Wednesday, 10 December 2014

एक नवीन फ्रॉड- हिलसा फिश स्कॅम



सध्याचे युग हे गैरव्यवहारांचे युग आहे असे म्हटले तरी चालेल. टू- जी स्कॅम, कॉमनवेल्थ खेळ फ्रॉड, आदर्श सोसायटी फ्रॉड यासारखे असंख्य गैरव्यवहार मागच्या एक वर्षात उघडकीस आले आहेत. माझी आपली पूर्वी एक समजूत होती. अर्थात ती अगदीच बालिश होती हे आता या सगळ्या गैरव्यवहारांवरून सिद्ध झालेच आहे. मला वाटायचे की फ्रॉड हा प्रकार फक्त बॅन्क व्यवहारांच्यातच केला जातो. आता माझ्या लक्षात आले आहे की प्रयत्न केला तर तो कोठेही केला जाऊ शकतो.

या फ्रॉड किंवा स्कॅम सारखाच एक प्रकार म्हणजे भेसळ.; पूर्वी हळदीत किंवा तिखटात रंगाची पूड मिसळणे, धान्यात बारक्या गारगोट्या किंवा खडे मिसळणे वगैरे किरकोळ प्रकार चालत असत. अजूनही कांदे बटाटा यांची वजने ते ओले असताना वाढत असल्याने ते ओले असतानाच विकले जातात असे म्हणतात. खरे खोटे ते या मालाच्या व्यापार्‍यांनाच ठाऊक. आता एक नवीनच भेसळीचा प्रकार उघडकीस आला आहे. तो म्हणजे माशांमधली भेसळ. आता तुम्हा म्हणाल की माशांच्यात कशी काय भेसळ करता येईल? पण ती सुद्धा करता येते. आपल्या बांगला देशी बांधवांनी ही भेसळ कशी करायची याचा अगदी आदर्श नमुनाच आपल्याला आखून दिला आहे.
भारताच्या पूर्व भागात असलेल्या मोठमोठ्या नद्यांच्यात भरपूर मासे सापडत असल्याने या भागातील जनतेच्या आहारात साहजिकच मत्स्य किंवा मासे हे भरपूर प्रमाणात असतात. बांगला देशातील पद्मा नदीत सापडणारा हिलसा हा मासा असाच अतिशय लोकप्रिय मासा आहे. बांगला देशाची, भारताला व पश्चिम युरोपला होणारी, या माशांची निर्यात खूप मोठी आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी गंमतीने या माशाच्या चविष्टपणाचे वर्णन करताना, हा मासा जर आपल्याला रोज मिळणार असेल तर आपण आपला शाकाहारी आहार सुद्धा सोडून द्यायला तयार आहोत, असेही आपल्या बांगला देशच्या भेटीमध्ये नुकतेच सांगितले आहे. भारतातल्या गंगा किंवा इतर नद्यांच्यात सुद्धा हा मासा विपुल प्रमाणात मिळत असे. मात्र या नद्यांच्यातील प्रदुषणामुळे हा मासा आता कमी कमी उपलब्ध होऊ लागला आहे. भारतीय बाजारांच्यात हिलसा माशांना मागणी तर आहे पण बांगला देशी नद्यांत तर मासे नाहीत. अशा परिस्थितीत, भारताला हिलसा मासे निर्यात करण्यासाठी बांगला देशी व्यापार्‍यांनी एक ट्रिक आता शोधून काढली आहे. ते हिलसा मासे चक्क ब्रम्हदेशाकडून आयात करतात व हेच मासे भारताला निर्यात करून टाकतात.
मात्र भारतीय मत्स्य रसिकांना याने काहीच फरक पडत नसल्याने हिलसा मासे मिळत आहेत ना? मग ते बांगला देशी असोत किंवा ब्रम्हदेशी असोत अशीच त्यांची मनोधारणा आहे.
मात्र आता एक नवीनच हिलसा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बांगला देश मधल्या बरिसाल या शहरात राहणार्‍या व येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या मश्रफ उल-इस्लाम शौकत या विद्यार्थ्याने हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. या विद्यार्थ्याने नुकतेच बरिसाल फिश मार्केट मधून 6 हिलसा मासे खरेदी केले होते व त्याचे तुकडे करून घेण्यासाठी दुसर्‍या एका माणसाला दिले होते. या माणसाला माशांचे तुकडे करताना असे आढळले की या 6 पैकी एका माशाच्या पोटात 20 तर दुसर्‍या माशाच्या पोटात 15 काचेच्या गोट्या भरण्यात आल्या होत्या. बरिसाल फिश मार्केट मध्ये हा मासा सध्या 400 रुपये प्रति किलो दराने विकला जातो आहे. परंतु मासा जार आकाराने मोठा असला म्हणजे त्याचे वजन 1 किलोपेक्षा जास्त असले तर त्या माशाला दुपटीने भाव मिळतो. शौकतला प्रथम असे वाटले की या माशाने कदाचित काचेच्या गोट्या गिळल्या असतील. परंतु एवढ्या प्रमाणात गोट्या मिळाल्याने त्याच्या लक्षात आले की आपल्याला फसवण्यात आले आहे. हे लक्षात आल्यावर शौकतने त्या मासेविक्रेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो बाजारातून गायब झाल्याचे शौकतच्या लक्षात आल्यावर, त्याने बरिसाल फिश ट्रेडर्स असोसिअशन कडे आपली तक्रार नोंदवली.
बांगला देशात किंवा पश्चिम बंगालसह संपूर्ण बंगालमधेच मासे हा फार जिव्हाळ्याचा व नाजूक विषय आहे. त्यामुळेच बांगला देशामधील माशांच्या गुणवत्तेत भेसळ, हा प्रकार बांगला देशी मासे विक्रेत्यांच्या अगदी जिव्हाळी लागल्या सारखा झाला आहे. त्यामुळे बरिसाल फिश ट्रेडर्स असोसिएशनचे निझाम हुसेन टुटुल यांनी आपल्या असोसिअशनच्या एका सभासदाने, स्वत:चा नफा वाढवण्यासाठी, हा गैरव्यवहार केल्याबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांच्या मते हा मासे विक्रेता आता गायब आहे. मात्र शौकत म्हणतो की गोट्या काढून टाकल्यावरही हा मासा खाताना पाहिजे तसाच रुचकर लागला आहे.
या मासे विक्रेत्यासारखे अनेक विक्रेते भारतात आहेतच. त्यांना अगदी सहज रित्या अनुकरण करून आपला नफा वाढवता येण्यासारखा आहे हा स्कॅम.
16 सप्टेंबर 2011