Saturday, 9 March 2019

अल्बर्ट आइनस्टाइन प्रकरण 3 विवाह आणि नोकरी



1901 च्या फेब्रुवारी महिन्यात 5 वर्षे वाट बघण्याची अट पूर्ण केल्यामुळे आइनस्टाइनला   स्विट्झरलॅन्डचे नागरिकत्त्व मिळाले. स्विट्झरलॅन्डचे वर्णन तो “मला माहीत असलेला पृथ्वीचा सर्वात सुंदर कोपरा” या शब्दात करतो. हे नागरिकत्त्व मिळाल्यानंतर थोड्याच दिवसात स्विस सैन्यात भरती होण्यासाठी नोंद करण्याची सूचना त्याला मिळाली. जर्मनीमधे असताना हेच बंधन त्याला काहीही करुन चुकवायचे होते. आइनस्टाइनच्या सुदैवाने त्याच्या पायांमध्ये काहीतरी दोष असल्याचे निष्पन्न झाल्याने सैन्यातील नोकरीसाठी तो अपात्र घोषित केला गेला.(त्याच्या पायामध्ये फ्लॅट फूट, तळपायांना वाजवीपेक्षा जास्त घाम येणे आणि व्हेरिकोझ व्हेन्स हे दोष आढळले होते. त्याला मोजे वापरणे अजिबात आवडत नसे. कदाचित तळपायांना वाजवीपेक्षा जास्त घाम येत असल्याने ही नावड असावी.) सैन्यातील सक्रिय  नोकरीसाठी अपात्र ठरल्याने ऑक्झिलरी मिलिटरी ड्यूटी साठी त्याची निवड केली गेली. प्रत्यक्षात ही ड्यूटी त्याने कधीच केली नाही व स्विस कायद्याप्रमाणे त्याच्या बदल्यात वयाच्या 42व्या वर्षापर्यंत तो वार्षिक मिलिटरी टॅक्स सरकारला भरत असे.

आइनस्टाइनचे मिलेव्हा बरोबरचे प्रेमसंबंध आता अधिकच गहिरे झाले होते. मिलेव्हाला बालपणी खुब्याचा क्षय झाला असल्याने ती थोडीशी लंगडत चालत असे व चालताना तिला खास करून घेतलेले ऑर्थोपेडिक बूट वापरावे लागत असत. तिचा स्वभावही मूडी होता. या कशाचाही काडीइतकाही परिणाम आइनस्टाइनला या मनस्वी तरुणीबद्दल वाटणार्‍या प्रेमावर झाला नव्हता. बर्‍याच वर्षाच्या कोर्टशिपनंतर, आपल्या वयाच्या 22व्या वर्षी, अलबर्टने मिलेव्हा बरोबरच विवाह करण्याचा आपला इरादा पुन्हा एकदा जाहीर केला. पॉवलिन आइनस्टाइनला मिलेव्हाबद्दल तीव्र तिरस्कार अजूनही वाटत होता. या तिरस्काराचे कारण मात्र समजू शकत नाही. मिलेव्हाचे अपंगत्त्व? ती यहुदी नव्हती म्हणून? ती पूर्व युरोपियन होती म्हणून? ती अल्बर्टपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती म्हणून? का पॉवलिनच्या मते मिलेव्हा सुंदर नव्हती म्हणून? जे काय कारण असेल ते असो पण पॉवलिनला असे वाटत होते की तिच्या अल्बर्टसाठी मिलेव्हा ही पाहिजे तेवढी योग्य नाही आणि अल्बर्टचे मिलेव्हा बरोबर लग्न होऊ नये यासाठी पॉवलिन जे काही तिला करणे शक्य होते ते करायला तयार होती. पॉवलिनला सगळ्यात मोठी काळजी मिलेव्हा गरोदर राहील ही होती. अल्बर्टला कोणतीही नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन नसल्याचे लक्षात घेऊन लिहिलेल्या पत्रात ती लिहिते. “असे झाले तर तुझ्या आयुष्यात केवढा गोंधळ होईल?” मिलेव्हाला सर्वप्रथम पॉवलिनचे मन वळ्वण्याची आशा होती.  पुढे पॉवलिनने मिलेव्हाच्या आई-वडिलांना एक पत्र लिहिले आणि सूडबुद्धिने मिलेव्हाच्या चरित्रावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला. या पत्रानंतर मात्र मिलेव्हाला पूर्णपणे कळून चुकले की पॉवलिनने मिलेव्हाला अल्बर्टपासून दूर करण्याचा ध्यासच घेतला आहे.

अल्बर्टला नोकरीसाठी अनुकूल शिफारसपत्रे मिळवणे फार कठीण जात होते. झुरिचमध्ये टीचिन्ग असिस्टन्टशिप मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला नकार मिळाला. बर्गडॉर्फ आणि फ्राउएनफेल्ड या गावांमधील माध्यमिक शाळांच्यात शिक्षक म्हणून नेमणूक करून घेण्याच्या प्रयत्नातही त्याला अपयश आले. अखेरीस दुसर्‍या काही खेडेगावांच्यात तात्पुरत्या शिकवण्या करण्याचे काम त्याला मिळाले. या कामात मिळणारा पगार इतका कमी होता की त्याचा खर्च जेमतेम भागत होता. या काळात मिलेव्हा झुरिचलाच होती व अल्बर्ट तिच्या  संपर्कात होता. ती ज्या वेळेस झुरिच सोडून तिच्या आई-वडिलांकडे हंगेरीला सुट्टीसाठी जात असे त्या वेळी अल्बर्ट तिला मोठी प्रेमपत्रे पाठवत असे. एकीकडे अल्बर्टचा कायमस्वरुपी आणि पूर्ण-वेळ नोकरीसाठी प्रयत्न चालूच होता. युरोपभरच्या भौतिकीच्या प्रोफेसरांना त्याने पत्रे लिहिली होती परंतु कोणीही त्याला प्रतिसाद दिला नव्हता. अल्बर्टच्या मताने यासाठी प्रोफेसर वेबर जबाबदार होते.

1901च्या वसंत ऋतूत मिलेव्हा गरोदर राहिली आणि पॉवलिनला वाटणारी भिती प्रत्यक्षात उतरली. उत्तर इटलीमधील लेक कोमो येथे अल्बर्ट आणि मिलेव्हा गुप्तपणे भेटले होते त्याचा हा बहुधा परिपाक असावा. अल्बर्ट याच्या आधी त्याच्या आई-वडिलांना मिलान येथे भेटून आला होता व नंतर विन्टेरथुर या गावी 2 महिन्यासाठी शिकवण्याची नोकरी करणार होता. प्रथम या आनंदी घटनेचे काहीच सोयर-सुतक अल्बर्टला  वाटले नाही परंतु थोड्याच कालात त्याच्या हे लक्षात आले की बाळाची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी आवश्यक नोकरी किंवा उत्पन्नाचे कोणतेच साधन त्याच्याकडे नाही. हातात नोकरी नसताना लग्नाची जबाबदारी अंगावर घेण्यास तो बिचकत होता. सहा महिन्यांपूर्वी अल्बर्टने बेर्न यथील स्विस पेटंट ऑफिसमध्ये मुलकी सेवेतील एका जागेसाठी अर्ज केला होता. बाळाच्या जन्माची तारीख जवळ येत असली तरी या नोकरीबद्दल नक्की काहीच त्याला समजत नव्हते व तो नेमणूक पत्र हातात पडण्याची वाट बघत होता. विन्टेरथुर मधील शिकवण्याची नोकरी संपल्यावर अल्बर्ट, आई आणि बहिण यांच्याबरोबर काही दिवस राहिला. मिलेव्हा झुरिचमध्ये परत एकदा परिक्षेसाठी घोकंपट्टी करण्यात गर्क होती. परंतु याही वेळी ती परिक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्नच तिने सोडून दिला. तिच्या आयुष्याला तिने कधी आधी कल्पनाही केली नव्हती अशी ही जी नवीन दिशा मिळाली होती त्यामुळे भ्रमनिरास होऊन तिला नैराश्य आले होते. वैफल्यग्रस्त अवस्थेतच ती हंगेरीला घरी परत आली व आपल्या बाळाच्या जन्माची वाट पहाण्यात दिवस घालवू लागली.

अल्बर्टला भेटण्यासाठी मिलेव्हा ऑक्टोबर महिन्यात स्विट्झरलॅन्डला स्वल्प कालावधिसाठी येऊन गेली. परंतु अल्बर्ट आणि मिलेव्हा या दोघांनाही तिचे येणे हे सर्वांपासून; मुख्यत्वे पॉवलिनपासून: गुप्त ठेवावयाचे होते. त्या वेळेपर्यंत मिलेव्हाचे गरोदरपण दिसू लागले असणार होते, कारण बाळाच्या जन्माची तारीख जानेवारी मधली होती. त्यामुळेच बहुधा मिलान जवळ असलेल्या एका खेडेगावातील हॉटेलमध्ये मिलेव्हा राहिली होती. पॉवलिन अजूनही मिलेव्हाबद्दलच्या गंडाने पछाडलेलीच होती. कदाचित तिला मिलेव्हा गरोदर आहे याचा सुगावा लागला असल्याची शक्यता आहे. मिलेव्हाचे गरोदरपण अल्बर्ट आणि मिलेव्हा यांनी आपल्या मित्रांपासून सुद्धा गुप्त ठेवले होते. पॉवलिनला आपल्याबद्दल वाटत असलेल्या तीव्र तिरस्कार मिलेव्हाला सतत सलत होता.  1901मधे हंगेरीला रहात असताना आपल्या एका मैत्रिणीला ती पत्रात लिहिते. “मिसेस आइनस्टाइन यांनी माझ्या आणि त्यांच्या मुलाच्या आयुष्यात जास्तीत जास्त कडवटपणा भरायचा असे आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवलेले दिसते आहे. इतक्या हृदयशून्य आणि पूर्णपणे दुष्ट व्यक्ती असू शकतात यावर मी कधीही विश्वास सुद्धा ठेवू शकले नसते.” अलबर्टलाही त्याच्या आईच्या मनातील कडवटपणा समजू शकत नव्हता. अल्बर्ट मिलेव्हाला आधार देणारी प्रेमभरी पत्रे मात्र तो नियमितपणे  पाठवत होता. त्याने मिलेव्हाला डॉली असे टोपणनाव ठेवले होते व मिलेव्हा त्याला जॉनी म्हणत असे. दक्षिण जर्मनी मधे प्रिय व्यक्तींना संबोधण्यासाठी ही नावे वापरणे अगदी सामान्य समजले जात असे.

नियमित स्वरुपाची नोकरी मिळवण्यात जरी आइनस्टाइनला अपयश आलेले असले तरी त्याच्या स्वत:च्या  काही कल्पना विकसित करून त्यासंबंधी लिखाण करणे त्याने चालूच ठेवले होते. त्याला जे काम सर्वात रोचक वाटत होते ते करण्यासाठी त्याला नोकरीची नियमित जागा किंवा काय काम करावयाचे? व ते कसे करावयाचे? हे सांगणारा कोणी वरिष्ठ यांची अजिबात गरज वाटत नव्हती. नंतरच्या काळात तो लिहितो. “मी जरी तरुण असलो तरी काही गोष्टी मला उमजत होत्या. बहुतेक लोक संपूर्ण आयुष्यभर अस्वस्थपणे आपल्या आशा आणि ध्येय यांचा पाठपुरावा करत राहतात. हा पाठपुरावा निरर्थक असतो ही गोष्ट यापैकीच एक आहे. हा पाठपुरावा निर्दयपणे केला जातो व तो निर्दयपणा, दांभिकता आणि बडे बडे शब्द यांच्या मागे त्या वेळी आजच्या पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात लपवला जात होता.” आइनस्टाइनने नंतर काहीही लिहिलेले असो, स्वत:च्या कामाचा पाठपुरावा करण्यात मात्र तो या काळात गर्क होता. एक स्वतंत्र अभ्यासक म्हणून “कॅपिलरी अ‍ॅक्शन” या विषयावरील आपला पहिला वैज्ञानिक निबंध त्याने एका प्रतिष्ठित जर्मन भौतिकी जर्नलकडे पाठवून दिला. लेख वाचून त्या जर्नलचे संपादक खूपच प्रभावित झाले व त्यांनी या अप्रसिद्ध तरुण शास्त्रज्ञाचा हा निबंध मार्च 1901 मधे प्रसिद्ध केला. आइनस्टाइन तेंव्हा फक्त 22 वर्षाचा होता. सहज मिळालेल्या या यशामुळे आइनस्टाइन साहजिकच खुश झाला. थोड्या महिन्यांनंतर किंवा सप्टेंबर महिन्यात त्याने “मोलेक्यूलर फोर्सेस इन गॅसेस” या विषयावरील आपला प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली. त्याला अशी आशा वाटत होती की त्याचा हा प्रबंध झुरिच विद्यापीठाची पीएचडी डिग्री मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

1902च्या जानेवारी महिन्यात मिलेव्हा तिच्या आई-वडिलांच्या नोव्ही साद येथील घरात प्रसुत होऊन तिला मुलगी झाली. मुलीचे नाव लिझेर्ल असे ठेवण्यात आले. आपल्या मुलीच्या जन्माच्या वेळी अल्बर्ट उपस्थित नव्हता. प्रसुतिच्या वेळेस गंभीर स्वरुपाची कॉम्प्लिकेशन्स झाल्याचे अल्बर्टला मिलेव्हाच्या वडिलांनी बाळाच्या जन्मानंतर लिहिलेल्या पत्राद्वारे कळवले. तपशील माहिती नसला तरी एवढे माहीत आहे की अल्बर्टने मिलेव्हाला लगेचच पत्र लिहून तिला झालेल्या त्रासाबद्दल भिती आणि दुख: व्यक्त केले होते. आई आणि नवे बाळ यांना भेटायला मात्र तो जाऊ शकला नाही. याच्या मागे बहुधा आर्थिक अडचण असावी. त्याच्याकडे अतिरिक्त पैसे नव्हते आणि या परिस्थितीत तो त्याच्या आई-वडिलांना आगगाडीच्या तिकिटासाठी पैसे नक्कीच मागू शकत नव्हता. मिलेव्हाला लिहिलेल्या पत्रात तो प्रेमाने विचारतो.  “ती निरोगी आहे का? ती व्यवस्थित रडते का? तिचे डोळे कोणासारखे आहेत? आपल्या दोघांपैकी कोणासारखी ती दिसते? मी तिला ओळखत नसलो तरी माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. मला तुझी रोज आठवण येते.” पुढचे 6 महिने मिलेव्हा आणि तिचे बाळ हे हंगेरीमधेच राहिले. अल्बर्ट तिला याच प्रकारची पत्रे पाठ्वत राहिला. या पत्रांमध्ये त्याने लग्नाचा उल्लेख कुठेच केलेला नाही. एकतर तो अतिशय गरिबीत दिवस काढत होता आणि आपल्या आई-वडिलांच्या प्रतिसादाला तो बहुधा घाबरत होता. फेब्रुवारी महिन्यात आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात पॉवलिन लिहिते.  आम्ही अल्बर्टच्या मिस मॅरिक बरोबरच्या संबंधांच्या पूर्णपणे विरुद्ध आहोत. आम्हाला तिच्याबरोबर कोणताही संबंध ठेवण्यात काहीही स्वारस्य नाही. तिच्यामुळे मला माझ्या आयुष्यातील सर्वात दुख:द काळाला तोंड द्यावे लागत आहे.” मिलेव्हाचे बाळ विवाहबाह्य संबंधांतून जन्मलेले असल्याने मिलेव्हाच्या आई-वडिलांसाठी परिस्थिती सामाजिकदृष्ट्या लाजिरवाणी होती. तरीही अल्बर्टपेक्षा आपली मुलगी आणि नात यांची काळजी घेण्यास ते जास्त समर्थ होते.

आपल्या मुलीच्या जन्माच्या बातमीने उल्हसित होऊन अल्बर्टने आपले तुटपुंजे सामान एकत्र गोळा केले व आपले बिर्‍हाड बेर्न या राजधानीच्या शहरात हलवले. स्विस पेटंट ऑफिसकडून लवकरच नोकरीची ऑफर येईल अशी सकारात्मक अपेक्षा त्याला होती. त्याचा मित्र मर्सेल ग्रॉसमन याच्या वडिलांनी त्याला अनुकूल शिफारसपत्र या आधीच दिले होते. त्याचप्रमाणे त्याचा डॉक्टरल सुपरवायझर, झुरिचचा प्रोफेसर आल्फ्रेड क्लायनर यानेही त्याची शिफारस केली होती. आइनस्टाइन क्लायनरबद्दल लिहितो. “ तो मला आधी वाटले होते तेवढा मूर्ख खचितच नाही.” जानेवारी महिन्यात बेर्नला बिर्‍हाड हलवण्याआधी आणि लिझेर्लच्या जन्माच्या दिवसाच्या आसपास अल्बर्टने आपले डॉक्टरल डेझर्टेशन अचानक मागे घेतले. अशी शक्यता आहे की क्लायनरच्या मनात त्या निबंधाविषयी काहीतरी किंतू असावा कारण तो निबंध ल्युडविग बोल्ट्झमन या भौतिकी शास्त्रज्ञाच्या संशोधनात काही दोष असल्याचे सूचित करत होता. बोल्ट्झमन हा स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स या विषयाचा संशोधक मानला जातो. कदाचित आइनस्टाइनलाच आपल्या निबंधात काही बदल करणे आवश्यक वाटले असेल. डॉक्टरल डेझर्टेशन मागे घेण्याच्या निर्णयाचा एक फायदा अल्बर्टला खचितच झाला. दुसर्‍या गावाला तो आता बिर्‍हाड हलवू शकत होता.

बेर्नमधे आल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अल्बर्टने गणित आणि भौतिकी या विषयांच्या  खाजगी शिकवण्या करण्याचे ठरवले. विद्यार्थी यावेत म्हणून त्याने जाहिरात केली. थोडेफार विद्यार्थी त्याला मिळाले परंतु त्यांची संख्या त्याला त्याच्या गंभीर आर्थिक अडचणीमधून बाहेर पडता येईल एवढी मोठी नव्हती. बेर्न मधे रहात असताना अल्बर्टने काही नवे मित्र जोडले व काही जुन्या मित्रांची पुन्हा ओळख करून घेतली. हे जुने मित्र बेर्नला पुढचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आले होते. या मित्रांमधे त्याची पहिली गर्ल फ्रेन्ड मेरी हिचा भाऊ पॉल विन्टेलेर हा होता. पॉल, बेर्न मधील विधी महाविद्यालयात शिकत होता.  या शिवाय कॉनरॅड हाबिख्ट हा होता. कॉनरॅड हा बेर्न मधील विद्यापीठात गणित विषयात डॉक्टरेट करत होता. मॉरिस सोलोव्हिन हा नवा मित्र अल्बर्टला बेर्नमध्ये मिळाला. भौतिकी मधील खाजगी शिकवणीसाठी अल्बर्टने जी जाहिरात केली होती त्याला प्रतिसाद देऊन मॉरिस प्रथम अल्बर्टच्या संपर्कात आला होता. हळूहळू त्या दोघांची मैत्री इतकी गाढ बनली की शिकवणी संपल्यावर ते दोघे भौतिकीचा पाया असलेल्या तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा करत रहात.

जून महिन्यात अखेरीस ज्या संधीची अल्बर्ट चातकासारखी वाट बघत होता ती त्याला प्राप्त झाली. फेडरल पेटंट ऑफिसकडून त्याला असे कळवण्यात आले की ज्या नोकरीसाठी त्याने अर्ज केला होता ती नोकरी त्याला हवी असल्यास मिळू शकेल. बेर्न सारख्या महाग शहरात कुटुंबाचा चरितार्थ चालू शकेल एवढा पगार या नोकरीतून मिळणार नव्हता. परंतु अल्बर्ट एवढा गरजू होता की त्याने नोकरी लगेचच स्वीकारली आणि  तो कनिष्ठ दर्जाचा पेटंट लिपिक बनला. विद्युत शक्तीवर चालणारी उपकरणे तपासणे आणि त्यांच्या उपयुक्ततेबद्दल मत देणे असे त्याच्या कामाचे स्वरूप होते. नोकरीसाठी उमेदवारीचा काळ 2 वर्षांचा होता. या काळानंतर सरकारी ऑफिस त्याची नोकरी कायमस्वरूपी करु शकणार होते किंवा तो अपात्र ठरल्यास त्याला डच्चू देणार होते.

त्या उन्हाळ्यात किंवा फॉल सीझनमधे मिलेव्हा अल्बर्टकडे स्विट्झरलॅन्डला गेली. आश्चर्याची गोष्ट  म्हणजे जाताना ती लिझेर्लला हंगेरीमधेच ठेवून गेली. अल्बर्टने अपल्या मुलीला अजूनही पाहिले नव्हते. या मधल्या काळात अल्बर्टच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. धंद्यात आलेली खोट हे त्यामागचे प्रमुख कारण होते. या आजाराने लवकरच गंभीर रुप धारण केले. 1902च्या ऑक्टोबर महिन्यात काळजीने ग्रस्त झालेल्या अल्बर्टने मिलानला जाऊन हर्मनची भेट घेतली. हर्मन त्यावेळी मृत्यूशय्येवरच होता. हर्मनने अल्बर्टला त्यावेळी सांगून टाकले की अल्बर्ट आणि मिलेव्हा यांच्या विवाहाला असलेला त्याचा विरोध आता संपला आहे. एवढे सांगून त्याने अल्बर्टला खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्याचा मृत्यू अल्बर्टने बघू नये अशी बहुधा हर्मनची इच्छा असावी. मृत्युसमयी हर्मनचे वय फक्त 55 वर्षे इतकेच होते व विधवा झालेली पॉवलिन फक्त 44 वर्षांची होती.

हर्मनच्या मृत्यूनंतर 3 महिन्यांनी किंवा  6 जानेवारी 1903 या दिवशी अल्बर्ट आणि मिलेव्हा बेर्नमधे अखेरीस विवाहबद्ध झाले. ते प्रथम भेटले त्याला साडेसहा वर्षे झाली होती तर लिझेर्लच्या जन्माला 1 वर्ष झाले होते आणि अल्बर्टची नवीन नोकरी सुरु झाली त्याला सहा महिने झाले होते. लग्न अगदी साधे आणि सिव्हिल मॅरेज पद्धतीने पार पडले. लग्नाला फक्त दोनच पाहुणे हजर होते, आइनस्टाइनचे मित्र मॉरिस सोलोव्हिन आणि कॉनरॅड हाबिख्ट.  आपल्या पतीचे निधन आणि तिला नापसंत असलेल्या मुलीशी होणारे मुलाचे लग्न या दोन्ही कारणांमुळे अतिशय उद्विग्न असलेली पॉवलिन लग्नाला हजर राहिली नव्हती. आइनस्टाइन कुटुंबातील अल्बर्ट हा पहिलाच मुलगा असा होता की ज्याने यहुदी नसलेल्या मुलीशी लग्न केले होते. नवीन लग्न झालेल्या या जोडप्याने आपले वैवाहिक जीवन बेर्नमधील टिलिएरस्ट्रासे रस्त्यावरील एका नव्या अपार्टमेंट मधे सुरु केले. लग्नाच्या पार्टीनंतर उशिरा घरी परतल्यानंतर आइनस्टाइनच्या हे लक्षात आले की तो त्याच्या नवीन घराच्या किल्ल्या कुठेतरी विसरला आहे. घरात प्रवेश करण्यासाठी त्याला घरमालकाला रात्री उठवणे भाग पडले होते. थोड्याच दिवसात आइनस्टाइनने आपल्या मित्रांना सांगितले की तो त्याच्या नव्या पत्नीबरोबर आरामदायी आयुष्य घालवतो आहे. त्याची पत्नी नेहमी आनंदी रहात असे. ती चांगली गृहिणी होती आणि तिला स्वैपाक सुद्धा चांगला करता येत होता.

बेर्न हे मोठे सुरेख आणि चैतन्यशील गाव होते. गावातील विद्यार्थी आणि बुद्धिमान मंडळी नेहमीच निरनिराळे कॅफे किंवा कोणाच्या तरी घरी ग्रूप्स करून चर्चा करण्यासाठी जमत असत. आइनस्टाइन कुटुंब त्या वातावरणात उत्तम रित्या मिसळून गेले. आइनस्टाइनला आपले विचार मोकळेपणे मांडण्यासाठी आणि इतरांबरोबर संवाद साधण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची गरज होती. 1903च्या वसंत ऋतूत आइनस्टाइन, मॉरिस सोलोव्हिन आणि कॉनरॅड हाबिख्ट यांनी एका व्यासपीठाची स्थापना केली व त्याला गंमतीने ऑलिम्पिया अ‍ॅकॅडमी असे नाव दिले. पृथ्वीवर राज्य करणार्‍या बलाढ्य टायटन्सना ज्याने पराभूत केले होते त्या ऑलिम्पस पर्वतावर रहाणार्‍या ग्रीक देवाच्या नावावरून हे नाव त्यांना सुचले होते. ही अ‍ॅकॅडमी म्हणजे एक चर्चा ग्रूप होता. या ग्रूपमधे ही मंडळी त्या वेळच्या महत्त्वाच्या वैज्ञानिक आणि बुद्धिनिष्ठ विषयांवर चर्चा करत असत. कार्ल पिअरसन, डेव्हिड ह्यूम, अर्न्स्ट माख, जॉर्ज फ्रेडरिक रिमन, बरुच स्पिनोझा आणि हेनरी पॉइनकेअर या सारख्या लेखकांच्या  तत्त्वज्ञानावरील पुस्तकांवर अनौपचारिक चर्चा होत असे. बर्‍याच वेळा ही चर्चा मध्यरात्र उलटून गेली तरी चालू राही. काही वेळेस आइनस्टाइन व्हायोलिनवर एखादी गत वाजवत असे तर काही वेळा कोणीतरी अभिजात वाङमयामधील एखादा भाग वाचून दाखवत असे. काही वेळा या सभांचे रुपांतर सोशल गेटटूगेदरमधे  होत असे व तेथे थोडाफार उच्छृंखलपणाही चालत असे. मिलेव्हा या छोट्या ग्रूपचा एक भाग होती परंतु ती बहुतांशी श्रवणभक्ती करत असे. भौतिकी आणि तत्त्वज्ञान यावरील चर्चेत सक्रिय भाग घेण्यापेक्षा छोट्या लिझेर्लचा विचार करणे तिला जास्त पसंत असावे. या चर्चाग्रूप्सची आठवण काढून आइनस्टाइन पुढे म्हणतो की या ग्रूप्स मध्ये बुद्धिनिष्ठ आणि स्पष्ट असलेल्या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करताना एखाद्या लहान मुलाला व्हावा तसा आनंद होत असे.

या चर्चाग्रूपमधे भाग घेणार्‍यांपैकी कॉनरॅड हाबिख्ट हा बेर्न विद्यापीठात गणित या विषयाचे अध्ययन करत होता. तो व्हायोलिन उत्तम वाजवत असे. पुढे तो आइनस्टाइनचा जिवलग मित्र बनला आणि अखेरपर्यंत त्याचा आइनस्टाइनशी पत्रव्यवहार सुरु होता. 1907 आणि 1910च्या दरम्यान कॉनरॅड हाबिख्ट, त्याचा भाऊ पॉल आणि आइनस्टाइन यांनी सहकार्याने एक उपकरण तयार केले होते. या उपकरणाच्या सहाय्याने अगदी क्षीण स्वरुपातील विद्युतशक्ती मोजता येत होती. आइनस्टाइनने या उपकरणाला “लिटल मशिन” असे नाव दिले होते. चर्चाग्रूपमधील मॉरिस सोलोव्हिन याला आइनस्टाइन “सोलो” असे म्हणत असे. त्याला ह्युमानिटिज व विज्ञान या विषयांच्यात विशेष रस होता.

1903च्या सप्टेंबर महिन्यात मिलेव्हा तिचे आई-वडिल आणि लिझेर्ल यांना भेटण्यासाठी म्हणून नोवि  सादला गेली होती. तिथून तिने अल्बर्टला एक क्लेशदायक बातमी कळवली. लिझेर्ल “स्कार्लेट फीव्हर” या तापाने आजारी होती. आइनस्टाइनने मिलेव्हाला काळजी वाटत असल्याचे पत्र लगेच पाठवले. या पत्रात तो विचारतो की लिझेर्लचे रजिस्ट्रेशन कसे केले आहे? परंतु या पत्राला आलेले मिलेव्हाचे उत्तर कधीच सापडलेले नाही आणि ते कदाचित नष्ट करण्यात आलेले असावे. लिझेर्लचा जन्म किंवा बाप्तिस्मा यांची नोंद कोठेतरी नक्कीच केलेली असली पाहिजे. परंतु त्याचा कोणताही पुरावा कधीच सापडलेला नाही. आइनस्टाइनच्या पत्रात उल्लेख केलेले लिझेर्लचे रजिस्ट्रेशन कदाचित तिला दत्तक घेण्याबद्दलचे कागदपत्र असू शकतात.

लिझेर्लला जन्मानंतर स्विट्झरलॅन्डला कधीच का आणले गेले नाही याबद्दल आइनस्टाइनच्या आयुष्यावर संशोधन करणार्‍या संशोधकांनी दोन दशके निरनिराळे अंदाज बांधले आहेत. अशी शक्यता वाटते की लिझेर्लच्या जन्माच्या वेळी आइनस्टाइन पेटंट ओफिसमधील मुलकी सेवेतील नोकरी मिळवण्याच्या खटपटीत होता. त्याला अनौरस संतती आहे ही बाब त्याला ही नोकरी मिळण्याच्या दृष्टीने अडचणीची ठरु शकत होती. स्विट्झरलॅन्ड हा देश त्या वेळी अतिशय पुराणमतवादी असल्याने लिझेर्लचा जन्म ही बाब गुप्त ठेवण्याचे मेलिव्हा व अल्बर्टने कदाचित ठरवले असावे. एकदा आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांचे लग्न झाले की तिला स्विट्झरलॅन्डला आणण्याचे त्यांनी ठरवलेले असावे.

एक गोष्ट नक्की आहे. आइनस्टाइन निदान प्रथमदर्शी तरी लिझेर्लला त्यांच्याबरोबर ठेवण्यास अनुकूल होता आणि त्याची तशी इच्छाही होती. लिझेर्लच्या जन्मानंतर थोड्या दिवसांनी मिलेव्हाला लिहिलेल्या पत्रात तो मिलेव्हाला लिहितो की आपण अजून लिझेर्लला आपल्याबरोबर कसे ठेवता येईल हे ठरवलेले नाही. मिलेव्हला हंगेरीला पाठ्वलेल्या पत्रात तो लिहितो. “मला तिला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचे नाहिये.” परंतु नंतरच्या काळात त्याने मिलेव्हाला पटवून देण्याचा अजिबात प्रयत्न केलेला दिसत नाही की तिने लिझेर्लला स्विट्झरलॅन्डला घरी घेउन यावे. काही लोकांच्या मते लिझेर्लला काहीतरी विकृती असली पाहिजे ज्या योगे अल्बर्ट आणि मिलेव्हाला तिची काळजी घेणे स्विट्झरलॅन्डमध्ये शक्य नव्हते. ही विकृती कदाचित अवघड बाळंतपणामुळे आली असण्याची शक्यता आहे. परंतु सर्वात जास्त शक्यता वाटते ती ही की त्या फॉल सीझनमध्ये अल्बर्ट आणि मिलेव्हा यांनी लिझेर्लला स्विट्झरलॅन्डला आणणे किंवा दत्तक घेणे याबद्दलचा कोणताही निर्णय घेण्याआधीच स्कार्लेट फीव्हरमुळे लिझेर्ल हे जग सोडून गेली असावी. तेंव्हा या आजाराची मोठी साथ आली होती व अनेक माणसे मृत्यूमुखी पडलेली होती. मिलेव्हाच्या मैत्रिणींच्या मताने त्या सुमारास मिलेव्हा अतिशय काळजीग्रस्त आणि मूडी बनलेली होती आणि त्यांना असे वाटत होते की ती आणि अल्बर्ट यांच्यामध्ये काहीतरी मोठे बिनसलेले आहे. कोणत्याही आईप्रमाणे मिलेव्हाला आपली मुलगी आपल्याजवळ निदान लग्नानंतर तरी असावी असे वाटत असणार. तिचे कुटुंबीय निदान तात्पुरत्या स्वरुपात तरी तिला आर्थिक मदत करण्याच्या परिस्थितीत नक्कीच होते. परंतु काही कारणांमुळे अल्बर्ट याला तयार नव्हता.

हे सगळे अंदाज आहेत. नक्की माहीत एवढेच आहे की लिझेर्लला स्कार्लेट फीव्हर झाल्यानंतर पुढे तिचे नाव अल्बर्ट आणि मिलेव्हा किंवा इतर कोणी यांच्या कोणत्याही प्राप्त पत्रव्यवहारात उल्लेखिलेले आढळत नाही. मात्र याचा अर्थ असा होत नाही की अल्बर्ट, मिलेव्हा किंवा त्यांचे इतर नातेवाईक यांच्या बोलण्यात कधी लिझेर्ल आलीच नाही किंवा तिच्या जाण्याबद्दल कोणी शोक केला नाही. परंतु अल्बर्ट आणि मिलेव्हा यांच्या बेर्न मधील परिचितांना लिझेर्लबद्दल काहीच माहिती कधीच झाली नाही. तिचे आयुष्य पुढची अनेक दशके गुप्तच राहिले. 75 वर्षांनी जेंव्हा अल्बर्ट आणि मिलेव्हा यांच्यामधील त्या काळातील  पत्रव्यवहाराचा शोध लागला तेंव्हा लिझेर्लच्या जन्माबद्दलची माहिती उघडकीस आली. लिझेर्लचे पुढे काय झाले हे रहस्यच राहिले आहे.

लिझेर्लच्या जन्मानंतर दीड वर्षाने किंवा 1903च्या फॉल सीझनमधे मिलेव्हाने अल्बर्टला हंगेरीहून पत्र लिहून आपण पुन्हा गर्भारशी असल्याचे कळवले. या पत्राला पाठवलेल्या उत्तरात अल्बर्टने तिला ही बातमी वाचून तो अतिशय आनंदी झाला असल्याचे आणि तो तिची आतुरतेने वाट बघत असल्याचे कळवले. त्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात नवीन बाळाच्या आगमनाप्रीत्यर्थ आइनस्टाइन जोडप्याने बेर्नच्या एका स्टायलिश रस्त्यावरील दोन खोल्यांच्या अपार्टमेंटमधे आपले बिर्‍हाड हलवले. या वेळेपर्यंत भौतिकीतील परिक्षेत दोनदा आलेले अपयश आणि दोन बाळंतपणे या गोष्टींमुळे मिलेव्हाची स्वत:च्या व्यावसायिक करियरमधील रुची पूर्णपणे संपलेली होती. भौतिकीचे जग आता नवर्‍यावर सोडून देऊन एक गृहिणी म्हणून नवे आयुष्य तिने सुरु केले होते.

बेर्नमधे आइनस्टाइन एका  वैज्ञानिक असोसिएशनचा सभासद झाला होता. भौतिकी शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि वैज्ञानिक विषयांत रुची असणारे इतर लोक या असोसिएशनचे सभासद होते.  डिसेंबर महिन्यात आइनस्टाइनने आपले पहिले व्याख्यान या असोसिएशन समोर दिले, विषय होता “थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅगनेटिक वेव्ह्ज.” आइनस्टाइन या असोसिएशनच्या सभांना जरी नियमित उपस्थित रहात असला तरी तो सभांमधे औपचारिक रित्या फारसा बोलत नसे. असोसिएशनच्या सभासद वैज्ञानिकांच्या घरी अनौपचारिक रितीने  काही जण जमलेले असताना तेथे भाषण देणे त्याला जास्त पसंत होते.  झुरिच विद्यापीठात करण्याच्या डॉक्टरल डेझर्टेशनसाठीचा नवा विषय या सुमारासच त्याच्या डोक्यात घोळू लागला होता.

आणखी एका अवघड बाळंतपणानंतर मिलेव्हाला 14 मे 1904 रोजी पहिला मुलगा झाला. त्याचे नाव हान्स अल्बर्ट असे ठेवले गेले. या वेळी नवे बाळ आपल्या आई-वडिलांबरोबर राहिले आणि वयाच्या 25व्या वर्षी आइनस्टाइनने कुटुंब आणि नवे बाळ यांची जबाबदारी स्वीकारली. या वेळेपर्यंत मिलेव्हाच्या आई-वडिलांना पॉवलिनप्रमाणेच मिलेव्हाचे अल्बर्टबरोबर झालेले लग्न फारसे पसंत नव्हते. परंतु नातवाच्या जन्मानंतर त्यांनी बरेचसे जुळवून घेतले. पॉवलिनने सुद्धा अनिच्छेने का होईना, आपला विरोध बराच सौम्य केला आणि अल्बर्ट, मिलेव्हा यांना हायसे वाटले. भावनिक आणि बौद्धिक या दोन्ही पातळ्यांवर त्यांचे वैवाहिक जीवन आता बरेच सुखकर झाले.

आइनस्टाइनच्या व्यावसायिक आयुष्यात सुद्धा आता चांगले बदल होऊ लागले होते. सप्टेंबर महिन्यात पेटंट ऑफिसमधील त्याच्या नोकरीचा उमेदवारी काळ संपून तो कायम झाला होता व त्याला एक छोटीशी पगारवाढही मिळाली होती. वर्षापूर्वीच्या  उन्हाळ्यात अल्बर्टने मेकॅनिकल इंजिनीअर असलेला त्याचा जिवलग मित्र मिशेल बेसो याला पेटंट ऑफिसमध्ये वरिष्ठ हुद्द्यावर असलेल्या एका नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी गळ घातली होती. 13 इतर उमेदवारांमधून बेसोची या जागेसाठी निवड झाल्याने साहजिकच तो अतिशय आनंदी होता. बेसोच्या निवडीमुळे हे दोघेही मित्र एकाच शहरात आणि व्यवसायात कार्यरत होते. आइनस्टाइन आणि बेसो हे दोघेही जण झुरिचमधे रहात असताना त्यांची प्रथम भेट झाली होती. आइनस्टाइनला बेसो प्रथमदर्शनीच आवडला होता व त्याच्या सखोल ज्ञानामुळे आइनस्टाइनला त्याच्याविषयी आदरभावही होता. कुठलीही नवीन कल्पना आली की प्रथम ती बेसोच्या कानावर घालून त्याचे मत आइनस्टाइन विचारत असे व असे करण्यासाठी बेसो हा युरोपमधील सर्वात चांगला श्रोता आहे असे आइनस्टाइनचे मत होते. 
आइनस्टाइनला बेसोच्या वैयक्तिक गुणांचे कौतुक होते व त्याच्याबरोबरच्या पत्रव्यवहारात आइनस्टाइनला त्याच्याबद्दल वाटत असलेला जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येतो. बेसोचा विवाह आइनस्टाइनची पहिली गर्ल फ्रेन्ड मेरी हिची बहिण अ‍ॅना विन्टेलेर हिच्याबरोबर 1898 मध्ये झाला होता. अ‍ॅना आणि मिलेव्हा या सुद्धा चांगल्या मैत्रिणी होत्या. बेसोने आपल्या आयुष्यात आपल्याला आनंद मिळवून देणार्‍या दोन गोष्टी, पत्नी आणि पेटंट ऑफिसमधली नोकरी, या मिळवून दिल्याबद्दल आइनस्टाइनचे आभार पुढच्या काळात मानले आहेत.

बेर्नमधे आइनस्टाइन आपल्या आर्थिक अडचणींतून अखेरीस बाहेर आला. त्यानंतर त्याने घालवलेली पुढची काही वर्षे त्याच्या आयुष्यातील सर्वात सर्जनशील म्हणता येतील. कोणत्याही वैज्ञानिक तज्ञांच्या संपर्कात नसताना त्याने आपल्या सर्वात क्रांतीकारक कल्पना या काळात कल्पून विकसित केल्या होत्या. मिलेव्हा मार्च 1903 मधे एका मैत्रिणीला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हणते की पेटंटसाठी आलेले अर्ज तपासण्याचे काम अल्बर्टला अत्यंत कंटाळवाणे वाटत होते व दुसर्‍या चांगल्या नोकरीच्या शोधात तो होता. परंतु अल्बर्टला दुसरी नोकरी मिळणे दोन कारणांसाठी कठिण होते. पहिले कारण म्हणजे त्याची दुसर्‍याला बोचेल अशी बोलण्याची पद्धत आणि दुसरे कारण म्हणजे त्याचा यहुदी धर्म. युरोपात त्यावेळी यहुदी विरोधी वातावरण होते. मिलेव्हा आपल्या पत्रात लिहिते की त्या दोघांनी बुडापेस्ट मधे जर्मन भाषा शिकवण्याच्या नोकर्‍या मिळू शकतील का? याचा शोध घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. कदाचित या प्रयत्नामागे मिलेव्हाच्या मनात लिझेर्ल असण्याची शक्यता आहे. बुडापेस्ट मधे राहिल्यानंतर ती लिझेर्लच्या जवळ राहू शकली असती किंवा निदान लिझेर्ल हंगेरीतच असल्याने तिला वारंवार भेटू शकली असती.

पेटंट ऑफिसमधले काम जरी आइनस्टाइनला पहिल्यांदा नावडीचे आणि कंटाळवाणे वाटले असले तरी खरे म्हणजे तो या कामासाठी अतिशय योग्य व्यक्ती होता. या कामासाठी अशा व्यक्तीची गरज होती जी व्यक्ती छिद्रान्वेषी निर्णय घेऊ शकेल. त्याच्या ऑफिसमधे येणार्‍या उपकरणांपैकी कोणती व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त आहेत व कोणती महत्त्वाची आहेत हे त्याला ठरवावे लागे. यासाठी “आउट ऑफ द बॉक्स” विचार करण्याची खूप गरज होती. पूर्ण दिवसभरासाठी म्हणून जे काम त्याच्याकडे येत असे ते तो काही तासातच संपवून टाकत असे. त्यामुळे स्वतंत्रपणे स्वत:चे काम किंवा विचार करणे त्याला सहज साध्य होत असे. त्याच्या बरोबर काम करणारे बहुतेक जण मेकॅनिकल इंजिनीअर होते आणि तो त्यांच्यामधे एकटाच भौतिकी वैज्ञानिक होता. परंतु पेटंट ऑफिसने त्याला नोकरी मोठ्या सयुक्तिक कारणासाठी दिली होती. त्या वेळी जलद गतीने विकसित होणार्‍या विद्युत उद्योगातील बरेचसे नवे शोध इलेक्ट्रोमॅगनेटिक फेनॉमिननच्या सैद्धांतिक आकलनावर आधारित होते आणि त्याच्याशी आइनस्टाइन चांगलाच परिचित होता. नंतरच्या काळात जेंव्हा त्याने पेटंट ऑफिस सोडले होते आणि तो एक प्रसिद्ध व्यक्ती बनला होता तेंव्हा सुद्धा पेटंट ऑफिस नव्या पेटंट अर्जांबद्दल त्याचे मत विचारत असे आणि आइनस्टाइन ते देत असे. आइनस्टाइन आपले मत देत असे याला कारण म्हणजे तंत्रज्ञानात त्याला असलेली रुची हे होते. या शिवाय त्याच्या स्वत:च्या संशोधनातही त्याला याची मदत होत असे. आइनस्टाइन बेर्नच्या  पेटंट ऑफिसमध्ये काम करत असताना 1906 मध्ये एक जगप्रसिद्ध उत्पादन तेथे पेटंटसाठी आले होते. हे उत्पादन असे होते की ऑफिसमध्ये काम करणार्‍या बहुतेक लिपिकांना त्याची चव घेणे आवडले असते. हे उत्पादन होते विशिष्ट आकाराचा “टॉबलरवन” चॉकोलेट बार. हा चॉकोलेट बार म्हणजे बदाम व मध घातलेले पहिले दुग्ध चॉकोलेट होते.

आइनस्टाइन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत नसल्यामुळे त्याला कामाचे ओझे कमी होते आणि त्याच्याकडे  ऑफिसमध्ये असताना किंवा नंतर भरपूर वेळ होता. या वेळाचा सदुपयोग कल्पकतेने विचार करण्यात त्याने केला व आपले अत्यंत बुद्धिमान कार्य त्याने जगापुढे ठेवले. हे कार्य तो पूर्ण करू शकला फक्त एका वर्षात. त्या वर्षाला “चमत्कारांचे वर्ष” असेच नाव दिले पाहिजे.

‌‌‌‌‌-----------