राष्ट्रीय अवकाश समाज (National Space Society (NSS)) ही "अंतराळप्रवासी संस्कृतीची निर्मिती" हे ध्येय डोळ्यासमोर असलेली,
अमेरिकास्थित आणि कोणत्याही सरकारी व्यवस्थेचा भाग नसलेली अशी एक संस्था आहे. या
संस्थेने नुकतेच आपले 2015 या वर्षाचे अभियांत्रिकी आणि शास्त्र या विभागामधील
"अवकाश पथप्रदर्शक पारितोषिक" (2015 Space Pioneer Award) विजेते म्हणून भारताचा मंगळयान कार्यक्रम
सफलतेने पूर्ण करणार्या शास्त्रज्ञ गटाचे नाव घोषित केले आहे.
या संस्थेने दिलेल्या निवेदनाप्रमाणे शास्त्रज्ञांच्या या
गटाची विजेते म्हणून निवड करण्यामागे दोन कारणे आहे. भारताचे मंगळयान हे पहिल्या
प्रयत्नातच मंगळाच्या कक्षेत यशस्वी रित्या भ्रमण करू लागले हे यापैकी पहिले कारण
आहे.
दुसरे कारण असे आहे. मंगळयान मंगळाभोवती लंबगोलाकार कक्षेत
फिरत असल्याने जेंव्हा हे यान भ्रमणकक्षेतील मंग़ळापासूनच्या सर्वात दूरच्या
स्थानावर (high apoapsis) असते तेंव्हा यानातील कॅमेरा
मंगळाच्या संपूर्ण बिंबाचे चित्रण करण्याच्या परिस्थितीत असतो. भारतीय मंगळयानामधील
कॅमेरा अतिशय बारकाईने (high resolution) चित्रण करू शकणारा असल्याने यान
भ्रमणकक्षेमधील दूरच्या स्थितीत असताना मंगळाच्या संपूर्ण बिंबाची सप्तरंगातील
छायाचित्रे घेण्यात ते यशस्वी ठरले आहे. यापूर्वी मंग़ळाच्या संपूर्ण बिंबाची
छायाचित्रे फक्त यान मंगळाकडे जात असताना घेता आलेली आहेत. मंगळाभोवती फिरणार्या
यानांना मंगळाच्या थोड्याच प्रदेशाची छायाचित्रे घेता येतात. मंगळयानाने काढलेली
संपूर्ण बिंबाची छायाचित्रे या ग्रहाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांच्या
दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी आहेत.
2015 मधील मे महिन्यात या संस्थेची सभा कॅनडा मधील टोरॅन्टो
मधे येथे होणार आहे. त्या वेळेस भारतीय अवकाश शास्त्रज्ञांच्या प्रतिनिधीला हे
पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
13 जानेवारी 2014
