Saturday, 29 November 2014

एका सर्पवेड्याची कहाणी


जर्मनीमधे म्युलहाईम या गावात रहाणार्‍या केव्हिन ओ या 19 वर्षांच्या तरुणाला सापांचे अतिशय वेड आहे. त्यामुळे त्याने एक साप स्वत:चा पेट म्हणून घरी आणण्याचे ठरवले. या साठी त्याने जो साप निवडला तो अतिशय विषारी असा समजला जाणारा नाग होता. एका आठवड्यापूर्वी केव्हिनने एक नागाचे पिल्लू स्वत:च्या घरी आणले व त्याच्यासाठी खास बनवलेल्या काचांच्या घरात त्याला ठेवले. या काचेच्या घराला थंडीपासून बचावासाठी ऊब देणारी यंत्रणाही त्याने बसवली होती.
परंतु थोड्याच काळात केव्हिनच्या हे लक्षात आले की आपण आणलेले हे नागाचे पिल्लू, त्याच्यासाठी बनवलेल्या खास घरातून नाहीसा झाले आहे व सर्प घर पूर्ण रिकामे आहे. हे लक्षात आल्याबरोबर केव्हिनचे धाबे अक्षरश: दणाणले. त्याने ताबडतोब अधिकार्‍यांशी संपर्क साधला. यानंतर सुरू झाला,जर्मनीच्या इतिहासातला सर्वात जास्ती काळ चाललेला व सर्वात महाग असा सर्पशोध.


अग्निशामक दलाच्या लोकांनी केव्हिनच्या तिसर्‍या मजल्यावरच्या सदनिकेचे छत, भिंती व पायपोशी प्रथम पाडून टाकली. तरीही नागराज सापडलेच नाहीत. त्यामुळे नंतर खालच्या दोन मजल्यावर शोध सुरू झाला. जमिनीवरचे कार्पेट कापून काढण्यात आले व पायपोशीवर सगळीकडे नागाच्या खुणा दिसाव्यात म्हणून पीठ पसरण्यात आले व नाग चिकटून बसेल या कल्पनेने सगळीकडे चिकटपट्या लावण्यात आल्या. अगदी कानाकोपर्‍यात हे नागाचे पिल्लू लपले आहे का हे बघण्यासाठी सगळीकडे टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.


या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही व नागाचे पिल्लू काही सापडले नाही. शेवटी शोध बंद करण्यात आला. आता त्या घरात राहणार्‍या सर्वांना किमान दोन महिने तरी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यास सांगून अधिकार्‍यांनी केव्हिनचे घर सीलबंद करून ठेवले आहे. सध्या जर्मनीत अतिशय थंडी असल्याने हा नाग घराच्या बाहेर पडण्याचे धाडस करणार नाही असे अधिकार्‍यांना वाटते. नाग कित्येक दिवस अन्नपाण्याशिवाय जिवंत राहू शकतात. सहा आठवड्यात हे नागाचे पिल्लू उपासमारीने मरून जाईल असा अधिकार्‍यांचा अंदाज असल्याने त्यांनी घर 2 महिने सीलबंद केले आहे.
केव्हिनला मात्र त्याचा हा पाळलेला साप फारच महाग पडणार आहे. अग्निशामक दलाने त्याच्याकडे 40000 यूरोची (24 लाख रुपये) मागणी केली आहे. याशिवाय ते घर उखडण्याचे काम ज्या बांधकाम करणार्‍या कंपनीने केले त्या कंपनीचे बिल केव्हिनला द्यावे लागणार आहे. केव्हिनचा घरमालक व खाली रहाणारे दोन दुसरे भाडेकरू यांना शांत करण्यासाठी केव्हिनला अतिरिक्त बराच खर्च येईल असा अंदाज आहे. अग्निशामक दलाच्या एका अधिकार्‍याच्या मते हे नागाचे पिल्लू शंभर वर्षे शोध घेतला तरी सापडेल असे वाटत नाही.
विषारी नागाला घरी आणून पाळण्याचा तद्दन मूर्खपणा करणार्‍या केव्हिनला त्याच्या मूर्खपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली आहे हे मात्र खरे.
30 मार्च 2010