Friday, 12 September 2014

स्वाईन फ्ल्यूचा नवा रुग्ण

या वर्षीच्या मार्च मधे, मेक्सिको देशात स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण प्रथम आढळले व अक्षरश: विद्युतवेगाने या रोगाचा प्रसार सार्‍या जगभर झाला. मेक्सिको नंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व त्याच्यापाठोपाठ युरोप आणि जपान यांना या रोगाला सामोरे जावे लागले. त्या वेळेस भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात, उन्हाळा चालू असल्याने तिथे हा रोग पसरला नाही पण मॉंसूनचे आगमन झाल्याबरोबर भारतीय उपखंड व मलेशिया येथेही हा रोग पसरला.

स्वाइन फ्ल्यूचा इतक्या झपाट्याने प्रसार होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे विमान प्रवासी. जगभरच्या विमान कंपन्याचा विस्तार आता एवढा वाढला आहे की आता जगातील कोणत्याही ठिकाणाहून अगदी दुसर्‍या कोपर्‍यात असलेल्या ठिकाणापर्यंत सहजपणे प्रवास करता येतो. स्वाइन फ्ल्यूची लागण झालेल्या रोग्याला प्रथम तशी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. नंतर सुद्धा बहुतेक लक्षणे सर्वसाधारण सर्दी खोकल्याचीच असतात. स्वत: रुग्णालाच जर हे माहित नसले की त्याला या रोगाची लागण झाली आहे तर तो विमान प्रवास टाळणार का आणि कशासाठी? त्यामुळेच या रुग्णांचा विमान प्रवास चालूच राहला व हा रोग सगळीकडे पसरला.

China Swine Flu


आपल्याला विमान प्रवासात या रोगाची लागण होईल या भितीने लोक सध्या सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याच्या मागेच आहेत. जागतिक मंदीमुळे आधीच रडत खडत चाललेल्या विमान कंपन्यांना हा एक अतिरिक्त फटकाच बसला आहे. सिंगापूर एअरलाइन्स सारख्या जगातल्या प्रथम श्रेणीतल्या विमान कंपनीला सुद्धा, पहिल्या तिमाहीत 307 मिलियन सिंगापूर डॉलर्सच्या नुकसानीचा फटका बसला आहे. A 380 या नवीन विमानाची डिलिव्हरी घेण्याचे त्यांनी सध्या टाळले आहे. भारतातल्या विमान कंपन्यांची परिस्थिती तर आणखीनच कठिण बनली आहे. जेट एअरला 227 कोटी रुपयाचा तर किंगफिशर एअर ला 242 कोटी रुपयांचा तिमाही तोटा झाला आहे. एअर इंडिया तर नेहमीच घाट्यात चालणारी असल्याने तिचा विचार करण्यातही अर्थ नाही.

प्रवाशांचे मनोधैर्य वाढावे आणि त्यांनी विमान प्रवास करावा म्हणून जगभरच्या विमान कंपन्या निरनिराळे उपय योजत आहेत. अमेरिकेतल्या साउथवेस्ट व व्हर्जिन या विमान कंपन्यांनी दिवसाच्या उड्डाणांमधे प्रवाशांना उशा व ब्लॅंकेट्स देणेच बंद केले आहे. व्हर्जिन विमान कंपनी सर्व प्रवाशांना हात पुसण्यासाठी जंतुनाशक रुमाल आणि जेल देते व कोणत्याही प्रवाशाला हवा असल्यास मास्क उपलब्ध करून देते.
डॉक्टरांच्या मते ब्लॅंकेट्स, उशा यांचा या रोगाचा प्रसार होण्याशी काही संबंध नाही त्यामुळे हे उपाय फारसे उपयुक्त ठरणार नाहीत. विमान प्रवाशांपैकी कोणाला रोग झाला आहे हे ओळखणे अशक्यच असल्याने हा जंतुप्रसार थांबवणे जवळ जवळ अशक्यच आहे.

thermal_scanners_01थर्मल 
स्कॅनर्स च्या पडद्यावर दिसणारे चित्र


काही विमान कंपन्या व विमानतळ हे थर्मल स्कॅनर्स वापरून प्रवाशांचे तपमान त्यांनी विमानात प्रवेश करण्याआधी व उतरण्याआधी बघतात. हा उपाय त्यातल्या त्यात उपयुक्त आहे असे वाटते. तसेच विमानातील हवा दर 10 मिनिटाने बदलणे हाही उपाय केला जातो. त्यामुळे एवढे तरी नक्की म्हणता येईल की वातानुकुलित सार्वजनिक जागा किंवा बस यांपेक्षा विमान प्रवास काही जास्त धोकादायक नाही.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मताप्रमाणे या हिवाळ्यात स्वाईन फ्ल्यूची आधिक जोरदार साथ येण्याची बरीच शक्यता आहे. असे झाले तर विमान कंपन्यांची परिस्थिती आणखीनच खराब होण्याची शक्यता वाटते.
आतपर्यंत डुकरे आणि मानव यांनाच हा रोग होता. आता तो विमान कंपन्यांनाही झाला आहे असे दिसते आहे.


6 सप्टेंबर 2009