व्यवस्थित
जेवणखाण करून तुम्ही नेहमीच्याच वेळेला झोपी गेले आहात. का कोण जाणे
तुम्हाला अचानक जाग येते. घड्याळात बघितले तर साडेबारा वाजलेले दिसतात. परत
झोपायचा प्रयत्न करताना तुमच्या लक्षात येते की तुम्हाला खूप भूक लागली
आहे. पोटात अगदी खड्डा पडल्यासारखे झाले आहे. तुमची पावले आपसुकच फ्रीजकडे
वळतात. फ्रीजमधे फ्रूट सॅलड, पेस्ट्री किंवा कमीतकमी बर्फी तरी आहेच आहे.
पण थांबा. अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी, उंदरांच्यावर काही नवीन प्रयोग करून असे निरिक्षण केले आहे की जे उंदीर अशा विचित्र वेळेला खाणे खातात ते बाकीच्या उंदरांच्या दुप्पट प्रमाणात लठ्ठ होतात. शास्त्रज्ञांनी या सर्व उंदरांना सारख्या प्रमाणातच अन्न दिले होते व त्या सर्वांच्या कडून सारखाच व्यायाम करून घेतला होता. तरी सुद्धा नियमित वेळेला खाणे खाल्लेल्या उंदरांच्यापेक्षा अनियमित वेळेस खाणे घेतलेल्या उंदरांचे वजन दुप्पटीपेक्षा जास्त वाढले होते.
या अभ्यासावरून एक नवीनच गोष्ट उघडकीस आली आहे. आपण कसे आणि काय खातो? या बरोबरच आपण कधी खातो हे ही तितक्याच महत्वाचे आहे आणि 24 तासातल्या काही वेळा भोजन करण्यासाठी अयोग्य आहेत. आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असते. या घड्याळाचा सुद्धा आपल्या खाण्याशी काहीतरी संबंध आहे असे दिसते आहे.
शिफ्ट करणार्या कर्मचार्यांसाठी हा महत्वाचा शोध आहे कारण त्यांच्या जेवणखाण्याच्या वेळा बहुदा अनियमित असतात. त्याचप्रमाणे काही लोक प्रमाणाबाहेर लठ्ठ का होतात? या प्रश्नाचे उत्तर कदाचित यातून मिळू शकेल. फक्त किती अन्न खाल्ले आणि किती व्यायाम केला यावर लठ्ठ्पणा अवलंबून असतो असे आतापर्यंत आहारतज्ञांचे म्हणणे होते. पण या अभ्यासावरून असे दिसते की आहार कधी घेतला जातो हे पण तितकेच महत्वाचे आहे.
आता आहारशास्त्रज्ञ, खालेल्या अन्नाचे प्रमाण याशिवाय झोप, शरीराचे तपमान आणि त्या व्यक्तीच्या शरीरातल्या हार्मोन्सची पातळी, या घटकांचाही लठ्ठपणाशी संबंध काय आहे? याचा अभ्यास करत आहेत.
मी काही आयुर्वेदाचा तज्ञ नाही पण माझ्या समजूतीप्रमाणे आयुर्वेदात कोणत्या ऋतुत कोणते अन्न, कधी खावे याबद्दल मार्गदर्शक तत्वे आहेत. कदाचित पूर्वीच्या वैद्यांना, अन्न अयोग्य वेळेस खाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात ही गोष्ट निरिक्षणांअंती लक्षात आली असावी.
9 सप्टेंबर 2009