Monday, 22 September 2014

आमटी – भात

कुठल्याही सच्च्या मराठी माणसाला, जेवणातला कोणता पदार्थ खरा खुरा मनापासून आवडत असेल तर तो म्हणजे तुरीच्या डाळीची खमंग फोडणी घालून केलेली आमटी. अशी आमटी मस्त भुरके मारून भाकरी बरोबर खावी किंवा आंबे मोहर तांदुळाच्या भातावर ओतून, आमटी-भात खावा. या आमटी भाताची सर सुद्धा कोणत्याही पक्वान्नाला येणार नाही. प्रत्येक सुगरण सुगृहिणीच्या हाताच्या आमटीला निराळीच सर असते. कोणी मसाला सढळ हाताने घालतात तर कोणाच्या आमटीला आंबट-गोड चव असते. आमटीत प्रकार सुद्धा किती असावेत? पातळ आमटी, घट्ट फोडणीचे वरण, मुळ्याचे काप किंवा पालक घातलेली आमटी. प्रत्येक आमटीची चव निराळी, ढंग निराळा.

tti


असे जरी असले तरी सगळ्या प्रकारच्या आमट्यांच्यात एक मसाल्याचा पदार्थ हा असतोच असतो. मसाला, लाल तिखट, जिरे, हिंग सगळे वैकल्पिक असते पण हळदीची चिमूटभर तरी पूड ही प्रत्येक प्रकारच्या आमटीत असतेच असते. हळदीचे अनेक गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत. हळद जंतूनाशक असते. हळद सांधेदुखी (arthritis) किंवा स्मृतीभ्रंश (dementia.) सारख्या रोगांवर उपयोगी असते असे म्हणतात. इंग्लंडमधले डॉक्टर शॅरन मॅककेना (Dr Sharon McKenna)व कॉर्क़ कॅ न्सर संशोधन केंन्द्रातले (Cork Cancer Research Centre ) त्यांचे सहकारी, यांनी हळदीचा एक नवाच गुणधर्म शोधून काढला आहे.

हळदीमधे असलेला कर्क्युमिन (curcumin) या मूल पदार्थचा एक नवीनच गुणधर्म शोधून काढण्यात या संशोधकांना यश मिळाले आहे. प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात या डॉक्टरांना असे आढळून आले की कर्क्युमिन हा पदार्थ अन्ननलिकेच्या कर्करोगी पेशींना 24 तासात नष्ट करतो. या पदार्थाच्या तावडीत सापडलेल्या कर्क पेशी स्वत:च स्वत:ला नष्ट करणे सुरू करतात.

गेल्या तीस वर्षात अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण जवळ जवळ दुप्पट झाले आहे. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की समाजातील वाढता लठ्ठपणा, मद्यपींची वाढती संख्या या सारख्या गोष्टी या कर्करोगाच्या प्रसाराला कारणीभूत आहेत. मृत्युला कारणीभूत होणार्‍या कर्करोगांच्यामधे, हा कर्करोग सहाव्या क्रमांकावर आहे असे मानतात. त्यामुळेच या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.

आमटी भात भुरकताना त्या आमटीतली हळद किती औषधी आहे हे समजल्यामुळे डावभर आमटी आधिक वाढून घ्यायला काहीच हरकत दिसत नाहीये.

30 ऑक्टोबर 2009