Monday, 22 September 2014

पुण्याची वेताळटेकडी-एक फोटोब्लॉग

पुणे शहराचे एक वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या पश्चिम भागामधे असलेली सह्याद्रीच्या टेकड्यांची रांग. वेताळ टेकडी ही या टेकड्यांच्या रांगेतील सर्वात उंच टेकडी. या टेकडीवर  आठशे मीटर उंचीचे एक छोटेखानी शिखर सुद्धा आहे. या शिखरावर, वेताळबाबाचे एक मंदिर आहे. त्या मंदिरामुळेच या टेकड्यांच्या रांगेला वेताळ टेकड्या असे नाव पडले आहे. या शिखरावरच अग्नीशामक दलाने एक निरिक्षण मनोरा बांधला आहे.

on the hill1


मी अगदी लहानपणापासून या टेकड्यांवर मनमुराद फिरलो आहे. आम्ही मित्र, मित्र सूर्य पश्चिमेकडे कलला की या टेकड्या चढण्यास सुरवात करत असू व हनुमान टेकडीवरून सूर्यास्त बघूनच घरी परत येत असू.

sunset


आता मी ठराविक मार्गाने, ठराविक वेळ, टेकडीवर फिरतो. टेकडी, पायी न चढता गाडी घेऊन वर जातो. असे जरी असले तरी तरी हा फेर- फटका केल्यावर मिळणारा आनंद व सुख, लहान वयाएवढेच आहे. पुण्याची हवा नेहमीच आल्हादकारक असते. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या टेकड्याच आहेत. या टेकड्यांवरची वृक्षराई शहरातली प्रदुषणयुक्त हवा शोषून घेते व स्वच्छ हवा बाहेर टाकते. काही लोक या टेकड्यांना पुण्याची श्वसनसंस्थाच मानतात.

onthehill3


वेताळबाबाचे मंदिर मध्य धरला तर या टेकड्या सगळ्या दिशांना निदान 10 वर्ग किलोमीटर तरी पसरलेल्या आहेतच. या टेकड्यांच्या मधे मधे उथळ दर्‍या आहेत. या दर्‍यांच्यात खुरट्या झाडांचे दाट जंगल आहे. टेकड्यांच्यावर मधे मधे झाडे झुडपे व गवत यामधून छोट्याछोट्या पायवाटा जातात. उत्तरेच्या बाजूला एक वापरात नसलेली दगणखाण आहे.

dagadakhan3


couplein love


यात वर्षाचे सात आठ महिने तरी पाणी साचते. पूर्वेच्या डोंगरउतारावर एक खाजगी न्यास जंगल तयार करतो आहे. त्याची वाढ झाल्यावर हा भाग अतिशय नयनमनोहर होईल यात शंकाच नाही. या टेकड्यांच्या दक्षिणेस सर्व पुणेकरांचा विरोध असताना मध्यवर्ती सरकारने एक प्रयोगशाला उभारलेली आहे. लोकांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी या संस्थेने परिसर फुलझाडे वगैरे लावून सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे.

cosmos


road

वेताळ टेकडी हे पुण्यातले खरे खुरे, अगदी जागतिक दर्जाचे प्रेक्षणिय स्थळ आहे. आता तुम्ही गाडी घेउन वरपर्यंत जाऊ शकता आणि मनमुराद भटकू शकता. फक्त वर जाताना रस्ता एका झोपडपट्टीच्या वस्तीतून जातो तेंव्हा डोळे, कान आणि नाक बंद ठेवूनच वर जा.


vahantal


ते नको असेल तर वॉकिंग शूज घाला व हनुमान टेकडी चढण्यास सुरवात करा.


24 ऑक्टोबर 2009