1971 मधे मी माझ्या मुंबईमधल्या नोकरीचा राजीनामा दिला व पुण्यामधल्या एका प्रसिद्ध वाहन उद्योगाच्या, इंजिनियरिंग संशोधन केंद्रात, अभियंता म्हणून माझी नेमणूक झाली. ही कंपनी, वाहने बनवणारी असल्याने, त्यांचे
पुण्यातले संशोधन केंद्र हे मुख्यत्वे कंपनीच्या वाहनांच्यात वापरण्यात
येणार्या भागांचा टिकाऊपणा व विश्वासार्हता कसा सुधारता येईल यावर काम करत
असे. हे
सर्व काम मेकॅनिकल अभियंत्यांचे असल्याने माझ्यासारखा इलेक्ट्रॉनिक्स
अभियंता तेथे काय करणार असा प्रश्न माझ्यासकट कंपनीतल्या इतर
अभियंत्यांनाही पडला होता.
आमच्या इंजिनियरिंग संशोधन केंद्राचे प्रमुख संचालक हे मोठे उत्साही व नवीन कल्पना अंमलात आणणारे गृहस्थ होते. त्यांनी परदेशातील वाहन उद्योगात बरीच वर्षे घालवली होती. कंपनीच्या वाहनांचे, ब्रेक, इंजिन, गिअर बॉक्स यासारखे भाग अचूकपणे कार्य करत आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी, आमच्या संशोधन केंद्रात, चाचणी यंत्रे बनवून घेतली जात असत व हे सुटे भाग या चाचणी यंत्रांवर बसवून, त्यांची सतत चाचणी घेण्याचे कार्य चालत असे. अशा प्रकारच्या चाचणी यंत्रांच्यावर, परदेशात इलेक्ट्रॉनिक मापन उपकरणे बसवलेली आमच्या संचालकांनी बघितलेली असल्याने, त्याच प्रकारची उपकरणे आपण विकसित करून वापरावीत असा त्यांचा मला नोकरीवर घेण्यातला उद्देश होता.
आमच्या संशोधन केंद्रात इलेक्ट्रॉनिक्स संबंधी काहीच कार्य चालत नसल्याने मला परत एकदा शून्यातून आरंभ करण्याची जबाबदारी आली. या कंपनीत आणखी एक अडचण अशी होती की माझ्या डोक्यावर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय हे जाणणारे कोणीच बॉस नव्हते व त्यामुळे बरेचसे स्वातंत्र्य मिळत असले तरी प्रत्येक गोष्ट व्यवस्थापनाला पटवून द्यावी लागे. पुढच्या दीड दोन वर्षांत मी आणि माझ्यानंतर आलेले आणखी काही अभियंते यांनी मिळून आमच्या संशोधन केंद्रातला इलेक्ट्रॉनिक्स विभाग बराच नावारूपाला आणला. चाचणी यंत्रांच्यावर बसवता येतील अशी काही मापन उपकरणे आम्ही विकसित केली.
सर्व मोठ्या कंपन्यांच्यात, माहिती प्रसृत करण्याच्या अधिकृत यंत्रणेबरोबरच, अफवा पसरवण्याचीही एक यंत्रणा नेहमीच कार्यरत असते. या यंत्रणेतून अशा बातम्या कानावर येत होत्या की आमच्या संचालक साहेबांचे, हेड ऑफिस बरोबरचे संबंध पाहिजे तसे सुरळीत राहिले नव्हते. अर्थात आम्ही सर्व इतक्या कनिष्ठ पातळीवर होतो की याच्याशी आमचा तसा काहीच संबंध नव्हता. याच वेळी एक दिवस मला संचालकांच्या स्वीय सहाय्यकांचा फोन आला. दुसर्या दिवशी साहेबांच्या बरोबर माझी मीटींग ठरली होती. मी रात्रभर जरा अस्वस्थच होतो. संचालक साहेबांना प्रत्यक्ष माझ्याबरोबर काय काम असावे बरे? या विचाराने. दुसर्या दिवशी संचालक साहेबांनी मला त्यांच्या डोक्यातली एक कल्पना सांगितली. ते नुकतेच युरोपला जाऊन आलेले होते. त्या ठिकाणी त्यांनी डिजिटल घड्याळ बघितले होते. तसे घड्याळ आपण आपल्या संशोधन केंद्रात बनवून कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरांना भेट देऊ शकतो का? असे त्यांना मला विचारायचे होते. मी त्या वेळेपर्यंत असे घड्याळ कधी बघितलेलेही नव्हते व ते कसे बनवायचे याची सुतराम कल्पना मला नव्हती. पण माझ्या डोक्यात काय झाले कोणास ठाऊक! मी “आपण असे घड्याळ बनवू व ते 3 महिन्यात मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना देऊ”, असे छातीठोकपणे आमच्या संचालक साहेबांना सांगितले.
साहेबांचा प्रत्यक्ष प्रकल्प असल्याने कोणत्याही लाल फितीत तो प्रकल्प अडकणे शक्यच नव्हते. स्वत: परचेस मॅनेजर माझ्या मदतीला काय सुटे भाग लागतील ते आणून देण्यास जातीने तयार होते. लायब्ररीत शोधाशोध, मुंबईच्या तीन चार खेपा, माझ्या जुन्या सहकार्यांबरोबर चर्चा या सगळ्यातून हे घड्याळ कसे करायचे याचा आराखडा तयार झाला व मी आणि माझे दोन सहाय्यक या कामाला लागलो. या घड्याळात वापरण्यासाठीची इलेक्ट्रॉनिक सर्किट्स टेबलावर प्रायोगिक स्वरूपात चालू लागली. काही महत्वाचे भाग बंगलुरू मधल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स मधून आणण्यात आमच्या परचेस मॅनेजरांना यश मिळाले. त्या काळात सध्या वापरतात तशी इंटिग्रेटेड सर्किट्स भारतात मिळत नसल्याने आम्ही साधे ट्रांझिस्टर्स वापरूनच हे घड्याळ बनवायाचे ठरवले.
हळू हळू या घड्याळाचे प्रिंटेड सर्किट बोर्डस तयार झाले. त्याच्यासाठी एक छान पॉलिश केलेली लाकडी पेटी आमच्या संचालक साहेबांनी खास तयार करून घेतली. शेवटचे पंधरा दिवस सकाळी 6 वाजता सुरू होणार्या पहिल्या पाळीला सुरवात करून रात्री दहा, बारा वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो. मला दिलेल्या डेड लाईनच्या तब्बल 3 दिवस आधी, ते घड्याळ पूर्ण करून आम्ही ते संचालक साहेबांच्या केबिन मधे चाचणीसाठी ठेवण्यास दिले.
या मधल्या काळात आणखी एक प्रकल्प आमच्या संशोधन केंद्रात जोरात चालू होता. आमच्या मॅनेजिंग डिरेक्टर साहेबांना, कॅम्पिंगला जाण्याचा शोक होता. त्यांच्यासाठी रेफ्रिजरेटर, गॅस वगैरेने युक्त अशी एक कॅम्पिंग बस बनवण्यात आली होती व त्याच्याही चाचण्या चालू होत्या. आणखी एक आठवड्याभराने ही बस व माझे घड्याळ या दोन्ही गोष्टी घेउन आमचे संचालक साहेब हेड ऑफिसला गेल्याचे मला एका अफवेप्रमाणे समजले. माझा या प्रकल्पातला सहभाग संपल्यामुळे मला त्यात आता फारसा रस उरला नव्हता. काही दिवसांनी संचालक साहेबांनी एका मीटींगमधे ते घड्याळ मोठ्या साहेबांना आवडल्याचे मला सांगितले. मी नुसतीच मान डोलावली. परंतु आणखी काही दिवसांनी, ती कॅम्पिंग बस, परत कंपनीच्या आवारात आलेली मी बघितली. तशीच गत आपल्या घड्याळाची होणार असे मला वाटू लागले. परंतु तसे काही झाले नाही. माझे घड्याळ हेड ऑफिसमधेच राहिले. आणखी थोड्या दिवसांनी, आमच्या संचालक साहेबांना डच्चू देण्यात आल्याची अफवा कानावर आली व नंतर ती खरीही ठरली.
ती कॅम्पिंग बस व घड्याळ हे काय कारणासाठी बनवून घेतले होते हे तेंव्हा मला पुरेपुर उमजले. मला त्याच्याशी फारसे काहीच सोयर सुतक आता उरले नव्हते, कारण एक तर मी मागितलेले पुढच्या वर्षासाठीचे सर्व बजेट हेड ऑफिसने मान्य करून पाठवले होते म्हणजेच माझ्या इलेक्ट्रॉनिक विभागाच्या कार्याबद्दल हेड ऑफिसची काहीच तक्रार नव्हती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या पदोन्नतीची ऑर्डर माझ्या हातात पडली होती.
1 एप्रिल 2010