अल्बर्ट आइनस्टाइन
ए बायोग्राफी
प्रकरण 1
जन्म आणि बालपण
1879 मधील त्या शुक्रवारी आइनस्टाइन यांच्या
दक्षिण जर्मनीतील उल्म या गावी असलेल्या घरात बरीच गडबड चालू होती. त्या दिवशी
मार्चची 14 तारीख होती आणि बाह्नहॉफस्ट्रॉसे या रस्त्यावरील त्यांच्या घरात सकाळीच
एका मुलाचा जन्म झाला होता. मुलाचे आई-वडील, पॉवलिन आणि हर्मन हे दोघेही अर्थातच खुश होते. आनंदी आणि सरळ स्वभावाच्या
हर्मनच्या डोळ्यावर नाकाच्या आधारावर राहणारा चष्मा दिसत होता व त्याने मिशाही
राखलेल्या होत्या व तो या चष्म्यातूनच अंथरूणात शांतपणे झोपलेली त्याची तरूण प्रिय
पत्नी व नवजात अर्भक यांच्याकडे मोठ्या प्रेमभर्या नजरेतून बघत होता. सर्व
पित्यांप्रमाणेच त्याचे प्रथम अपत्य असलेल्या त्या नवजात मुलाला चांगले आयुष्य
लाभेल अशी आशा त्यालाही वाटत होती. आई-वडीलांना फक्त एकच काळजी वाटत होती.
अर्भकाचे डोके फार मोठे वाटत होते व त्याला कोन आल्यासारखे दिसत होते. आईला हा जन्मदोष
आहे की काय अशी काळजी वाटत होती. परंतु डोक्टरांनी तिला याची खात्री दिली होती की
सर्व काही आलबेल आहे. आणि खरोखरच काही
कालानंतर त्या अर्भकाच्या डोक्याचा आकार सर्वसामान्य झाला होता. पॉवलिन आणि हर्मन
यांनी आपल्या मुलाचे नाव अल्बर्ट असे ठेवले होते.
1876 मध्ये जेंव्हा आइनस्टाइन पती-पत्नींचे लग्न
झाले तेंव्हा ते बुखाव या उल्म च्या नैऋत्येला 30 मैलावर असलेल्या एका आणखी छोट्या
गावात रहात होते. हे गाव दक्षिण जर्मनी मधील वुर्टेम्बर्ग या प्रांतामध्ये होते.
हर्मनचे कुटुंबीय या गावात 1750 पासून रहात होते. पॉवलिनचे कुटुंब स्टुटगार्ट या
मोठ्या शहराजवळ असलेल्या आणि उल्मच्या ईशान्येला असलेल्या कॅनस्टॅट मधले होते.
लग्न झाल्या दिवशी पॉवलिन 18 वर्षांची होती तर हर्मन 29 वर्षांचा होता. आइनस्टाइन
पतीपत्नी जरी यहुदी वंशाचे असले तरी यहुदी धार्मिक परंपरांचे पालन करण्याकडे त्यांचा
फारसा कल नव्हता. कोणत्या तरी जवळच्या नातेवाईकाचे नाव मुलाला ठेवण्याऐवजी
त्याच्या आजोबांच्या अब्राहाम या नावामधील फक्त पहिले अक्षर त्यांनी वापरले होते. कदाचित रुढीबंधने न
पाळणार्या आणि विशाल दृष्टीकोन असलेल्या
समाजात एकरूप होण्याच्या दिशेने त्यांचे हे पाऊल होते. असे असले तरी जगभरातील अनेक यहुदी कुटुंबांप्रमाणेच शिक्षण
आणि मानवहितवाद या दोन्ही संबंधी आत्यंतिक आदर आइनस्टाइन पतीपत्नींना सुद्धा होता.
हर्मन खुशालचेंडू स्वभावाचा असल्याने या आधी
त्याने काढलेल्या पिसांच्या शैय्यांच्या धंद्यात त्याला खोट आलेलीच होती. दोन
वर्षांपूर्वी त्याने कॅथेड्रलच्या दक्षिण बाजूस एक छोटे इलेक्ट्रिकल अणि
इंजिनीरिंग वर्कशॉप काढले होते. त्याचे कुटुंब कष्टाळू असले तरी सधन कधीच नव्हते. पॉवलिनच्या कुटुंबियांनी हा धंदा सुरू करण्यासाठी आर्थिक
पाठबळ त्याला दिले होते. प्रकाश निर्मितीसाठी विद्युत शक्तीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याच्या दृष्टीने युरोपीय आणि अमेरिकन
लोकांचे प्रयत्न त्या वेळी चालू होते आणि या संधीचा फायदा घेतल्यास आपल्या
कुटुंबाचा चरितार्थ नीट चालवता येईल अशी हर्मनची कल्पना होती. हे जरी खरे असले की
लोकांना विद्युतशक्ती बद्दलची माहिती गेल्या अडीचशे वर्षापासून होती: अॅम्बर हा पदार्थ रेशमी कपड्यावर
घासल्यानंतर त्याला हलके पदार्थ चिकटून रहातात हा शोध थेल्स ऑफ मिलेटस याला लागलेला होता
आणि अॅम्बर या पदार्थाचे प्राचीन ग्रीक नाव “इलेक्ट्रॉन” हेच होते: तरी या सर्व
माहितीचा टेलिफोन आणि टेलिग्राफ या दोन
गोष्टी सोडल्या तर फारसा व्यावहारिक उपयोग कधी झालेला नव्हता. अल्बर्टचा जन्म झाला
त्या वर्षी “मेन्लो पार्कचा जादूगार” या नावाने प्रसिद्ध असलेला “थॉमस अल्वा
एडिसन” हा आपल्या लाइटबल्बच्या पेटंटवर काम करत होता. जर्मनीतील सिमेन्स कंपनी
त्याच वर्षी बर्लिनमध्ये विद्युतशक्तीवर चालणार्या आपल्या पहिल्या ट्रॅम गाडीचे
प्रदर्शन करणार होती आणि इतर अशी विद्युत उपकरणे लवकरच उपलब्द्ध होतील असे आशादायक
चित्र दिसत होते.
दुर्दैवाने हरमनचे धंदा चालवण्याचे कौशल्य किंवा
आवाका हा त्याच्या विनोदबुद्धीहून कितीतरी कमी पटीने असल्याने आणि त्याचा दुर्दम्य
आशावाद हाच फक्त त्याच्या संशोधन किंवा विक्री करण्याच्या कौशल्याच्या अनेक पटीने
जास्त असल्याने त्याचा धंदा एका वर्षातच किंवा अलबर्टचा एक वर्षाचा वाढदिवस
होण्याआधीच बुडाला. हर्मन हताश
झालेला असला तरी त्याची निराशा झालेली नसल्याने आपले इप्सित जर प्राप्त करून
घ्यायचे असले तर आपल्याला एखाद्या मोठ्या शहरात आपला धंदा हलवला पाहिजे असे त्याने
निश्चित केले. इंजिनीयर असलेला आपल्या भाऊ जॅकोब याच्याशी चर्चा केल्यानंतर त्या
दोघांनी जून 1880 मध्ये वायव्य दिशेला असलेल्या आणि बॅव्हेरिया राज्याची राजधानी
असलेल्या म्यूनिख शहराकडे प्रस्थान
करण्याचे ठरवले. अतिशय विशाल आणि अत्याधुनिक असलेल्या या शहरात मुख्यत्वे कॅथॉलिक
धर्मियांची वस्ती होती. छोटा आइनस्टाइन एक वर्षाचा झाला तेंव्हा या शहरात या दोन
भावांनी एक छोटे इलेक्ट्रोकेमिकल वर्कशॉप सुरू केले. साहजिकच आपले जन्मग्राम उल्म
येथील कोणत्याच आठवणी अल्बर्टच्या स्मरणात राहिल्या नाहीत.
आइनस्टाइनच्या जन्माच्या आधीच्या काही वर्षांपर्यंत वुर्टेमबर्ग आणि
बॅव्हेरिया ही दोन स्वतंत्र राज्ये होती. 1871 मध्ये इतर काही अशाच राज्यांबरोबर
त्यांना प्रुशिया या राज्यात सामील करून घेण्यात आले आणि ही राज्ये एका नव्या
जर्मन साम्राज्याचा भाग बनली. या नवीन साम्राज्याचा नेता, ओट्टो
फॉन बिस्मार्क हा प्रुशिया मधीलच होता. प्रुशियाचे नागरिक ते पाळत असलेली कडक
शिस्त यासाठी ओळखले जात. समाजातील ज्येष्ठ आणि अधिकारी यांच्या आज्ञांचे कोणतेही
प्रश्न उपस्थित न करता ते पालन करीत असत.
समाजातील आदरणीय लोकांबद्दल त्यांना अतिशय आदर वाटत असे. नव्या राजवटीने लवकरच ही
अनोळखी संस्कृती खुशालचेंडू स्वभावाच्या दाक्षिणात्य लोकांवर लादली. इतकेच नव्हे
तर ही संस्कृती शाळांच्या नियमावली पर्यंत पोहोचण्यात सुद्धा यशस्वी झाली. छोट्या
अल्बर्टवर या नव्या बदलांचा सखोल असा परिणाम झाला.
हर्मनचा धंदा कसा काय चालतो याच्या काळजीच्या सावटाखालीच मधल्या काळात पॉवलिनने म्युनिखमधल्या एका छोट्या भाड्याच्या घरात आपला
संसार चालू केला. परंतु आपल्या आधीच्या चुकांपासून योग्य तो धडा हर्मन शिकला होता
असे म्हणता येते कारण त्याचा धंदा येथे
जोराने सुरू झाला व भरभराटीस आला. पाच वर्षांत आइनस्टाइन कुटुंब शहराच्या सीमेवरील
एका मोठ्या घरात राहण्यास गेले. अर्थात मधल्या
काळात ते त्यांच्या छोट्या भाड्याच्या घरात सुखी नव्हते असे अजिबात नाही.
नोव्हेंबर 1881 मध्ये किंवा दीड वर्षांनंतर अल्बर्टच्या “माजा” या छोट्या बहिणीचा
जन्म झाला. त्या वेळी
अल्बर्ट दोन-अडीच वर्षांचा होता. अल्बर्टच्या आई-वडीलांनी त्याला या छोट्या
बहिणीच्या जन्मानंतर जेंव्हा त्याला खेळायला एक नवीन खेळणे मिळाले आहे असे
सांगितले. तेंव्हा तिच्याकडे बघत तो निराशेने म्हणला होता की “खरे आहे! पण या
खेळण्याला चाके कोठे आहेत?”
वरवर बघायला गेले तर या सुरुवातीच्या वर्षांत झालेल्या अल्बर्टच्या वाढीवरून
हा मुलगा पुढे जिनियस होणार आहे अशी पुसटशी शंका सुद्धा आली नसती. तो बोलायला
उशीरा म्हणजे “माजाच्या” जन्मानंतर लागला.
परंतु तो संपूर्ण वाक्ये एकदम बोलायला शिकला. बरीच वर्षे प्रथम शब्द तो स्वत:शीच
बोलत असे व नंतर तेच शब्द मोठ्याने दुसर्यांशी बोलत असे. त्यामुळे काही लोकांना
वाटे की प्रत्येक गोष्ट तो दोन वेळेला बोलतो. प्रथम हळू व नंतर मोठ्याने. अल्बर्ट
10 वर्षांचा होईपर्यंत बोलण्यात पारंगत झालेला नसल्याने काही डॉक्टरना असे वाटते
की त्याला लहानपणी लेखन वाचन करण्यात अडचण येत असावी. पुढे उत्तर आयुष्यात एका
मानसतज्ञाला त्याच्या पुस्तकासाठी मुलाखत देताना अल्बर्ट आइनस्टाइन यांनी असे
सांगितले होते की त्यांचे शब्दांचे स्मरण नेहमीच कच्चे होते. ते म्हणतात. “ मी शब्द स्वरूपात क्वचितच विचार
करतो.” कदाचित यामुळेच त्यांनी निर्मिलेल्या वैचारिक प्रयोगांकरता ते पुढे अतिशय प्रसिद्ध झाले असावेत.
छोटा अल्बर्ट बर्याच वेळी कोडी आणि बांधणी ठोकळे यांचबरोबर एकटाच खेळत असे.
परंतु त्याला रागही लवकर येत असे. तो रागावला की नाकाचा शेंडा सोडून त्याचा बाकीचा संपूर्ण चेहरा पिवळट पडत असे.
त्याचा नाकाचा शेंडा पांढरा होई व त्याचा स्वत:वरचा ताबा जात असे. एकदा रागाच्या
भरात त्याने आपल्या व्हायोलिन शिक्षिकेवर खुर्ची फेकली होती. इतर काही वेळा त्याने
आपली बहिण “माजा” हिला वाळूत खेळण्याचे
छोटे हत्यार किंवा चेंडू हे फेकून मारले होते.
अल्बर्ट्ची बहिण माजा हिने लिहिलेल्या त्याच्या एका चरित्रात ती म्हणते.
कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्यावर मात करत अल्बर्ट 14 मजल्यापर्यंतची पत्त्यांची
घरे रचण्यात अनेक तास घालवत असे. आई-वडील किंवा इतर यांनी आणलेल्या कोणत्याही
नव्या गोष्टींबद्दल त्याला उत्सुकता असे आणि त्या गोष्टी वापरून बघण्याबाबत तो
अतिशय आग्रही आणि संयमी असे. मोठा झाल्यानंतर अल्बर्ट सांगत असे की तो दुसर्यांपेक्षा
जास्त हुशार नसून फक्त मनापासून आग्रही असतो. तो असेही सांगत असे की त्याच्या
बाबतीत बालपणी असलेली नैसर्गिक जिज्ञासा तो मोठा झाल्यावर कमी न होता तशीच राहिली
होती. एका सहाध्यायाला तो लिहितो की, “माझी वाढ इतकी हळू झाली की सज्ञान
होईपर्यंत मी अवकाश आणि काल यांचा कधी विचारही केला नाही. साहजिकच दुसर्या कोणी
सज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला असता त्यापेक्षा कितीतरी जास्त खोल जाऊन मी या
गोष्टींचा विचार केला.” यावरून त्याचे असे
म्हणणे दिसते की त्याचे आयुष्यकार्य ज्या विषयाला वाहलेले होते त्या विषयाचा विचार
सहसा सज्ञानी किंवा मोठी माणसे ही करत नसून लहान मुले करत असतात.
अल्बर्ट पाच वर्षांचा झाल्यानंतर एक
दिवस त्याच्या वडिलांनी आपल्या खिशातून एक उपकरण काढून त्याला दिले. ते
उपकरण म्हणजे एक होकायंत्र होते. त्या उपकरणाचा अल्बर्टच्या आयुष्यावर खोल परिणाम
झाला. होकायंत्राच्या सुईने सतत उत्तर दिशा दर्शविणे त्याला अतिशय आश्चर्यजनक आणि विस्मयकारक वाटले. त्याच्या बालवयात सुद्धा
त्याच्या हे लक्षात आले की की निसर्गात अशी बले आहेत की जी दिसू शकत नाहीत.
होकायंत्राच्या जादूने त्याच्या मनावर इतका खोल ठसा उमटवला होता की त्याची आठवण तो
पुढे अनेक वर्षे काढत असे. म्युनिखच्या
प्राथमिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक ते वय नसले तरी त्याच वर्षी अल्बर्टचे
प्राथमिक शिक्षण एका शिक्षकाच्या देखरेखीखाली घरी सुरू झाले.
वयाच्या सहाव्या वर्षी किंवा 1885च्या फॉल सिझनमध्ये अल्बर्टने घराजवळच्या
कॅथॉलिक प्राथमिक शाळेत बहुदा दुसर्या इयत्तेत प्रवेश घेतला. त्याच्या वर्गात तो
एकटाच यहुदी धर्मिय होता. शाळेच्या अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षणाचा अंतर्भाव
केलेला होता. त्यामुळे अल्बर्टचा बायबल मधील गोष्टी व निरनिराळे सेन्ट्स यांच्या
कहाण्यांशी परिचय झाला. यहुदी परंपरांसंबंधी धडे त्याला एक दूरचा नातेवाईक घरी
येऊन देत असे. अल्बर्टच्या आई-वडीलांना धर्मकांडांत रस नसल्याने बहुधा आपल्याला हे काम करता येणार
नाही असे वाटत असावे. परंतु मुलाला यहुदी
परंपरांसंबधी माहिती करून देणे गरजेचे वाटल्याने ही व्यवस्था त्यांनी केलेली
असावी. या काळात अल्बर्टला धार्मिक परंपरांमध्ये खूपच रस निर्माण झाला होता आणि
परमेश्वराची प्रार्थना व स्तुती करणे त्याला सर्वात महत्त्वाचे वाटू लागले होते. 1949
साली प्रसिद्ध झालेल्या “लायब्ररी ऑफ लिव्हिंग फिलॉसॉफर्स“ मधील त्याच्या नावाच्या
खंडाचा भाग असलेल्या आपल्या आत्मचरित्रातील टिपणांमध्ये तो लिहितो. “याप्रमाणे
मी अत्यंत धार्मिक बनलो. मात्र वयाच्या 12 व्या वर्षी ही धार्मिकता एकदम संपली.” हे
लक्षात घेतले पाहिजे की येथे धार्मिकता हा शब्द आइनस्टाइन प्रचलित अंधश्रद्धा या
अर्थाने वापरतो आहे व आपण यापासून दूर राहिलो होतो हे दर्शवितो आहे. शेवटपर्यंत आइनस्टाइन
स्वत:ला धार्मिकच मानत असे. मात्र त्याची धार्मिकतेची व्याख्या एका विशाल पायावर
आधारलेली होती. वैयक्तिक पातळीवर मात्र आइनस्टाइन परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल आपण
नेहमीच साशंक असल्याचे सांगत असे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून आइनस्टाइन व्हायोलिन वाजविण्याचे धडे घेऊ लागला व
त्याचे हे शिक्षण वयाच्या 14 व्या
वर्षांपर्यंत चालू राहिले. मूडी स्वभाव असलेल्या आइनस्टाइनवर संगीताचा सखोल परिणाम झाला व त्याचा स्वभाव खूपच शांत झाला.
संगीतात त्याला विशेष रस असल्याचे दिसून आले आणि आयुष्याच्या अंतापर्यंत एक चांगला
वादक आणि श्रोता म्हणून त्याने संगीतातील आनंद उपभोगला. तो प्रथम व्हायोलिन व नंतर
पियानो वादन करत असे. 1929 मध्ये घेतलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो. “मी जर भौतिकी
शास्त्रज्ञ झालो नसतो तर बहुधा संगीतकार झालो असतो. मी माझी दिवास्वप्ने संगीतातून
बघत असतो. मी माझ्या आयुष्याकडे संगीतातून बघतो. आयुष्यातून मला मिळणारा बहुतेक
आनंद हा संगीतातून मिळत राहिलेला आहे.” काही लोकांच्या मताने आइनस्टाइन हा चांगला
संगीतकार होता पण इतर बरेच याच्याशी सहमत नाहीत. एका व्यावसायिक व्हायोलिन
वादकाच्या मते तो व्हायोलिन एखाद्या लाकूड्तोड्यासारखे वाजवत असे. त्याच्याबरोबर
वादन करणारा एक प्रसिद्ध पियानोवादक आइनस्टाइनला एकदा म्हणाला होता, “अल्बर्ट
निदान ईश्वरासाठी तरी तू अंक बरोबर मोजू शकणार नाहीस कां?” बर्लिन
मधल्या एका संगीत समीक्षकाची अशी प्रामाणिक समजूत झाली होती की आइनस्टाइन हा
भौतिकी पेक्षा त्याच्या व्हायोलिन
वादनामुळे जास्त जगप्रसिद्ध झाला आहे. त्याने असे उद्गार काढले होते की “आइनस्टाइनचे
वादन कौशल्य उत्तम आहे, परंतु त्याला मिळालेल्या जगभरच्या
प्रसिद्धीला तो खचितच लायक नाही. त्याच्या तोडीचे इतर अनेक वादक आहेत.” भौतिकी
सोडून आपण इतर काय केले असते याबद्दल बोलताना आइनस्टाइन पुढे एकदा असेही म्हणाला
होता की प्लंबर किंव विक्रेत्याचे काम
करायला त्याला जास्त आवडले असते. भौतिकीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना तो एकदा
म्हणाला होता की दीपगृहाच्या देखभालीचे
काम करण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. यावरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की
आइनस्टाइनला बहुविध कामांच्यात रस होता. वर निर्देश केलेली कामे त्याने निवडली
होती याचे मुख्य कारण बहुधा ही कामे करताना अतिशय गंभीर अशा विषयांवर विचार करण्यास
भरपूर वेळ मिळणे सहज शक्य आहे असे त्याला वाटत असावे.
1888च्या फॉल सीझनमधे, अल्बर्ट नऊ वर्षांचा झाल्यावर त्याला जर्मन
माध्यमिक शाळांच्या नऊ वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या (या अभ्यासक्रमाला जिम्नाशियम या नावाने ओळखले
जाते.) पहिल्या वर्षाला म्युनिखमध्ये प्रवेश मिळाला. हा कोर्स पूर्ण केल्यावर
वयाच्या अठराव्या वर्षी विद्यापीठात थेट प्रवेश करणे त्याला शक्य झाले असते. या
शाळेत त्याला काही यहुदी धर्मपंथीय मुले भेटली पण त्याची कोणाशीच घट्ट अशी मैत्री
झाली नाही. तो काहीसा अलिप्त आणि एकांडाच राहिला. परिणामी
इतर मुले किंवा शिक्षक यांच्या मनात त्याच्याविषयी ममता कधीच निर्माण होऊ शकली
नाही. त्याच्या एक शिक्षकांनी तर त्याला
पुढे कधीच काही जमणार नाही असे भाकित केले होते आणि त्याची केवळ उपस्थिती
सुद्धा वर्गातील इतर मुलांचा
शिक्षकांबद्दल असलेला आदरभाव कमी करते आहे असे त्याला सांगितले होते. दुसर्या एका शिक्षकांनी तर
त्याची स्मरणशक्ती चाळणीसारखी आहे असे निदान केले होते.
जर्मनी मधील शाळांत त्या काळात असलेले शिक्षक हे
अत्यंत कडक आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवणारे असत. त्यांची लायकी असो किंवा
नसो,
सर्वांनी त्यांच्याबद्दल संपूर्ण आदरभाव दाखवलाच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा
असे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्तन कसे असले पाहिजे याबाबतचे कडक शिस्तीचे
नियम असत व ते कडकपणे राबवले जात. शाळा एक विशिष्ट आणि पूर्ण नियंत्रित असा अभ्यासक्रम
अनुसरत. हा अभ्यासक्रम विषय मुख्यत्वे तोंडपाठ करण्यावर भर देत असे. जे विद्यार्थी
कच्चे असतील त्यांचा वर्गात सर्वांसमोर अपमान करण्याची पद्धत रूढ होती. जेंव्हा
आवश्यक वाटेल तेंव्हा शारिरिक छळ होईल अशा शिक्षा देण्यात येत असत. आइनस्टाइन पुढे
एके ठिकाणी लिहितो. “शाळांसाठी सर्वात चुकीचा मार्ग जर कोणता असला तर तो भिती, बल आणि
कृत्रिम हुकुमशाही यांच्यावर आधारित कार्य करण्याचा आहे. अशा पद्धतीने कार्य
करणार्या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा, आत्म-विश्वास आणि योग्य विचार करण्याची कुवत हे लवकरच नष्ट होतात. अज्ञानी
आणि स्वार्थी शिक्षक अपमानास्पद वागणूक
आणि मानसिक दडपशाही यामुळे मुलांच्या तरूण मनात जो अनर्थ घडवून आणत त्याचा परिणाम
मुलांच्या मनातून पुढे परत कधीच कमी होत नसे आणि हानीकारक स्वरूपात पुढील संपूर्ण
आयुष्यात टिकून राहतो.” आइनस्टाइनला सैनिकी शिस्त तर अप्रिय होतीच पण पुढे
शांततावादी बनल्याने त्याला सैनिकी पेशा सुद्धा अप्रिय वाटत असे. आइनस्टाइन
लिहितो. “बॅन्डच्या तालावर जर एखाद्या माणसाला फॉर्मेशन मधे मार्च करायला आवडत
असेल तर त्याचा तिरस्कार करण्यासाठी ते कारण माझ्यासाठी पुरेसे ठरू शकेल.” जर्मन
शाळांचा शिस्तप्रिय आणि संकुचित मनोवृत्ती दर्शवणारा दृष्टीकोन आइनस्टाइनच्या स्वतंत्र
विचार करणार्या व्यक्तीमत्वाशी संपूर्णपणे विसंगत होता. आपण कोणत्या तरी
शिक्षकाचा आवडता विद्यार्थी व्हावे अशी इच्छा अजिबात नसणार्या या मुलाला
अधिकारावर असलेल्या शिक्षकांकडून गैरवाजवी विरोधी टीका ऐकून घ्यावी लागली असली तर
नवल नाही.
असे असले तरी आइनस्टाइनचे खास आवडते असे एक शिक्षक होतेच. शाळेतल्या त्याच्या
चवथ्या अणि सहाव्या वर्षी त्याला इतिहास, लॅटिन आणि ग्रीक शिकवणारे त्याचे
वर्गशिक्षक त्याला इतके आवडत असत की शाळा संपल्यावर जर त्याला या शिक्षकांनी
थांबवून घेतले असले तर त्याला राग न येता ते आवडत असे. त्याची माध्यमिक शाळा किंवा
जिम्नाशियम ही जर्मनीमधील एक मोठी आणि चांगली शाळा म्हणून नावाजलेली होती. आइनस्टाइन
त्या शाळेत शिकत होता तेंव्हा एक प्रबोधित आणि उदार वातावरण असलेली शाळा म्हणून
तिचा नावलौकिक होता. त्यामुळेच अशी शक्यता आहे की आइनस्टाइनचा शाळेबद्दलचा राग आणि
अप्रिय आठवणी यांचा संबंध त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचे शाळेतले वैयक्तिक अनुभव
यांच्याशी जास्त करून असावा. त्याला दटावणार्या किंवा रागावणार्या शिक्षकांना तो
कदाचित खिजवत असावा. जर्मनीमध्ये त्यावेळी एकूणच अन्यायी किंवा त्रासदायक असा
सर्वसाधारण मूड होता. कदाचित आइनस्टाइनच्या आठवणी त्या रंगात रंगलेल्या असाव्यात.
या वेळेपासून ते आइनस्टाइन जिम्नाशियम मधून बाहेर पडेपर्यंत त्याची भौतिकी, गणित
आणि तत्त्वज्ञान या विषयांमधली रुची, शाळेतील औपचारिक
शिक्षणाशी फारसा संबंध न रहाता, स्वतंत्रपणे विकसित होत
गेली. 1889 चा फॉल ते 1894 या कालखंडात मॅक्स टॅलमे या नावाचा एक तरुण वैद्यकीय
विद्यार्थी आइनस्टाइन याच्या घरी आठवड्यातून एक वेळा भोजनास येत असे. हा मॅक्स
टॅल्मे आणि अल्बर्टचा काका जॅकोब या दोघांचा खूप प्रभाव अल्बर्टवर त्याच्या विकसनशील
वयामधे पडला. या दोघांनी अल्बर्टला वडिलांनी दिलेले छोटे होकायंत्र ते धार्मिकता वगैरे
सारख्या प्रत्येक छोट्या-मोठ्या विषयावर त्याच्या मनात जी मूलभूत आणि अतृप्त
जिज्ञासा होती त्याला चांगलेच खतपाणी घालण्याचे कार्य केले. या तरूण जिज्ञासू
मुलाला रोचक वाटतील अशी शास्त्रीय विषयांवरची लोकप्रिय पुस्तके, त्याचप्रमाणे तत्वज्ञान या विषयावरील पुस्तकांचे गठ्ठे टॅल्मे बरोबर आणत
असे. जगासंबंधी ज्ञानाचा प्रचंड जिज्ञासू असलेला अल्बर्ट आणि टॅल्मे हे दोघे अल्बर्टला पडलेल्या अनेक
प्रश्नांबद्दल चर्चा करत. दोघांच्या वयात बराच फरक असला तरी टॅल्मे अल्बर्टला समवयस्क
असल्यासारखा वागवत असे व अल्बर्टला ते आवडत असे. टॅल्मेने अल्बर्टबरोबर घालवलेला
काल हा अल्बर्टच्या आयुष्यातल्या एका निर्णायक किंवा महत्त्वाच्या वयामधील होता
असे म्हणता येते कारण या वयातच आतापर्यंत एक तरूण मुलगा असलेल्या अल्बर्टचे स्वतंत्रपणे
विचार करणार्या एका प्रौढामधे रुपांतर होत होते. याच कालात अल्बर्टला फक्त
गणितातच नव्हे तर सर्व वास्तविक शास्त्रांमध्ये (नॅचरल सायन्सेस) रुची निर्माण होत
होती.
अल्बर्ट बारा वर्षाचा होईपर्यंत गणित आणि शास्त्रे या विषयांचे त्याचे एवढे
अध्ययन झाले होते की बायबलमध्ये त्याने वाचलेल्या चमत्कारांच्या सत्यतेबद्दल तो आता
प्रश्न विचारू लागला होता. या चमत्कारांवर विश्वास ठेवण्यासाठी आवश्यक श्रद्धाच
त्याच्याजवळ उरली नसल्याने पारंपारिक धार्मिकतेचा स्वीकार करणे त्याला शक्य
होईनासे झाले होते. त्याला असे वाटू लागले
होते की जग प्रत्यक्षात कसे आहे हे तरूण पिढीला न सांगण्याच्या एका कारस्थानात
शासन सुद्धा सहभागी आहे. यासाठी तरुण पिढीशी ते खोटे बोलत आहेत व त्याने या
सगळ्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. मात्र आयुष्यात पुढे त्याने काही प्रमाणात
धार्मिकता स्वीकारली होती. गणित आणि शास्त्रे या विषयांचा स्वाध्याय मात्र त्याने
चालूच ठेवला होता. या विषयांना कोणतेही दूषण देणे त्याला शक्यच वाटत नव्हते. त्याच्याजवळ
द्विमितीय भूमितीचे एक छोटे पुस्तक होते. जॅकोब काकाने ते बहुधा त्याला दिलेले
होते. या पुस्तकाला अल्बर्ट अनमोल समजत होता. या पुस्तकात दिलेली स्पष्ट विवरणे
आणि खुलासा यांचा अल्बर्टवर फार मोठा
परिणाम झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला दिलेल्या छोट्या
होकायंत्राला जसे तो एक आश्चर्य मानत असे त्याच धर्तीवर भूमितीचे हे पुस्तक
त्याच्यासाठी “दुसरे आश्चर्य” होते. नंतर त्याला आणखी प्रगत पुस्तके मिळाली व “अॅनॅलिटिकल
जॉमेट्री व कॅलक्युलस या विषयांच्यात तो पारंगत झाला. थोड्याच दिवसात गणिती सिद्धांत
त्याला सिद्ध करता येऊ लागले व कठिण प्रश्न सोडवता येऊ लागले. भूमितीतील पायथॅगोरस
सिद्धांत सिद्ध करण्याची एक संपूर्णपणे अभिनव पद्धत त्याने शोधून काढली. आपल्या
वर्गमित्रांबरोबरच्या गाढ मैत्रीसंबंधाचा पाठपुरावा करण्यापेक्षा गणितातील प्रश्न सोडवण्यात
त्याला कितीतरी जास्त आनंद मिळत असे. त्याच्या
आधी होऊन गेलेल्या आयझॅक न्यूटनप्रमाणेच “क्लासिकल जॉमेट्री” मधील एकीकरण प्रक्रियेचे
(सिंथेसिस); ही प्रक्रिया अतिशय सरळ आणि सुनिश्चित असल्याने;
त्याला आकर्षण होते.
प्रिन्स्टन न्यू जर्सी येथील एका माध्यमिक शाळेच्या वर्तमानपत्राच्या
वार्ताहराशी 1935 मध्ये बोलताना आइनस्टाइन आपले बालवयातील गणिताचे प्रेम आठवून
लिहितो. “माझे वय तेंव्हा फक्त 12 वर्षाचे होते व मी
प्राथमिक गणिताची तोंड-ओळख करून घेत होतो. गणिताच्या माध्यमातून केवळ तर्क करून एखादे
सत्य शोधून काढता येणे शक्य आहे ही कल्पनाच तेंव्हा मला अतिशय चित्तथरारक वाटली होती.
याच पद्धतीने एखाद्या सरळ गणिती रचनेच्या माध्यमातून सृष्टीचे आकलन करून घेणे शक्य
होईल याबाबत माझी जास्त जास्त खात्री पटत चालली होती.”
काही लोक असे मानतात की तरुण अल्बर्ट हा एक चांगला विद्यार्थी नव्हता. परंतु याला
एक असत्य असेच मानावे लागेल. काही शिक्षकांनी केलेल्या विरोधी टीकेमुळे कदाचित ही
गैरसमजूत पसरलेली असावी. परंतु शाळेने ग्रेड्स देण्याच्या पद्धतीत केलेला आमुलाग्र
बदल हे या गैरसमजुतीमागचे कारण असावे अशी शक्यता वाटते. 1 ते 6 या ग्रेडसपैकी 1 ही
ग्रेड आधी सर्वोत्कृष्ट समजली जात होती. पुढे ही पद्धत उलट करण्यात आली व 6 ही
ग्रेड सर्वोत्कृष्ट समजली जाऊ लागली. गणित
आणि शास्त्रे यात त्याला नेहमीच सर्वोत्कृष्ट ग्रेड्स मिळत असत. शाळेत शिकवल्या
जाणार्या इतर विषयांत त्याला
सरासरीपेक्षा जास्त वरच्या ग्रेड्स मिळत असत. तो मान्य करत असलेला त्याचा एक
कमीपणा म्हणजे परदेशी भाषांवर त्याचे नसलेले प्रभुत्त्व हा होता. परदेशी भाषा
आत्मसात करणे त्याला कधीच नीट जमले नाही. पुढे अमेरिकेत आल्यावर सुद्धा त्याला
इंग्लिश भाषा नीट आत्मसात करता आली नाही. अर्थात या वेळी तो मध्यमवयीन होता हे ही
खरेच आहे. अल्बर्ट एक तरुण विद्यार्थी असताना पुढे दिसलेल्या असामान्यत्त्वाच्या
कोणत्याही खुणा त्याच्यामधे दिसत नव्हत्या. वीस वर्षांचा झाल्यावर त्याने आपले
भौतिकीमधील अभिनव कार्य जेंव्हा लोकांपुढे ठेवले किंवा नंतर त्याने काल आणि अवकाश
या संबंधीच्या आपल्या अभिनव कल्पना लोकांपुढे मांडल्या तेंव्हाच असामान्यत्त्वाची
त्याला असलेली दैवी देणगी समोर आली.
वयाची 13 वर्षे पूर्ण झाल्यावर तरुण अल्बर्टला
तत्त्वज्ञान आणि संगीत या दोन विषयांमध्ये मनापासून रस निर्माण झाला. जर्मन
तत्त्वज्ञानी इमॅन्युएल कान्ट याचे “क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रीझन” हे पुस्तक त्याने
अभ्यासले. कान्टचा “मनाच्या स्वातंत्राचा नैतिक सिद्धांत ( मॉरल थिअरी ऑफ फ्रीडम
ऑफ विल)” हा त्याला मनापासून आवडला. या पुस्तकाच्या अखेरीस उद्धृत केलेले कान्टचे
प्रसिद्ध प्रतिपादन त्याने बहुधा वाचले. “दोन गोष्टी, सतत नाविन्यपूर्ण वाटणारे व
वर्धित होणारे आश्चर्य आणि दरारा यांनी आपले मन भरून टाकतात. वर दिसणारे आणि तार्यांनी
भरलेले अवकाश आणि आसमंतातील नैतिकता (टू थिंग्ज फिल द माइंड विथ एव्हर न्यू अॅन्ड
इनक्रिझिंग वंडर अॅन्ड ऑ: द स्टारी हेवन्स अबोव्ह अॅन्ड द मॉरल लॉ विदिन). बर्याच वेळा हे वाक्य
आइनस्टाइनचे स्वत:चेच असल्याचे समजले जाते. अल्बर्टला संगीत जरी मनापासून आवडत
असले तरी व्हायोलिनचे धडे घेणे आता त्याला कंटाळवाणे व यांत्रिक वाटू लागले व ते
त्याने बंद करून टाकले. संगीताचा अभ्यास आणि रियाज आपला आपणच करण्यास त्याने
सुरुवात केली आणि वादन आणि श्रवण या दोन्ही गोष्टींतून आंतरिक समाधान त्याला मिळू
लागले. आइनस्टाइनच्या आयुष्यभर त्याचे
सर्वात आवडते संगीत मोझार्टची सुनीते (सोनाटाज) हेच राहिलेले आहे व वयाच्या 13व्या
वर्षीही मोझार्टची सुनीते त्याची सर्वात आवडती होती. ही सुनीते त्याला इतकी निर्भेळ
आणि सुंदर वाटत की त्यांच्यात तो विश्वाच्या आंतरिक सौंदर्याचे प्रतिबिंब बघत
असे. पुढे त्याला स्वत:चा मुलगा झाल्यावर
त्याने मुलाला सांगितले होते की मोझार्टच्या सुनीतांचे अध्ययन कर. त्याच्यातूनच
तुझ्या वडिलांना संगीतकला एवढी चांगली शिकता आली आहे.
1894 साली मोठ्या दुख:द अंत:करणाने आइनस्टाइन
कुटुंबाने म्युनिख सोडण्याचा निर्णय घेतला. गेली काही वर्षे हर्मन आणि जॅकोब यांची
कंपनी उत्कर्षाकडे सतत वाटचाल करत होती. रस्त्यांवर विजेचे दिवे बसवणे, निरनिराळ्या प्रकल्पांना प्रकाशमान करणे, नागरी विद्युतकरणासाठी आवश्यक दिवे, इलेक्ट्रिक मीटर्स, डायनामोज या सारख्या उपकरणांचे उत्पादन करणे यासारखी कामे ते
करत होते. नगरपालिकांकडून मिळणारा व्यवसाय हा त्यांचा मुख्य आधार होता. शिखरावर
असताना कंपनीमध्ये जवळजवळ 200 कामगार कामावर होते. या व्यवसायातून मिळालेल्या
भरभक्कम फायद्याकडे मोठ्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग कंपन्यांचे लक्ष वेधले गेले व
त्यांनी आपल्या आर्थिक शक्तीच्या जोरावर हर्मन आणि जॅकोब यांच्या कंपनीशी जीवघेणी स्पर्धा सुरु केली. हर्मन आणि जॅकोब यांची कंपनी या स्पर्धेत टिकणे शक्यच नव्हते. अखेरीस हर्मन
आणि जॅकोब यांनी जर्मनीमधील आपला धंदा बंद करण्याचे नाईलाजाने ठरवले व उत्तर
इटलीमधील, मिलान जवळील पाविया या
गावी आपले नशीब आजमावण्याचे ठरवले. आपले घरदार मुळापासून उखडले जाण्याचा हा प्रसंग
आइनस्टाइन कुटुंबासाठी आणि मुख्यत्वे अल्बर्ट आणि माजा यांच्यासाठी तर फारच
क्लेशकारक होता. 15 वर्षे वय असलेला अल्बर्ट त्या वेळी एक संवेदनाशील आणि चांगली
आकलनशक्ती असलेला तरुण मुलगा होता. ज्या
महत्त्वाच्या व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टच्या बळावर आपले कुटुंब जर्मनीमध्ये राहू शकले
असते ते आपल्या कंपनीला मिळालेले नाही याचे पूर्ण आकलन त्याला झालेले होते. हे
कॉन्ट्रॅक्ट न मिळण्याच्या कारणांमध्ये आर्थिक कारणांबरोबर यहुदी लोकांबद्दलचा द्वेष हेही एक कारण होते
याची जाणीव त्याला झाली होती. यामुळेच त्याची स्वत:च्या देशाबद्दल काहीशी विरोधी
मनोवृत्ती तयार होऊ लागली होती.
अल्बर्टच्या आई-वडिलांना जिम्नॅशियम मधील त्याच्या अभ्यासक्रमात, कुटुंबाच्या
जर्मनी ते इटली या स्थलांतरामुळे, कोणतीही अडचण येऊ नये असे
वाटत होते. अल्बर्ट थोड्याच दिवसात या अभ्यासक्रमाचे सातवे वर्ष सुरु करणार होता. दूरची
नातेवाइक असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या घरी अल्बर्टची रहाण्याची सोय करण्यात आली
तर अजून लहान असलेल्या माजाला इटलीला बरोबर घेऊन जाण्याचे ठरवण्यात आले. उद्भवलेल्या
या नवीन परिस्थितीमुळे अल्बर्ट अगदी हवालदील होऊन गेला व आपला आनंद पूर्णपणे
गमावून बसला. एकतर त्याला शाळा आवडत नव्हतीच. त्यात भरीत भर म्हणून स्वत:चे घर आणि
आरामदायी कौटुंबिक जीवन हेही तो हरपून बसला होता. काही महिने त्याने मनस्ताप सहन
केला. आई-वडिलांकडून ते इटलीमध्ये कसे
आनंदी आयुष्य घालवत आहेत याचे वर्णन करणारी पत्रे त्याला येतच होती. शेवटी मनस्ताप
सहन न झाल्यामुळे आई-वडिलांना न विचारताच शाळा सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. आइनस्टाइन
कुटुंबाच्या फॅमिली डॉक्टरकडून त्याने एक पत्र घेतले. या पत्रात अल्बर्ट “मानसिक
शीण” या आजाराने त्रस्त असल्याचे म्हटले होते. फक्त या एवढ्या पत्राच्या जोरावर
त्याला शाळा सोडता आली. डिसेंबरच्या अखेरीस मिलानला जाणार्या गाडीत त्याने पाऊल
ठेवले. अल्बर्टचे आई-वडिल पाविया या गावी जाण्याआधी मिलान मध्ये तात्पुरते रहात
होते.
अल्बर्टला घराच्या पायरीवर उभा असलेला बघून पॉवलिन आणि हर्मन यांना धक्काच
बसला. आपल्याला मिलानमधेच त्यांच्याबरोबर राहू द्यावे अशी गळ अल्बर्टने त्यांना
घातली. झुरिच येथे स्थित असलेल्या “स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॉल
1895 मधे होणार्या प्रवेश परिक्षेसाठी आपला आपण अभ्यास करून तयारी करू असे
आश्वासन अल्बर्टने त्यांना दिले. अल्बर्टला या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेण्याची
इच्छा होती. या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची कल्पना त्याच्या मनात जॅकोब
काकाने तरी भरवली असावी किंवा त्याच्या आईने! त्याची आई ही एक अतिशय व्यवहारचतुर
स्त्री होती आणि आपल्या मुलाने कोणतातरी व्यवहार्य व्यवसाय निवडावा अशी तिची
मनापासून इच्छा होती. शास्त्रे आणि तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण घेण्यात ज्यांना
रुची होती त्यांच्यासाठी ही इन्स्टिट्यूट युरोपमध्ये तरी सर्वोत्तम होती. या
इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षेत जर चांगले गुण मिळालेले
असले तर जिम्नॅशियम डिप्लोमा आवश्यक नव्हता. अल्बर्टच्या आई-वडिलांनी त्याच्या
शब्दांवर संपूर्ण विश्वास दाखवला व त्याला मिलानमध्ये राहण्याची परवानगी दिली.
अल्बर्टला मिलानमध्ये राहणे खूप आवडले. वर्षभर खूप मेहनत घेऊन त्याने अभ्यास
केला. त्याचप्रमाणे उपकरणांचे आराखडे बनवण्याच्या त्याच्या काकाच्या कामात त्याने
मदत केली. मजेची गोष्ट म्हणजे या तरूण मुलाच्या अभ्यासाची पद्धत मोठी अजब होती. तो
अभ्यास करत असे तिथे चारचौघे जरी मोठमोठ्याने बोलत असले तरी तिथे असलेल्या एखाद्या
सोफ्यावर तो शांतपणे बसून राहत असे. “तो पेन आणि कागद हातात घेत असे आणि शाईची दौत
धोकादायक रितीने सोफ्याच्या आर्म रेस्ट्वर खुशाल ठेवून देत असे. समोरच्या प्रश्नात
गुंगून तो स्वत:ला इतका विसरून जात असे की तेथे चालू असलेल्या चार चौघांच्या बडबडीचा त्याला त्रास न होता ती
बडबड त्याला अभ्यासाला उत्तेजन देणारी वाटत असे.” त्याच्या बहिणीच्या आठवणीप्रमाणे
अल्बर्ट स्वत:च्या ध्येयाशी प्रामाणिक होता. याच कालात अल्बर्टने स्वानंदासाठी
म्हणून पहिला शास्त्रीय निबंध लिहिला. या निबंधामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेनॉमिनन
या विषयात अल्बर्टला किती रुची होती हे तर दिसून आलेच पण हेही स्पष्ट झाले की
इलेक्ट्रोडायनॅमिक्स या विषयातील जे काही ज्ञान त्या वेळी उपलब्द्ध होते त्यात तो
पारंगत झाला होता.
याच कालात म्हणजे तो 16 वर्षाचा असताना, अल्बर्टने एका प्रयोगाची कल्पना केली. या
प्रयोगातूनच त्याचा विशेष सापेक्षता सिद्धांत (स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) नंतर
समोर आला. एखाद्या प्रकाश किरणाचा पाठलाग करता येईल कां? अशी
कल्पना त्याने केली. असा पाठलाग करणारा किरणाच्या वेगाने जाऊ शकेल का तो
किरणापेक्षाही जास्त वेगाने प्रवास करून त्याला मागे टाकू शकेल? “मी जर ‘c’ या गतीने (निर्वात ठिकाणी असलेली प्रकाश
किरणाची गती) जात असलेल्या प्रकाश किरणाचा पाठलाग केला तर हा प्रकाश किरण मला
स्थिर असलेल्या एका विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात (अर्थात
या विद्युतचुंबकीय क्षेत्राची अवकाशात आंदोलने चालू असणारच.) दिसला पाहिजे. मला हे
प्रथमपासून स्पष्ट होते की पृथ्वीच्या सापेक्ष स्थिर असलेल्या अशा एखाद्या निरीक्षकाच्या
दृष्टीकोनातून, प्रत्येक गोष्ट तो निरीक्षक पालन करत
असलेल्या नियमांनुसारच घडत असली पाहिजे.” आपल्या आयुष्याच्या अखेरीस लिहिलेल्या “ऑटोबायोग्राफिकल
नोट्स” मध्ये आइनस्टाइन लिहितो. जर एखादा निरीक्षक प्रकाश किरणांवर स्वार होऊन सेकंदाला 186324 मैल या गतीने प्रवास करू लागला
तर त्याला हे जग कसे दिसू लागेल? एखाद्या गतिमान आगगाडीतून
उगम पावलेला प्रकाश किरण स्टेशनवर उभ्या असलेल्या आगगाडीतून उगम पावलेल्या प्रकाश
किरणापेक्षा अधिक गतीने प्रवास करेल कां? नंतरच्या कालात, आपला विशेष सापेक्षता सिद्धांत प्रसिद्ध केल्यानंतर, प्रकाश किरण, निदान निर्वात ठिकाणी तरी, एकाच गतीने प्रवास करतात हे जाणणारा पहिला शास्त्रज्ञ तो ठरला. प्रकाश किरण
ज्या वस्तूपासून उगम पावत असेल ती वस्तू कितीही गतिमान असली तरी त्या गतीचा प्रकाश
किरणाच्या गतीवर काहीही परिणाम होत नाही. थोडक्यात सांगायचे तर अशा प्रकाश किरणाची
गती, एखाद्या स्थिर वस्तूपासून उगम पावलेली प्रकाश किरणाची
गती अधिक त्या गतिमान वस्तूची गती एवढी नसून ती स्थिर वस्तूपासून उगम पावलेल्या
प्रकाश किरणाच्या गतीएवढीच किंवा मूलत: स्थिर असते हे त्याने सांगितले. आइनस्टाइनचा
हा शोध अवकाश आणि काल यांच्या बद्दलच्या आपल्या ज्ञानावर मोठा दूरगामी परिणाम
करणारा ठरला.
त्या उन्हाळ्यात आइनस्टाइन कुटुंब मिलानहून पावियाला स्थलांतरित झाले.
अल्बर्टला तेंव्हा हायकिंग मधे गोडी निर्माण झाली होती. अभ्यास करत नसला की
पुष्कळदा तो आल्प्स पर्वतराजीमध्ये हायकिंग करत असे व या पर्वतराजीच्या दुसर्या
बाजूस असलेल्या गिनोआ या गावात रहात असलेल्या आपल्या नातेवाईकांना भेट देत असे.
अल्बर्टच्या आई-वडिलांचा पाविया मधल मुक्काम जेमतेम वर्षभर टिकला. पुढच्या
वर्षीच्या फॉल सीझन मध्ये ते मिलानला परत आले.
स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलीटेक्निकची प्रवेश परीक्षा
देण्यासाठी अल्बर्ट ऑक्टोबर महिन्यात आगगाडीने झुरिचला रवाना झाला. पॉलीटेक्निकमधे
प्रवेश घेण्यासाठी जे किमान सर्वसाधारण वय समजले जात होते त्यापेक्षा अल्बर्ट दोन
वर्षांनी लहान होता. परंतु आइनस्टाइन कुटुंबियांच्या एका परिचिताच्या ओळखीतून ही
परिक्षा लवकर देण्यासाठी विशेष परवानगी अल्बर्टला मिळाली होती. या प्रवेश परीक्षेमधे
गणित आणि शास्त्रे या संबंधित जे विभाग होते त्यात उच्च गुण मिळवून अल्बर्ट
उत्तीर्ण झाला. पॉलीटेक्निकमधे शिकवत असलेले एक प्रोफेसर अल्बर्टच्या उत्तरांवर
एवढे खुश झाले की त्यांनी अल्बर्टला झुरिचमध्ये राहून आपल्या वर्गांना उपस्थित
राहण्याची सूचना केली. परंतु पॉलीटेक्निकचे डायरेक्टर अल्बिन हेरझॉग यांचे असे मत
पडले की अल्बर्ट जरी एक ‘वंडरबॉय’ असला तरी विद्यापीठात
शिक्षण घेण्यासाठी तो अजून तयार नव्हता. त्यांच्या मताने विद्यापीठातील शिक्षणात
जी आव्हाने त्याच्या समोर येतील ती पेलण्यासाठी त्याने आणखी एक वर्ष तयारी करावी.
याचप्रमाणे अल्बर्टचे भाषा व इतिहास यासारखे काही विषय कच्चे होते. या विषयांची
तयारी करणे सुद्धा त्याला गरजेचे होते.
आइनस्टाइन कुटुंबाचा गुस्ताव्ह मायेर म्हणून एक मित्र होता त्याने अशी
सूचना केली की 1895-96 या वर्षी अल्बर्टने स्विट्झरलॅन्ड मधील एखाद्या उच्च
माध्यमिक शाळेच्या टेक्निकल डिव्हिजन मध्ये प्रवेश घ्यावा. अल्बर्टच्या
आई-वडिलांना ही सूचना पसंत पडली. झुरिचजवळच आराउ नावाचे एक खेडेगाव आहे. (हे
खेडेगाव आरगाउ या कॅन्टन मध्ये आहे. स्विस कनफेडरेशन मध्ये राज्याना कॅन्टन या
नावाने संबोधले जाते.) तेथील शाळेचे वर्ष आता सुरू होणार होते. अल्बर्टला घरातील
ज्येष्ठ मंडळींची ही कल्पना आवडली. आणखी एका वर्षात तो या शाळेतून उत्तीर्ण होऊन
पॉलीटेक्निकमधील प्रवेशाच्या किमान अपेक्षा पूर्ण करू शकत होता. त्याला परत प्रवेश
परीक्षा देण्याचीही गरज नव्हती. रसायनशास्त्र आणि त्याचे जे इतर कच्चे विषय होते त्यातील
त्याची क्षमता वाढ्वणे हे ध्येय त्याच्या
डोळ्यासमोर होते. आणि सर्वात महत्त्वाची
गोष्ट म्हणजे विद्यापीठातील शिक्षणात जी आव्हाने त्याच्यासमोर येणार होती
त्यांना तोंड देण्याची तयारी करण्यासाठी एक संपूर्ण वर्ष त्याला मिळणार होते.
-----------