Sunday, 21 September 2014

अखिल भारतीय सासू संरक्षण संघटना

बंगलुरू शहराच्या मध्यवर्ती भागात, बर्‍याच जुन्या काळापासून अस्तित्वात असलेले, कब्बन पार्क या नावाचे एक सुंदर उद्यान आहे. या उद्यानाच्या एका कोपर्‍यात ज्येष्ठ नागरिकांचा एक गट दर आठवड्याला भेटतो. या भेटीचा उद्देश नुसत्या गप्पा टप्पा हा नसतो. या गटात सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक आपले अनुभव एकमेकांना कथन करतात आणि आपल्या साचलेल्या, कोंडलेल्या भावनांना वाट फोडून देतात. या गटातील सहभागी स्त्रीपुरुष समाजाच्या विविध अंगातून आलेले असतात. कोणी निवृत्त शिक्षक, कोणी निवृत्त वायुदल अधिकारी, कोणी डॉक्टर तर कोणी संगणक अभियंते, पण सर्वजण उच्चशिक्षित. हे सर्वजण येथे दर आठवड्याला जमतात एकाच कारणासाठी. या सगळ्यांना त्यांच्या सुनांनी अक्षरश: गांजलेले आहे. त्यांच्या कुटुंबात लग्न करून आलेल्या या नवीन मुलींनी त्यांना दे माय धरणी ठाय केले आहे. त्यांच्या सुना, उद्धट, स्वार्थी आणि घरावर स्वत:चेच वर्चस्व गाजवू पहाणार्‍या असल्याने त्यांना एक प्रकारची असहाय्यता आली आहे.

cubbon_park


विश्वास नाही ना बसत! पण भारतातल्या बहुतेक शहरांच्यातल्या, उच्चशिक्षित व सधन कुटुंबांमधली ही अगदी नवीन समस्या आहे. पारंपारिक अनुभवाच्या गोष्टी बोलतात सासूने सुनेच्या केलेल्या छळाबद्दल. नवीन सुनेने माहेरून अपेक्षित धनसंपत्ती आणली नाही म्हणून तिचा झालेला छळ, तिला परत माहेरी पाठवले, क्वचित तिला पेटवून देऊन तिचा खून केला वगैरे बातम्या आपण वर्तमानपत्रातून कधीतरी वाचतो. यावर अनेक कथा कादंबर्‍या, नाटके आली, टी.व्ही. मालिका आल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर, बंगलुरू शहरातल्या कब्बन पार्कमधे भेटणारा हा गट म्हणजे उलटी गंगा वाटण्याची शक्यता आहे.

या गटात शंभरापेक्षा जास्त स्त्रिया सहभागी होतात. यावरूनच हा सामाजिक प्रश्न आता किती विस्तारत चालला आहे हे लक्षात येते. पारंपारिक भारतीय कुटुंबसंस्था आता अतिशय तणावाखाली येऊ लागली लागली आहे याचेच ते चिन्ह आहे. एकत्र कुटुंबात आलेल्या नवीन सुनांच्या होणार्‍या छळापासून त्यांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक नवीन कायदे कानू करण्यात आले. नवीन सुनेने लग्न झाल्यावर पहिल्या सात वर्षात, जर सासू सासर्‍यांबद्दल पोलिसात तक्रार केली तर पोलिस ताबडतोब त्यांना पकडून नेतात. सुनेच्या कोणत्याही तक्रारीबद्दल पोलिस नेहमीच सुनेची बाजू ग्राह्य आहे असे धरूनच कारवाई करतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. सासू म्हणजे कोणीतरी दुष्ट व्यक्ती आहे असेच अलीकडे धरले जाते.

India_10_11_09_Rai_Mothers_EDIT


काही नवीन सुना या कायदेकानूंचा आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेऊ लागल्या आहेत असे दिसते. या नवीन सुना उच्चशिक्षित व बहुतेक वेळा अर्थार्जन करणार्‍या असल्याने अतिशय स्वतंत्र वृत्तीच्या असतात. स्वत:च्या मताप्रमाणे वर्तन करण्यास एकत्र कुटुंबपद्धतीत नेहमीच बंधने येतात त्यामुळे या सुनांना एकत्र कुटुंबात रहाणे रुचत नाही. पारंपारिक भारतीय कुटुंब पद्धती यामुळे अतिशय तणावाखाली आली असून तुटण्याच्याच मार्गावर आहे असे दिसते.

बहुतेक कुटुंबात, आज सासू झालेली स्त्री, फक्त गृहिणी आहे. तिचे कुटुंबच तिचे सर्वस्व असल्याने, तेच तुटू लागल्याने ती अतिशय बैचैन व असहाय्य बनत चालली आहे. कब्बन पार्कमधे भेटणार्‍या या सारख्या गटात सहभागी झाल्याने व आपले अनुभव इतर स्त्रियांच्या बरोबर चर्चा केल्याने तिचे दुख: साहजिकच हलके होते आहे. म्हणूनच हे गट आता समाजातील या वर्गातील लोकांत, लोकप्रिय होत आहेत.

या स्त्रियांनी आता आपली एक संघटना स्थापन केलेली असून ती इतर भारतीय शहरांच्यातही  पसरू लागली आहे. सुनांच्या छळाने पिडीत, स्त्रियांना कायदेशीर व इतर बाबीत मदत करणे हे या संस्थेचे मुख्य धेय आहे.
पारंपारिक भारतीय कुटुंबसंस्था आता तुटण्याच्याच मार्गावर आहे हे खरे!


14 ऑक्टोबर 2009