Showing posts with label शिलादित्य. Show all posts
Showing posts with label शिलादित्य. Show all posts

Sunday, 7 December 2014

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र- राजधानीचे शहर- भाग 3


कोकणपूर मधला मुक्काम आटोपून ह्युएन त्सांग व त्याच्या बरोबरचे सहप्रवासी पुढे वायव्य दिशेला प्रवासाला निघाले. या पुढच्या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांग लिहितो,
“From this going north-west, we enter a great forest wild, where savage beasts and bands of robbers inflict injury on travellers. Going thus 2400 or 2500 li, we come to the country of Mo-ho-la-ch’a (Maharashtra).”
या नंतर वायव्येकडे जात असताना आम्ही एका विशाल व मनुष्य वस्तीचे कोणतेही चिन्ह नसलेल्या अरण्यात शिरलो. या अरण्यात फक्त हिंस्त्र श्वापदे व प्रवाशांना जायबंदी करून लूटमार करणार्‍या ठगांच्या टोळ्या आहेत. 2400 ते 2500 लि अंतर (400 मैल) प्रवास केल्यानंतर आम्ही महाराष्ट्र या देशामध्ये पोचलो.”
महाराष्ट्र देशाच्या राजधानीचे वर्णन करताना ह्युएन त्सांगने खालील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
1.महाराष्ट्राची राजधानी देशाच्या पश्चिमेला असून ती भारतातल्या एका मोठ्या व प्रमुख नदीच्या काठावर आहे.
2.राजधानीत शंभराहून जास्त संघराम असून 5000 भिख्खू त्यात रहात आहेत. येथे 100 पेक्षा जास्त देवळे, ज्यांच्यात अनेक पंथांचे साधू वस्ती करून आहेत.
3.राजधानीत पाच ठिकाणी सम्राट अशोकाने बांधलेले मोठे स्तूप आहेत. या ठिकाणी चार बुद्ध अवतार येऊन गेल्याच्या स्मरणार्थ हे स्तूप बांधलेले आहेत. या शिवाय शहरात अनेक स्तूप आहेत.
4.शहराच्या दक्षिणेला थोड्या अंतरावर एक संघराम असून तेथे बोधिसत्वांची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीची प्रार्थना केल्यास ती मनोकामना पूर्ण करते अशी ख्याती आहे.
5.येथून 1000 लि अंतरावर व नर्मदा नदी ओलांडल्यावर आपण भडोचला पोहोचतो.
या यादीतील शेवटचा मुद्दा ह्युएन त्सांगचा शिष्य हुई लि याने अगदी स्पष्टपणे मांडला आहे. तो म्हणतो की या राजधानीपासून सुमारे 1000 लि अंतर वायव्य दिशेला गेले व नर्मदा नदी पार केली की आपण भडोचला पोहोचतो.”
ह्युएन त्सांगने आपल्या या प्रवास वर्णनात अजंठा गुंफांसारख्या एका मोठ्या बुद्ध विहाराचे बारकाईने वर्णन केले आहे परंतु प्रत्यक्षात तो तेथे गेला नसावा असे संशोधक म्हणतात. याच प्रकारे, लंकेचे वर्णन सुद्धा ह्युएन त्सांगने आधी केलेले आहे. परंतु तो तिथे गेला नसल्याचे त्याचा शिष्य हुई लि याने आपल्या पुस्तकात मान्य केलेले आहे. हा बुद्ध विहार राज्याच्या पूर्वेला सीमेवर आहे असे ह्युएन त्सांगने आपल्या वर्णनात नमूद केलेले आहे ते लक्षात घेण्याजोगे आहे.
पुलकेशीच्या या महाराष्ट्राची राजधानी म्हणजे नक्की कोणते स्थान असावे या विषयी काही अंदाज बांधता येतात का? याचा आता आपण विचार करू.
पुलकेशी हा चालुक्य घराण्यातला राजा होता. हे घराणे मूळचे उत्तर कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातले. पुलकेशीचा आजा, पुलकेशी 1 (..535-..566) याने आपल्या राज्याची राजधानी ऐहोले येथून बदामीला हलवली होती. या राजाने बदामीला एक किल्ला व गुफा मंदिरे बांधली होती. कर्नाटकात आजही, चालुक्य राजधानी नेहमीच बदामीला होती असे सांगितले जाते.परंतु पुलकेशी राजाच्या कर्तुत्वाची माहिती देणार्‍या ऐहोले येथील शिलालेखात पुलकेशीच्या संदर्भात बदामीचा उल्लेख फक्त एका ठिकाणी येतो.
(V. 32.) While He, Satyashraya, endowed with the powers of energy, mastery and good counsel,–having conquered all the quarters, having dismissed the kings full of honours, having done homage to gods and Brahmans, having entered the city of Vatapi–is ruling, like one city, this earth which has the dark-blue waters of the surging sea for its moat;
” ( कडवे 32) ज्याच्या राज्याभोवती गर्जणार्‍या समुद्राच्या गर्द निळ्या लाटा एखाद्या खंदकाचे काम करतात, ज्याने चारी दिशांना महापराक्रम गाजवून अनेक पराक्रमी राजांना पदच्युत केलेले आहे, ज्याचे शक्ती व राजकौशल्य यावर प्रभुत्व आहे अशा या सत्याश्रय राजाने ईश्वर व ब्रम्हवृंद यांचे आशिर्वाद घेऊन वाटपी (बदामी) मध्ये प्रवेश केला. ” या एका वाक्यावरून कन्नड इतिहासकार पुलकेशीची राजधानी बदामीच होती असे मानतात. पल्लव देशाचा राजा महेन्द्रवर्मन याच्यावरील विजयानंतरचे हे वर्णन आहे.
ह्युएन त्सांगच्या प्रवास कालात पुलकेशीचे साम्राज्य केवढे पसरलेले होते ते आपण बघितलेले आहे. त्या वेळी त्याला प्रबळ असा शत्रू (हर्षवर्धन या राजाबरोबर तह झालेला असल्याने) म्हणजे पल्लव राजा महेन्द्रवर्मन याचा नव्याने गादीवर आलेला मुलगा नृसिंहवर्मन हाच होता. बदामी हे गाव कांचीपुरम पासून तसे म्हटले तर जवळच आहे. त्यामुळे पुलकेशी सारखा कर्तबगार राजा आपल्या साम्राज्याची राजधानी आपल्या सर्वात प्रबळ शत्रूच्या सैन्याच्या टप्प्यात ठेवेल हे मानणे कठिण वाटते. या शिवाय ह्युएन त्सांगच्या भेटीच्या काही वर्षे आधी पुलकेशी आणि हर्षवर्धन यांच्यात मोठे युद्ध झाले होते व या युद्धात हर्षवर्धनाला पराभव पत्करावा लागला होता. हे युद्ध तर महाराष्ट्राच्या उत्तरेस झाले होते. कदाचित या युद्धासाठी पुलकेशीने आपली राजधानी उत्तरेकडे हलवली असावी अशीही शक्यता आहे. या कारणांमुळे ह्युएन त्सांगच्या वर्णनाप्रमाणे ही राजधानी राज्याच्या पश्चिमेला असल्याची नोंद सत्य असावी असे वाटते.
ह्युएन त्सांगने वर्णन केलेली ही महाराष्ट्राची राजधानी कोणती असावी या संबंधीचे काही प्रमुख अंदाज असे आहेत.
M.V.de.St.Martin याने दौलताबाद हे नाव सूचित केले होते. परंतु येथे मोठी नदी नाही. बौद्ध अवशेष मिळत नाहीत व भडोच पासून याचे अंतर बरेच जास्त असल्याने त्याचा विचार करण्याची आवश्यकता दिसत नाही. कनिंगहॅम हा संशोधक कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातले व पश्चिमी चालुक्य राजघराण्याची राजधानी असलेले कल्याणी (सध्याचे बसवकल्याण) हे गाव सूचित करतो. परंतु या गावाजवळूनही कोणतीच मोठी नदी वहात नाही, येथे बौद्ध अवशेष सापड्त नाहीत व हे गाव भडोच पासून 372 मैल अंतरावर आहे. फर्ग्युसन हा संशोधक ही राजधानी, टोक(नेवासा), पुणतांबे किंवा पैठण यापैकी एक गाव असावे असा अंदाज करतो. या तीन गावांपैकी टोक हे गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी आहे. या गावाचे भडोच पासूनचे अंतर 195 मैल आहे. परंतु हे अगदी साधारण असे खेडेगाव असून येथे कोणत्याही ऐतिहासिक खाणाखुणा सापडत नाहीत. पुणतांबे हे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यात येते. हे गाव पण गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि टोक या गावापासून सुमारे 28 मैल अंतरावर असल्याने याचे भडोचपासून अंतर सुद्धा ठीक आहे. परंतु या गावात सुद्धा कोणत्याच ऐतिहासिक खाणाखुणा सापडत नाहीत. फर्ग्युसनने सूचित केलेले तिसरे गाव पैठण हे मात्र एक चांगला उमेदवार वाटते. या गावाजवळून गोदावरी नदी वाहते. ऐतिहासिक दृष्ट्या हे गाव शालीवाहन राजाची राजधानी असल्याने प्रसिद्धच होते या कालात पठणहून राज्य करणारे बौद्ध असल्याने येथे संघराम व बुद्धाची मूर्ती त्या काली असणे शक्य वाटते मात्र या शहराचे भडोच पासूनचे अंतर 220 मैल आहे.


जे.एफ फ्लीट हा एक ब्रिटिश सनदी अधिकारी महाराष्ट्रात पोस्टिंगवर होता. त्याने महाराष्ट्रात अतिशय विस्तृत स्वरूपात प्रवास केलेला असल्याने त्याची मते मला जास्त रोचक वाटली. फ्लीटच्या मताने नाशिक हे शहर पुलकेशीच्या महाराष्ट्राची राजधानी असली पाहिजे. नाशिकच्या पक्षामध्ये काय काय मुद्दे आहेत हे बघितले तर असे लक्षात येते की
1.नाशिक गोदावरी नदीच्या काठावर असल्याने एक मोठी व प्रमुख नदी त्याच्या जवळून वाहते आहे.
2.नाशिक महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे.
3.भडोच, नाशिकच्या वायव्येला 128 मैलावर आहे. परंतु प्रवास करण्यासाठी मनमाड मार्गे जावे लागल्याने हे अंतर थोडे वाढू शकते.
4.नाशिकच्या नैऋत्येला सुमारे सहा मैलावर पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध बौद्ध गुफा आहेत. या गुंफामध्ये बुद्धाची उभी मूर्ती आहे (संदर्भ Gazettier of the Bombay Presidency Vol 16 pp. 543)
5.शालिवाहन कालापासून नाशिक हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून सुप्रसिद्ध आहे.
6.नाशिकच्या परिसरात कमीत कमी एका बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडलेले आहेत. (जे.एफ. फ्लीट याच्या मताप्रमाणे) (संदर्भ Gazettier of the Bombay Presidency Vol 16 pp. 539)
7.सुप्रसिद्ध अजंठा गुफा नाशिकच्या पूर्वेला येतात.
वरील सर्व मुद्यांवरून पैठणपेक्षा नाशिक ही पुलकेशीची राजधानी किंवा ह्युएन त्सांगच्या प्रवासाच्या कालात तरी, त्याचे राज्यकारभार पाहण्याचे ठिकाण असले पाहिजे असे वाटते. बदामी पेक्षा नाशिकवरून एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार पहाणे, नक्कीच सुलभ असावे.


ह्युएन त्सांगच्या वर्णनात, अजंठ्याचा बौद्ध विहार हा देशाच्या पूर्व सीमेवर एका मोठ्या पर्वतराजीमधील एका अंधार्‍या दरीत आहे असा उल्लेख आहे. अजंठ्याचा उल्लेख ह्युएन त्सांग एक सीमेवरचे गाव (Frontier Town)म्हणून करतो. गुगल अर्थ वरचे या भागाचे उपग्रह चित्र बघितले की त्या काळी ह्युएन त्सांग असे का म्हणत असावा हे लगेच लक्षात येते. अजंठ्या जवळच्या पर्वतराजीला सातमाला किंवा चांदोर असे नावे आहे व ही पर्वतराजी पश्चिमेला नांदगाव व चांदवड या गावांजवळून नाशिकच्या वायव्येला सह्याद्री पर्वत राजीला येऊन मिळते. ही पर्वतराजी नांदगाव व मनमाड या मध्ये जरी जमीनसपाट होत असली तरी बाकी भागात खानदेश व महाराष्ट्राचा इतर भाग या मध्ये ती एखाद्या नैसर्गिक सीमेसारखी आहे. या कारणामुळे ह्युएन त्सांगने अजंठ्याचा उल्लेख महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरील गाव असा करणे स्वाभाविक वाटते.
जगभरात ह्युएन त्सांगच्या प्रवासवर्णनावर जेवढे संशोधन झाले असेल तेवढे दुसर्‍या कोणत्याही पुस्तकावर झाले असेल असे मला वाटत नाही. या प्रवास वर्णनावरून केलेले अनेक नकाशे सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र कांचीपुरम ते भडोच या प्रवास टप्प्याबाबत इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की बहुतेक मंडळी तो कांचीपुरमहून महाराष्ट्रातून प्रवास करत भडोचला गेला एवढाच उल्लेख करतात. यामुळे खरे म्हणजे माझा या बाबतीतली उत्सुकता वाढली व मी जालावर या संबंधी शोधाशोध करण्यास उद्युक्त झालो. माझ्या या अभ्यासाचे निष्कर्ष मी या तीन भागांच्यात सादर केलेले आहेत.
11 मे 2011

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र – कोंकणपूर- भाग 2


द्रविड देशातील कांचीपुरम येथून निघालेल्या ह्युएन त्सांगने परतीच्या प्रवासासाठी उत्तर दिशेला प्रयाण केले व आपला पुढचा मुक्काम कोंकणपुर या गावात केला हे आपण आधीच्या भागात बघितले. या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांगने स्वत: काय लिहून ठेवले आहे ते आपण प्रथम पाहूया.
Leaving the country of Ta-lo-pi-ch’a (Dravida) and travelling northwards, we enter a forest wild, in which are a succession of deserted towns, or rather little villages.Brigands, in concert together, wound and capture (or delay) travellers. After going 2000 li or so we come to Kong-kin-na-pu-lo (Konkanapura).”
द्रविड देश सोडून उत्तर दिशेला प्रवास करण्यास प्रारंभ केला की आपण एका मनुष्य वावर नसलेल्या अरण्यात शिरतो. या अरण्यात एका पाठोपाठ एक अनेक निर्मनुष्य गावे किंवा खेडेगावे लागतात.” Watters या संशोधकाने या वाक्याचे भाषांतरनिर्मनुष्य असलेले एक मोठे गाव व छोट्या वस्त्या लागतातअसे केले आहे.लुटारू व दरोडेखोर एकत्रितपणे प्रवाशांवर हल्ला करतात किंवा त्यांना पकडतात. यामुळे प्रवासात दिरंगाई होऊ शकते. 2000 लि अंतर चालल्यावर आपण कोंकणपुरला पोचतो.”
ह्युएन त्सांगचा शिष्य हुई लिहा याच प्रवासाबद्दल लिहितो.
From Dravida, he (Master of law) went north-west in company with about seventy priests from Simhala, and visited the sacred traces for the purpose of reverent observation”
द्रविड देशातून विधीविशारदव त्यांच्या बरोबरचे अंदाजे सत्तर सिंहली भिख्खू यांनी वायव्येकडे प्रयाण केले व या प्रवासात त्यांनी अनेक आदरणीय व पवित्र स्थानांना भेटी दिल्या.”
या दोन्ही प्रवासवृत्तांमधून, ह्युएन त्सांग व त्याचे शिष्य यांनी उत्तरेला प्रयाण केले की वायव्येला या बद्दल एकवाक्यता आढळत नाही. जे. बर्गेस या संशोधकाने जून 14, 1893 रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या एका लेखात, या फरकाचा खुलासा दिला आहे. त्याच्या मताने ह्युएन त्सांग किंवा त्या काळातील इतर चिनी प्रवासी हे चार मुख्य दिशांचा ढोबळ मानाने उल्लेख करत असत. ज्या वेळी एखादे स्थळ वायव्येसारख्या एखाद्या उपदिशेला अगदी सरळ मार्गावर असेल तरच उपदिशांचा वापर करत. त्यामुळे ह्युएन त्सांगने निर्देश केलेल्या उत्तर दिशेचा अर्थ ईशान्य व वायव्य या दिशांमधील कोनाची दिशा असा घेतला तरी चालण्यासारखे आहे. यामुळे कोंकणपुरचा शोध घेताना आपण एवढेच लक्षात घ्यायचे की हे स्थान कांचीपुरमच्या उत्तर ते वायव्य दिशांमधे कोठेतरी होते.
दुसरा महत्वाचा मुद्दा अंतरांबद्दलचा आहे. ह्युएन त्सांगने मोजलेली अंतरे ही दोन ठिकाणांमधले अंतर चालायला किती पावले टाकायला लागली? यावर आधारित आहेत. याला चीनमध्ये लि असे नाव आहे. (अर्थात 1 लि म्हणजे 1 पाऊल नव्हे.) लि या एककात (Unit)दिलेली अंतरे कोणत्या रस्त्याने प्रवास केला? त्याला वळणे होती का? घाट होते का? नद्या ओलांडून जाण्यासाठी लांबचा फेरा घ्यावा लागला का? या सगळ्या बाबींवर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे या लिएककात दिलेल्या अंतराचे, मैलात केलेले परिवर्तन ढोबळ मानानेच घेणे आवश्यक आहे. या कारणामुळे कांचीपुरम आणि कोकणपूर यातला 330 मैलाचा अंदाज प्रत्यक्षात 200 मैलापासून 350 मैलापर्यंत असू शकतो असे मला वाटते.
कोंकणपूर गाव व राज्य याबद्दल ह्युएन त्सांगने बरेच वर्णन केले आहे. या वर्णनावरून हे स्थान बरेच महत्वाचे व मोठे असले पाहिजे हे लगेच लक्षात येते. ह्युएन त्सांगने कोंकणपूर बद्दल लिहिलेल्या वर्णनापैकी आपल्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे असे आहेत.
1. देशाचा परिघ 5000 लि (अंदाजे 800 मैल) एवढा आहे. (देश फारसा मोठा नाही)
2. जमीन अतिशय सुपीक व सतत लागवडीखाली असल्याने उत्तम पिके येतात. हवा अतिशय गरम आहे. ह्युएन त्सांगने केलेल्या इतर वर्णनावरून देशातील सुबत्तेची व श्रीमंतीची कल्पना येते.
3. स्थानिक लोक कृष्णवर्णाचे आहेत. त्यांचा स्वभाव रानटी व असभ्य वाटतो. मात्र या लोकांची आकलनशक्ती अतिशय तीव्र आहे व ते मनस्वी स्वभावाचे वाटतात. शिक्षणाबद्दल त्यांना प्रेम आहे व सद्गुण व अंगभूत हुशारी यांना ते महत्व देतात. या देशात 100 संघराम आहेत व 10000 उपासक आहेत. महायान व हीनयान अशा दोन्ही पंथांचे उपासक येथे आहेत. देशात शेकडोच्या संख्येने निरनिराळ्या पंथांच्या देवांची देवळे आहेत व या सर्व देवांची येथे उपासना होते.
4. शहराच्या उत्तरेला ताल वृक्षांचे 30 लि (अंदाजे 5 मैल) परिघाचे एक मोठे अरण्य आहे.
5. शहराच्या नैऋत्येला सम्राट अशोकाने बांधलेला 100 फूट उंचीचा स्तूप आहे.
कोंकणपूरच्या स्थानाबद्दल आपण काही अंदाज करण्याआधी भाषांतरकारांनी केलेले अंदाज तपासू. सर्वसाधारणपणे कोंकणपूर दक्षिण भारतात असावे या बद्दल जरी एक मत असले तरी प्रत्यक्ष स्थानाबद्दल प्रचंड मतभेद आहेत. कोंकणपूरचे स्थान म्हणून ज्या जागा निरनिराळ्या संशोधकांनी सूचित केल्या आहेत. त्या अशा आहेत.
1. कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील बनवासी हे गाव. कदंब राजांची राजधानी येथे होती. -
( Saint-Martinया संशोधकाच्या मताप्रमाणे)
2. तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर असलेले अनागुन्डी गाव.
- (Cunningham या संशोधकाच्या मताने)
3. मैसूर जवळचे नागपट्टम - (Fergusson या संशोधकाच्या मताने )
4. चंद्रपूर
5. गोळकोंडा(हैदराबाद) – (Bealया संशोधकांच्या मताने. )
6. कोकनुर- (Burgess या संशोधकाच्या मताने )
7. Watters या संशोधकाने अल बिरूनीचा दाखला दिला आहे. अल बिरुनीने कोकण हा प्रदेश समुद्राजवळ असल्याचे सांगितले असल्याने या गावाचे नाव चिनी लिपीतून इंग्रजीत भाषांतर करताना चुकीने कोकणपूर असे पूर्वीच्या भाषांतरकारांनी ठरवलेले आहे व प्रत्यक्षात योग्य भाषांतर केल्यास हे नाव दख्खनपूर किंवा थक्कनपूर असे असले पाहिजे असे आपले मत त्याने व्यक्त केले आहे.
कोकणपूर गावाच्या स्थानाबद्दल, संशोधकांनी केलेले हे दावे, एवढ्या विस्तृत प्रदेशांतर्गत आहेत की हे सर्व अंदाज अंधारात एखादा दगड फेकण्यासारखेच आहेत असे मला राहून राहून वाटते आहे. मग कोकणपूरचे स्थान आपल्याला नेहमी अज्ञातच राहणार आहे का आपण काही नवे अंदाज बांधू शकतो?
या सर्व संशोधकांनी आपले अंदाज करताना त्या काळची राजकीय परिस्थिती बहुदा लक्षातच घेतली नसावी असे माझे मत झाले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की कोकणपूर या स्थानामधल्या मुक्कामानंतर, ह्युएन त्सांगने पुलकेशीच्या महाराष्ट्रामधे प्रवेश केलेला आहे या महत्वाच्या बाबीकडे या सर्व संशोधकांचे दुर्लक्ष झालेले दिसते आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, कोकणपूर हे गाव व राज्य पुलकेशीच्या महाराष्ट्रात नव्हते किंवा किमान पक्षी हे गाव व राज्य, पुलकेशी सम्राटाचे मांडलिक राज्य तरी असले पाहिजे. सुदैवाने पुलकेशीच्या साम्राज्य सीमा काय होत्या त्या बद्दलचा एक महत्वपूर्ण शिलालेख आज उपलब्ध आहे. हा शिलालेख कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील ऐहोले गावाजवळच्या जैन मंदिरात सापडलेला आहे. या लेखातील वर्णनाप्रमाणे, पश्चिमेला कोकण प्रांताचा समुद्र तट, पूर्वेला कलिंग देशाचा समुद्र तट, उत्तरेला हर्षाच्या राज्याला भिडलेला व नर्मदा नदीपर्यंतचा भाग व दक्षिणेला कावेरी नदीपर्यंतचा भाग, पुलकेशीच्या राज्याचा भाग होता. कोकणपूर हे गाव पुलकेशीच्या स्वामित्वाखाली असलेल्या या भूप्रदेशात नसणार आहे ही गोष्ट लक्षात घेतली की संशोधकांनी वर सूचित केलेली सर्व गावे बाद ठरतात हे या शिलालेखावरून स्पष्ट होते आणि Watters या संशोधकाच्या म्हणण्याप्रमाणे, कोकणपूर हे भाषांतरही बहुदा चुकीचे असावे असे दिसते.
पुलकेशीचे साम्राज्य
ह्युएन त्सांगने जेंव्हा हा प्रवास केला होता तेंव्हा पुलकेशी राजाला एकच प्रबळ असा शत्रू उरलेला होता. तो म्हणजे पल्लव राजघराण्यातील महिन्द्रवर्मन (पहिला) हा राजा. या राजाची राजधानी, ह्युएन त्सांगने आपला प्रवास जेथून चालू केला ते कांचीपुरम शहर ही होती. याच्या काही काल आधी, पुलकेशी राजाने या महिन्द्रवर्मन राजाचा युद्धात मोठा पराभव केला होता. परंतु कांचीपुरम मात्र अभेद्यच राहिले होते. कांचीपुरम पुलकेशीच्या राज्याच्या साधारण अग्नेय दिशेला येते व या दिशेला पुलकेशीचे साम्राज्य साधारन पेन्नार नदीकाठापर्यंतच सीमित होते.
ह्युएन त्सांगच्या वर्णनातील एका महत्वाच्या वाक्याचा वर मी उल्लेख केला आहे. कांचीपुरम ते कोकणपूर या प्रवासात आपल्याला अनेक निर्मनुष्य गावे एका पाठोपाठ लागली असे वर्णन तो करतो. माझ्या मताने या वर्णनाचा स्पष्ट अर्थ असा होतो की ह्युएन त्सांग प्रवास करत असलेल्या त्या मार्गावर मोठे युद्ध काही काळापूर्वी होऊन गेले होते व त्या युद्धात नष्ट झालेली गावे त्याने प्रवास करताना बघितली होती. या सगळ्या वर्णनावरूम एक गोष्ट मला तरी स्पष्ट होते आहे. ती म्हणजे कोकणपूर हे गाव पल्लव व चालुक्य राज्यांचा सीमेवर असलेले मांडलिक राज्य असले पाहिजे व त्या राज्याचे पुलकेशी राजाशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजेत.
त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला तर असे दोन उमेदवार आपल्याला मिळतात. पहिला उमेदवार म्हणजे कोंगानीवर्मन माधव या राजाने स्थापन केलेले गंगा(पश्चिम) हे राज्य. पुलकेशीच्या काळात दुर्विनिता हा राजा या राज्याच्या गादीवर होता. ऐहोलेच्या शिलालेखात या राजघराण्याच्या पुलकेशीशी असलेल्या एकनिष्ठतेचा उल्लेख आहे. या राज्यामध्ये सध्याच्या मैसूर, हसन, मंड्या व बंगलूरू या शहरांच्या परिसरातला भाग, तामिळनाडू मधला कोंगू हा भाग व कर्नाटक, आंध्र-प्रदेश सीमेवरचा अनंतपूर जवळचा भाग यांचा समावेश होत होता. या राज्याची राजधानी दक्षिण कर्नाटकातील तालकड येथे होती.
आन्ध्र प्रदेशातील नेल्लोर पासून कर्नाटक सीमेवरील अनंतपूर पर्यंत राज्याची सीमा असलेले या भागातले दुसरे महत्वाचे मांडलिक राज्य म्हणजे बाण हे राज्य, आपला दुसरा उमेदवार आहे. हे राज्य आधी पल्लव राजांचे मांडलिक राज्य होते. पुलकेशीने पल्लव राजाचा पराभव केल्यावर हे राज्य पुलकेशीचा सामंत राज्य झाले. सामंत राज्य आणि मांडलिक राज्य यात मला तरी फारसा फरक दिसला नाही. पुलकेशीच्या काळात हे राज्य, कर्नाटकातील चित्तूर पासून आंध्र प्रदेशातील कडाप्पा व नेल्लोर पर्यंत पसरलेले होते.
पलार नदी ही या राज्याची दक्षिण सीमा होती. बाण या राज्याची राजधानी, आन्ध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्हा व हिंदुपूर तालुक्यात असलेल्या पारिगी (पूर्वीचे नाव पारिवीपूर) या गावाजवळ होती.
नकाशावर बघितले तर गंगा या राज्याची राजधानी असलेले तालकड हे गाव कांचीपुरमच्या नैऋत्येला येते. त्यामुळे ते बादच करावे लागेल. बाण राज्याची राजधानी असलेले पारिगी (पूर्वीचे नाव पारिवीपूर) हे गाव मात्र कांचीपुरमच्या वायव्येला येते आहे. हिंदुपूर तालुक्याचा परिसर ज्या भौगोलिक स्थानावर आहे तो भाग नकाशावर बघितला तर तो चालुक्य व पल्लव साम्राज्यांच्या सीमेवर येतो.
पारिगी व कांचीपुरम यातील As Crow fliesअंतर, 170 मैल आहे. परंतु पारिगीला कांचीपुरम पासून पोचण्यासाठी सध्याच्या रस्त्यांचा वापर केला तर 300 मैलाहून जास्त अंतर कापावे लागते. त्यामुळे ह्युएन त्सांगने दिलेले अंतर फारसे चूक नसावे असे मला तरी वाटते.
कोकणपूर हे गाव म्हणजे आन्ध्र प्रदेशातील पारिगी या खेडेगावाचा परिसरात असलेले पारिवीपूर आहे असे मान्य करायचे ठरवले तर आतापर्यंतच्या चर्चेतल्या कोणत्या गोष्टी या निवडीला पाठिंबा देऊ शकतात?
1. पेन्नर आणि चित्रावती या दोन नद्या या भागातून वहातात, त्यामुळे ह्युएन त्सांगच्या कालात येथे निबिड अरण्य असणे पूर्ण शक्य आहे.
2. हवा अतिशय उष्ण आहे.
3. लोकांचे वर्णन आंध्र प्रदेशच्या लोकांना बर्‍यापैकी लागू पडते.
4. हा भाग चालुक्य व पल्लव राज्यांचा सीमेवर असल्याने युद्धामुळे गावे बेचिराख झाल्याचे वर्णन या भागात पूर्ण शक्य आहे.
5. आन्ध्र प्रदेशात बुद्धकालीन जुनी मंदिरे, विहार यांचे अवशेष विपुल प्रमाणात आढळतात त्यामुळे ह्युएन त्सांगने केलेली स्तूपांची वगैरे वर्णने या भागाला गैरलागू वाटत नाहीत. तसेच येथे हिंदू देवळांची संख्याही भरपूर असणार आहे.
ही सर्व कारणे लक्षात घेतली तर पारिगी गावाच्या परिसरातील पारिवीपूर हे ह्युएन त्सांगचे कोकणपूर असावे असे म्हणणे पूर्ण शक्य वाटते.
8 मे 2011

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र – माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1


ह्युएन त्सांग ( शुएनझांग XuenZang ) या प्रसिद्ध चिनी भिख्खूने इ.. 629 ते इ.. 645 या कालामध्ये चीन पासून सुरूवात करून दक्षिण भारतापर्यंत व तेथून परतीचा केलेला खुष्कीच्या मार्गाने प्रवास व त्या प्रवासाचे त्याने लिहून ठेवलेले प्रवासवर्णन हे सर्वश्रुत आहे. आपला परतीचा प्रवास त्याने तमिळनाडू मधील कांचीपुरम पासून सुरू केला होता. कांचीपुरम ते गुजरातमधील भडोच या त्याच्या प्रवासाच्या टप्प्यात त्याचा प्रवास मार्ग महाराष्ट्रातून गेलेला असल्याने मला त्याच्या या प्रवासाबद्दल बरेच कुतुहल होते. त्याच्या या प्रवास वर्णनावरून सातव्या शतकातील महाराष्ट्र कसा होता याची काही कल्पना मिळेल असे मला वाटत होते. ह्युएन त्सांगने लिहून ठेवलेले मूळ प्रवास वर्णन अर्थातच चिनी लिपीत असल्याने, इंग्रजी भाषांतरावरच मला समाधान मानावे लागणार आहे हे उघड होते. सुदैवाने बर्‍याच संशोधकांनी प्रसिद्ध केलेली अशी भाषांतरे उपलब्ध आहेत. 1884 मध्ये प्रसिद्ध झालेले सॅम्युएल बील (Samuel Beal) याचे व 1904 मध्ये प्रसिद्ध झालेले थॉमस वॉटर्स (Thomas Watters) या लेखकाचे, अशा दोन भाषांतरांचा मी मुख्य संदर्भ घेतला आहे. या शिवाय, व्हिन्सेंट ए. स्मिथ(Vincent A. Smith) या संशोधकाच्या ह्युएनत्सांगचा प्रवास-मार्ग‘ (The Itinerary of Yuan Chwang) या लेखाचा, तसेच ह्युएन त्सांग या भिख्खूचा एक शिष्य हुई लि (Hwui Li) याने आपल्या गुरूच्या भारत प्रवासाबद्दल लिहिलेले व सॅम्युएल बील यांनीच भाषांतर केलेले, The life of Hiuen-Tsiang, by the shaman Hwui Li. या पुस्तकातील काही भाग व ई. बर्गेस यांच्या एका लेखाचा मी संदर्भ घेतला आहे.
ह्युएन त्सांगने हा महाराष्ट्रातील प्रवास कोठून व कसा केला हे आपण थोडक्यात पाहूया.
1. ह्युएन त्सांग त्या वेळी द्रविड देशातील कांचीपुरम या स्थानी होता. हे स्थान म्हणजे तमिळनाडूमधील कांचीपुरम आहे याबद्दल दुमत असल्याचे काहीच कारण नाही.
2. कांचीपुरम मधून ह्युएन त्सांग उत्तर किंवा वायव्य दिशेने निघाला व साधारण 330 मैल अंतर असलेल्या कोकणपूर किंवा कोंगणपूर या राज्यामध्ये त्याने पुढचा मुक्काम केला. कोकणपूर राज्याचे रहिवासी कृष्णवर्णीय आहेत व त्यांची वागण्याची पद्धत (Manners) रानटी व असभ्य (Fierce and Uncultivated) आहेत असे तो लिहितो.
3. कोकणपूर मधून परत वायव्य दिशेने पदक्रमण करून ह्युएन त्सांग सुमारे 400 मैलावरच्या महाराष्ट्र या देशाच्या राजधानीत पोचला. महाराष्ट्राची राजधानी राज्याच्या पश्चिमेला एका मोठ्या नदीकाठी होती.
4. महाराष्ट्र या देशावर त्यावेळी पुलकेशी हा राजा राज्य करत होता. हा राजा पराक्रमी असून त्याने शिलादित्य राजाला नर्मदेपलीकडे येऊ दिले नव्हते.
5. महाराष्ट्राच्या राजधानीहून ह्युएन त्सांग त्या राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या एका मोठ्या बुद्ध-विहारापाशी पोचला. हा बुद्ध विहार एका मोठ्या पर्वताच्या एका अंधार्‍या दरीत होता. या ठिकाणी अनेक मजल्यांच्या गुफा होत्या व त्यावर बुद्ध जीवनातील प्रसंग चित्रित केलेले होते. या विहाराचे वर्णन बारकाईने ह्युएन त्सांगने केलेले आहे. त्यावरून ही जागा म्हणजे प्रसिद्ध अजिंठा गुफा आहेत याबद्दल एकमत आहे.
6. अजिंठ्या पासून ह्युएन त्सांग पश्चिम दिशेकडे निघाला व नर्मदा नदी ओलांडून तो सुमारे 200 मैल अंतरावरच्या भडोच या स्थानावर पोचला. भडोच या स्थानाबद्दलही एकमत आहे. (भडोच शहर अजिंठ्यापासून 200 मैल अंतरावरच साधारण आहे.)
ह्येन त्सांग व त्याचा शिष्य शमन हुई लि या दोघांनी केलेली वर्णने वाचल्यावर माझ्या मनात बराच गोंधळ निर्माण झाला. माझ्या मनात आलेले प्रमुख प्रश्न असे आहेत. कोकणपूर हे गाव कोणते असावे? कांचीपुरम पासून 330 मैलावर असलेल्या या राज्यातील रहिवासी, कृष्णवर्णीय व रानवट वागणूकीचे आहेत म्हणजे हे गाव कोठे असावे? महाराष्ट्राची राजधानी कोठे असावी? त्या काळात महाराष्ट्राचा राजा असलेल्या पुलकेशीने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता व त्यांच्यात तह होऊन नर्मदा ही दोन्ही राज्यांची सीमा ठरली होती असा इतिहास मी वाचलेला असल्याने ह्युएन त्सांग हर्षवर्धन राजाला शिलादित्य असे का संबोधतो?
या संभ्रमात टाकणार्‍या मुद्यांवर काही प्रकाश टाकता येतो का? हे आपण पुढे बघूया!
6 मे 2011