Sunday, 7 December 2014

गायीचे उड्डाण व इतर सुरस आणि चमत्कारिक कथा


माझ्या नातीच्या बडबड गाण्यांच्या(Nursery Rhymes) एका पुस्तकात एक बडबड गाणे आहे.
Hey diddle diddle,
The Cat and the fiddle,
The Cow jumped over the moon,
The little Dog laughed to see such sport,
And the Dish ran away with the Spoon.
या गाण्याच्या शेजारी चंद्रावरून उड्डाण करणार्‍या एका गाईचे चित्र छापलेले आहे. माझ्या नातीची मधून मधून ऑर्डर येते की हे पुस्तक वाचून दाखव म्हणून. या प्रत्येक वेळी मला असे वाटते की हे गाणे म्हणजे मानवी कल्पनाशक्तीची मर्यादा असावी. गाय हा प्राणी जास्तीत जास्त एखादा पाय वगैरे उचलत असावा. गाईने उडी मारली असे कोणी सांगितले तर काय लोणकढी मारतो आहे असेच बहुदा सगळ्यांना वाटेल. त्यामुळे गाईच्या उड्डाणाबद्दल काही लिहिले तर ती एक सुरस व चमत्कारिक कथा असल्याचेच सर्वांना वाटेल, अगदी अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथांसारखी! यात मला तरी तिळमात्रही शंका वाटत नाही.
त्यामुळेच, जर्मनी मधल्या बव्हेरिया प्रांतातील, लाऊफेन (Laufen) या गावातल्या एका शेतकर्‍याची मुलगी रेजिना मायर (Regina Mayer) आणि तिची गाय यांची गोष्ट जेंव्हा मी वाचली तेंव्हा माझा काही त्यावर विश्वास बसला नाही आणि वाचकांचाही सुरूवातीस बसेल असे मला वाटत नाही.
ही सगळी कथा सुरू झाली रेजिनाच्या नवव्या वाढदिवसापासून! आपल्या वाढदिवसाचे प्रेझेंट म्हणून आपल्या आई-वडीलांनी आपल्याला एक घोडा आणावा अशी या रेजिनाची अतिशय इच्छा होती. पण तिच्या आई-वडीलांनी त्याला चक्क नकार दिला. रेजिनाची साहजिकच खूप निराशा झाली. त्यावेळी रेजिनाला लिलीया नावाचे एक गाईचे पारडू वडिलांनी दिले होते. रेजिनाने असे ठरवून टाकले की लिलीला घोड्यासारखे शिकवायचे. अर्थातच रेजिनाचे सर्व प्रयत्न पूर्णपणे वाया गेले. ‘लिलीने कोणतेही शिक्षण घेण्याचे नाकारले व आपला गायपणा पूर्ण सिद्ध केला.
लिलीला शिक्षण देण्याचे आपले सर्व प्रयत्न संपूर्ण फसले आहेत हे लक्षात आल्यावरही रेजिनाने आपला गाईला शिक्षण देण्याचा हेका काही सोडला नाही. मायर कुटुंबाच्या गोठ्यात, 2 वर्षे वयाची व ल्यूना (Luna) नावाची एक गाय आहे. रेजिनाने मग तिच्याकडे आपला मोर्चा हलवला. ही ल्यूना गाय पहिल्यापासूनच जरा निराळीच होती. तिने रेजिनाला सहकार्य द्यायला सुरूवात केली. रेजिनाने तिच्या पाठीवर घोड्याचे खोगीर चढवले व तिच्या पाठीवर बसून स्वारी करायला सुरूवात केली. आता ल्यूना गाईला “go,” “stand” or “gallop” या सारख्या सूचना समजू लागल्या आहेत अर्थात यासाठी तिचा मूड असावा लागतो ही गोष्ट वेगळी.


काही दिवसांनंतर रेजिनाला गाईच्या पाठीवर बसून नुसते इकडे तिकडे फिरण्याचा कंटाळा आला व तिने छोटे छोटे अडथळे कसे पार करायचे हे ल्यूना गाईला शिकवायला सुरूवात केली. ल्यूनाने हे कसब लवकरच आत्मसात केले व त्यानंतर ती अडथळ्यांवरून उड्याही मारायला शिकली. रेजिनाला या उडीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक हालचाल तिला दाखवायला लागली व प्रत्येक हालचाल तिने शिकावी म्हणून गाजरे व साखर यांची लाच द्यावी लागली. आज ल्यूना 3 फूटापर्यंतच्या अडथळ्यांवरून सहजपणे उडी मारू शकते.
रेजिनाच्या मताने, ल्यूनाला आपण घोडाच आहोत असे वाटते कारण ती सतत इतर घोड्यांच्या मागे मागे असते. मात्र इतर घोड्यांना ती फारशी आवडत असल्याचे दिसत नाही. गोठ्यातल्या इतर गाईंनाही ल्यूना आवडत नाही आणि त्या गाई तिला मधून मधून लाथांचा खुराक देत असतात.
स्वित्झर्लंडमधल्या झुरिच शहराजवळ असलेल्या Adliswil या गावामधे गाईंना शिक्षण देण्यासाठी एक गाईंची शाळाआहे. या शाळेत गाईंना उड्या मारणे, जमिनीवर गुंडाळून ठेवलेली जाजमे आपल्या नाकाने सरळ करणे वगैरे सारखी बारीकसारीक कामे शिकवली जातात. रेजिनाने या शाळेला फोन करून, ल्यूनाने अडथळे ओलांडण्यासाठी उड्या मारणे वगैरे हे तिच्यासाठी धोकादायका नाही ना? हे विचारून घेतले आहे. तसेच ल्यूनाच्या पशु वैद्याने गाईंनी उड्या मारण्यात काहीही धोकादायक नाही हे मान्य केले आहे.


रेजिनाच्या मित्र-मैत्रिणींनी प्रथम रेजिनाच्या या चमत्कारिक छंदाबद्दल तिची बरीच चेष्टा मस्करी केली होती. आता मात्र ल्यूनावर स्वारी करण्यासाठी सगळ्यांची चढाओढ असते. रेजिनाची चिकाटी बघून शेवटी तिच्या वडिलांनी आता तिच्यासाठी एक घोडा खरेदी करावयाचे ठरवले आहे.
यापुढे केंव्हाही माझ्या नातीला मी हे डिडल डिडल!’ हे बडबडगाणे वाचून दाखवीन, त्यावेळी मला रेजिना आणि तिची ल्यूना गाय नक्की आठवतील. अगदी चंद्रावरून नसले तरी पृथ्वीवर केलेले तिचे उड्डाण लक्षात राहण्यासारखे खचित आहे.
19 एप्रिल 2011