोधून काढण्यापेक्षा काम स्वत:च करून टाकावे असे वाटण्याची वेळ येई. या शिवाय कारखान्याच्या आवारात फिरून काडया कुडया जमवणे, कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याशी, पानतंबाखूवाल्याशी संधान बांधून कुजकी, नासकी भाजी फुकटात मिळवणे किंवा फुकट मिळालेली तंबाखूची चिमूट दाढेखाली दडपणे व कारखान्यातील कामगारांच्या मागणीनुसार त्यांना पान तंबाखू पुरविणे, त्यांची लॉटरी तिकिटे आणणे व त्या लॉटरीचा निकाल शोधून काढणे ही कामे तो आनंदाने करत असे व त्याचा पैसा दोन पैशाचा मोबदलाही मिळवत असे. या गोष्टींबद्दल कोणीही कितोही रागावले तरी तो फारसे लक्ष देत नसे.

तुकारामची इतरांशी संभाषण साधण्याची पध्दत स्वतंत्र होती. तो जेंव्हा भाषेच्या माध्यमातून इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करी तेंव्हा त्याचा स्वर गेंगाणा येई व तो इतके हेल काढून बोलत असे की त्याला काय सांगावयाचे आहे हे कळतच नसे. यासाठी तो मुख्यत: खाकरून खोकरून दुसऱ्याचे लक्ष वेधून घेई व नंतर प्रचंड पाल्हाळ लावीत आपले म्हणणे हेल काढीत काढीत सांगण्याचा प्रयत्न करी.
तुकाराम कामाला लागल्यावर तीन चार महिन्यांनी एक दिवस संध्याकाळी त्याच्या परिचित खाकरण्याचा आवाज आला. काय रे ? म्हणून त्याला घरातूनच विचारल्यावर तो गप्पच राहिला. जरा वेळाने परत खाकरण्याचा आवाज आल्याने उठून बाहेर जावेच लागले. बाहेर तुकाराम एका टोपपदराची साडी नेसलेल्या चांगल्या फटाकडया बाईबरोबर उभा होता. त्याला परत काय रे ? म्हणून विचारल्यावर तो चक्क लाजला व आपली मानसं तुमच्याकडे आल्याचे त्याने सांगितले. एवढी ओळख झाल्यावर करकरीत आवाजात त्याच्या बायकोने पाल्हाळ लावत लावत तिचे काम सांगितले. तिच्या बोलण्याचा सारांश एवढाच होता की तुकारामला कामावर ठेवताना, काम बघून नंतर पगार वाढवून देऊ असे सांगितले होते व ती वेळा आता आलेली होती. तुकारामला कोणतेच काम नीट येत नाही त्यामुळे त्याला पगारवाढ देणे शक्य नाही हे कळल्यावर तिला फारसे वाईट वाटलेले दिसले नाही. आहे तो पगार चालू राहील यांतच तिला समाधान असावे. पुढच्या चार पांच वर्षात जेंव्हा जेंव्हा तुकारामला आमच्याशी संवाद साधावा वाटला तेंव्हा तेंव्हा तो आपल्या बायकोला घेऊन येत असे. बायकोच्या नथीतून तीर मारणारा असा दुसरा पुरुष बघावयास मिळणे दुरापास्तच आहे.

तुकाराम नेहमी पैशाच्या अडचणीत असे. पैशा दोन पैशाची तंबाखू सुध्दा स्वत:च्या पैशांनी आणणे त्याला जमत नसे. याबाबत त्याला विचारल्यावर लक्षांत आले की पगार झाला रे झाला की त्याची बायको सर्व पैसे काढून घेत असे व उरलेल्या महिन्याभर हा माणूस अगदी पैशा पैशा साठी लाचार होऊन कोणाचेही काहीही काम करण्यास तयार असे. एवढे असूनसुध्दा त्याला कोणतीही वस्तू बाजारातून आणण्यासाठी काही पैसे दिले तर त्या पैशांचा हिशोब तो चोख देत असे. त्याचप्रमाणे घरात पडलेली चवली पावली तो इतक्या प्रामाणिकपणे उचलून ठेवत असे की त्याच्या या प्रामाणिकपणाच्या गुणामुळे इतर कमीपणांकडे सहज डोळेझाक करावी असे वाटे.

हा अर्धवट वाटणारा माणूस प्रसंगी इतकी माणुसकी व प्रसंगावधान दाखवत असे की शहाण्यांनी तोंडात बोटे घालावी. घरातले आजोबा देवाघरी गेले तेंव्हा आजी घरांत एकटयाच आहेत हे जाणून त्याने पळत पळत जाऊन कोपऱ्यावरच्या इमारतीमधे काम करणाऱ्या त्यांच्या भाच्याला बोलावून आणले. कारखान्यातल्या पोरी सोरी आपली चेष्टा, टिंगल करतात ते तुकारामला आवडत नसे व आपला अपमान झाल्यासारखा त्याला वाटे. अशा वेळी एकटाच लांबवर बसून तो रागारागाने बडबडत असे व आपला अपमान गिळून टाकत असे.
तुकाराम पुष्कळ बाबतीत वेडसरपणाच्या लक्षमणरेषेवर आहे असे आम्हाला वाटे. त्याला कोठेही एखादे कापडाचे फडके दिसले की तो खुष होत असे व थोडयात वेळात ते फडके नाहिसे होत असे व काही दिवसांनंतर ते फडके तुकारामच्या खांद्यावर विराजमान झालेले दिसत असे. त्याचे फडक्यांचे वेड नंतर एवढे वाढले की आमच्या चारचाकीच्या चालकाला सुध्दा गाडी पुसण्याची फडकी तुकारामच्या नजरेआड ठेवावी लागत.

तुकाराम आमच्याकडे रुळल्यावर त्याची बरीचशी माहिती आम्हाला समजली. या माणसाचे आयुष्य म्हणजे खरोखरच एक शोकान्तिका ठरावी. हा माणूस मुंबईच्या मालधक्यावर काम करणारा एक बलदंड मजूर होता हे सांगून सुध्दा खरे वाटले नसते. सिमेंट वगैरेच्या गोणी उचलण्याच्या कामावर तो असे व त्याला या कामासाठी भरपूर पगार मिळत असे. चांगली बायको, मुले असा त्याचा सुखी संसार होता. परंतु कोणत्यातरी दुर्धर आजाराने त्याला पार ग्रासले व हळुहळु त्याचा सुखी संसार मिटत गेला. बायकोच्या माहेरच्या नातेवाइकांच्या मदतीने मग त्याने पुण्यात बस्तान बसविले. पण येथेही दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. त्याचा मोठा मुलगा ठार वेडा झाला व त्याला वेडयांच्या इस्पितळांत ठेवावे लागले. दुखा:त सुख एवढेच होते की बाकीची मुले चांगली होती व मुलीला चांगले ठिकाण मिळाले होते. पुढे त्याचा हा वेडा मुलगा इस्पितळातच वारला. त्याचे शव बेवारशी म्हणून जाळले जाईल या भितीने तुकाराम वेडापिसा झाला. त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला व मुलाचे शव ताब्यात घेऊन सर्व क्रियाकर्म यथासांग पार पाडले. कोणीतरी त्याला विचारले की या वेडयासाठी तूं एवढी धावपळ कां करतो आहेस? तेंव्हा तुकारामने दिलेले उत्तर मोठे समर्पक होते. मुलगा वेडा असला म्हणून काय झाले? त्याचा जीवच होता ना? मग त्याचे सर्व क्रियाकर्म यथासांग केलेच पाहिजे.

तुकाराम दिवसेदिवस थकत चालला आहे हे आम्हाला दिसत होते. त्याचे एकटे बसून बडबड करणेही वाढले होते. तो फारसे कामही करत नसे. पण त्याला कामावरून काढण्याचे धैर्य आमच्यात नव्हते. तो या नंतर बरेच दिवस कामाला येतच राहिला. तो आमच्या येथे तसा सुखी होता पण प्रपंचाचा त्याच्यावर बहुदा खूपच तणाव येत असावा. एक दिवस संध्याकाळी घरी न जाता तो थांबून राहिला. त्याची विचारपूस केल्यावर आपण हे काम सोडत असल्याचे त्याने सांगितले. पुढे काय करणार हे विचारल्यावर थक्क होण्याची पाळी आमची होती. दिवसांसुध्दा पूर्णवेळ जागे न राहू शकणाऱ्या या फाटक्या वेडसर इसमाला रात्रपाळीचा गुरखा म्हणून नवी नोकरी मिळाली होती.

19 ऑगस्ट 1999