आता
तुम्ही म्हणाल की लग्नाचा आणि पासपोर्टचा काय संबंध आहे? पण भारतातल्या
अति म्हणजे अतिश्रीमंत असलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी, ही
एक आवश्यक गोष्ट होऊ लागली आहे. इतके दिवस ही मंडळी, आपल्या कुटंबियांची
लग्ने बड्या बड्या पंचतारांकित हॉटेलांच्यात करत असत किंवा मोठ्या
पटांगणांवर, एखाद्या चित्रपटात शोभेल असा सेट उभारून, त्यात आपले
लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटाने उरकत असत
पण भारतात एकूणच श्रीमंत लोकांचे प्रमाण वाढू लागल्याने जरा कमी
प्रमाणातील श्रीमंत आणि काही वेळेस हौशी उच्च मध्यमवर्गीय पण, आपल्या
कुटुंबियांचे लग्नसमारंभ या ठिकाणांवरच आयोजित करू लागले आहेत. अतिश्रीमंत
लोकांची त्यामुळे जरा पंचाईतच झाली आहे. त्यांचे वेगळेपण, त्यांची श्रीमंती
यांचे प्रदर्शन त्यांना आता करताच येईनासे झाले आहे. त्यामुळे या मंडळींनी
आता एक नवीनच मार्ग चोखाळला आहे. ही मंडळी आता आपल्या मुलांची लग्ने
भारताच्या सीमेबाहेर जाऊन लावू लागले आहेत.
या फॉरेन लग्नसमारंभांसाठी, सध्या एकदम हॉट फेवरिट आहे हॉन्गकॉन्ग जवळची
मकाव ही पूर्वीची पोर्तुगीज वसाहत. या शिवाय दुबई, थायलंड, मलेशिया आणि
अगदी युरोपातला फ्रान्स सुद्धा लोकप्रिय आहे. हे असे लग्न समारंभ आयोजित
करण्यासाठी कुशल सल्लागार हवेतच. टेक्नोपॅक, रेड डॉट या भारतीय कंपन्या हेच
काम करतात. यात आणखी कमाल म्हणजे काही मंडळी समुद्रावर क्रूझला जाऊन
लग्नसमारंभ आयोजित करू लागले आहेत. अशी लग्ने कशी आयोजित करावी या साठी
माहिती देणारे ‘ब्राइड आणि स्टाईल’ या नावाचे, दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध
होणारे मासिकही निघते.

हे लग्नसमारंभ असतात तरी कसे? चार पाच दिवस चालणारा लग्न समारंभ म्हटला
की जेवणखाण हे आलेच. त्याची उत्तम सोय असायलाच हवी. यासाठी पन्नास-साठ
आचारी व त्यांचे मदतनीस यांचे एक सैन्यच भारतातून पाठवले जाते.
पाहुण्यांसाठीची हजारो जेवणे मग हे सैन्य पकवते. जेवणाची शिधा सामुग्री,
खास भारतीय मिठाया, पनीर या सारख्या गोष्टी भारतातूनच न्याव्या लागतात. या
शिवाय हॉल सजवणारे लोक, हेअरड्रेसर्स, मेंदी काढणार्या स्त्रिया,
फोटोग्राफर्स, व्हिडियोग्राफर्स आणि मुख्य म्हणजे लग्न लावणारा भटजी या
सर्वांना लग्नस्थळी नेले जाते. लग्नात सर्व विधी अगदी बारकाईने आखलेले
असतात. या शिवाय नाच, गाणी चांगली म्हणजे फिल्मी श्टाईल व्हावी म्हणून खास
कोरिओग्राफर्स ही नेले जातात. काही लग्नांना बॉलीवूडच्या कलाकारांना सुद्धा
करमणुकीच्या कार्यक्रमासाठी म्हणून आमंत्रित केले जाते. मकावला नुकत्याच
झालेल्या एका लग्नात 100 तासाचे व्हिडियो रेकॉर्डिंग आणि 8000 फोटो
काढण्यात आले होते. नवरदेवाच्या वरातीसाठी घोडा मिळतो पण पंधरा वीस
मिनिटाच्या प्रवासासाठी तब्बल 5000 डॉलर्स तरी मोजावे लागतात.
तुम्ही म्हणाल की हे ठीक आहे पण परदेशात तुमच्या लग्नाला येणार कोण?
परदेशातून या लग्नांना अर्थातच कोणीच येत नाही.पण भारतातूनच सर्व नातेवाईक,
आप्तेष्ट, मित्रजन यांना विमानाने घेऊन जाण्यात येते. त्यांच्या
रहाण्याची, जेवण खाण्याची सर्व व्यवस्था केली जाते आणि त्यांना कंटाळा येऊ
नये म्हणून करमणुकीचे कार्यक्रमही आयोजित केलेले असतात.लग्न जर जैन
समाजातील असले तर संपूर्ण हॉटेल जंतुनाशके मारून पाहुण्यांना सामिष
पदार्थांचा कुठेही गंधही येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.मकावला
नुकत्याच झालेल्या एका लग्नात हॉटेलातल्या 550 खोल्या बुक केलेल्या होत्या.
या लग्नांना खर्च तरी किती येतो? अगदी साधेपणाने केलेल्या लग्नांना
निदान 3 लाख य़ू.एस. डॉलर्स एवढा खर्च येतोच. डामडौलाने केलेल्या लग्नांना
निदान 40 ते 50 लाख यू.एस. डॉलर्स येऊ शकतो.
परदेशात लग्न लावून परतलेल्या अशाच एका नवरदेवांचे म्हणणे आहे की भारतात
लग्न करायचे म्हणजे आपल्या सर्व परिचितांना बोलवावे लागते. हा आकडा एक ते
दोन हजारापर्यंतही जातो. त्यामुळे भारतातील लग्न हे मासळीबाजारात केलेल्या
लग्नाप्रमाणे वाटते. परदेशी केलेल्या लग्नाला फक्त जवळचे आप्त व मित्रजन
उपस्थित असतात त्यामुळे हा लग्न समारंभ कसा exclusive वाटतो.
तेंव्हा थोडक्यात म्हणजे तुमचा पासपोर्ट नेहमी तयार ठेवा. नाहीतर
कोणीतरी लग्नाचे तुम्हाला आमंत्रण दे ईल आणि पासपोर्टच नसल्याने फॉरेनला
जायची तुमची संधी हुकेल.
29 सप्टेंबर 2009