Tuesday, 16 December 2014

वृषाकपि आणि मृग नक्षत्र

काही दिवसांपूर्वी श्वान दिन या नावाचे एक ब्लॉगपोस्ट मी प्रसिद्ध केले होते. त्यावेळेस कॅनिस मेजर तारका समूह व मृगशीर्ष नक्षत्र या संबंधी थोडी चर्चा झाली होती. त्या चर्चेत, मी ऋग्वेदात यासंबंधी एक ऋचा असल्याचे म्हटले होते. ही ऋचा 23 श्लोकांची आहे व समजण्यास अतिशय दुर्बोध आहे. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोकांचा विचार न करता त्याचा अनुवाद फक्त आपण बघूया. या ऋचेत इंद्र, त्याची पत्नी इंद्राणी, वृषाकपि नावाचे माकड व या वृषाकपिची पत्नी यांच्यातील संभाषणाचे वर्णन केलेले आहे. अगदी सरळ सरळ अर्थ घ्यायचा ठरवला तर हे संभाषण ग्राम्यतेकडे किंवा अश्लीलतेकडे झुकलेले आहे असे वाटेल. परंतु या संभाषणातून खरा अर्थ काय निघतो व लोकमान्य टिळकांनी यावरून काय निष्कर्ष काढले आहेत हे नंतर बघूया.
ऋग्वेद 10.86
1. इंद्राणी- (लोकांनी) सोमरस गाळणे बंद केले आहे व इंद्राला देव मानणेही त्यानी बंद केले आहे.
2. इंद्रा तुला प्राशन करण्यासाठी सोमरस कोठेही मिळणार नाही. तू या वृषाकपिचे नियमबाह्य वागणे कसे चालवून घेतो आहेस?
3. इंद्र- वृषाकपि या यकश्चित प्राण्याने तुझे असे काय वाकडे केले आहे की त्यामुळे तू त्याचा मत्सर करते आहेस व माझा शत्रू व त्याचा भक्त असलेल्यांनी दिलेले हविर्भाग तो उपभोगतो आहे याचाही तुला हेवा वाटतो आहे?
4. इंद्राणी- रानडुकराचा पाठलाग करून धापा टाकणार्‍या कुत्र्याने तू संरक्षण देत असलेल्या व तुझा लाडका असलेल्या या वृषाकपिचे कान चावावे.( असे मला वाटते आहे.)
5. या माकडाने मला अर्पण केल्या गेलेल्या सुबद्ध व मौल्यवान गोष्टी अपवित्र केल्या आहेत. मी त्याचा शिरच्छेद करून त्याला शिक्षा करणार आहे.
6. पुरुषांना सुख देऊ शकणारी व त्यासाठी आवश्यक अशी शरीरयष्टी असणारी माझ्यापेक्षा अधिक उत्तम अशी स्त्री नाही.
7. वृषाकपि - (उपरोधाने म्हणतो आहे- माते!) तुझ्या शरीराकडे बघून मी उद्दीपित होतो आहे.
8. इंद्र- तुझे बाहू व हस्त इतके सुंदर आहेत. तुझे केस इतके लांब आहेत व तुझे शरीर इतके सुडौल आहे. तू एका सर्वश्रेष्ठ योध्याची पत्नी आहेस. तू या वृषाकपिवर का टीका करते आहेस.?
9. इंद्राणी- हा सोंगाड्या मला कोणी पती नसल्याप्रमाणे, माझ्या मागे लागला आहे. परंतु हे सत्य आहे की माझा पती हा खराखुरा पुरुष आहे. मी इंद्राची पत्नी आहे व मरुत माझे सहकारी आहेत.
10. वृषाकपि- याच्या आधी या स्त्रीची, ती कोणत्याही उत्सव प्रसंगी व सार्वजनिक स्थळी गेली की ती इंद्राची पत्नी असल्यामुळे सर्व गोष्टी सुरळीत घडवून आणेल असे सांगून लोक तिची स्तुती करत असत.
11. वृषाकपि पत्नी- इंद्राणी ही सर्वात नशीबवान स्त्री आहे. मी असे ऐकले आहे की तिचा पती वृद्धत्वाने कधीच मरणार नाही.
12. इंद्र- वृषाकपि सहवासात असल्याशिवाय मी कधीच आनंदी असू शकत नाही कारण त्याच्या कडून मिळणारे अर्ध्य थेट देवांपर्यत पोचते व ते सुखी पावतात.
13. वृषाकपि पत्नी- तू धनवान आहेस तुला पुत्ररत्ने व स्नुषा आहेत. इंद्र त्याला हविर्भाग म्हणून दिलेले बैल खाऊ शकतो व अत्यंत शक्तीमान आणि आनंदमय असे अर्ध्यही स्वीकारू शकतो.
14. इंद्र- तू माझ्यासाठी 20 बैलांचे मांस शिजवले आहेस; ते व चरबी खाल्याने माझ्या पोटाचे दोन्ही भाग भरून मी तृप्त झालो आहे.
15. वृषाकपि पत्नी- अनेक गाईंच्या कळपातील व अणकुचीदार शिंगे असलेल्या एकुलत्या एक बैला प्रमाणे इंद्रा तू आहेस. या मिश्रणामुळे तुला सौख्य प्राप्त होईल व तू ताजातवाना होशील.
16. श्लोक फारच अश्लील व मुद्याला सोडून आहे.
17. श्लोक फारच अश्लील व मुद्याला सोडून आहे.
18. इंद्र- या वृषाकपिला एक वध केलेले रान डुक्कर, तलवार, टोपली, एक पात्र व जळाऊ लाकडाने भरलेली एक हातगाडी सापडली आहे.
19. इंद्र - मी आता पुढे येऊन शोध घेतो आहे की ही व्यक्ती आदरणीय सहकारी आहे का शत्रूचा गुलाम आहे. कारण मला एका तज्ञाची गरज आहे. या व्यक्तीने बनवलेले एक साधे पेय मी घेतो आहे.
20. वाळवंट व सुपीक जमीन यात किती अंतर आहे हे मला सांगशील का? हे वृषाकपि तू माझ्या गृहाच्या जवळ ये.
21. इंद्राणी- निद्रानाश करणार्‍या वृषाकपि, तू घराच्या मार्गावर परत ये. म्हणजे आपल्यातील कलह संपेल.
22. कवी- वृषाकपि तू उत्तरेला असलेल्या तुझ्या घरी गेलास तेंव्हा अनेक पापे रिचवलेला तो महाभयानक हिंस्त्र पशू कोठे गेला? लोकांचे नेतृत्व करणारा तो इंद्र कोठे गेला?
23. मुद्याला सोडून श्लोक आहे.
या ऋचेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणत्याही व्यक्तीचे डोके हे करताना गरगरू लागेल असे मला वाटते इतकी ती विचित्र आहे. परंतु विद्वानांनी या ऋचेचे अनेक अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी अगदी तळागाळातील अर्थ व लोकमान्य टिळकांनी लावलेला अर्थ हेच फक्त आपण पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वृषाकपि हे शरद ऋतू कालीन सूर्याचे नाव आहे व तो इंद्राचा मित्र आहे.
अगदी तळागाळाच्या पातळीवर जर या ऋचेचा अर्थ लावला तर तो असा सांगता येतो. ही ऋचा म्हणजे चार व्यक्तींमधील व ग्राम्य भाषेतील वर्णन असलेला हा एक कलह आहे. प्रथम इंद्राणी आपल्या पतीचे लाडके असणार्‍या, वृषाकपि या माकडाने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करते आहे. या नंतर इंद्र तिची स्तुती करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे. या नंतर वृषाकपि पत्नी तिची स्तुती करते आहे व अतिशय ग्राम्य अशा भाषेत ती व तिचा पती यांचे संबंध कसे आहेत या संबंधी सांगते आहे. ती इंद्राणीला खात्री देते आहे की वृषाकपि तिच्याकडे कधीच वाकड्या नजरेने बघणार नाही व या पूर्वी जर त्याने असा काही प्रयत्न केला असला तरी याच्या पुढे तो कधीच करणार नाही.. शेवटी इंद्राणी आपला राग सोडून देते व वृषाकपि व त्याची पत्नी यांना मार्गक्रमण करण्याची परवानगी देते.
लोकमान्यांनी या ऋचेचा अर्थ सांगताना यातील काही दुर्बोध अशा गोष्टींची तारका समूहांशी सांगड घातली आहे. कॅनिस मेजर तारका समुहाचा उल्लेख या ऋचेत कुत्रा असा आला आहे तर मृग नक्षत्राला रान डुक्कर, हिंस्त्र पशू असे म्हटलेले आहे. या ऋचेत अशीही कल्पना आहे की शरद कालीन सूर्य हा मृग नक्षत्राचे रूप घेऊन आला आहे. लोकमान्यांनी सांगितलेला या ऋचेचा अर्थ असा आहे.
इंद्राचे घर उत्तरेला असताना हा वृषाकपि खाली (दक्षिणेला) नाहीसा झाला आहे व त्याने मृगाचे रूप धारण केले आहे. सूर्य दक्षिणेला गेल्याने आर्यांनी इंद्राला हविर्भाग देणे व सोमरस गाळणे बंद केले आहे. त्यामुळे इंद्राणी संतप्त होऊन तिने मृग बनलेल्या वृषाकपिचे डोके उडवून, कुत्र्याने त्याचे कान खावे म्हणून त्याला सोडले आहे. इंद्र आपल्या मित्राला इंद्राणीने अशी वागणूक देऊ नये म्हणून विनवतो व तिची स्तुती करतो. इंद्राणी ते मान्य करते. इंद्र व इंद्राणी, सूर्याची त्याने परत उत्तरेला यावे म्हणून विनवणी करतात.”
लोकमान्यांच्या मताने या ऋचेत काही अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
1.सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला गेल्याने आर्यांचे बंद झालेले हविर्भाग.
2. शरद काली रात्री आकाशात मृग नक्षत्र दिसते आहे. म्हणजेच त्याच्या सहा महिने, आधी वसंत संपाताच्यावेळी, सूर्य मृगनक्षत्रासमोर आहे.
3. व्याध तार्‍याला व्याध न म्हणता इंद्राणी कुत्रा म्हणते आहे. या नक्षत्राचे युरोपियन नाव कुत्रा हेच ( Canine Major) आहे.
4. सूर्य परत विषुव वृत्ताच्या उत्तरेला आल्यावर, आर्यांचे सुरू होणारे हविर्भाग.
ऋग्वेद हा समजण्यास अत्यंत दुर्बोध असा ग्रंथ आहे असे का म्हणतात हे या उदाहरणावरून चांगलेच लक्षात येते. मात्र लोकमान्यांनी ज्या पद्धतीने या ऋचेचा अर्थ लावला आहे त्यावरून त्यांचा व्यासंग किती दांडगा होता याचीही चांगलीच कल्पना येऊ शकते.
6 ऑक्टोबर 2011