Tuesday, 16 December 2014

शरद पोर्णिमा


मनासारखा भरपूर पाऊस एकदा पावसाळ्यात पडून गेला की त्या नंतर येणारा शरद ऋतू मला अतिशय आवडतो. एखाद्या नववधू तरूणीच्या चेहर्‍यावर दिसणारे तेज तो आसमंतात भरतो. अजून झाडांची पानगळ सुरू झालेली नसते किंवा पानांचा हिरवा रंगही लुप्त झालेला नसतो. निळेशार आकाश, हिरवीगार वनराई आणि खाली सचैल न्हालेली धरती यामुळे शरद ऋतुमधील आसमंत अतिशय लोभसवाणे दिसत राहते. खरे तर अनंत चतुर्दशीला, गणपतींना पोचवल्यापासूनच, शरद ऋतूची चाहूल लागते. पण या नंतरचा पंधरवडा आपल्याकडे अशुभ मानला जातो. पितरांना जेवायला घालण्याची एक अजब रूढी आपल्याकडे याच दिवसात पाळली जाते.
सिंगापूरला राहिल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की साधारण याच दिवसात, चिनी लोकही याच प्रकारची एक रूढी पाळतात. मात्र पंधरवड्याऐवजी ते ही रुढी महिनाभर पाळतात. त्यांनी तर या महिन्याला ‘भुतांचा महिना’ (Month of the Ghosts) असेच नाव देऊन टाकलेले आहे. मात्र भटजीच्या मार्फत पितरांना जेवू घालण्याची रूढी त्यांच्यात नाही. पितरांना, खास चविष्ट पदार्थ, पैसे, मोटर गाड्या, दास-दासी या सारख्या ज्या ज्या गोष्टी हव्या असतील असे त्यांना वाटते, त्या त्या गोष्टींची चित्रे छापलेले कागद ते आणतात व एका घमेल्यात विस्तव पेटवून त्या अग्नीत हे छापलेले कागद टाकून अग्निदेवामार्फत या गोष्टी ते पितरांना पोचवतात. अगदी ‘नरकाच्या बॅंकेची’ (Bank of Hell) क्रेडिट कार्डे सुद्धा ते पितरांना या पद्धतीने पोचवत असतात.
अर्थात निसर्गाला या सगळयाशी काही देणे-घेणे नसते. तो शुभ अशुभ वगैरे काही मानत नाही. व यामुळेच या दिवसातील हवा मोठी शुभद आणि सुखद असते. मधूनच पडणारे ऊन आणि अधून मधून पडणारी पावसाची एखादी सर यामुळे वातावरण आल्हादकारक बनते. पण नंतर एखाद्या दिवशी एकदम उकडू व गदमदू लागते. दुपारी दक्षिणेकडून काळीकुट्ट झाकोळ येते व बघता बघता तुफान पाऊस सुरू होतो. हत्तीच्या पावलासारखा पडणारा हा पाऊस हस्त नक्षत्राच्या आगमनाचे शिंग वाजवतो. हस्त भरपूर पडले की पुढच्या पावसाळयापर्यंत पाऊस पडला नाही तरी चालते. एकदा का हस्ताचा पाऊस सुरू झाला की पुढच्या आठ पंधरा दिवसांची निश्चिंती असते. दिवसभर उकडहंडी आणि संध्याकाळी बदाबदा पाऊस या चक्रातून सुटका कधी होणार असे वाटू लागते. मग एकदम एके दिवशी सकाळी उठले की बाहेर सगळे धुरकट दिसू लागते. सगळा आसमंत धुक्याच्या दुलईत गुरफुटुन गेलेला असतो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाल्याची ती खूणगाठ असते. आकाश दोन तीन दिवसात परत निरभ्र होते व दिवसा जरी थोडेसे गरम वाटले तरी रात्री मोठया आल्हादकारक होतात. नुकताच पावसाळा संपल्याने हवेतील धुळीचे प्रमाण खूपच कमी असते. व यामुळे हे निरभ्र आकाश दिवसभर मोठे निळेशार व छान दिसते.
या दिवसात शरद पोर्णिमा किंवा कोजागिरी येते. या पोर्णिमेला दिसणारे चंद्राचे तेज परत काही वर्षभर दिसत नाही. याचे एक प्रमुख कारण या दिवसात हवेमधे धूळ अतिशय कमी असते हेच असावे असे मला वाटते. हवा शीतल असली तरी बोचणारी थंडी निदान पूर्व रात्री तरी कधी भासत नाही. या अशा सुंदर हवेत कोठेतरी मोकळ्या हवेत मित्र मैत्रिणींबरोबर जाऊन दोन चार तास गप्पा गोष्टी करण्याचा रिवाज आपल्याकडे आहे. अतिशय सुखद असा तो अनुभव असतो. याच वेळी चटकदार भेळ व मसालेदार दूध संगतीला असले तर या रात्रीची मजाही काही औरच वाटते.
शरद ऋतूमधील पोर्णिमेचा चंद्र आणि चांदणे प्रसिध्दच आहे पण याच दिवसात येणार्‍या कृष्ण पक्षांतील रात्री मला जास्त देखण्या वाटतात. काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त एकदा नाशिकला गेलो होतो. परत येताना रात्र झाली. सिन्नरच्या पुढे चंदनापुरी नावाचा एक घाट लागतो तो पार करून आम्ही घाटमाथ्यावर आलो होतो. चौफेर काळोखाचे साम्राज्य होते. नजर पोहोचेल तोपर्यंत कुठेही मिणमिणता दिवा सुध्दा दिसत नव्हता. अशा वेळी, सहज माझे लक्ष आकाशाकडे गेले. आकाश तेजाने नुसते लखलखत होते. गाडी थांबवून मी खाली उतरलो. आभाळात लक्ष लक्ष दीप पेटविले आहेत की काय असे भासत होते. इतके तेजोमय आकाश मी या पूर्वी कधीच बघितलेले नाही असे मला वाटत राहिले. अशा आभाळाचे वर्णन पी.सावळाराम या कवींनी आपल्या एका गीतात ‘ नक्षत्रांचा निळा चांदवा ‘ असे मोठे समर्पकपणे केले आहे. त्या रात्री आकाशाकडे बघत असताना गीतातील ती ओळ माझ्या डोक्यात इतकी भिनली होती की घरी परत येईपर्यंत तेच गीत मी गुणगुणत होतो.
तुम्ही पुण्यामधे रहात असलात तर या दिवसात पहाटे वेताळ टेकडीवर नक्की फिरायला जा. धुक्यात गुरफटलेली हिरवीगार वनराई व ओलसर जमिनीवर अजून हिरवे असलेले तृणांकूर यामधे अधून मधून डोकावणार्‍या खडकांवर बसून सूर्योदय बघणे म्हणजे एक पर्वणीच असते. निसर्गाची हीच तर गंमत आहे. तो न चुकता, ठरल्या वेळी अनंत करांनी सौंदर्याची उधळण करत राहतो. शरदातील रात्रींचा तेजोत्सव म्हणजे तर या नैसर्गिक सौंदर्याचा परमोच्च अविष्कार मला भासतो. शरद ऋतू म्हणजे वर्षातील सर्वोत्तम काल हे भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगून टाकले आहे.
अलीकडे एक दोन वेळा मी या अशाच कोजागिरी गप्पांना मी गेलो होतो. आपल्याकडे काही अनिष्ट चालीरिती रूढ होऊ पहात आहेत त्यातलीच एक रूढी सोशल ड्रिंकिंग ही आहे. त्या दिवशी कोजागिरीच्या गप्पांना मद्यार्काची साथ बघून मला त्या गप्पांचे संयोजन करणार्‍यांची कीव कराविशी वाटली. तुम्हाला ड्रिंक्स घेऊन सोशल गेटटूगेदर्स साजरी करायला बाकी वर्ष असतेच. या एका दिवशी तरी फक्त निसर्गाकडून तेजाची होणारी बरसात अंगावर घेऊन धुंद व्हावे असे मला वाटते.
अर्थात सौंदर्याची बरसात करणार्‍या निसर्गाला याचे काहीच सोयर-सुतक नसते. तो ही उधळण करतच राहतो. या सौंदर्याच्या बरसातीचा आस्वाद घ्यायचा की करंटेपणाने बाजूला उभे रहायचे हे प्रत्येकाने ठरवायचे असते.
11 ऑक्टोबर 2011.