महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामधले दापोलीजवळचे मुरुड हे समुद्र
किनार्यालगत असलेले गाव तसे आता पर्यटकांच्या गर्दीमुळे प्रसिद्ध झालेले आहे. पण
हेच गाव भारत रत्न डॉ. धोंडो केशव कर्वे यांचे जन्मग्राम होते हे कदाचित बर्याच
मंडळींना माहिती नसेल. अण्णासाहेब कर्वे यांच्या आत्मचरित्रात या मुरुड गावाचा
उल्लेख लहानपणींच्या आठवणींमध्ये अर्थातच आलेला आहे. परंतु याशिवाय परत एकदा या
गावाचा उल्लेख ते करतात. पहिल्या पत्नीचे निघन झाल्यावर अणांनी विधवेबरोबरच
पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला व आनंदी जोशी यांच्याबरोबर त्यांनी 1893 मध्ये
विवाह केला. या विवाहामुळे तत्कालीन समाजात एक प्रचंड काहूर माजले. यात मुरुड
गावकर्यांचाही समावेश होताच. विवाहानंतर अण्णा आपल्या पत्नीला घेऊन मुरुडला गेले.
गावकर्यांना हे कळल्यानंतर त्यांनी अण्णा व त्यांची पत्नी यांना तर बहिष्कृत करून
वाळीत टाकलेच पण याशिवाय मुरुड गावात स्थायिक असलेल्या अण्णांच्या आई-वडीलांना ही
वाळीत टाकले.
अण्णासाहेबांच्या चरित्रातील या प्रसंगाची जाणीव मला आज एक बातमी
वाचल्यानंतर प्रकर्षाने झाली, कारण मुरुड हे गाव ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे
त्याच्या उत्तरेला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील भोगाव बुद्रुक या गावामधील
गावकर्यांनी, या गावचेच मूळ रहिवासी असलेले आणि येलेंगेवाडी
वस्तीमधे राहणारे श्री. राहूल येलेंगे (वय वर्षे 30) आणि त्यांच्या 27 वर्षाच्या
पत्नी पूर्णिमा, या नवपरिणित दांपत्याला या एकविसाव्या
शतकामध्ये बहिष्कृत करून वाळीत टाकण्याचे अत्यंत महान कार्य पार पाडले आहे. आणि सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे 2012 मध्ये
पुण्यामधून एव्हरेस्ट शिखर ज्या टीमने सर केले होते त्या टीमचे श्री. येलेंगे हे
सभासद होते व या कारणासाठी गावकर्यांनी त्यांच्या गैरहजेरीतच त्यांचा या आधी
सत्कारही पार पाडला होता.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या सौ. पूर्णिमा या वकील असून सायबर लॉ या
विषयात त्यांनी विशेष पारंगतता मिळवली आहे. या येलेंगे पतीपत्नींनी असा काय गुन्हा
केल्यामुळे त्यांना वाळीत टाकण्याचे पुण्यकर्म गावकर्यांनी केले असावे? श्री.
राहूल यांच्या म्हणण्याप्रमाणे या गुन्ह्यांची यादी बरीच मोठी दिसते आहे. श्री. राहूल व पूर्णिमा यांनी रजिस्टर्ड विवाह
केला असल्याने तो आंतरजातीय असला पाहिजे असे गावकर्यांनी ठरवले आहे. त्या साडी न
नेसता रोज जीन्सचा वापर करतात, मंगळसूत्र घालत नाहीत, कुंकू लावत नाहीत या सारखे इतर गुन्हे त्या सतत करत असतात.
येलेंगे पतीपत्नी मार्च 2014 मध्ये त्यांच्या मूळगावी, तेथे
डेअरीच्या व्यवसाय करणे रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण वर्ग चालवण्याच्या उद्देशाने
परतले तेंव्हापासूनच इतर ग्रामस्थांनी त्यांना उपद्रव देणे चालू केले आहे. या
पतीपत्नीवर आडून टोमणे मारणे हे ग्रामस्थ स्त्रिया करत होत्याच त्या शिवाय रॉक क्लाइंबिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी येलेंगे
यांना एक भिंत बांधावयाची होती, ती बांधण्यास ग्रामस्थांनी
परवानगी नाकारली आहे. येलेंगे यांच्या गोठ्यातील म्हशींसाठी गावामधील
नळकोंडाळ्यातून पाणी घेण्यास त्यांना मनाई करण्यात आल्याने या एव्हरेस्ट वीराला
जवळच्या टेकडीवरून पाण्यासाठी रोज 20 मिनिटाच्या चकरा माराव्या लागतात. श्रीमती
येलेंगे यांना भेटण्यासाठी पक्षकार आले तरी गावकरी त्याबद्दल आडून-आडून बोलत
असतात.
2 महिन्यांपूर्वी गावातील 80 कुटुंबांनी ग्रामा पंचायतीला एक लेखी निवेदन
दिले. या निवेदनाप्रमाणे श्री. येलेंगे यांच्या गोठ्याला आग लागल्यास त्यांना
जबाबदार धरले जाऊ नये अशी मागणी केलेली होती. हे कळल्यावर श्री. येलेंगे यांनी
पोलादपूर पोलिस ठाण्यात आपल्या गोठ्याला धोका असल्याची तक्रार नोंदवली. या
वेळेपासून येलेंगे पती पत्नींवर गावकर्यांनी बहिष्कार टाकला आहे. गावातील
देवस्थानाच्या उत्सवाला त्यांना बोलावले गेले नाही.
श्री. येलेंगे म्हणतात की एव्हरेस्ट शिवाय मी आणखी 16 शिखरे सर केली आहेत.
ही शिखरे सर करताना मला जेवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा जास्त त्रास त्रास मला
गावकर्यांशी वागताना होतो आहे. आम्ही पतीपत्नी आधुनिक आहोत व खुळचट परंपरा पाळत
नाही यासाठी आम्हाला प्रचंड त्रास सोसावा लागतो आहे.
येलेंगे पतीपत्नींची कथा खरोखर विचार करावयाला लावणारी आहे. ज्या कोकणातील
एका गावात, अण्णासाहेब कर्व्यांच्यावर विधवेशी विवाह केल्याबद्दल बहिष्कार टाकण्यात
आला होत, त्याच कोकणातील दुसर्या एका गावात आधुनिक आणि
सुधारणावादी आचरण केल्याने, 121 वर्षांनीही आज जर बहिष्कार
टाकला जात असेल तर भारतीय समाजात झाल्यासारखी दिसणारी सुधारणा वरवरची आणि बेगडी
असून हा समाज अजूनही तसाच परंपरावादी आणि अंधश्रद्धांच्या आधीन राहिलेला आहे असेच
म्हणावे लागेल.
18 जानेवारी 2015
