Friday, 16 January 2015

बेंगलुरू शहरात जंगल राज



श्री कुमारमंगलम हे 40 वर्षाचे गृहस्थ, भारताला अभिमानास्पद (?) वाटेल असे म्हटले जाणार्‍या व माहिती उद्योगाची राजधानी समजल्या जाणार्‍या बेंगलुरू शहरातील कावेरी नगर भागात राहत होते. स्वत: ते वैद्यकीय मदतनीस (paraamedic) म्हणून काम करतात तर त्यांच्या पत्नी श्रीमती माया या बेंगलुरू मधील लायन क्लब हॉस्पिटल मधे परिचारिका म्हणून काम करत असतात. या जोडप्याला 11 वर्षाचा एक मुलगा असून तो शाळेत जातो. श्री. कुमारमंगलम हे त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या 80 फूट X 30 फूट आकाराच्या एका प्लॉटवर बांधलेल्या एका साध्यासुध्या व बैठ्या घरात सुखासमाधानाने आपल्या कुटुंबाबरोबर आयुष्य व्यतीत करत होते.
सोमवार, 29 जुलै 2013 या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे कुमारमंगलम पती-पत्नी आपापल्या कामावर व त्यांचा मुलगा शाळेत गेलेला असताना, श्री. कुमारमंगलम यांना त्यांच्या एका शेजार्‍याकडून त्यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आला. शेजार्‍याने फोनवर सांगितलेले वृत्त ऐकून त्यांना अक्षरशः आपल्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे वाटू लागले. शेजारी सांगत असलेल्या बातमीप्रमाणे, श्री. कुमारमंगलम यांचे साधेसुधे बैठे घर, बुलडोझरच्या सहाय्याने सुमारे 20 गुंडांची एक टोळी पोलिसांच्या नजरेसमोर त्या वेळेस जमीनदोस्त करत होती.
श्री. कुमारमंगलम ही बातमी ऐकताच त्वरेने आपल्या कामावरून निघाले व घरी पोहोचले. तोपर्यंत त्यांच्या घराला फक्त उध्वस्त विटा दगडांचा एक ढीग असे स्वरूप आले होते व त्या ढिगात इतस्तत: पडलेल्या व या जोडप्याने पै अन पै करून जमवलेल्या फर्निचर, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि इतर गृहोपयोगी वस्तू रस्त्यावरच्या चोराचिलटांनी केंव्हाच लंपास केल्या होत्या. श्री. कुमारमंगलम यांनी आपले घर उध्वस्त करणार्‍या गुंडांच्या टोळीला अटकाव करण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्या गुंडांनी त्यांच्यावरच हल्ला करून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. श्री. कुमारमंगलम यांनी आपल्या फोनवरून मित्रांना बोलावण्याचा प्रयत्न केल्यावर एका गुंडाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व समोरच्या जमावातील एका तरूणाकडे फेकला. त्या तरूणाने त्वरेने तो मोबाईल घेऊन तेथून पोबारा केला. या सर्व प्रसंगात सर्वात क्लेशदायक जर काय असले तर हे घर पाडले जात असताना त्या भागाचा चार्ज ज्यांच्याकडे होता असे पोलिस समोर उभे राहून हे सर्व दृष्य निर्विकारपणे बघत होते. पोलिस फक्त तेथे जमलेल्या व घरातील सामानाची लूटमार करणार्‍या जमावामुळे वाहतुकीचा खोळंबा तर होत नाही ना! या कडेच फक्त लक्ष देत होते.
श्री. कुमारमंगलम मग तेथून त्वरेने जवळच्याच पोलिस चौकीवर गेले व तेथे त्यांनी आपली तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ही बाब दिवाणी कायद्याच्या अंतर्गत येत असल्याचे सांगून त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अतिशय हताश होऊन निर्वाणीचा प्रयत्न म्हणून कुमारमंगलम मग बेंगलुरूचे पोलिस कमिशनर, राघवेंद्र एच. औरडकर यांच्या कचेरीत मदत मागण्यासाठी गेले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली.
पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे कुमारमंगलम यांचे घर उध्वस्त करणारे गुंड कर्नाटक विधानसभेचे विद्यमान सभासद असलेल्या एका व्यक्तीचे संबंधित आहेत. या गुंडानी कुमारमंगलम यांचे घर ज्या ठिकाणी होते त्या कावेरी नगर भागात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. एक साधेसुधे मध्यमवर्गीय असलेल्या असलेल्या कुमारमंगलम यांना या प्रकारानंतर असुरक्षिततेच्या भावनेने चांगलेच पछाडले आहे. ते म्हणतात: ” माझ्या एखाद्या स्वप्नात सुद्धा मला कधी असे वाटले नव्हते की माझ्यावर फूटपाथवर, माझे स्वत:चे घर असून, रात्र घालवण्याची कधी वेळ येईल. या गुंडांच्या दहशतीमुळे माझे शेजारी सुद्धा माझ्याशी संभाषण करू इच्छित नाहीत.” या प्रसंगानंतरच्या दोन रात्री ते व त्यांचे कुटुंब यांनी जवळील एका मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पदपथावर घालवल्या आहेत.

कुमारमंगलम यांच्या एका बालमित्राने त्यांना आपल्या घरी रात्री राहण्यासाठी बोलवले होते. परंतु त्याचे घर एक शयनकक्ष असलेले लहानसे असल्याने कुमारमंगलम यांना तेथे जावे असे वाटत नाही. त्यांच्या पत्नी परिचारिका म्हणून काम करत असलेल्या लायन्स क्लब आय हॉस्पिटलने त्यांच्या निवासाची तात्पुरती सोय करण्याचे मान्य केले आहे आणि त्यांचे केरळ राज्यातील एर्नाकुलम येथे रहात असलेले काही नातेवाईक त्यांच्या मदतीसाठी पुढच्या 2/3 दिवसात बेंगलुरुला दाखल होतील असे दिसते आहे. परंतु कुमारमंगलम यांच्या मनात स्वत:च्या प्लॉटवरच तात्पुरती एक शेड उभारून रहावे असे आहे. कुमारमंगलम यांच्या मनात आता खरी भीति कसली असली तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची आहे. ते म्हणतात: ” मी माझे घर तर गमावून बसलोच आहे आता मला माझ्या कुटुंबाला गमवायचे नाहीये. या गुंडांनी मी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली असल्याने माझ्या मुलाचे अपहरण केले आणि माझ्या पत्नीला काही केले तर मी काय करू?” बेंगलुरुचे अतिरिक्त पोलिस कमिशनर( कायदा व सुव्यवस्था) यांच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी 8 व्यक्तींना आतापर्यंत अटक केली आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रसंगात पोलिसांची वर्तणुक व त्यांनी दाखवलेला गलथानपणा याची चौकशी करण्याचेही आदेश दिलेले आहेत.
कल्पना सुद्धा करता येणार नाही असा हा सर्वच प्रकार अतिशय धक्कादायक आहे असे मला वाटते. बेंगलुरू शहरात काय प्रकारची कायदा व सुव्यवस्था आता प्रत्यक्षात आहे या बद्दल संभ्रमच माझ्या मनात उत्पन्न झाला आहे. विधानसभेचे सभासद हे काय कायद्याच्या कक्षेबाहेर असतात काय? की ज्यायोगे ते कोणतेही अवैधानिक कृत्य स्वत:च्या मर्जीप्रमाणे करू शकतात. अशा प्रकारची गुंडागिरी रोकणे व सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करून त्यांचे नागरी हक्क अबाधित राखणे हे कोणत्याही शासनाचे प्रथम कर्तव्य आहे असे मला वाटते. कर्नाट्क सरकारने कुमारमंगलम यांचे झालेले नुकसानीची त्वरित रित्या भरपाई केली पाहिजे व ही नुकसानीची रक्कम गुन्हेगारांकडून, ते कितीही बडे असले तरी, वसूल केली पाहिजे.
एक गोष्ट मात्र आता दगडावरच्या रेषेसारखी स्पष्ट होते आहे. 50 वर्षांपूर्वी निवृत्त आणि मध्यमवर्गीय यांच्यासाठी स्वर्गसमान असेलेले बेंगलुरू शहर आता अत्यंत बकाल व गुंडांच्या तावडीत असलेले एक शहर झाले आहे व ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
( हा लेख व यातील छायाचित्रे ही द हिंदू या वृत्तपत्रातील एका बातमीच्या आधाराने)
2 August 2013