भारताच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकाला एक अडचण सतत भेडसवत असते. ती म्हणजे या अभ्यासासाठी आवश्यक अशी (कोणत्या तरी स्वरूपातली) हस्तलिखिते. ही हस्त लिखिते कागदपत्र या स्वरूपात असली तर उत्तमच परंतु या शिवाय ताम्रपत्र, मृत्तिका पात्रांवर लिहिलेल्या ओळी, शिलालेख, सील्स, नाणी हे सुद्धा या बाबतीत महत्वाची भूमिका निभावतात. भारताला 5000 वर्षांचा इतिहास आहे असे आपण म्हणतो. पण दुर्दैवाने हा इतिहास अभ्यासता येईल असे खात्रीलायक रेकॉर्ड आपल्याला मिळत नाही. भारताच्या इतिहासातली दुसरी एक अडचण म्हणजे कालगणना. होऊन गेलेल्या प्रत्येक महत्वाच्या राजाने आपल्या राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन कालगणना सुरू करण्याचा जो एक प्रघात आपल्याकडे होता त्यामुळे कोणता राजा कधी होऊन गेला हे सांगणे हेच मुळी अंदाज बांधून करावे लागते.
भारतासारख्या
पुरातन संस्कृती जगात इतरत्र जेथे आढळलेल्या आहेत. तेथे बर्याच मोठ्या प्रमाणात जुनी रेकॉर्ड्स उपलब्ध
आहेत. इ.स.पूर्व 1250 मध्ये चीनवर राज्य
करत असलेल्या शांग राजघराण्याचे रेकॉर्ड हेनान प्रांतातील अन-यांग या गावाजवळ
सापडलेले आहे. चीनमधील हे सर्वात जुने रेकॉर्ड समजले जाते. या पुढील जवळ जवळ सर्व
राजघराण्यांची रेकॉर्डस चीनमध्ये जतन
केलेली आहेत. भारतात याच्या उलट परिस्थिती आहे. आपल्याकडील सर्वात जुने हस्तलिखित
म्हणजे सम्राट अशोकाचे शिलालेख असे म्हणता येईल. या शिलालेखात लोकांनी, अंमलदारांनी, भिख्खूंनी, वागावे कसे हे जरी सांगितलेले असले तरी
इतिहासाबद्दल माहिती फारशी मिळत नाही. पुराणांतून थोडीफार माहिती मिळते पण त्यावर
किती विश्वास टाकायचा हा एक प्रश्नच आहे.
प्राचीन
भारताच्या इतिहासाबाबत खात्रीलायक अशी माहिती आपल्याला फक्त चीनमधील हान
राजघराण्याच्या (इ.स.पूर्व तिसरे शतक ते तिसरे शतक) आणि वै राजघराण्याच्या(4थे ते 6वे शतक) कालात
अनुक्रमे वै लियो आणि हाऊ हान चौ या इतिहासकारांनी लिहिलेल्या लिहिलेल्या “पाश्चिमेकडचे देश” या क्रॉनिकल्स
मधून मिळू शकते. परंतु यात मुख्यत्वे करून त्याकालापर्यंत भारतावर झालेल्या परकीय
आक्रमणांबद्दल जास्त माहिती दिलेली आहे.
अशा या
निराशाजनक परिस्थितीत जी काय खात्रीलायक महिती आपल्याला मिळू शकते ती भारतात
आलेल्या चिनी बौद्ध भिख्खूंनी लिहून ठेवलेल्या प्रवासवर्णनावरून, असे म्हटले तरी चालेल.
प्राचीन भारतात जे बौद्ध भिख्खू येऊन गेले त्यांच्या मध्ये, प्रवासवर्णनाच्या दृष्टीने महत्वाचे म्हणता
येतील, अशा खालील भिख्खूंची नावे घेता येतील.
फा-शियान-
पाचवे शतक
सॉन्ग-युन आणि हुई-झेंग – सहावे शतक
शुआन झांग – सातवे शतक
यि-जिंग- सातवे शतक
हुई-चाओ- आठवे शतक
सॉन्ग-युन आणि हुई-झेंग – सहावे शतक
शुआन झांग – सातवे शतक
यि-जिंग- सातवे शतक
हुई-चाओ- आठवे शतक
या सर्व
भिख्खूंपैकी शुआन झांग सोडला तर इतर भिख्खूंनी भारतात जो प्रवास केला तो मर्यादित
स्वरूपातील असल्याने, जरी त्यांनी मागे लिहून ठेवलेली वर्णने उपयुक्त असली तरी त्यावर बरीच
मर्यादा येते.
शुआन
झांग हा बौद्ध भिख्खू चीनमधून 629-630 मध्ये निघाला व तब्बल पंधरा वर्षांनी किंवा
इ.स 645 मध्ये तो चीनच्या राजधानीला परत पोहोचला. जाण्यायेण्याच्या प्रवासात
घालवलेली 4/5 वर्षे सोडली तरी किमान दहा वर्षांचा काल त्याने भारतात व्यतीत केला
होता असे खात्रीलायकपणे म्हणता येते. भारतातील त्याच्या वास्तव्यात त्याने पेशावर
पासून गुवाहती पर्यंत आणि कश्मिर आणि कुलू-मनाली पासून दक्षिणेतील कांचीपुरम
पर्यंत असा प्रवास केला. कश्मिर मध्ये 1
वर्ष आणि नालंदामध्ये त्याने 5 वर्षे अध्ययनात घालवली.
त्याच्या
या प्रवासाचे बारकाईने त्याने केलेले वर्णन दोन पुस्तकांत मिळून आज उपलब्द्ध आहे.
यापैकी पहिले पुस्तक म्हणजे तो स्वतः लेखक असल्याचे सांगतो ते “ पाश्चिमात्य
जगाबद्दलच्या बौद्ध नोंदी” हे पुस्तक आणि शुआन झांगचा पट्टशिष्य स्वतःला
म्हणविणारा भिख्खू हुई-ली हा लेखक असलेले “शुआन झांगचे चरित्र” हे दुसरे पुस्तक.
परंतु पुस्तके वाचल्यावर हे लक्षात येते. की शुआन झांगने लिहिलेले पुस्तक स्वतः
चिनी सम्राटाने अधिकृत केलेले असल्याने सम्राटाला रुचणारा व त्याच्या कारकिर्दीतील
अधिकृत नोंदी म्हणून पात्र होणारा मजकूरच
या पुस्तकात दिलेला आहे. या उलट हुई-ली चे पुस्तक कोणत्याच मर्यांदामध्ये बसवणे
बंधनकारक नसल्याने त्यातला मजकूर जास्त सत्याला धरून आहे. एवढे मात्र खरे की ही
दोन्ही पुस्तके मिळून सातव्या शतकातील भारताबद्दल जेवढी माहिती आपल्याला मिळते तेवढी
दुसर्या कोणत्याही पुस्तकावरून किंवा इतर कोणत्याही स्त्रोतापासून मिळत नाही.
शुआन
झांगने आपला प्रवास अनेक अशक्यप्राय अडचणी आणि संकटे यावर मात करून केला होता की
त्याचे नुसते प्रवासवर्णन सुद्धा वाचताना रोमांचकारक आणि चित्तथरारक वाटते. चीनची राजधानी चॅन्ग-आन (सध्याचे शियान)
येथून तो निघाल्यावर्र चिनी सम्राटाचे गुप्त हेर अशा प्रवासाला बंदी असल्याने त्याच्या मागे लागले. त्यांना
टाळण्यात तर तो यशस्वी झाला व चिनी सीमेवरून त्याने उत्तरेकडे असलेल्या शिनजिआंग
भागातील स्वतंत्र देशांकडे जाण्यासाठी एका वाटाड्याबरोबर प्रयाण केले. हा वाटाड्या
सुद्धा एका दिवसापेक्षा जास्ती काळ दम धरू शकला नाही व तो परत चीनकडे निघून गेला.
पुढे असलेले भयाण वाळवंट शुआन झांगने एकट्याने ओलांडले. हे ओलांडत असताना 4/5 दिवस
अन्नपाण्याशिवाय त्याला गुजारा करावा लागला व शेवटी त्याला अचानक पाणी मिळाले व
त्याचा प्रवास पुढे सुरू झाला. उत्तरेकडच्या राज्यांकडून त्याला मदत मिळाली. पुढे
काही वाटमारी करणार्या दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला पण त्यातून तो कसाबसा
बचावला. चीनच्या उत्तरेला असलेली तियानशान पर्वतराजी त्याने बेडेल खिंडीतून
ओलांडली पण तेथे असलेल्या अत्यंत खराब आणि धोकादायक परिस्थितीमुळे आपले 14
सहप्रवासी भिख्खू त्याने गमावले.
यानंतर
किरकिझस्तान, कज़ागस्तान मधून तो उझ्बेकीस्तानमधे आला व ताशकंद जवळ त्याने सिर दर्या (जाकारटिस)) नदी ओलांडली. यानंतर
समरकंद मार्गे तो आला व ती ओलांडल्यावर
अफगाणिस्तान मधील कुंडुझ जवळ त्याने अमु दर्या (ऑक्सस) नदी ओलांडली.
बामियानला भेट देऊन त्याने हिंदुकुश पर्वत
चढणे टाळले व तेथून तो एक हिंदू राजा असलेल्या कापिशी मधे आला. (सध्याचा बेग्राम
विमानतळ) तेथून जलालाबाद मार्गे तो पेशावरला आला.
भारतातल्या
प्रवासात सुद्धा त्याला काही कमी अडचणी आल्या नाहीत. पंजाबमधे असताना (पाकिस्तानचा भाग) तो परत
दरोडेखोरांच्या तावडीत सापडला व त्याने नेसत्या वस्त्रानिशी कशीबशी आपली सुटका
करून घेतली. कनौज आणि प्रयाग यामधील प्रवासात नदीवरील चाच्यांनी त्याचे अपहरण केले
व गोरागोमटा दिसत असल्याने त्याला बळी द्यावयाचे ठरवले . त्यातून तो कसा तरी
वाचला.
परतीचा
प्रवास त्या मानाने सुखकर झाला असला तरी पामिरच्या पठारावर त्याला आत्यंतिक थंडीचा
सामना करावा लागला. शुआन झांगने आपल्या भारतातील वास्तव्यात अनेक बौद्ध संस्कृत
ग्रंथ नकलून घेतले होते. यातले काही ग्रंथ सिंधू नदी ओलांडताना जलार्पण झाले व ते
पुन्हा त्याला नकलून घेणे क्रमप्राप्त झाले. सम्राट हर्षवर्धनाने त्याला पुस्तके
नेण्यासाठी एक हत्ती दिला होता. परंतु काराकोरम पर्वतराजी ओलांडताना तो हत्ती एका
दरीत पडला व मृत झाला.
शुआन
झांग भारतात असल्याचा काळ (सातवे शतक) याला एक प्रकारे भारताचा सुवर्ण काल म्हणता
येते. या वेळी कोणतेही परकीय आक्रमण भारतावर झालेले नव्हते व सर्व उत्तर भारत
सम्राट हर्षवर्धन याच्या अंमलाखाली होता. त्या वेळी भारतात पूर्णपणे शांती आणि
सुबत्ता नांदत होती. व हाच भारत व त्यात असलेला महाराष्ट्र कसा होता ते आता आपण बघणार आहोत.
सातव्या
शतकात सुद्धा, संपूर्ण भारतवर्ष हे छोट्या छोठ्या राज्यात विभागलेले असले तरी ही सर्व
राज्ये चार किंवा पाच सम्राटांच्या किंवा
महाराजांच्या हाताखाली मांडलिक राज्ये म्हणून होती. हे चारी किंवा पाची राजे मोठी सेना पदरी बाळगून असत व त्यामुळे कुठेही कोठेही बंडाचा उद्रेक होतो
आहे असे जरी वाटले तरी त्याचा बीमोड लगेचच होत असल्याने सर्वत्र, निदान उत्तर हिंदुस्थानात तरी, शांततेचे वातावरणा
होते. या महाराजांत प्रथम नाव घ्यावे
लागेल ते सम्राट हर्षवर्धन याचे. अनेक मांडलिक राजांवर विजय प्राप्त करून त्याने
प्रस्थापित केलेले आपले साम्राज्य पश्चिमेला पेशावर, उत्तरेला
कश्मिर, पूर्वेला
गंगेच्या काठावर असलेल्या झारखंड मधील संथाल परगण्यातील कजगृह आणि वायव्येला
गोदावरी नदी तर नैऋत्येला नर्मदा नदी यामधील विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेले होते.
हर्षवर्धनाचे वर्णन करताना शुआन झांग लिहितो की त्याच्या बरोबर नेहमी 1000 ढोलवादक
असत व आपल्या सोन्याचा पत्रा चढवलेल्या ढोलांच्या ठोक्यावर हर्षवर्धनाची स्वारी
कूच करत असे.
गंगेच्या पूर्व किनार्यापासून आसामधील गुवाहती
पर्यंत महाराजा भास्करवर्मन याचे राज्य होते. भास्करवर्मन जरी हर्षवर्धनाचा
मांडलिक नसला तरी त्याची आज्ञा तो कधी मोडत नसे. हर्षवर्धनाचा जावई असलेला मैत्रक
राजघराण्यातील राजा धृवभट्ट याचे गुजरात आणि सौराष्ट्र यावर राज्य होते.
नर्मदेच्या दक्षिण किनार्यापासून कावेरी नदीपर्यंत चालुक्य राजघराण्यातील राजा
पुलकेशी याचे साम्राज्य पसरलेले होते तर कावेरी नदीच्या दक्षिणेला पल्लव
राजघराण्यातील राजा महेंद्रवर्मन आणि त्याचा मुलगा नृसिंहवर्मन यांचे राज्य होते.
यानंतर
आपण महाराष्ट्राकडे वळूया. शुआन झांगच्या वर्णनाप्रमाणे चालुक्य सम्राट पुलकेशी
दुसरा याच्या अंमलाखाली असलेल्या महाराष्ट्र देशाच्या सीमा साधारण खालीलप्रमाणे
होत्या. पश्चिमेला सह्याद्री पर्वतराजी. (कोकणाचा अंतर्भाव बहुधा
महाराष्ट्राच्यासीमेमध्ये केला जात नव्हता). पूर्वेला मराठवाड्यामधील अजिंठा हे
गाव. याच्या पूर्वेला दक्षिण कोशल हा देश होता. उत्तरेला नर्मदा नदी ही सीमा समजली
जात होती तर दक्षिणेला कावेरी नदीपर्यंतचा प्रदेश महाराष्ट्राच्या भूमीचा भाग समजला जात होता.
महाराष्ट्राची वायव्य सीमा गोदावरी नदी ही होती. तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्याचा
गोदावरीच्या पूर्वेला असलेला भाग
आंध्र या नावाने ओळखला जात होता तर
गोळकोंडा किल्ल्याजवळील भाग “कोंकणपूर” या नावाने ओळखला जात असे. कावेरी नदीच्या दक्षिणेला
पल्लव राजांचे राज्य होते.
महाराष्ट्राबद्दल
शुआन झांग लिहितो. या देशाचा परिघ साधारणपणे 1562 किमी आहे. जमीनीचा कस चांगला आहे
व जमीन सुपीक असल्याने येथे पिके नियमीत घेतली जातात. हवामान उष्ण आहे. शुआन झांगच्या कालाच्या सुमारे सातशे वर्षे आधी
महाराष्ट्रावर सातवाहनांचे राज्य होते. या काळात महाराष्ट्राचा रोम बरोबर मोठा
व्यापार उदीम चालत असे. हा व्यापार ज्या रस्त्याने चालत असे तो रस्ता महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख असा राजमार्ग
होता. सातवाहन कालातील हा व्यापारी मार्ग आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि
विनुकोंडा येथून येणार्या दोन मार्गांपासून सुरू होऊन गोळकोंडा किल्ल्याजवळील
कोंडापूर येथे ते एकत्र मिळत व नंतर कल्याणी-तगर (तेर)- पैठण- देवगिरी- चांदवड-
मार्कंडेय खिंड- भडोच बंदरापर्यंत तो पोचत असे. शुआन झांगच्या वर्णनाप्रमाणे
सातव्या शतकात हा रस्ता कोंडापूर- देवगिरी
या सेक्टरमध्ये तेर-पैठण असा न येता गोळकोंडा पासून हा रस्ता उत्तरेकडे असलेल्या
जंगलामधून जात असे व नांदेड जवळ गोदावरी ओलांडून तो परभणी, आष्टी,
अंबड मार्गे देवगिरीला जात असे.
सर्वसाधारणपणे
चालुक्य राजांची राजधानी ही उत्तर कर्नाटकातील बदामी येथे होती असे समजले जाते.
परंतु शुएन झांगच्या वर्णनाप्रमाणे ही राजधानी नाशिक परिसरात होती हे स्पष्ट होते.
सातव्या शतकात नाशिक येथे अंदाजे महायान व हीनयान या दोन्ही पंथांचे मिळून 100 तरी
बौद्ध्द मठ होते व त्यात 5000 भिख्खू रहात होते.
शहरात 100च्या वर वैदिक धर्माची देवळे होती व अनेक पंथाचे लोक त्यात
पूजाअर्चा करत असत. शहराच्या दक्षिणेला पाषाणात खोदलेला मठ होता (पांडव-लेणी) तर
शहराच्या पूर्वेला थेट सीमेवर पाषाणात खोदलेलाच अनेक मजले असलेला एक मठ होता. या
मठाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन पाषाण हत्ती होते व मठात चारी भिंतींवर बुद्धाच्या
जीवनातील प्रसंगांवर रंगवलेली चित्रे होती.
(अजिंठा गुंफा).
महाराष्ट्रातील
रहिवाशांबद्दल शुएन झांग काय म्हणतो ते बघुया.
येथील लोक हे साधे-सुधे सरळ आणि सत्यप्रिय आहेत. ल लोकांना धर्मग्रंथ
वाचनाची आवड आहे व वैदिक आणि बौद्ध अशा दोन्ही प्रकारचे ग्रंथ येथे वाचले
जातात. सर्वसाधारणपणे मोठी अंगकाठी असलेले हे लोक स्वभावाने कडक व कोणी
काही दुष्कृत्य केल्यास त्याचा बदला
घेण्याची वृत्ती ठेवतात. त्यांना मदत करणार्या लोकांचे ते आभारी असले तरी ते शत्रूंची
भीडभाड ठेवत नाहीत. त्यांचा कोणी अपमान
केला तर प्राण पणाला लावून ते सूड घेतल्याशिवाय रहात नाहीत. अडचणीत असलेल्या कोणी
त्यांची मदत मागितली तर तहान-भूक विसरून ते मदत करतील. कोणाचा बदला घ्यायचा असला
तर त्याला ते प्रथम सूचना देऊन शस्त्र हातात घेण्यास सांगतील व स्वतः शस्त्र धारण
करून शत्रूशी युद्ध करतील. शत्रूचा ते पाठलाग जरूर करतात पण शरण आलेल्याला ते
जीवदान देतात. एखादा सेनानी युद्ध हरला तर त्याला शिक्षा न देता चोळी-बांगडी देऊन
त्या सेनानीला स्वत:च आत्महत्या करण्यास ते प्रवृत्त करतील. या देशात 700 हून अधिक
अजिंक्य योद्धे आहेत. युद्धावर जाण्याआधी ते दारू पिऊन धुंद होतात व नंतर हातात
भाला घेऊन शत्रूवर तुटून पडतात. या अजिंक्य योद्ध्यांनी मनुष्यवध केला तरी त्यांना
तरी त्यांना शिक्षा होत नाही. युद्धावर जाताना ते शेकडे हत्तींना दारू पिऊन धुंद
करतात व आपणही दारू पितात. नंतर ढोल वाजवत यांचे मोठे सैन्य शत्रूवर हल्ला करते व
वाटेत येणार्या प्रत्येक गोष्टीचा ते नाश करत असल्याने यांच्याशी युद्ध करण्यास
कोणी धजत नाही.
इथल्या
लोकांचे कपडे विशिष्ट फॅशनचे असे नसतात. त्यांना बहधा धूत वस्त्रे आवडतात. पुरुष
धोतरे नेसतात व त्याचा सोगा उजव्या पायावर सोडतात. स्त्रियांची वस्त्रे पायघोळ
असतात आणि आपले खांदे त्या पूर्ण झाकून घेतात. केसांचा एक बुचडा डोक्यावर बांधलेला
असतो व बाकीचे केस मोकळे सोडलेले असतात. लोक गळ्यात खड्यांच्या किंवा फुलांच्या
माळा घालतात.
शुएन
झांगने केलेले महाराष्ट्र व तेथील लोक यांचे वर्णन इतके हुबेहुब वठलेले आहे की
त्यावर अधिक भाष्य करण्याची काहीच गरज नाही. शुएन झांगचे प्रवासवर्णन ही आपल्याला
मिळालेली एक मोठी देणगी आहे असे मी मानतो. हे प्रवासवर्णन नसते तर प्राचीन कालातील
महाराष्ट्र कसा होता, इथले लोक कसे होते, हे सांगणे मोठे अवघड होते यात
शंकाच नाही.
1 डिसेंबर
2018
