Tuesday, 6 January 2015

सूर्यावरील महावावटळ


एका पाठोपाठ एक निर्माण झालेल्या अग्निशिखा(Solar Flares)
उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी गरम गरम वारे वाहू लागतात व अकस्मात एखाद्या भोवर्‍यासारखे गरगर फिरणारे धुळीची वावटळ निर्माण होते व ही वावटळ कशीही व कोठेही भरकटत जाते हा अनुभव आपल्या सर्वांना नेहमीच येतो. अमेरिकेसारख्या देशात तर या वावटळी महाविशाल असतात व त्या शेकडो मैल सुद्धा प्रवास करतात व आपल्या कचाट्यात सापडलेली घरे, गाड्या यांना भिरकावून देत असतात.
अमेरिकेच्या अवकाश संशोधन विभागामधील सोलर डायनॅमिक्स ऑब्झरवेटरीने (NASA’s Solar Dynamics Observatory) नुकताच सूर्याच्या पृष्ठभागावरील अशाच एका वावटळीचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध केला आहे. अर्थात सूर्यावर धूळ नसल्याने या वावटळीत सूर्यावरील विद्युतभारित वायू (sun’s plasma) हाच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात गोल गोल फिरत व भरकटत राहिला. या वावटळीतील वारे अंदाजे तासाला 300,000 मैल या गतीने वहात होते. पृथीवरील सर्वात तीव्र समजल्या जाणार्‍या वावटळींच्यात (F5 ) सुद्धा, वारे जास्तीतजास्त तासाला 300 मैल या पेक्षा जास्त गतीने वाहत नाहीत. सूर्यावरील ही वावटळ सुमारे 30 तास भरकटत होती.

सूर्य हा अतिशय उद्रेकी तारा समजला जातो. आण्विक कण व उर्जेचे तो सतत प्रसारण करत असतो. या प्रसारणामुळेच पृथ्वीवर ऑरोरा प्रकाश व चुंबकीय वादळे निर्माण होत असतात. सूर्यावरील घडामोडी पहाण्यासाठी जगभरात आता सूर्य निरिक्षण दूरादर्श उभे केले जात आहेत. भारतात लडाखमध्ये असाच एक सूर्य दूरादर्श उभारण्यात येणार आहे.
19 फेब्रुवारी 2012