चाळीस पन्नास वर्षांपूर्वी, पावसाळ्याच्या दिवसात, पुण्याच्या आसमंतात असंख्य नाले किंवा ओढे दिसत असत. पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या की या नाल्यांना, कल्पनाही करता येणार नाही एवढ्या प्रमाणात पूर येत असे. या ओढ्यांच्या काठावर उभे राहून या पुराकडे व त्यात वाहून जाणारी झाडे झुडपे आणि क्वचित दिसणारे साप- नाग बघत राहणे हा आम्हा मुलांचा एक आवडता टाइमपास असे. या ओढ्यांमध्ये काही विविक्षित जागी भोवरे तयार होत.एखादे पान किंवा झुडूप या भोवर्यांजवळ आले की जोरात गोलगोल फिरू लागे व क्षणार्धात बुडून अदृष्य होत असे. किंबहुना असे वाटू लागे की ते पान आपल्या विश्वातून नाहीसेच झाले आहे.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी स्टीफन हॉकिन्गचे “ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम” हे पुस्तक मी वाचले होते. या पुस्तकातल्या मला विशेष आवडलेल्या दोन कल्पना होत्या त्या म्हणजे, एकतर आपल्या विश्वासम असणारी इतर अनेक विश्वे प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता आणि या विश्वांना जोडणारी “कीटक छिद्रे किंवा वर्म होल्स” आणि भविष्यात या वर्म होल्समधून एक विश्व ते दुसरे विश्व असा प्रवास करता येऊ शकेल हे हॉकिन्गचे भाकित. पुस्तकाचा हा भाग वाचताना लहानपणी पाहिलेल्या नाल्या-ओढ्यांमधील भोवर्यांची मला प्रकर्षाने आठवण झाली होती. त्या भोवर्यांमधून अदृश्य होणारा पालापाचोळा आणि हॉकिन्गच्या वर्महोल्समधून जाणारा प्रवासी यांच्यात दिसणारे विलक्षण साम्य लक्षात आल्याने हॉकिन्गच्या कल्पना अगदीच कवी कल्पना नसाव्यात असे माझ्या ध्यानात सहजपणे येऊ शकले होते. हॉलीवूडच्या “इन्टरस्टेलर” या चित्रपटात, त्याच्या निर्मात्याने, हॉकिन्गच्या या कल्पनांना दृकश्राव्य स्वरूपात आपल्या समोर सादर केले आहे. हा चित्रपट बघतानाही मला लहानपणच्या त्या भोवर्यांचीच सारखी आठवण होत होती.
विश्वांमधील वर्म होल्सचे भोवरे काय किंवा ओढे-नाल्यांमधील पुराचे भोवरे काय? या दोन्हीमध्ये हे जे विलक्षण साम्य मला जाणवते ते म्हणजे या दोन्हींमध्ये फिरणार्या वस्तूंना त्या क्षणाला, त्यांना आपले भासणार्या विश्वामधून नाहीसे किंवा नष्ट करून एका वेगळ्याच विश्वात फरफटत खेचून नेण्याची त्यांची असलेली क्षमता आहे. वस्तूंच्या बाबतीत हे सर्व ठीक वाटते, पण आपल्या मनाला क्षणार्धात असे खेचून,फरफटत कोणी निराळ्याच विश्वात नेऊ शकेल का? असा प्रश्न मला नेहमीच पडतो. अशी शक्यता अंधूकच असते कारण मन स्वत:च विश्वसंचारी असते किंवा अनेक विश्वे असल्यास त्यांमधे सुद्धा संचारी असते.ते क्षणार्धात कोठेही आणि भविष्य-वर्तमान-भूत यापैकी कोणत्याही कालात जाऊ शकेल एवढे ते चंचल असते.
मग अशा या अचपल मनाला कोणी खेचून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणि पाहिजे त्या कालात नेऊ शकणे अशक्यप्राय वाटत असले तरी ते तसे नाही. या मनाची फरफट करू शकणारी एक शक्ती या जगात आहे आणि ती आपल्याजवळच असते. ही शक्ती म्हणजे अर्थातच आपली स्मृती किंवा आठवणी. अणि मग या आठवणींचे जर भोवरे मनाने तयार करण्यास सुरुवात केली तर विचारूच नका! कोठेही, कुठेही आणि कसेही आपण क्षणार्धात पोचूच.
आठवणींच्या अशा या भोवर्यांतून मन कसा व कुठे प्रवास करेल हे सांगणे कोणालाही अगदी निसर्गालाही सांगणे शक्य होईल असे मला तरी वाटत नाही. माणसाचे आयुष्य,तो ज्या स्थित्यंतरांमधून जातो ती बघितली तर दीर्घच म्हणावे लागेल. आता माझ्या म्हणजे ज्याला अगदी सर्वसाधारण म्हणता येईल अशा एका माणसाचा जीवनप्रवास सुद्धा केवढ्या स्थत्यंतरांमधून गेलेला आहे याची जाणीव मला होते आहे. बालपणीचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे दिवस, पुढची समाजवादाच्या ओझ्याखाली आणि त्यामुळे देशापुढे आलेल्या आर्थिक विवंचना यांच्याखाली दडपून गेलेली वर्षे आणि नंतरचे उदारीकरण आणि त्याबरोबरच आलेले आधुनिक तंत्रज्ञान हे सगळे बघितले तर केवढे बदल मी माझ्या आयुष्यकालात बघू शकलो आहे याची जाणीव होते आहे. मग या कालांच्या आठवणींमधून प्रवास करायला मनाला भोवर्यांची मदत घ्यावी लागत असली तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. किंबहुना या भोवर्यांमुळेच आठवणींच्या जगात माणूस रमू शकतो आहे. आठवणी एखादी रोजनिशी वाचावी तशाच जर येत राहिल्या तर त्यात कोणाची रुची कायम राहील? केवळ या भोवर्यांमुळे आठवणी रम्य वाटतात,त्यात मन रमते यात शंकाच नाही.
3 मे2015

