दर वर्षी 14 जुलैला फ्रेंच लोक आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या
दिवसाला बॅस्टिल डे म्हणण्याची प्रथा आहे कारण इ.स. 1790 मधे याच दिवशी
बॅस्टिलच्या तुरुंगातील कैद्यांची मुक्तता करून फ्रेंच राज्यक्रांतीचे
पहिले पाऊल पडले होते. या दिवशी पॅरिसमधल्या शॉंझेएलिझे या राजरस्त्यावर
सैनिकांचे एक भव्य संचलन होते.

मनमोहनसिंहजी, सारकॉझी व त्यांच्या पत्नी कार्ला ब्रुनी
आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रात वाचलेच असेल की या वर्षी पंतप्रधान मनमोहनसिंह हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते व फ्रेंच सरकारच्या खास आमंत्रणावरून, मराठा लाइट इनफन्ट्रीचे 144 जवान व चार अधिकारी हे या संचलनात वायुदल व नेव्ही यांच्या पथकांबरोबर अग्रभागी होते.

बॅस्टिल डे परेड 2009
सर्वसाधारण फ्रेन्च नागरिकांना जरी हा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करावा असे वाटत असले तरी बर्याच रिकामटेकड्या फ्रेंच तरूणांना हा दिवस, म्हणजे दंगाधोपा करून सध्याच्या समाजरचनेवरच्या आपल्या संतापाला आणि वैतागाला वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू करण्याचाच दिवस वाटतो. अर्थातच गुंड आणि समाजकंटक या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. बॅस्टिल डे च्या आदल्या रात्रीपासूनच हे तरूण दंगली चालू करण्याचा प्रयत्न करतात. 2008 मधे या दंगेखोरांनी 250च्या आसपास मोटारी जाळल्या होत्या व 120 दंगेखोरांना अटक झाली होती.
यावर्षी असे प्रकार घडू नयेत म्हणून फ्रेंच सरकारने जय्यत तयारी केली होती. दंगेखोरांना कडक शासन व्हावे म्हणून दंगल केल्यास होणारी शिक्षा 3 वर्षे तुरुंगवास व 45000 युरो दंड एवढी वाढविण्यात आली होती. 10000च्या वर पोलिस आणि सैनिक सर्व महत्वाच्या ठिकाणी तैनात केले होते.

बॅस्टिल डे दंगे 2009
या वर्षी या दंगेखोरांना, लिंऑं शहराच्या जवळ असलेल्या एका गावात, 8 जुलैला, मोहम्मद बेनमौन्ना या 21 वर्षाच्या तरुणाचा झालेला मृत्यु ही आयतेच कारण मिळाले होते. तीन दिवस या गावात खदखदत असलेल्या असंतोषाला 14 जुलैच्या पहाटे बॅस्टिल डे च्या निमित्ताने पॅरिसमधे हिंसक वळण मिळाले. दंगेखोरांनी कचराकुंड्यांत फटाके फेकून आगी लावल्या व नंतर तब्बल 317 गाड्या जाळून टाकल्या व शेवटी पोलिसांवर हल्ला चढवला. 17 पोलिस जखमी झाले आणि 240 गुंडांना अटक करण्यात आली.
स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची ही अजबच तर्हा आहे.
16 जुलै 2009