Saturday, 29 November 2014

आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक


बुधवारी सकाळी आइसलॅन्डमधल्या एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. मागच्या महिन्याच्या मानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून देण्याची तीव्रता इतकी अधिक आहे की या राखेचा ढग अंदाजे 20000 फूट उंचीवरून आग्नेय दिशेला पसरत चालला आहे. वार्‍याची दिशा हीच असल्याने, अमेरिका खंड या राखेच्या ढगापासून वाचले असले तरी हा ढग युरोपवर पसरला आहे. त्यामुळे युरोपवरची विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. अर्थात हे सगळे तात्पुरते परिणाम आहेत. दोन चार दिवसानंतर हा ढग विखुरला की उड्डाणे पुन्हा पूर्ववत होतील अशी आशा आहे.

या ज्वालामुखीचा याच तीव्रतेचा उद्रेक, याच्या आधी डिसेंबर 1821मधे झाला होता व तो जानेवारी 1823 पर्यंत चालू राहिला होता. या वेळेस जर मागच्या वेळेची पुनरावृत्ती झाली तर मात्र युरोप मधला विमान उद्योग मोठ्याच संकटात सापडू शकतो. असे जरी असले तरी शास्त्रज्ञांना वाटणारी खरी भिती काही निराळीच आहे.

एव्हलूब हा ज्वालामुखी आइसलॅन्डमधल्या इतर ज्वालामुखींच्या मानाने बच्चा ज्वालामुखी समजला जातो. या देशात असलेल्या सुमारे 35 ज्वालामुखीमध्ये हेकला ‘(Hekla), ‘ काटला ‘(Katla) ग्रिम्स्व्होट्न ‘(Grimsvotn) हे तीन ज्वालामुखी, बडे किंवा दादा ज्वालामुखी समजले जातात. या तीन बड्या ज्वालामुखींपैकी काटला या ज्वालामुखीची भिती आइसलॅन्ड मधल्या नागरिकांना सर्वात अधिक वाटते. या ज्वालामुखीचे मुख साधारण 10 किलोमीटर व्यासाचे आहे व तो 5000 फूट उंचीवर असल्याने या ज्वालामुखीच्या उद्रेकात, महाप्रचंड पूर येऊ शकतात. 1918 मधे या ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. सध्या या ज्वालामुखीच्या मुखावरून हिमनद वहात असल्याने, बर्फाच्या मोठ्या जाडीच्या थरांनी हे मुख, बूच बसवल्यासारखे बंद केले गेले आहे. ‘एव्हलूक काटला हे दोन्ही ज्वालामुखी एकमेकाजवळच आहेत.

बुधवारच्या एव्हलूब च्या उद्रेकाने, शास्त्रज्ञाना खरी भिती अशी वाटते आहे की हा उद्रेक जर बराच काल चालू राहिला तर या ज्वालामुखीतून वहात असलेल्या लाव्हा रसामुळे, ‘ काटला ज्वालामुखीच्या मुखावरचे, बर्फाचे बूच वितळून जाईल व या ज्वालामुखीचा मोठा विस्फोट होऊन लाखो टन राख आकाशात फेकली जाईल. 1991 मधे फिलिपाईन्स देशातल्या पिनाट्यूबो ज्वालामुखीने दोन दिवसात पृथ्वीपासून 70000 फूट अंतर उंचीपर्यंत राख फेकली होती व त्यामुळे जगभरातले तपमान 0.4 डिग्री सेल्सियसने कमी झाले होते.

त्याच हिशोबाने काटला ज्वालामुखीचा उद्रेक, जगाला डीप फ्रीझ मधे टाकू शकतो. अठराव्या शतकात जेंव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता तेंव्हा संपूर्ण अमेरिका खंडाला अतिशय तीव्र असा शीतकाल सहन करावा लागला होता. अमेरिकेतील मिसिसिपी नदी, न्यू ऑर्लिन्स या शहराजवळ मेक्सिकोच्या आखाताला मिळते. या न्यू ऑर्लिन्स शहराच्या थोड्या उत्तरेला असलेल्या स्थानापर्यंत मिसिसिपी नदी या शीत कालात गोठली होती. जर काटला ज्व्वालामुखीचा परत उद्रेक झाला तर जगाला फार मोठ्या प्रमाणात हवामानातले बदल सहन करावे लागतील यात शंकाच नाही.
सध्या तरी एव्हलूब ज्वालामुखीवर लक्ष ठेवून रहाणे एवढेच शास्त्रज्ञ करू शकतात.
16 एप्रिल 2010