Wednesday, 10 September 2014

खाण्याची फॅडे

मदर इंडिया या नावाचे एक मासिक काही वर्षांपूर्वी निघत असे. या मासिकाचे संपादक कै. बाबूराव पटेल ही व्यक्ती वीस पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत एक बरीच जानी-मानी व्यक्ती होती. ते राज्यसभेचे सभासदही काही वर्षे होते. ते डॉक्टर होते की नाही ते मला माहिती नाही. पण मदर इंडिया प्रॉडक्ट्स या नावाची एक कंपनी ते चालवत असत. या कंपनीने काढलेली होमिओपॅथिक औषधे अजूनही लोकमान्य आहेत. या बाबूराव पटेलांची मते बर्‍याच वेळा विक्षिप्तपणाकडे झुकणारी असली तरी पटत असत. तीन पांढरी विषे, हे असेच एक त्यांचे मत होते. साखर-मैदा-दुग्धजन्य पदार्थ या पदार्थांना ते या नावानी संबोधत असत व सर्वांनी या पदार्थांचे सेवन टाळावे असे त्यांचे मत होते. गाई-म्हशींना दूध त्यांच्या पाडसांसाठी येते; मानवांसाठी नाही असे ते सांगत.

glass-of-milk2


मला त्यांचे हे मत पटत असले तरी मी मुळात गोडघाश्या असल्याने साखर सोडून देणे मला कल्पनेतही कठिण वाटले. तेंव्हा सुरवातीला मैदा व दुग्धजन्य पदार्थ आपण सोडून द्यावे असे मी काही दिवसांपूर्वी ठरवले. मैदा सेवन सोडणे हे त्या मानाने सोपे आहे. पण दुग्धजन्य पदार्थांचे काय? अलीकडे सोयाचे दूध टेट्रापॅक मधील डब्यात सगळीकडे उपलब्ध असते ते मी वापरायला सुरवात केली. वर्ष भर तरी मी माझे हे फॅड चालू ठेवले. मध्यंतरी मला एक छोटासा अपघात झाला व अस्थिभंग झाल्याने कॅल्शियम जास्त प्रमाणात घेण्याची गरज आहे असे डॉक्टरांचे म्हणणे पडले. अर्थातच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन परत चालू करणे भाग पडले. आता खरे सांगायचे म्हणजे मला दुग्ध्जन्य पदार्थ सेवन केले किंवा न केले तरी कोणताच असा फरक जाणवला नाही. त्यामुळे मी आता हे पांढर्‍या विषांचे फॅड डोक्यातून काढून टाकले आहे.

6a00d8341cedee53ef011570b9722d970c-800wi


तुम्ही विचाराल की हे सगळे मी तुम्हाला कशासाठी सांगत बसलो आहे? परवाच मला असे समजले की मी जरी हे फॅड सोडून दिले असले तरी माझ्यापेक्षा अनेक पटीनी जास्त कडक अशी खाण्याची फॅडे संभाळणारे अनेक फॅडिस्ट या जगात गेल्या काही वर्षातच निर्माण झाले आहेत. त्यांची संख्या आता बरीच जास्त झाली असल्याने त्यांना आता ऑर्थोरेक्सिक्स (orthorexics) या वैद्यकीय नावाने ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी ही फॅडिस्ट मंडळी, एडनॉस (Ednos) या नावाने संबोधली जात असत. एडनॉस म्हणजे ‘इतर कोणत्याही प्रकारचा बिघाड न झालेले’ लोक. 1997 मध्ये कॅलिफोर्निया मधील एक डॉक्टर, स्टीव्हन ब्रॅटमन (Steven Bratman) याने या मंडळींना ऑर्थोरेक्सिक्स हे नाव दिले आणि त्यांचे वागणे हे एक प्रकारचा सौम्य मनोवैज्ञानिक आजारच आहे असे प्रतिपादन केले. ब्रॅटमनने या आजाराला ऑर्थोरेक्सिया नरव्होसा (orthorexia nervosa) असे नाव दिले आहे.

Young-woman-eating-bowl-o-001

या डॉक्टरच्या मताप्रमाणे, हा आजार झालेल्या लोकांना, आपल्या आरोग्यास अतिशय पोषक असेच अन्न फक्त आपण खाल्ले पाहिजे असे सतत वाटत असते. कोणते अन्न खायचे आणि कोणते नाही याबद्दल ते अतिशय आग्रही असतात. खाण्याबद्दलचे इतर मनोवैज्ञानिक आजार झालेल्या मंडळींना, किती प्रमाणात अन्न खावे हे कळत नसते. या उलट, ‘ऑर्थोरेक्सिक्स’ मंडळी, आपण जे अन्न खातो त्याची गुणवत्ता काय आहे व ते शुद्ध आहे की नाही हे सतत डोळ्यात तेल घालून बघत रहातात. कोणते अन्न किती शुद्ध आहे या बद्दल त्यांच्या असलेल्या समजुतीप्रमाणे, त्यांच्या आहारात ते खाद्यपदार्थ किती प्रमाणात घ्यायचे हे ते ठरवतात व त्यावर त्यांचे एकूण डाएट अवलंबून रहाते. हे लोक सुरवातीला, साखर, मीठ, कॉफी, मद्यार्क, गहू, यीस्ट, सोया, मका आणि दुग्धजन्य या सारखे पदार्थ खाणे बहुदा सोडून देतात. किंवा सेंद्रीय उत्पादने, रासायनिक खते किंवा जंतुनाशके न वापरलेले अन्न खाण्यावरही यांचा भर रहातो. खाद्यपदार्थांचा एक संपूर्ण वर्गसुद्धा (उदा. दुग्धजन्य पदार्थ) हे लोक त्याज्य समजू शकतात. यामुळे यापैकी काही जणांना कुपोषण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

हे लोक मुख्यत: मध्यम वर्ग व सुशिक्षितांपैकी असतात व निरनिराळी मासिके, वर्तमानपत्रे, इंटरनेटवरची संकेतस्थळे बघून कोणते अन्न चांगले व कोणते वाईट हे स्वत:च ठरवतात. व आपण चांगलेच अन्न खाल्ले पाहिजे असे ठरवून त्या पद्धतीने वागतात. त्यांच्या मताप्रमाणे जे अन्न शुद्ध असते, ते खरेदी करणे त्यांच्या खिशाला सहज पेलवते. आवश्यकता म्हणून डायेट करणारे लोक व हे ऑर्थोरेक्सिक्स यांच्यात अतिशय सूक्ष्म असा फरक असल्याने, या लोकांना आपल्याला काही आजार झाला आहे हे लक्षातच येत नाही. स्वत:च्या शुद्ध अन्न सेवनाबद्दल, या लोकांना उगीचच अभिमान वाटत रहातो व त्यामुळे त्यांचे इतरांशी असलेले त्यांचे वैयक्तिक संबंध किंवा सामाजिक संबंध दुरावतात किंवा खालच्या पातळीवर जातात. इतरांबरोबर कॉफी किंवा मद्यसेवन करण्याचा साधा आनंदही ते लुटू शकत नाहीत व ते समाजात एकटे पडत जातात. काही तज्ञांचे तर असे मत झाले आहे की आधुनिक समाज, अन्नसेवनाबद्दलचा  आपला रस्ताच चुकत चालला आहे. आहारतज्ञ, व्यायाम शिकवणारे तज्ञ, नवनवीन पुस्तके ही सगळी मंडळी या गोंधळात फक्त भर टाकत चालली आहेत.
तर थोडक्यात सांगायचे काय की मी सध्या तरी ऑर्थोरेक्सिक्स होण्यापासून थोडक्यात बचावलो आहे. तुम्ही पण जरा डोकावून पहा ना! कुठे बसताय का यांच्यात!

18 ऑगस्ट 2009