सध्या सगळीकडे स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला असल्यामुळे
निरनिराळ्या संस्था, शाळा-कॉलेजे आपापल्या स्वच्छता मोहीमा राबवत आहेत. या
मोहिमांचे फलित काय असा प्रश्न अनेकांना पडत असला तरी अहमदाबाद मधील एका शाळेत
राबवल्या गेलेल्या स्वच्छता मोहिमेतून एक मोठे चांगलेच घबाड हाती लागले आहे.
अहमदाबाद शहरातील चांदखेडा भागात ऑइल अॅन्ड नॅचरल गॅस कमिशन
या सरकारी कंपनीच्या मालकीचा एक मोठा परिसर आहे. या परिसरात एक केंद्रिय विद्यालय
सुद्धा आहे.
मागच्या शनिवारी या विद्यालयाचे प्राचार्य श्री अवधेश कुमार
यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय
घेतला होता. या निर्णयानुसार साफसफाई चालू असताना प्राचार्यांना शिक्षकांच्या
कक्षात 20 लॉकर्स असलेले एक कपाट दिसले.
हे कपाट वापरात नसल्याने त्यावर बरीच धूळ साठलेली दिसत होती. प्राचार्यांनी या
लॉकर्सच्या किल्ल्या मागवून घेतल्या व शिक्षकांना ते उघडून त्यांची साफसफाई
करण्यास सांगितले. यानुसार साफसफाई चालू असताना 5 लॉकर्सच्या किल्ल्या गायब
असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्राचार्यांनी या लॉकर्सची कुलुपे तोडण्याचा आदेश
दिला. ही कुलुपे तोडल्यावर 5 पैकी 3 लॉकर्स रिकामे व 2 लॉकर्स मध्ये प्रत्येकी 1
थैली असल्याचे आढळून आले. या थैल्या उघडल्यावर, एका
थैलीमध्ये 1 कोटी रुपये नगद आणि दुसर्या थैलीमध्ये प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाची
सोन्याची 21 बिस्किटे असल्याचे प्राचार्यांना आढळले. यानंतर हा खजिना
पोलिसांना बोलावून त्यांच्या हवाली केला गेला.
पोलिसांच्या माहितीनुसार शाळेतील हे लॉकर शिक्षक आणि इतर
कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक सामान ठेवण्यासाठी शाळेकडून दिलेले होते. परंतु
कोणता लॉकर कोणाला दिलेला आहे याची कोणतीही नोंद शाळेने ठेवलेली नव्हती.
पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाचे फलित काय व्हायचे ते मिळेल. मात्र या मोहिमेच्या अंतर्गत मिळालेला हा पहिला दृष्य परिणाम मात्र जबरदस्त
आहे यात शंकाच नाही.
2 फेब्रुवारी 2015
