Wednesday, 17 December 2014

कर्नाटक मधील समुद्र किनारे – एक फोटोब्लॉग


समुद्र किनारा म्हटला की आपल्याला साहजिकच प्रथम आठवतात ते कोकणचे किंवा गोव्याचे समुद्र किनारे. परंतु गोव्याच्या आणि कारवारच्याही दक्षिणेला काही अप्रतिम सुंदर समुद्र किनारे आहेत. या किनार्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे काशीद किंवा मुरूड सारखे व्यापारीकरण अजून झालेले नाही. त्यामुळे प्राकृतिक निसर्ग सौंदर्य भरपूर प्रमाणात पहायला मिळते.


गोकर्ण महाबळेश्वर मंदिराजवळ असलेला हा ओम किनारा. शेजारी असलेल्या खडकांच्या रांगानी अतिशय रमणीय दिसतो. गोव्या प्रमाणेच येथे परदेशी पाहुणे बरेच येतात.


हा मरवंथी किनारा! याचे वैशिष्ट्य म्हणजे या किनार्‍याला लागूनच सुपर्णिका नदी वाहते. रस्त्याच्या एका बाजूला मरवंथी किनार्‍याजवळच्या खुल्या समुद्रातले खारे पाणी तर दुसर्‍या बाजूला गोड्या पाण्याची नदी असे सहसा न आढळणारे चित्र येथे दिसते.

मरवंथी किनार्‍याला लागूनच असलेला हा ट्रासी किनारा! माडाची झाडे, हिरवळ व रुपेरी वाळू यांनी हा अतिशय निसर्गरम्य वाटतो.

अरबी समुद्रा लगतच बैन्दूर ही एक टेकडी आहे. या टेकडीवरून खाली बघितले की घनदाट वृक्षराजी व त्याच्या मागेच समुद्राच्या लाटा दिसतात.

बैन्दूर टेकडीवरून दिसणारा अरबी समुद्र व खाडी.

बैन्दूर टेकडीवर राहण्यासाठी बांधलेले घरकुल.

समुद्रस्नान किंवा नुसतेच डुंबणे यासाठी सर्वात सुरक्षित असलेला सोमेश्वर किनारा. याचा उतार इतका कमी आहे की समुद्राच्या आतपर्यंत बिनधास्त जाता येते.

मुरुडेश्वरचा किनारा; या किनार्‍याजवळ एक शंकराचे देऊळ व गोपूर आहे. शेजारील टेकडीवर शंकराची एक भली थोरली मूर्ती आहे.

मुरुडेश्वर किनार्‍यावरचा सूर्यास्त. नितांत रमणीय व निसर्ग सौंदर्य असलेले कर्नाटकाच्या समुद्र किनार्‍यांना एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
28 नोव्हेंबर 2011